भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, March 31, 2010

१७. आशा नाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला ।

१७. आशा नाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला ।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्तिपङ्गुवत् ॥

अर्थ

माणसांमधे आशा नावाची एक आश्चर्यकारक बेडी आहे. ह्या बेडीने बांधलेली माणसे सतत धावत असतात आणि मोकळे असलेली माणसे पाय नसल्याप्रमाणे एका जागी बसतात.

१६. पृथीव्याम् त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।

१६. पृथीव्याम् त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थ

ह्या पृथ्वीवर पाणी, अन्न आणि सुभाषिते ही ३ रत्ने आहेत. मुर्ख मात्र दगडांना रत्न म्हणून संबोधतात.

१५.आत्मनो मुखदोषेण बध्यंते शुकसारिका:|

१५.आत्मनो मुखदोषेण बध्यंते शुकसारिका: |
बकास्तत्र न बध्यंते मौनम् सर्वार्थसाधनम् ||

अर्थ

पोपट आणि साळुंक्या स्वत:च्या [गोड आवाजाच्या खरंतर गुण पण लोकांनी पकडण्याच्या दृष्टीने] दोषामुळे बंधनात पडतात. बगळे [काही आवाज करत नसल्यामुळे] पकडले जात नाहीत [म्हणून] मौन सर्व हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याचे साधन आहे.

Tuesday, March 30, 2010

१४. अस्माकं बदरीचक्रम्‌ युष्माकं बदरीतरु : |

१४. अस्माकं बदरीचक्रम्‌ युष्माकं बदरीतरु : |
बादरायणसंबधात्‌ यूयं यूयं वयम्‌ वयम् ||

अर्थ
आमच्या [बैलगाडीला] बोराच्या लाकडाचं चाक आहे. तुमच्याकडे बोरीचे झाड आहे. म्हणून तुम्ही म्हणजे आम्हीच आणि आम्ही म्हणजे तुम्ही. [अगदी सुताएवढं नातं किंवा संबध असताना त्याचा फायदा घेणारे लोक असतात ते असं नातं सांगतात]

१३. मनोजवं मारूततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धीमताम् वरिष्ठम् |

१३. मनोजवं मारूततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धीमताम् वरिष्ठम् |

वातात्मजं वानरयूथमुख्यम्‌ श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ||

अर्थ

आज हनुमान जयंती आहे त्यानिमित्त हा श्लोक रामरक्षेमधला.

[मी] वाऱ्याप्रमाणे आणि मनाइतका वेग असणाऱ्या; इंद्रिये ताब्यात असणाऱ्या; बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या; वायुदेवाचा पुत्र असलेल्या; वानरांच्या सेनेचा प्रमुख असणाऱ्या श्रीरामाचा दूत असणाऱ्या [हनुमानाला] शरण जाते /जातो.

१२. अपूर्वः कोऽपि कोपाग्निः खलस्य सज्जनस्य च।

१२. अपूर्वः कोऽपि कोपाग्निः खलस्य सज्जनस्य च।

एकस्य शाम्यति स्नेहात् वर्धतेड्न्यस्य वारितः ॥

अर्थ

सज्जन आणि दुर्जन यांचा कोप रूपी अग्नी [भयंकर राग] याचे वर्णन करता येत नाही. पहिल्याचा [सज्जनाचा]राग स्नेहाने [आग असूनही स्नेह म्हणजे प्रेमाने]विझतो आणि दुसऱ्याचा वारित: [संस्कृतमध्ये वारि म्हणजे पाणी वारित: म्हणजे पाण्याने तसेच अडवले असता असा त्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे] दुर्जनाचा राग वाढतो.

स्नेहाने एकाचा राग विझणे वारी [पाण्यामुळे]वाढणे असा सकृतदर्शनी विरोधाभास कवीने वर्णिला आहे.

११. अपूर्वः कोऽपि कोषोयम् विद्यते तव भारती।

११. अपूर्वः कोऽपि कोषोयम् विद्यते तव भारती।
व्ययतो वृद्धिमायाति व्ययमायाति संचयात॥

अर्थ

हे सरस्वती, तुझ्याकडे विद्यारुपी विलक्षण खजिना आहे. ज्याचा खर्च केला असता त्या खजिन्यात वाढ होते आणि तो साठवुन ठेवल्यास त्याचा क्षय होतो.

१०. स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपङकजस्मरणम् |

१०. स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपङकजस्मरणम् |
वासरमणिरिव तमसाम् राशीन्नाशयति विघ्नानाम् ||

अर्थ

ज्याच्या मुखाला शेंदूर लावलेला आहे असा; ज्याच्या चरणकमलांचे स्मरण केले असता ; सूर्य ज्याप्रमाणे अंधाराच्या लोटांचा नाश करतो त्याप्रमाणे ; संकटांचा नाश होतो ; अशा देवाचा [गणेशाचा] जयजयकार असो.

Monday, March 29, 2010

९. गौरवं प्राप्यते दानात्‌ न तु वित्तस्य संचयात्‌ |

९. गौरवं प्राप्यते दानात्‌ न तु वित्तस्य संचयात्‌ |
स्थितिरुचै: पयोदानाम्‌ पयोधीनाम्‌ अध: स्थिति: ||

अर्थ

संपत्तीचे दान करण्यामुळे मोठेपणा मिळतो साठा करण्यामुळे नव्हे. याला कवींनी दृष्टांत दिला आहे. पयोद [पाणी देणारे = ढग] ते दान करतात म्हणून त्यांची जागा वर असते.  पयोधि [पाण्याचा साठा करणाऱ्या = समुद्राची] जागा खाली असते.

८. दुर्जन: परिहर्तव्य: विद्ययाऽलंकृतोऽपि सन|

८. दुर्जन: परिहर्तव्य: विद्ययाऽलंकृतोऽपि सन|
मणिना भूषित: सर्प: किमसौ न भयङकर:||

अर्थ

सुशिक्षित असला तरी दुष्ट माणूस टाळावा ज्याच्या [फण्यावर] रत्न असते असा साप भीतीदायक नसतो काय? [निश्चित असा साप भीतीदायक   असतो.]

Sunday, March 28, 2010

७. शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पंडित: |

७. शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पंडित: |
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||

अर्थ 

शंभर मुले जन्माला येतात तेंव्हा एक शूर जन्माला येतो हजारांमध्ये एक विद्वान असतो दहा हजारांमध्ये एक [चांगला] फर्डा वक्ता असतो [पण] उदार माणूस जन्माला येतो असे नाही कधी जन्माला येतो कधी येत पण नाही.
[यातील शेवटच्या वा न वा म्हणजे होतो किंवा होत पण नाही या शब्दांवरून वानवा म्हणजे दुर्मिळता असा शब्द मराठीत तयार झाला आहे]

Saturday, March 27, 2010

६. माता पिता गुरुश्चेति त्रयो वन्द्या नृणां सदा।

६. माता पिता गुरुश्चेति त्रयो वन्द्या नृणां सदा।
आयुर्यशो बलं चेति त्रीण्याप्नोति तदाशिषा॥

अर्थ

माणसांनी नेहमी आई, वडील आणि शिक्षक [गुरु ] यांना नमस्कार केला पाहीजे त्यांच्या आशीर्वादाने दीर्घ आयुष्य, कीर्ति आणि ताकद मिळते.

Friday, March 26, 2010

५. माता मित्रम्‌ पिता चेति स्वभावात्‌ त्रितयम्‌ हितम्‌ |

५. माता मित्रम्‌ पिता चेति स्वभावात्‌ त्रितयम्‌ हितम्‌ |
कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धय:||

अर्थ

निसर्गत: आई, वडील आणि मित्र हे त्रिकूट  [आपल्याला ] कल्याणकारक असते ते आपल्या हितासाठी झटत असतात इतर सगळेजण काही निमित्ताने आपल्या हिताची इच्छा करतात. [त्यांचा स्वत:च्या फायदा तोट्याचा विचार करून सल्ला देतात.]

Thursday, March 25, 2010

४. अनारम्भो हि कार्याणाम् प्रथमं बुद्धीलक्षणम् |

४. अनारम्भो हि कार्याणाम् प्रथमं बुद्धीलक्षणम् | प्रारब्धस्यान्तगमनम्‌ द्वितीयं बुद्धीलक्षणम् ||

अर्थ

कामाला मुळीच सुरवात न करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे. पण माणसाला काहीतरी [काम]करावच लागत त्यामुळे जे [काम]सुरु केले असेल ते पूर्ण करणे हे बुध्दीचे दुसरे पण खरे लक्षण आहे.

Wednesday, March 24, 2010

३. राकारोच्चारमात्रेण मुखान्नीर्याति पातकम् |

३. राकारोच्चारमात्रेण मुखान्नीर्याति पातकम् | पुन: प्रवेशभीत्या एव मकारस्तत् कपाटवत् ||

अर्थ


राम हा उच्चार इतका पवित्र आहे की फक्त राचा उच्चार झाल्यावर पाप तोंडाबाहेर पळून जाते आणि त्याने पुन्हा आत प्रवेश करू नये म्हणून म चा असा उच्चार आहे की दाराच्या फळ्या बंद झाल्याप्रमाणे तोंड बंद होते त्यामुळे पाप परत आत येऊ शकत नाही.

२. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ |

२. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यार्थसिद्धये ||

अर्थ

हे मुख वक्र असणाऱ्या, शरीर विशाल असणाऱ्या, कोटी सूर्याच्याप्रमाणे तेजस्वी अशा देवा [माझी] सर्व कामे पूर्णव्हावी म्हणून [तू] सर्व संकटे नाहीशी कर.

Monday, March 22, 2010

१. न चोरहार्यं न च राजहार्यम् न भ्रातृभाज्यम् न च भारकारी ।

१. न चोरहार्यम् न च राजहार्यम् न भ्रातृभाज्यम् न च भारकारी ।
व्यये कृते वर्धत एव नित्यम् विद्याधनं सर्वधनप्रधानम् ||

अर्थ


विद्यारूपी धन हे सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये श्रेष्ठ प्रकारची संपत्ती आहे. [कारण] चोर ती पळवू शकत नाही, राजा कर वगैरे रीतींनी घेऊ शकत नाही. तिची भावांमध्ये वाटणी होऊ शकत नाही. तिचे ओझे होत नाही. ती खर्च केली [दुस-याला दिली, शिकवलं] तर वाढते.