भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 29, 2011

३२८. सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं परिपालनम् |

अनित्वात्तु चित्तानां मतिरल्पेऽपि भिद्यते ||


वाल्मिकी रामायण

अर्थ

मित्र मिळवणे अगदी सोपे आहे. पण मैत्री टिकवणे अतिशय अवघड आहे. मनाचा स्वभाव चंचल असल्यामुळे अगदी थोड्या गोष्टींवरून बुद्धी फिरते. [आणि भांडण होते]

३२७. बलवानपि निस्तेजाः कस्य नाभिभवास्पदम् |

निःशङ्कं दीयते लोंकैः पश्य भस्मचये पदम् ||

अर्थ

सामर्थ्य असूनही ज्याच्या ठिकाणी तेज नाही [जो स्वाभिमानीपण दाखवत नाही] त्याचा कोण बरे अपमान करीत नाही? पहा लोक राखेच्या ढिगाऱ्यावर खुशाल पाय देतात.

३२६. प्रजापीडनसंतापात् समुद्भूतो हुताशनः |

राज्ञः कुलं श्रियं प्राणान् नादग्ध्वा विनिवर्तते ||

अर्थ

प्रजेला त्रास दिल्यामुळे उत्पन्न झालेला [असंतोषाचा] अग्नि राजाचे ऐश्वर्य, घराणं आणि प्राण जाळल्याशिवाय माघारी फिरत नाही.

३२५. अनुकूले विधौ देयं, यतः पूरयिता हरिः |

प्रतिकुले विधौ देयं, यतः सर्वं हरिष्यति ||

अर्थ

नशीब अनुकूल असताना भरपूर द्यावे कारण पुरवणारा हरीच आहे [कमी पडणारच नाही] आणि दैव प्रतिकूल असताना देखील यथा शक्ति दान करावे, कारण नाही तरी सर्स्वाचे हरण होणारच आहे, मग निदान चांगला उपयोग तरी झाला.

Wednesday, March 23, 2011

३२४. उत्तमो नाति वक्ता स्यादधमो बहु भाषते |

सुवर्णें न ध्वनिस्तादृग्यादृक्कांस्ये प्रजायते ||

अर्थ

थोर माणूस फार बोलत नाही. अति बडबड करणारा माणूस क्षुद्र असतो. काशाचा जेवढा आवाज येतो तेवढा सोन्याचा येत नाही.

३२३. भयेन भेदयेद्भीरुं शूरमञ्जलिकर्मणा |

लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा ||

अर्थ

घाबरट माणसाला दरारा दाखवून दहशतीने फोडावे, तेच शूर माणसाला नम्रता दाखवून वळवावे, लोभी माणसाला पैसे देऊन आपलेसे करावे आणि बरोबरीच्या किंवा कमी दर्जाच्या माणसावर आपला प्रभाव पडून वश करून घ्यावे.

३२२. नपुंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः |

तत्तु तत्रैव रमते हताः पाणिनिना वयम् ||

अर्थ

[या पाणिनीने आमचा सर्वस्वी घात केला त्याने] मन नपुंसक [लिंगी] असे सांगितल्यावरून आम्ही मनाला [बिनधास्त] प्रियेकडे पाठवलं आणि ते [बेट] तिथेच रमलं. पाणिनीनेच आम्हाला ठार केलं.

Friday, March 18, 2011

३२१. अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम् |

विषं सभा दरिद्रस्य; वृद्धस्य तरुणी विषम् ||

अर्थ

[शिकवलेल्याचा] अभ्यास केला नाही तर शास्त्र हे विषासारखे घटक होते. पहिले अन्न पचण्यापूर्वीच पुन्हा खाल्ले तर तेही विषच बनते. दरिद्री माणसाला सभा अनिष्ट ठरते. जक्ख म्हाताऱ्याला तरुणी विषतुल्य बनते.

Wednesday, March 16, 2011

३२०. दिग्वाससं गतव्रीडं जटिलं धूलिधूसरम् |

पुण्याधिका हि पश्यन्ति गङ्गाधरमिवात्मजम् ||

अर्थ

[अंगावर कपडे मुळीच नसलेलं] दिगंबर, [अजून] लाज वाटायला लागली नसलेलं, जावळ अस्ताव्यस्त उडणार, धुळीने सर्वांग माखलेल असं, शंकराची सगळी लक्षण असलेलं आपलं लेकरू बघण्याचं भाग्य पुण्यवंतानाच लाभत.

३१२. व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम् |

आयुः परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम् ||

अर्थ

जरा [म्हातारपण] वाघिणी सारखी डरकाळ्यांनी भिववित समोर उभीच असते. रोग हे शत्रूसारखे शरीरावर घावावर घाव घालीतच असतात. तडा गेलेल्या माठातून पाणी झीरपावं तसं आयुष्य वेगानी कमी होतयं. तरीहि माणूस आपल्या अकल्याणाच्या गोष्टी करीतच असतो हे आश्चर्य आहे.

Monday, March 14, 2011

३१९. लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता |

दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ||

अर्थ

व्यायामाने शरीर हलके होते, बोजड राहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरीरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या [चांगल्या] गोष्टी होतात.

३१८. अलङ्करोति हि जरा राजामात्यभिषग्यतीन् |

विडम्बयति पण्यस्त्रीमल्लगायकसेवकान् ||

अर्थ

वार्धक्य हे राजा, मंत्री, वैद्य, सन्यासी यांना भूषणास्पद असते. तर वेश्या, मल्ल, गायक, नोकर यांचे हाल करते, विडंबना करते.

३१७. शीलभारवती कान्ता पुष्पभारवती लता |

अर्थभारवती वाणी भजते कामपि श्रियम् ||

अर्थ

सत्चारित्र्य असणारी पत्नी, फुलांनी लगडलेली वेल, अर्थसंपृक्त भाषा यांना काही आगळेच सौंदर्य प्राप्त होते.

३१६. उद्योगः कलहः कण्डुर्द्यूतं मद्यं परस्त्रियः |

आहारो मैथुनं निद्रा सेवनात्तु विवर्धते ||

अर्थ

व्यवसाय, भांडण, अंगाची खाज, जुगार, दारू पिणं, परस्त्रीगमन, आहार, मैथुन आणि झोप या गोष्टी सुरु केल्या की सतत वाढतच जातात.

Monday, March 7, 2011

३१५. अपराधो न मेऽस्तीति नैतद्विश्वासकारणम् |

विद्यते हि नृशंसेभ्यो भयं गुणवतामपि ||

अर्थ

माझी काहीच चूक नाही असे [दुष्टांनी त्रास न देण्यास पुरेसे] कारण नाही. अत्यंत गुणी माणसांनाहि दुर्जनांपासून भीती असतेच. [दुष्टांना दुसऱ्याचं चांगलं पाहवत नाही व ते त्रास देतातच.]

३१४. उत्तमो नातिवक्ता स्यादधमो बहुभाषकः |

काञ्चने न ध्वनिस्तादृग्यादृक्कांस्ये प्रजायते ||

अर्थ

थोर माणूस फार बोलत नसतो. अति बडबड करतो तो क्षुद्र असतो. काश्याच्या भांड्याचा जेवढा आवाज येतो; तेवढा सोन्याचा येत नाही.

३१३. धन्या केयं स्थिता ते शिरसि ? शशिकला; किन्नु नामैतदस्याः ? नामैवास्यास्तदेतत्परिचितमपि ते विस्मृतं कस्य हेतोः |

नारीं पृच्छामि नेन्दुं ; कथयतु विजया न् प्रमाणं यदीन्दुर्देव्या निन्होतुमिच्छोरिति सुरसरितं शाठ्यमव्याद्विभोर्वः ||

अर्थ

'ही कोण बरं तुमच्या डोक्यावर बसलीय? धन्य [आहे बाई]', [ही तर] शशिकला', 'हे तिचे नाव आहे काय?', ' हो हे तिचे नावच आहे. तुला ते चांगले माहित आहे विसरलीस काय?'. 'मी स्त्री बद्दल विचारतेय चन्द्रकलेबद्दल नाही.' [येथे विचारणे हे क्रियापद द्विकर्मक असल्याचा फायदा घेऊन शंकरांनी असा अर्थ घेतला मी स्त्रीला विचारीन चंद्राला नाही] 'ठीक आहे चंद्रावर विश्वास नसेल तर विजयेला सांगू देत' - अशा रीतिने गंगेला पार्वतीपासून दडवून शिवाने लबाडी केली - [भगवान शंकर] तुमचे रक्षण करो.

Thursday, March 3, 2011

३११. संध्यासलिलाञ्जलिमपि कङ्कणफणिपीयमानमविजानन् |

गौरीमुखार्पितमना विजयाहसितः शिवो जयति ||

अर्थ

पार्वतीच्या मुखाकडे लक्ष असल्यामुळे संध्याकाळच्या [सन्ध्येतील] अर्घ्याचे पाणी हाताला वेटोळे घातलेल्या सर्पाने प्यालेले लक्षात न् आल्यामुळे [ज्याला] विजया [पार्वतीची सखी] हसली अशा भगवान शंकराचा [नेहमी] विजय होतो.

३१०. अहिभूषणोऽप्यभयदः सुकलितहालाहलोंऽपि यो नित्यः |

दिग्वसनोऽप्यखिलेशस्तं शशधरशेखरं वन्दे ||

अर्थ

[भीतिदायक असे] सर्प हेच अलंकार असूनही जो [प्राणिमात्रांना] भीती मधून मुक्त करतो, हलाहलासारखे जहरी विष पिऊन सुद्धा जो अमर आहे, दिगंबर असूनही जो सर्व जगाचा स्वामी आहे, अशा चंद्राला डोक्यावर धारण करणाऱ्या [महादेवाला मी] वन्दन करतो.

Wednesday, March 2, 2011

३०९. न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते |

गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ||

अर्थ

[दगडविटांनी बांधलेले] घर म्हणजे घर नव्हे तर त्यातील घरधनीण म्हणजे घर. गृहिणी नसलेले घर म्हणजे अरण्याहुनही भयंकर स्थान असते.