भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, June 28, 2012

७१५. गिरौ कलापी गगने पयोद: लक्ष्यान्तरेऽर्कंश्च जलेषु पद्मम् |

इन्दुर्द्विलक्षे कुमुदस्य बन्धुर्यो यस्य हृद्यो न हि तस्य दूर: ||

अर्थ

मेघ हा आकाशात असतो आणि मोर पर्वतावर असतो [तरी ढग दिसल्यावर मोर नाचत सुटतो] सूर्य एक लाख [मैलावर] असतो आणि कमळ पाण्यात असतं [तरी सूर्य उगवल्यावर कमळ उमलत ] रातकमळाचा  बांधव [मनापासून आवडता ] चन्द्र दोन लाख [मैलावर] अंतरावर असतो. [ते पण चंद्रोदय झाल्यावर विकसित होत ]  तर एखाद्याच्या मनात ज्यानी जागा मिळवली आहे तो त्याच्यासाठी जवळच असतो. [तो लांब असला तरी आपल्या मनात त्याच्या बद्दल विचार चालूच असतात.]

टीप: अंतरे लक्षात न घेता अर्थ लक्षात घ्यावा, कारण त्याकाळामधे कदाचीत कवीला चंद्र सूर्यापेक्षा लांब आहे असे वाटत असेल.

७१४. अवृत्तिकं त्यजेद्देशं वृत्तिं सोपद्रवां त्यजेत् |

त्यजेन्मायाविनं मित्रमन्नं प्राणहरं त्यजेत्  ||

अर्थ

ज्या प्रदेशात [आपल्याला] उपजीविकेचे साधन नसेल त्या ठिकाणाचा त्याग करावा. ज्या धंदा किंवा नोकरीचा त्रास होत असेल तर ती सोडून द्यावी. फसव्या [किंवा मनातून शत्रूसारखा आणि वरवर गोड बोलणाऱ्या] मित्राला टाळावे. जिवाला धोका होईल असे [कुपथ्याचे] जेवण जेवू नये.

७१३. देहीति वचनं कष्टं नास्तीति वचनं तथा |

तस्माद्देहीति नास्तीति न भवेज्जन्मनि  जन्मनि  ||

अर्थ =  'देहि' [दे]  असं बोलणं आणि तसंच 'नास्ति ' [नाही] असं उत्तर देण अतिशय अवघड असत म्हणून आताच्या आणि पुढच्या कुठल्याही जन्मात 'देहि ' किंवा 'नास्ति ' असं म्हणण्याची वेळ यायला नको. [रे बाबा ]

Monday, June 25, 2012

७१२. मार्जारभक्षिते दु:खं यादृशं गृहकुक्कुटे |

न तादृङ्ममताशून्ये कलविङ्केऽमूषके  ||

अर्थ

घरातला कोंबडा जर मांजरीनी खाल्ला तर [आपल्याला] जसं दु:ख होत तसं ज्याच्यावर आपला जीव नाही अशी चिमणी किंवा उंदीर तिनी खाल्ला तर आपल्याला होत नाही. [आपल दु:ख हे खरं तर आपल्या आसक्ती मुळे असतं. ]

Sunday, June 24, 2012

७११. मुक्त्वा नि:श्रीकमप्यब्जं मराली न गतान्यत: |

भ्रमराली त्वगाद्वेगादिदं सदसदन्तरम् ||

अर्थ

ज्याचं वैभव लयाला गेलेलं आहे [ज्यातला मध संपलाय; ते सुकलय अशा] कमळाला हंसी [तरीसुद्धा] सोडून जात नाही. पण भुंग्यांची रांग [मात्र सगळी] वेगात उडून जाते. हाच सज्जन आणि दुर्जन यांच्यातला फरक आहे.

७१०. जीर्यन्ति जीर्यत: केशा: दन्ता जीर्यन्ति जीर्यत: |

जीवनाशा धनाशा च जीर्यतोऽपि न जीर्यति  ||

अर्थ

म्हातारपण आल्यामुळे [वृद्धांचे] केस गळतात; दात पडत जातात. पण [खूप] वृद्ध झाला तरी पैशाची हाव आणि जगण्याची इच्छा कमी होत नाही. [खरं तर जसं जसं  म्हातारपण येईल तसं तसं  आसक्ती सोडली पाहिजे.]
७०९. वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये  |
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ || रघुवंश १

अर्थ

[मी] शब्द आणि अर्थ यांचे सम्यक आकलन होऊन [मनोहर काव्यनिर्मिती व्हावी म्हणून] शब्द आणि अर्थ जसे एकमेकात सामावलेले असतात त्याप्रमाणे समरस असलेल्या; सर्व जगाचे माता पिता असलेल्या देवी पार्वती आणि भगवान शंकर यांना वंदन करतो.

Thursday, June 21, 2012

७०८. कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त: शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः |


यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु  स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु  || मेघदूत १

अर्थ

धन्याने [कुबेराने; यक्षाने] स्वतःच्या कामात हयगय केल्यामुळे प्रियेशी मोठा विरह करणारा; वर्षभर भोगावा लागणारा; शाप दिल्यामुळे; ज्याची थोरवी विलयाला गेली आहे अशा यक्षाने; जेथे सीतेने  स्नान केल्यामुळे  पवित्र झालेले [सीताकुंड]  आहे अशा; [घनदाट] सावली  देणारे विपुल वृक्ष असणाऱ्या रामगिरी येथील [विशाल] आश्रमात वास्तव्य केले.

Wednesday, June 20, 2012

७०७. अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज: |

पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य  स्थित: पृथिव्या  इव  मानदण्ड: ||

अर्थ

उत्तर दिशेला; पृथ्वी मोजण्यासाठी प्रमाणभूत मानकच जणू काही असा; सर्व पर्वतांचा सम्राट; देवताचा  आत्म्याप्रमाणे असलेला [दैवी शक्तीअसणारा; पवित्र; सात्विक असा; देवतांचे निवासस्थान असणारा], हिमालय पर्वत पूर्व आणि पश्चिम [बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर] समुद्रामधे अवगाहन करून उभा आहे. 

आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करतात.  कालीदासाबद्दल अशी आख्यायिका आहे - विद्वत्तमा नावाची नावाप्रमाणे असणारी राजकन्या स्वयंवरासाठी असा पण लावते की जो तिला वादात हरवील त्याच्याशी ती विवाह करील. जे हरत त्यांचा ती खूप अपमान करत असे. याचा प्रधानाला राग आला आणि त्याने एका मूर्खाला पकडून त्याचं मौन चालू आहे तेंव्हा खुणांनी वाद कर असे सांगितले आणि त्याच्या खुणांच्या उत्तरांचा आपल्याला सोयीस्कर असा उत्तम अर्थ लावणारे पण्डित त्याच्या मागे ठेवले आणि मग तो विजयी झाला. मग अर्थातच तिनी त्याच्याशी लग्न केलं. 

पण तिला लवकरच हा मूर्ख आहे हे तिच्या लक्षात आलं. मग तिने अपमान केल्यामुळे दुखावलेल्या त्या तरुणाने काली देवीची उपासना केली तो विद्वान होऊन परत आला. पण त्याला तिनी पहिलाच प्रश्न विचारला; 'अस्ति कश्चित् वाग्विशेष:' [तुमच्या वाणीमध्ये काही वैशिष्ठय  {सौंदर्य} प्राप्त झाले काय?] ते सौंदर्य ज्यात अप्रतिम आहे अशा काव्यांची त्यांनी रचना केली. त्यात "अस्ति 'नी सुरु होणारा कुमारसंभव मधिल पहिला श्लोक.

Monday, June 18, 2012

७०६. अजायुद्धं ऋषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् |

दम्पत्यो: कलहश्चैव परिणामे न किञ्चन ||

अर्थ

बोकडांची झुंज; ऋषींच श्राद्ध; सकाळी आभाळ भरून येण; जोडप्याच [आपसातल] भांडण, या गोष्टी घडल्या तरी पुढे त्याचा [पुढच्या काळात] काहीच फरक पडत नाही. [ऋषींच श्राद्ध करायची जरूरच नसते; आभाळ आलं म्हणून पाऊस पडेलच असं काही नाही आणि त्या झुंजी ते लोक लक्षात ठेवत नाहीत. पुढे सगळं व्यवस्थित चालू रहात.]

७०५. कर्ता कारयिता चैव प्रेरकश्चानुमोदक: |

सुकृते दुष्कृते चापि चत्वार: समभागिन: ||

अर्थ

चांगल किंवा वाईट काम [स्वतः] करणारा; [ते] करवून घेणारा [अंमलबजावणी करवणारा]; प्रेरणा देणारा आणि पाठिंबा देणारा ह्या चौघांचं [पुण्य किंवा पाप] सारखं असतं. [चांगुलपणा किंवा बदमाशी त्यांच्यामध्ये सारखीच ठरते.]

७०४. एकवस्तुं द्विधा कर्तुं बहवः सन्ति धन्विन: ||

धन्वी स मार एवैको द्वयोरैक्यं करोति य: ||
 
अर्थ
 
एका वस्तूचे दोन [किंवा  अधिक] तुकडे करणारे खूप धनुर्धर आहेत. पण एकच [आश्चर्यकारक] धनुर्धर [मदन] आहे की जो [त्याच्या धनुष्याचा नेम धरून] दोघांच्या मधे ऐक्य घडवून आणतो. [तोडफोडी  न करता उलट जोडण्याचं काम करतो.]

७०३. अहिं नृपञ्च शार्दूलं कीटञ्च बालकं तथा ||

परश्वानञ्च मूर्खञ्च सप्त सुप्तान्न बोधयेत् ||

अर्थ

सर्प; राजा; वाघोबा; किडा; लहान मूल; दुसऱ्याचं कुत्र; आणि मूर्ख हि सात मंडळी झोपली असतील तर त्यांना उठवू नये.

Thursday, June 14, 2012

७०२. अकुर्वन्तोऽपि पापानि शुचय: पापसंश्रयात् |

परपापैर्विनश्यन्ति मत्स्या नागह्रदे यथा ||

अर्थ

स्वत: पाप केल नसलं; आपण पवित्र असलं तरी पापी लोकांना आधार दिल्यामुळे; दुसऱ्यांच्या दुष्कृत्यांमुळे;  ज्याप्रमाणे साप असलेल्या तळ्यामधल्या बेडकांचा [त्यांचा काही दोष नसताना नाश होतो.] त्याप्रमाणे; [स्वतः स्वच्छच  असले तरी] नाश होतो.

७०१. मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसञ्चितम् |

दम्पत्यो: कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागता ||

अर्थ

ज्या [घरी] मूर्ख लोकांना मान दिला जात नाही; धान्य व्यवस्थितरित्या  साठवून ठेवलं जात; नवरा -बायको भांडत नाहीत; त्या ठिकाणी लक्ष्मी स्वतः आलेलीच असते. [तिची वाट पहावी लागत नाही.]

Tuesday, June 12, 2012

७००. अन्नदानं परं दानं विद्यादानमत: परम् |

अन्नेन क्षणिका तृप्ति: यावज्जीवं च विद्यया ||

अर्थ

अन्नाच दान करणं हे फार मोठ दान आहे. विद्या शिकवणं हे त्यापेक्षाही श्रेष्ठ दान आहे [कारण] अन्नामुळे थोडासाच वेळ समाधान होत तर विद्येनी आयुष्यभरच  समाधान होत. [ते ज्ञान मिळवल्याने आयुष्याचं कल्याण होत.]

Monday, June 11, 2012

६९९. कार्यार्थी भजते लोकं यावत्कार्यं न सिध्यति |

उत्तीर्णे च परे पारे नौकाया: किं प्रयोजनम्  ||

अर्थ

ज्याला काम पूर्ण करण्याची [गरज आहे  तो] काम होई पर्यन्त  आधार घेतो. [गोड बोलतो; काही भेट वस्तु देतो.] [नदी ] पार करून दुसऱ्या तीरावर गेल्यानंतर नावेचा काय उपयोग?  [काम झालं की मग कोणी फिरकणार नाही याची कल्पना मनात ठेवून मदत करावी म्हणजे नंतर वाईट वाटणार नाही.]

६९८. शाखायां सुखमासीन: सलीलं विध्यते खग: |

उत्पन्स्त्वनपाय: स्यादनुद्योगो भयावह: ||

अर्थ

[पारधी] झाडावर आरामात बसलेल्या पक्षाला सहजी मारतात. [तेच] तो उडत असला तर त्याला काही धोका नसतो [अशारीतीने] आराम [काही न करणं] या पासून धोका असतो.

६९७. स्वयं स्वधर्मं चरता शुभं यद् यद्वाशुभं प्राप्यत एव किञ्चित् |

स्वस्थेन चित्तेन तदेव सर्वमनन्यगत्या मनुजेन भोग्यम् ||

अर्थ

आपण स्वतः स्वधर्माने आचरण करीत असता; जे काही आपल्या आयुष्यात येतच; ते मग कल्याणकारक असो का हानिकारक; त्याला दुसरा पर्याय नसल्यामुळे; माणसाने शान्त चित्ताने भोगावे [किंवा उपभोगावे] [आपलं आचरण आदर्श असूनही सुखं आणि दु:ख दोन्ही भोगावीच लागतात. त्यांचा त्रास किवा फार आनंदाच्या उकळ्या न फुटू देता स्थितप्रज्ञतेनी आयुष्य जगता आल पाहिजे.]

Friday, June 8, 2012

६९६. न केवलं प्रयुञ्जान: परेष्वपकृतिं स्वयम् |

क्रियमाणामरुन्धानोऽप्यन्यैर्भवति दोषभाक् ||
 
अर्थ
 
लोक फक्त स्वतः दुसऱ्याचं नुकसान करणाऱ्यालाच [दोषी म्हणत नाहीत] तर [नुकसान] करणाऱ्याला  न अडवणाऱ्याला पण दोषी ठरवतात. [तुम्ही सत्ताधारी असताना; स्वतः स्वच्छ प्रतिमेचे असून पुरेस  नाही. घोटाळे करणाऱ्याला तुम्ही थांबवलं  पाहिजे.]

६९५. यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे |

कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित  उच्यते ||

अर्थ

ज्याचा [मनातला] बेत; मसलत ; त्यांनी केलेलं खलबत दुसऱ्यांना समजत नाही, नंतर त्याची कृती [यशस्वी] झाल्यावरच समजते त्याला पण्डित असे म्हणतात. [उगाच कामाचा गवगवा करून पूर्ण काहीच नाही असं न करता काम पूर्ण झाल्यावरच लोकांना सांगाव तर तो शहाणा.]

Wednesday, June 6, 2012

६९४. उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणम् |

तडागोदरसंस्थानां परीवाह इवाम्भसाम्  ||

अर्थ

तलावाच्या उदरात साठवलेले पाणी पाट काढून [शेतीला पुरवणे जस चांगलं] त्याप्रमाणे भरपूर संपत्ती मिळवल्यानंतर त्याच दान करणे हाच ती रक्षण करण्याचा चांगला उपाय आहे.

Tuesday, June 5, 2012

६९३. बुधाग्रे न गुणान् ब्रूयात्साधु वेत्ति यत: स्वयम् |

मूर्खाग्रेऽपि च न ब्रूयात् बुधप्रोक्तं न वेत्ति स: ||

अर्थ

[आपले] गुण विद्वान माणसाला सांगू नयेत, कारण त्याला स्वतःलाच ते समजतात आणि मूर्ख माणसा समोर पण आपलं गुणगान करू नये, कारण शहाण्यांनी सांगितलं तरी त्याला कळतच नाही. [मग आपलं स्वतःच गुणगान करून काय उपयोग? म्हणून आपले गुण आपण स्वतः कधी गाऊ नयेत.

६९२. य: पृष्ट्वा कुरुते कार्यं प्रष्टव्यान् स्वान् हितान् गूरून् |

न तस्य जायते विघ्न: कस्मिंश्चिदपि कर्मणि ||

अर्थ

जो [कठिण] काम सल्ला घेण्यासाठी योग्य अशा हितचिंतकाना ; मोठ्या माणसाना; विचारून मग करतो त्याला कुठल्याही कामात अडचण येत नाही.

Monday, June 4, 2012

६९१. परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् |

वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भं पयोमुखम् ||

अर्थ

तोंडाशी दूध आणि आत विष असणाऱ्या घड्या प्रमाणे असणाऱ्या; डोळ्यासमोर गोड बोलणाऱ्या आणि दृष्टी आड झाल्यावर कार्याचा नाश करणाऱ्या मित्राचा त्याग करावा. [त्याला टाळावे.]

६९०. निर्वाणदीपे किमु तैलदानं चौरे गते वा किमु सावधानम् |

वयोगते का  खलु मल्लविद्या पयोगते क: खलु सेतुबन्ध: ||

अर्थ

दिवा विझल्यावर तेल घालून काय उपयोग? चोरांनी चोरी केल्यानंतर पहारा ठेवून काय उपयोग? म्हातारपणी कुस्ती शिकून काय उपयोग?  पाणी वाहून गेल्यावर बंधारा बांधून काय उपयोग?

Friday, June 1, 2012

६८९. मणिर्लुठति पादेषु काच: शिरसि धार्यते |

यथैवास्ते तथैवास्तां काच; काचो मणिर्मणि: ||

अर्थ

[जरी] रत्न हे पायदळी पडलं आणि काचेला डोक्यावर घेतलं तरी जसं [मान  द्यायचा असेल तसं ] असो तरीही रत्न ते रत्न आणि काच ती काच.

[रत्नान्योक्ती- जरी वशिल्याच्या माणसाला अधिक मान मिळाला आणि दुसऱ्या हुशार मंडळींचा कोणी कंटाळा केला तरी शेवटी जिथे हुशारीची जरुरी असेल तिथे त्यांनाच बोलवावे लागते.]