भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, July 31, 2013

१०७२. यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिसेवते |

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ||

अर्थ

निश्चित गोष्टी करायच्या सोडून जो अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबाबतीत नक्की पूर्ण होणाऱ्या गोष्टी न केल्यामुळे नाहीशा होतात आणि अध्रुव हे तर घडतच नाही. [त्यामुळे सर्वच शून्य तोट्यात कारभार.]

Monday, July 29, 2013

१०७१. सुखानां स्यात्‌ किमुत्तमं किन्नु त्यक्त्वा सुखी भवेत्?

सुखानां तुष्टिरुत्तमा लोभं त्यक्त्वा सुखी भवेत्‌ ||

अर्थ

कुठलं सुख सर्वात श्रेष्ठ ? कशाचा त्याग केला असता माणूस सुखी होतो ? समाधानी असण हे सर्वात श्रेष्ठ सुख होय लोभ [हाव -आसक्ती ] सोडली की माणूस सुखी होतो

Thursday, July 25, 2013

१०७०. अनाहूत: प्रविशति अपृष्टो बहुभाषते |

अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ||

अर्थ

बोलावलं नसताना येऊन धडकतो, विचारलं नसताना खूप सांगत बसतो; त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी तो [बिनधास्त] विश्वासून राहतो, असा माणूस बेअक्कल क्षुद्र होय.

Tuesday, July 23, 2013

१०६९. एकमेवाक्षरं यस्तु गुरुः शिष्यं प्रबोधयेत् |

पृथिव्यां नास्ति तद्द्रव्यं यद्दत्वा चानृणी भवेत्‌ ||

अर्थ

गुरुनी शिष्याला जरी एखादंच अक्षर शिकवलं तरी; त्यांना एखादी वस्तु देऊन; त्या उपकाराची फेड करता येईल अशी कोणतीही वस्तु या जगात नाही.

१०६८. आस्ते भग आसीनस्योर्ध्वस्तिष्ठति तिष्ठत: |

शेते निपद्यमानस्य चराति चरतो भग: || ऐतरेय ब्राह्मण

अर्थ

बसून राहाणाऱ्याच नशीब बसूनच रहात; आपण उभं राहील तर ते उभं राहात; झोपल्यावर झोपून राहात आणि चाललं [आपण खटपट केली तर] चालतं. [पुढे सरकत - नशिबाला दोष देण्या ऐवजी आपण प्रयत्न केले पाहिजेत.]

Saturday, July 20, 2013

१०६७. रोग-शोक-परीताप-बन्धन-व्यसनानि च |

आत्मापराधवृक्षाणां फलान्येतानि देहिनाम् ||

अर्थ

माणसांनी आपणच केलेले अपराधरूपी जो वृक्ष असतो त्याची फळं म्हणजे - [आपणच केलेल्या चुकांचे परिणाम असतात खरं तर हे] आजारी पडणं; [आपण जास्त; पौष्टीक नसलेलं; वेळीअवेळी खाल्लं की आजारी पडतो] शोक-अति दुःख; मानसिक व्याधि; अडकणं; संकटे.

Tuesday, July 16, 2013

१०६६. धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोकं किमिति निजकलङ्कं नात्मसंस्थं प्रमार्ष्टि |

भवति विदितमेतत्प्रायशः सज्जनानां परहितनिरतानामादरो नात्मकार्ये ||

अर्थ

चन्द्र हा सर्व जगाला उजळवतो [अंधार नाहीसा करतो] मग स्वतःवरचा तो डाग [कलंक] का बरं धुवून टाकत नाही? हे सर्वांना ठाऊकच आहे की पुष्कळ वेळा दुसऱ्याला मदत करण्यात गढून गेलेल्या सज्जनांचे स्वतःच्या कामाकडे फारस लक्ष नसते. [त्यांचा सगळा जीव दुसऱ्याला मदत करण्याकडे असतो. आपण वाईट दिसतोय तर प्रसाधन करावं असं त्यांच्या लक्षात येत नाही.]

Monday, July 15, 2013

१०६५. उदये सविता रक्त: रक्तश्चास्तमने तथा |


सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता ||

अर्थ

उगवण्याच्या वेळी [समृद्धीच्या वेळी] सूर्य तांबूस दिसतो आणि मावळण्याच्या वेळी [हलाखीच्या परिस्थितीत] सुद्धा तो तांबडा दिसतो [यावरून असं दिसत] थोर लोक समृद्धी आणि उतरती कळा या दोन्ही प्रसंगी ते सारखे [माजत ही नाहीत आणि खचत सुद्धा नाहीत.] असतात.

१०६४. दानेन तुल्यः निधिरस्ति नान्यः संतोषतुल्यं सुखमस्ति किं वा |

विभूषणं शीलसमं कुतोऽस्ति ? लाभोऽस्ति  नारोग्यसमः पृथिव्याम् ||

अर्थ

दान देण्यासारखा [उत्तम] दुसरा खजिना नाही. समाधानासारखं दुसरं कुठलं सुख आहे काय? चारित्र्यासारखा [उत्कृष्ट] दागिना मिळतो काय? या जगात तंदुरुस्ती सारखा दुसरा कुठलाही फायदा नाही.

Saturday, July 13, 2013

१०६३. द्वाविमावुदधौ क्षेप्यौ कण्ठे बद्ध्वा दृढां शिलाम् |

श्रीमान्न योऽर्हते दत्ते दरिद्रो योऽलसः सदा ||

अर्थ

गळ्यात मोठा धोंडा चांगला घट्ट बांधून या दोघांना समुद्रात फेकल पाहिजे. - जो श्रीमंत असून लायक व्यक्तीला दान करत नाही त्याला आणि जो गरीब असून सतत आळशीपणा करतो त्याला.

Thursday, July 11, 2013

१०६२. सुन्दरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः |

शोभते न विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम् ||

अर्थ

जरी एखादी व्यक्ती देखणी असली; त्याच चारित्र्य चांगलं असलं; घरंदाज असली; श्रीमंत सुद्धा असली; तरीही शिक्षणाशिवाय [प्रतिष्ठीतपणे] मिरवू शकत नाही. सर्वांनाच विद्या हे भूषण आहे.

Wednesday, July 10, 2013

१०६१. अधमा धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमा: |

उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम् ||

अर्थ

क्षुद्र लोक [कशाही रीतीने मिळाला तरी चालेल पण हवाच अशारीतीने] पैशाची इच्छा [हाव] धरतात. मध्यम प्रकारचे लोक [पैसा तर हवा पण तो] मान मिळेल अशा रीतीने मिळवतात. थोर लोकांना स्वाभिमान महत्वाचा असतो. [धन न मिळालं तरी चालेल, त्यांच तिकडे लक्षच नसत] मान हे त्यांच्यासाठी धन असतं.

Tuesday, July 9, 2013

१०६०. अन्नदानं परं दानं विद्यादानं तत: परम् |

अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं तु विद्यया ||

अर्थ

अन्नाच दान करणं हे फार उत्तम दान आहे. विद्यादान [एखाद्याला एखादी गोष्ट शिकवणं] हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे [कारण] अन्न [दिल्याने] काही काळापुरत समाधान होत. [काही वेळानी पुन्हा भूक लागतेच] ज्ञान [मिळालं की जन्मभर त्याचा उपयोग होतो त्यामुळे] त्याचा आनंद आयुष्यभर होत राहतो.

१०५९. शीलं शौर्यमनालस्यं पाण्डित्यं मित्रसङ्ग्रहः |

अचोरहरणीयानि पञ्चैतान्यक्षयो निधिः ||

अर्थ

चारित्र्य; पराक्रम; उद्योगी असणं [सतत काम करणं] विद्वत्ता आणि [चांगल्या] मित्रांचा संग्रह् या पाच गोष्टी म्हणजे चोर चोरू शकणार नाही असा आणि चिरंतन असा खजिना आहे.

१०५८. कराविव शरीरस्य नेत्रयोरिव पक्ष्मणी |

अविचार्य प्रियं कुर्यात्तन्मित्रं मित्रमुच्यते ||

अर्थ

जो मित्र कुठलाही इतर विचार न करता आपल्या हिताच वर्तन करेल, तोच [खरा ] मित्र.- पापण्या [eyelids डोळ्यांना काही त्रास आहे असं दिसल्यास लगेच मिटतात] किंवा हात शरीराला [इजा होईल असं वाटल्यास प्रतिकार करतात] तसं;

Sunday, July 7, 2013

१०५७. गङ्गा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा | 

पापं तापं च दैन्यं च हन्ति साधुसमागमः ||

अर्थ

गंगा [भागीरथी मधे स्नान केलं तर] पाप नाहीशी होतात. चन्द्र आपल्या [शीतल किरणांनी उन्हाचा] त्रास नाहीसा करतो. कल्पवृक्ष [आपण मागू ती  वस्तू देऊन] गरिबी नाहीशी करतो [हे तिघं एकएक त्रासातून सुटका करतात पण] सज्जनांचा सहवास [एकटाच] ह्या  तिन्ही त्रासातून सुटका करतो.

Friday, July 5, 2013

१०५६. दिवाकराद्रक्षति यो गुहासु लीनं दिवाभीतमिवान्धकारम् |

क्षुद्रेऽपि नूनं शरणं प्रपन्ने ममत्वमुच्चैः शिरसामतीव ||   कुमारसम्भव कालिदास

अर्थ

घुबडाप्रमाणेच सूर्याला भिणाऱ्या गुहांमध्ये दडलेल्या; अंधाराचे [उच्चतम असा हिमालय पर्वत] सूर्यापासून रक्षण करतो. खरोखर अगदी क्षुल्लक [व्यक्ती] जरी शरण आली तरी थोर लोकांना [मनाची आणि शरीराची उंची श्रेष्ठ असणाऱ्यांना] त्यांच्याबद्दल फारच आपलेपणा वाटतो.

Wednesday, July 3, 2013

१०५५. भीतेभ्यश्चाश्रय: देय: व्याधितेभ्यस्तथौषधम् |

देया विद्यार्थिने विद्या देयमन्नं क्षुधातुरे ||

अर्थ

घाबरलेल्याला आसरा द्यावा. त्याचप्रमाणे आजाऱ्याला औषध द्यावं. जिज्ञासूला ज्ञान द्यावं आणि भूकेजलेल्याला अन्न द्यावं.

Tuesday, July 2, 2013

१०५४. फणिनो बहवः सन्ति भेकभक्षणतत्पराः |

एक एव हि शेषोऽयं धरणीधारणक्षमः ||

अर्थ

बेडूक खात राहणारे खूप सर्प असतातच. [सर्व ठिकाणी सामान्य ताकद असणारे लोक खूप असतात.]
पण पृथ्वी तोलून धरण्याची क्षमता असणारा शेषनाग एकटाच.

Monday, July 1, 2013

१०५३. पादपानां भयं वातात्पद्मानां शिशिराद्भयम् |

पर्वतानां भयम् वज्रात्साधूनां दुर्जनाद्भयम्  ||

अर्थ


झाडांना वाऱ्यापासून भीती असते. कमळाना  शिशिर ऋतुमध्ये त्रास होतो. पर्वताना वज्राची भीती असते आणि सज्जनांना दुष्ट लोक त्रास देतात.

१०५२. दुर्जनदूषितमनसां पूसां सुजनेऽपि नास्ति विश्वासः |

दुग्धेन दग्धवदनस्तक्रं फूत्कृत्य पामरः पिबति ||

अर्थ

दुष्टांच्या [दुष्कुत्यांमुळे] ज्यांची मन साशंक झाली आहेत, अशा माणसांचा सज्जनांवर देखील [चटकन] विश्वास बसत नाही [बरोबरच आहे] बिचारा माणूस तोंड दुधानी पोळलं की ताक पिताना सुद्धा फुंकरून पितो.

१०५१. कार्या च महदाकाङ्क्षा क्षुद्राकाङ्क्षा कदापि न |

यथाकाङ्क्षा तथा सिद्धिर्निरीहो नाश्नुते फलम् ||

अर्थ

महत्वाकांक्षा ही नेहमी अगदी मोठी ठेवावी कधीही ध्येय खालचं ठेवू नये. जशी आपली अपेक्षा असेल तसच फळ मिळणार आणि जो निरिच्छ असेल त्याला [काहीच] मिळणार नाही. [ध्येय क्षुद्र असलं तर यश उत्तुंग मिळणारच नाही. इच्छा तर उत्तम ठेवली पाहिजे.]