भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 30, 2013

१०९१. एकेन तिष्ठताधस्तादन्येनोपरि तिष्ठता |

दातृयाचकयोर्भेद: कराभ्यामेव सूचित: ||

अर्थ

एकाचा [दात्याचा] हात वर असतो आणि दुसऱ्याचा [घेणाऱ्याचा] हात खाली असतो. या [उच्च स्थान आणि खालच स्थान] या दोन हातांच्या स्थानामुळे [दाता कोण आणि याचक कोण हे] दाता आणि याचक यांच्यातला फरक कळतो.

१०९०. मन्दं हसन्तं प्रभया लसन्तं जनस्य चित्तं सततं हरन्तम् |

वेणुं नितान्तं मधु वादयन्तं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||

अर्थ

मृदु हास्य करणाऱ्या; तेजाने झळकणाऱ्या सतत लोकांचे चित्त आकर्षित करणाऱ्या; अत्यंत गोड आवाजात बासरी वाजवणाऱ्या बाळकृष्णाचे मी मनापासून स्मरण करते.

Wednesday, August 28, 2013

१०८९. यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः |

ध्यानावास्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ||

अर्थ

अतिशय उत्कृष्ट अशा कवनांनी ब्रह्मदेव; वरुण; इंद्र; मरूतगण ज्याची स्तुती करतात; सामगायन करणारे ऋषि वेदाच्या ऋचांचे यथाविधी पठण करतात; त्याच्यावर लक्ष्य एकाग्र करून त्याच्याच स्वरूपात परिणत होऊन योगी ज्याचं दर्शन घेतात; देव किंवा राक्षस या पैकी कोणालाच ज्याच पूर्ण आकलन झालं नाही अशा परमेश्वराला मी वंदन करते.

Friday, August 23, 2013

१०८८. कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |

कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ||

अर्थ

मोठ्या प्रासादांचा शेवट अंतर्गत भांडणांमुळे, [खूप श्रीमंती असली तरी भाऊबंदकी मुळे सर्वांचे पैसे वकिलाकडे जाऊन ते वैभव रहात नाही.] मैत्रीचा शेवट वाईट बोलण्याने होतो, राष्ट्राचा अन्त वाईट राजामुळे होतो व अपकृत्यामुळे माणसाची कीर्ती लयाला जाते.

१०८७. प्राप्ते भये परित्राणं प्रीतिविश्रम्भभाजनम् |

केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् ||

अर्थ

भीतीदायक [परिस्थिती आली] असता मित्र हा रक्षणकर्ता; प्रेमाचा आणि विसाव्याचे स्थान असतो. मित्र हि दोन अक्षरे असलेले हे रत्न कोणी बरे निर्माण केले. [त्या देवाला धन्यवाद.]

१०८६. काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति |

सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धाः सर्वयत्नाः फलन्ति ||

अर्थ

लाकडे एकामेकावर घासल्यामुळे अग्नि उत्पन्न होतो. [खरं म्हणजे हे फार कठीण काम आहे पण प्रयत्नपूर्वक सतत करत राहिल्यास यश मिळत.] जमीन खणत राहिल्याने [खूप काळाने का होईना] पाणी लागत. उत्साही लोकांना अशक्य असे काही नाही. [योग्य रीतीने] प्रयत्न केल्यावर ते फलद्रूप होतातच.

१०८५. तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले |

यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा ||

अर्थ

[आज संस्कृत -दिन आहे २०/०८/२०१३] जोपर्यंत  आर्यांचा वंश या जगामध्ये अस्तित्वात आहे, तोपर्यंत देवांची असलेली ही नितांतसुंदर आणि सामर्थ्यवान अशी संस्कृत भाषा अढळ स्थानी राहील.

Monday, August 19, 2013

१०८४. पशुखलजनमध्ये खलस्त्याज्यो पशुर्वरम् |

पशवस्तु रक्षणीयाः कृतघ्नो न तु दुर्जनः ||
अर्थ

पशु व दुष्ट माणूस यांमध्ये दुष्टाचा त्याग करणे हे बरोबर आहे. [त्या दोघात] पशु बरा. कृतघ्न, दुष्ट माणसाचे रक्षण करू नये, प्राण्यांच करावं.

१०८३. वचस्तत्र प्रयोक्तव्यं यत्रोक्तं लभते फलम् |

स्थायी भवति चात्यन्तं रागः शुक्लपटे यथा ||
अर्थ

बोलणे ज्याठिकाणी फलदायी होईल [बोलण्याचा जिथे उपयोग होईल] त्याच ठिकाणी बोलावे. पांढऱ्या कापडावर दिलेला रंग पक्का बसतो, त्याप्रमाणे [आधीच गडद अशा रंगावर पुन्हा दुसऱ्या रंगाचा हात दिला तर काहीच उपयोग होत नाही तसं असतं.]

Friday, August 16, 2013

१०८२. न स्वल्पस्य कृते भूरि नाशयेन्मतिमान्नर: |

एतदेव हि पाण्डित्यं यत्स्वल्पाद्भूरि रक्षणम् ||

अर्थ

बुद्धीमान माणसाने छोट्याशा गोष्टी साठी मोठ्या गोष्टींचा नाश करू नये. थोडे [देऊन] मोठ्याचं रक्षण करणे यातच शहाणपण आहे.

१०८१. राष्ट्रध्वजो राष्ट्रभाषा राष्ट्रगीतं तथैव च |

एतानि मानचिह्नानि सर्वदा  हृदि धार्यताम् ||

अर्थ

आपला राष्ट्रध्वज [तिरंगा] राष्ट्रगीत [वन्दे मातरम्; जन गण मन] आणि राष्ट्रभाषा हिंदी, ही आपली मानचिह्ने आहेत. त्यांचा आपण नेहमी आदर राखला पाहिजे.

Wednesday, August 14, 2013

१०८०. विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः |

आवेष्टितो महासर्पैश्चन्दनो न विषायते ||

अर्थ

संगत [वाईट] असली तरी त्या दोषामुळे सज्जन लोक बिघडत नाहीत. मोठमोठ्या [विषारी] सापांनी वेटोळी घातली, तरीसुद्धा चंदनाचे झाड विषारी बनत नाही.

Tuesday, August 13, 2013

१०७९. ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्मप्रधानं न तु बुद्धिहीनम् |

तस्माद्द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||

अर्थ

कृती शिवाय ज्ञान श्रेष्ठ नाही [निरुपयोगी आहे] बुद्धी शिवाय कर्म देखील चांगले नाही [डोकं चालवाल्याशिवाय कामाची  हमाली देखील वाया जाते] तेंव्हा दोन्ही [बुद्धी आणि कृती यामुळे] चांगले फळं मिळेल, कारण पक्षी एका पंखाने उडू शकत नाही [नुसत ज्ञान असून उपयोग नाही त्याला कृतीची जोड हवी विचारपूर्वक काम केलं तरच यश मिळत.]

१०७८. पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता |

पवर्गरचिता मूर्तिरपवर्गप्रदास्तु वः ||
 
अर्थ
 
पिनाक [त्रिशूळ] णी [सर्प] बालेन्दु [चंद्रकोर] स्म आणि  मंदाकिनी [गंगा] या "प " वर्गाने युक्त अशी [भगवान शंकराची] मूर्ति तुम्हाला अपवर्ग [मोक्ष] मिळवून देवो.

Monday, August 12, 2013

१०७७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनैः सुजनैः सह |

स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिकाः ||

अर्थ

सुष्ट असोत किंवा दुष्ट [एकाचवेळी] खूप लोकांशी भांडण करू नये. साप [अगदी भयानक आणि] फुरफुरणारा असला तरी [एकटाच असेल तर पुष्कळशा] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.

Friday, August 9, 2013

१०७६. यथा देशस्तथा भाषा यथा राजा तथा प्रजा |

यथा भूमिस्तथा तोयं यथा बीजं तथाङ्कुरः ||

अर्थ

देश [भूप्रदेशा] प्रमाणे भाषा असते. [काही मैलानंतर बोलीभाषेत फरक पडतो] राजाच्या वर्तनावर प्रजेचं वागणं अवलंबून असत. पाणी तिथल्या जमिनीवर अवलंबून असत. ज्याचं बियाणे लावलं तसलीच फळे मिळतात.

Thursday, August 8, 2013

१०७५. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |

नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ||

अर्थ

जीवनातला एखादा क्षण सुद्धा [कितीही किंमत दिली] अगदी सगळी रत्न दिली, तरीही [परत] मिळत नाही. त्यामुळे जर वेळ वाया घालवला तर तो अतिशय मोठा गुन्हा आहे.

१०७४. सह्याद्रिर्गगनप्रविष्टशिखरैर्नागाश्रितैर्गव्हरैर्नृत्यद्भिश्च नदद्भिरुच्चशिखरात्पातालगैर्निर्झरैः |

तालैर्वायुविकम्पिपत्ररुचिरैर्वन्यैः सुपुष्पद्रुमैर्भव्यस्तिष्ठति शोभनः पदनतो यस्यापरस्तोयधिः || माधव अणे

अर्थ

गगनचुंबी शिखरांमुळे; सर्पांनी आश्रय घेतलेल्या गुहांमुळे; उंच शिखरांवरून खाली खोलखोल जाणाऱ्या निर्झरानी बनलेल्या मोठ्या नद्यांच्या नर्तनामुळे; वाऱ्यामुळे हलणाऱ्या सुंदर पानांच्या ताडवृक्षामुळे; शोभून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या पायाशी अतुलनीय असा समुद्र लोळण घेत आहे.

Tuesday, August 6, 2013

१०७३. हृदयानि सतामेव कठिनानीति मे मतिः |

खलवाग्विशिखैस्तीक्ष्णैर्भिद्यन्ते न मनागपि ||
 
अर्थ 
 
ज्या अर्थी दुष्ट लोकांच्या धारदार वाग्बाणांनी [अतिशय वाईट अशा आरोपांनी] देखील सज्जनांच्या अन्तःकरणाला जरा सुद्धा जखम होत नाही, त्यावरून त्यांची मने अत्यंत कठोर असतात असे मला वाटते.