भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, December 22, 2014

१३७७. भवभयमपहन्तुं ज्ञानविज्ञानसारं निगमकृदुपजऱ्हे भृङ्गवद्वेदसारम् |

अमृतमुदधितश्चापाययद् भृत्यवर्गान् पुरुषमृषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि |

अर्थ

भगवान शुक म्हणतात - भ्रमराप्रमाणे [भुंगा जसा कमलाला जराही धका न लावता फुलातून मध घेतो तसं वेदाची ओढाताण न करता] वेदाची निर्मिती करणाऱ्या देवाने वेदाचं सारं [भागवतात कृष्ण-उद्धव संवादात ] काढून किंवा  समुद्र मंथनातून अमृत काढून भक्तांना पाजले आहे, अशा त्या श्रेष्ठ कृष्ण नावाच्या परब्रह्माला मी वंदन करतो.

Monday, December 15, 2014

१३७६. नष्टं मृतमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः |

पण्डितानां च मूर्खाणां विशेषोऽयं यतः स्मृतः ||

अर्थ

मेलेले [संबंधित] नाहीशा झालेल्या [वस्तू] आणि गतकाळ याबद्दल ज्ञानी लोक दुःख करीत नाहीत. [आणि सामान्य शोक करत बसतात.] म्हणून ज्ञानी आणि मूर्ख यातला हाच [महत्वाचा] फरक सांगितला आहे.

१३७५. किं कौमुदी: शशिकलाः सकला विचूर्ण्यसंयोज्य चामृतरसेन पुनः प्रयत्नात् |

कामस्य घोरहरहुंकृतिदग्धमूर्तेः संजीवनौषधिरियं विहिता विधात्रा ||

अर्थ

[सुंदर युवतीच वर्णन] भगवान शंकराच्या भयंकर हुंकाराने भस्म झालेल्या कामदेवाला पुन्हा जिवंत करण्या [च अतिदुर्धर काम असल्याने तितकाच उपाय जालीम हवा म्हणून] ब्रह्मदेवाने सर्व लखलखत्या चंद्रकोरींची बारीक पूड करून प्रयत्नपूर्वक त्यावर अमृताचा रस ओतून ओतून या [सुंदरीची] निर्मिती केली आहे .

Wednesday, December 10, 2014

१३७४. बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |

न च्छन्दसा केनचिदुधृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||

अर्थ

[खूप शिक्षण झालं; व्याकरण येत असलं तरी] भुकेजलेला असताना व्याकरण खात नाहीत. [त्यानी भूक भागत नाही.] तहानलेल्याला काव्य रस पिऊन [तहान भागत नाही]. वेदांच अध्ययन करून कुणीही घर वर काढलेलं नाही. हे गुण निरुपयोगी आहेत. संपत्ती मिळव बाबा.

Monday, December 8, 2014

१३७३. मालाकमण्डलू अधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले |

यस्य स्त उर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ||

अर्थ

सहा भुजा असणाऱ्या; की ज्या खालच्या दोन करकमलात जपमाळ आणि कमंडलू आहे; मधल्या करद्वयात डमरू आणि त्रिशूल आहे आणि वरच्या हातात कल्याणकारक शंख आणि चक्र आहे, अश्या भगवान दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो की  ज्याने अत्री ऋषींना वर दिला.

Friday, December 5, 2014

१३७२. उच्चैरेष तरुः फलं च विपुलं दृष्ट्वैव हृष्टः शुकः पक्वं शालिवनं विहाय जडधीस्तं नालिकेरं गतः |

तत्रारुह्य बुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा तस्य न केवलं विगलिता चञ्चूर्गता चूर्णताम्  ||

अर्थ

मूर्ख  पोपट "हे झाड खूप उंच आहे आणि फळ पण भरपूर लागल्यैत" असं पाहून पिकलेलं भाताच शेत सोडून देऊन 'त्या' नारळाच्या झाडाकडे गेला. त्यावर चढून भूकेजलेल्या वृत्तीने त्यानी [नारळ] फोडायचा प्रयत्न केला. त्याची आशाच फक्त नव्हे तर चोचीचा सुद्धा पार चुराडा झाला.

Thursday, December 4, 2014

१३७१. चातक धूमसमूहं दृष्ट्वा मा धाव वारिधरबुद्ध्या |

इह हि भविष्यति भवतो नयनयुगादेव वारिणां पूरः ||


अर्थ

अरे चातका; धुरांचे लोट पाहून ढग आहेत अशा कल्पनेने धावत सुटू नको. [त्यामुळे पाणी तर मिळणार नाहीच पण] तुझ्या डोळ्यातून मात्र घळघळा अश्रू ओघळतील. [चातकान्योक्ती चातक = गरजू याचक; धुराचा लोट = कंजूष श्रीमंत.]