भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, July 29, 2011

४१६. निर्गुणेष्वपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवः |

न हि संहरते ज्योत्स्नां चन्द्रः खलनिकेतनात् ||

अर्थ

सज्जन गुणहीन प्राणिमात्रांवरहि दया करतात. चन्द्र आपले दुष्ट माणसाच्या घरावर पडणारे चांदणे आवरून घेत नाही. [ आपल्या चांदण्याच्या शीतलतेचे सुख दुष्टालाही मिळू देतो.]

४१५. विद्वानेव विजानाति विद्वज्जनपरिश्रमम् |

न हि वन्ध्या विजानाति गुर्वीं प्रसववेदनाम् ||

अर्थ

विद्वानांचे श्रम विद्वानांनाच कळतात. प्रसूतीच्या जीवघेण्या असह्य कळा वान्झोटीला कशा कळणार?

४१४. यस्यास्ति सर्वत्र गति: स कस्मात् स्वदेशरागेण हि याति नाशम् |

तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणा क्षारं जलं कापुरुषा पिबन्ति ||

अर्थ

ज्याला बुद्धीच्या जोरावर सर्वत्र मुक्त; मनसोक्त संचार; व्यवहार करता येतो तो नको तिथे स्वदेशावर प्रेम करत विनाश कशाला ओढवून घेईल? " आमच्या वाडवडिलांची विहीर " या वृथाभिमानाने तिचे दूषित वा खारे पाणी फक्त कोत्या मनोवृत्तीचे लोकच पीत बसतील.

४१३. उपचार: कर्तव्यो यावदनुत्पन्नसौहृदा: पुरुषा: |

उत्पन्नसौहृदानामुपचार: कैतवं भवति ||

अर्थ

जोपर्यंत स्नेह निर्माण झाला नाही तोपर्यंत माणसाच्या वागण्यात औपचारिकपणा असावा. मात्र एकदा स्नेह जमला की औपचारिकपणे वागणे हे नाटकीपणाचे ठरते.

Monday, July 25, 2011

४१२. जिव्हे प्रमाणं जानीहि भोजने भाषणेऽपि च |

अतिभुक्तिरतीवोक्तिः सद्यः प्राणापहारिणी ||

अर्थ

अग जिभे; तुझं खाणं आणि बोलणं जरा प्रमाणबद्ध असू देत कारण अति खाणं आणि [वायफळ] बडबड या दोन्ही गोष्टी प्राणघातक असतात.

४११. शुन: पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्यया विना |

न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे ||

अर्थ

विद्येशिवाय असलेले जीवन हे कुत्र्याच्या शेपटासारखे व्यर्थ - निरुपयोगीच होय. धड गुह्येन्द्रिये झाकली जात नाहीत आणि माशांसारखे चावणारे कीटकही हाकलता येत नाहीत. त्यामुळे ते चावतातच.

४१०. देवतासु गुरौ गोषु राजसु ब्राह्मणेषु च |

नियन्तव्य: सदा कोपो बालवृद्धातुरेषु च ||

अर्थ

देवदेवता; गुरु - वडिलधारी मंडळी; गाई; राजे; ब्राह्मण; लहान मुले; म्हातारी माणसे आणि आजारी यांच्यावरचा राग नेहमी आवरता घ्यावा [एकदम संतापल्यास अनर्थ घडू शकतात.]

४०९. क्वचिद्रुष्टः क्वचित्तुष्टः रुष्टस्तुष्टः क्षणे क्षणे |

अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयङ्करः ||

अर्थ

कधी रागावतो तर कधी अत्यंत प्रसन्न होतो असे ज्याचे रुसणे वा हसणे क्षणोक्षणी बदलते, अशा अस्थिर मनाच्या माणसाची कृपा सुद्धा प्रसंगी घातक ठरू शकते. [त्याच्याशी फारसा संबंध ठेवू नये.]

Friday, July 22, 2011

४०८. भये वा यदि वा हर्षे सम्प्राप्ते यो विमर्शयेत् |

कृत्यं न कुरुते वेगान्न स सन्तापमाप्नुयात् ||

अर्थ

भीती किंवा अत्यानंदाच्या प्रसंगी जो विचारपूर्वक कृती करतो; [ अविचाराने काही करत नाही ] त्याला कधीच दुःख होत नाही.

४०७. हृदयानि सतामेव कठिनानीति मे मति: |

खलवाग्विशिखैस्तीक्ष्णैर्भिद्यन्ते न मनाग्यतः ||

अर्थ

सज्जनाची अन्तःकरणे भलतीच कठोर असतात असे माझे [स्पष्ट ] मत आहे. कारण दुष्टांच्या तीक्ष्ण अशा वाग्बाणांनी ती किंचितही विद्ध होत नाहीत.

Wednesday, July 20, 2011

४०६. अभ्रच्छाया खलप्रीतिः समुद्रान्ते च मेदिनी |

अल्पेनैव विनश्यन्ति यौवनानि धनानि च ||

अर्थ

[आकाशातील] ढगांची रचना; दुष्ट लोकांच प्रेम; समुद्राच्या काठावरची जमीन; तारुण्य आणि संपत्ती या गोष्टी अगदी

छोट्याशा कारणांनी सुद्धा नष्ट होऊ शकतात.

४०५. माता गुरुतरा भूमे: खात्पितोच्चोतरस्तथा |

मन: शीघ्रतरं वाताच्चिन्ता बहुतरी तृणात् ||

अर्थ

आई ही पृथ्वीहून मोठी असते; वडील योग्यतेने आकाशाहून थोर; विशाल असतात. मन हे वाऱ्यापेक्षाही चंचल असते तर

चिंता ही भूमीवरील गवताहून सुद्धा उदंड असते. [गवत फार झपाट्यानी वाढतं तसं काळजी कशाचीही आणि फार वाटत राहते.]

४०४. आरोप्यते शीला शैले यत्नेन महता यथा |

निपात्यते क्षणेनाधस्तथात्मा गुणदोषयो: ||

अर्थ

एखादी [प्रचंड] शिळा पर्वताच्या माथ्यावर न्यायला खूपच प्रयत्न करावे लागतात पण खाली पाडायला मात्र एका क्षणात ती

ढकलून देता येते, त्याचप्रमाणे गुण अंगी बाणवायला खूप कष्ट पडतात. दोष मात्र लगेच अंगात भिनतात.

४०३. एकमेवाक्ष्ररं यस्तु गुरुः शिष्यं प्रबोधयेत् |

पृथिव्यां नास्ति तद्द्रव्यं यद्दत्वा चानृणी भवेत्‌ ||

अर्थ

या जगात अशी कोणतीही वस्तू नाही की जी दिली असता गुरुने जरी अगदी थोडेसे ज्ञान दिले असले तरी, ज्ञानी झालेला

शिष्य ती देऊन ज्ञानदानाच ऋण फेडू शकेल.

४०२. अपि सम्पूर्णतायुक्तैः कर्तव्या: सुहृदो बुधैः |

नदीश: परिपूर्णोऽपि चन्द्रोदयमपेक्षते ||

अर्थ

जरी [आपण] सर्व [गुणांनी ; वस्तूंनी ] परिपूर्ण असलो तरी सुद्धा शहाण्या माणसांनी मित्र मिळवले पाहिजेत. समुद्र हा पाण्याने

[पूर्ण ] असुनसुद्धा चंद्रोदयाची वाट पाहत असतो.

Wednesday, July 13, 2011

४०१. दूरस्था: पर्वता रम्या; वेश्या च मुखमण्डने |

युद्धस्य वार्ता रम्या ; त्रीणि रम्याणि दूरतः ||

अर्थ

पर्वत लांबूनच सुंदर दिसतात. तसेच वेश्यांचे मुख [नटणे] दुरूनच रम्य वाटते. युद्धाच्या बातम्या - अनुभव श्रवणीय असतो. या तीन गोष्टी दुरूनच सुंदर दिसतात [ त्यांचा अनुभव घेणे फार त्रासदायक असते. ]

४००. इयं सुस्तनी मस्तकन्यस्तकुम्भा कुसुम्भारुणं चारू चेलं दधाना |

समस्तस्य लोकस्य चेत:प्रवृत्तिं गृहीत्वा घटे न्यस्य यातीव भाति ||

पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

उभारदार स्तन असलेली ही सुंदर लालसर वस्त्र नेसलेली [मला तर अस वाटतंय की] जणू काही मार्गातल्या सर्व लोकांची अंत:करणे ती डोक्यावरच्या घटात ठेवून घेऊन चाललीय.

Monday, July 11, 2011

३९९. अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम् |

फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ||

अर्थ

बिनहाताचे प्राणी हात असणाऱ्या प्राण्यांचे; पाय नसणारे प्राणी चार पाय असणारांचे; लहान प्राणी मोठ्यांचे आशा तऱ्हेने एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन [भक्ष्य] असतो.

३९८. कीटोऽयं भ्रमरी भवेदविरतध्यानात्तथा चेदहं रामः स्यां , त्रिजटे , तथा ह्यनुचितं दाम्पत्यसौख्यच्युतः |

एवं चेत्कृतकृत्यतैव भविता ; रामस्तव ध्यानतः सीता ; त्वं च निहत्य राक्षसपतिं सीतान्तिकं यास्यसि ||

अर्थ

[अशोकवनात सीता आणि त्रिजटा राक्षसी यांच्या मधील संवाद] सीता म्हणते; " बाई ग त्रिजटे, [मला भीती वाटते] ज्याप्रमाणे किडा सतत कुंभार माशीचे ध्यान केल्यामुळे त्याच रूपाचा होतो, तसं रामाचे अखंड चिंतन केल्यामुळे मी रामच बनले तर? संसारसुखाची हानी होईल" यावर त्रिजटा उत्तर देते; ' अग मग फारच उत्तम. राम सुद्धा तुझ्या चिंतनाने सीता बनेल मग राम बनलेली तू रावणाचा वध करशील आणि तुझ्या लाडक्या सीतेकडे जाशील".

३९७. महीपते: सन्ति न यस्य पार्श्वे कवीश्वरास्तस्य कुतो यशांसि |

भूपा: कियन्तो न बभूवुरुर्व्यां नामापि जानाति न कोऽपि येषाम् ||

अर्थ

ज्या राजाच्या आश्रयाला मोठमोठे कवी नसतात त्याची कीर्ति वाढणे कसे शक्य आहे? असे किती तरी राजे होऊन गेले आहेत की ज्यांची नावे सुद्धा कोणाला माहित नाहीत.

३९६. वेषं न विश्वसेत् प्राज्ञो वेषो दोषाय जायते |

रावणो भिक्षुरूपेण जहार जनकात्मजाम् ||

अर्थ

वेशभूषेवर माणसाने विश्वास ठेवू नये. [वेषांतराला फसू नये.] त्यामुळे दोष [नुकसान] होते. रावणाने भिकाऱ्याच्या वेषात येऊन सीतेला पळवले.

३९५. मन्दोऽप्यमन्दतामेति संसर्गेंण विपश्चितः |

पंकच्छिदः फलस्येव निकषेणाविलं पयः ||

अर्थ

निवळीचे फळ पाण्यात घातले की ज्याप्रमाणे गढूळ पाणी सुद्धा स्वच्छ होते, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या सहवासात मंद सुद्धा बुद्धीमान होतो.

३९४. ऋणशेषोऽग्निशेषश्च शत्रुशेषस्तथैव च |

पुन: पुन: प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न रक्षयेत् ||

अर्थ

कर्जाची बाकी, न विझलेला अग्नी व शिल्लक उरलेले शत्रु पुन्हा पुन्हा वाढतात म्हणून या गोष्टीत बाकी ठेऊ नये.

Tuesday, July 5, 2011

३९३. कार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम् |

महदप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकालत: ||

अर्थ

काम [मदतीचे] लहानसे का होईना योग्य वेळी केल्यास मदत केली [असं ज्याला केली त्याला ] वाटते. परंतु अयोग्य वेळी [वेळ निघून गेल्यावर बरीच मदत करूनही निष्फळ ठरते.

३९२. किं मिष्टमन्नं खरसुकराणां किं रत्नहार: मृगपक्षिणां च |

अन्धस्य दीप: बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसङ्ग: ||

अर्थ

गाढवे आणि डुकरे यांना पक्वान्नाचे काय? पशुपक्षांना रत्नहाराचे काय? आंधळ्याला दिव्याचा; बहिऱ्याला गाण्याचा व मूर्खाला शास्त्रकथांचा काय उपयोग?

३९१. गुणेषु क्रीयतां यत्नः किमाटोपैः प्रयोजनम् |

विक्रीयन्ते न घण्टाभिः गावः क्षीरविवर्जिताः ||

अर्थ

गुण [अंगी बाणवण्याचा] प्रयत्न करावा. [नुसता] खटाटोप [बडेजाव] करून काय उपयोग? [जसे] दूध नसलेल्या [भाकड] गाई [केवळ गळ्यात] घंटा बांधून विकल्या जात नाहीत.

३९०. हीनसेवा न कर्तव्या कर्तव्यो महदाश्रय: |

पयोऽपि शौण्डिकीहस्ते वारुणीत्यभिधीयते ||

अर्थ

नीच माणसाची सेवा करू नये. थोरांचा आश्रय घ्यावा. [असं पहा की] दारू विकणाऱ्या स्त्रीच्या हातात दूध असलं तरी [त्याला] दारू असं म्हटल जात.

३८९. पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका |

भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुंधरा ||

अर्थ

[खरं तर] पावला पावलावर रत्ने आणि एक योजन अंतरावर पाण्याने भरलेली विहीर असते. पृथ्वी अनेक मौल्यवान गोष्टीनी परिपूर्ण आहे. पण दुर्दैवी माणसांना त्या गोष्टी दिसत नाहीत. [चांगल्या गोष्टी पाहण्याची नजर पाहिजे.]

३८८. परनिन्दासु पाण्डित्यं स्वेषु कार्येष्वनुद्यमः |

प्रद्वेषश्च गुणज्ञेषु पन्थानो ह्यापदां त्रयः ||

अर्थ

दुसऱ्याची निंदा करण्यात हुशारी; स्वतःचे काम करण्याचा कंटाळा आणि गुण जाणणारांचा द्वेष करणे ह्या तीन गोष्टी म्हणजे संकटांकडे नेणारे रस्ते आहेत.