भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, March 31, 2012

६३४. किं जन्मना महति; किं पितृपौरुषेण शक्त्यैव याति निजया पुरुष: प्रतिष्ठाम् |

कुम्भो हि कूपमपि शोषयितुं न शक्त: कुम्भोद्भवेन मुनिनाम्बुधिरेव पीत:||

अर्थ

बड्या घराण्यात जन्म होऊन काय उपयोग? वडिलांच्या कर्तृत्वाचा पण उपयोग नसतो. मनुष्य स्वतःच्या बळावरच मोठा होतो. मातीचा घडा तर साधी विहीर सुद्धा रिकामी करू शकणार नाही. पण कुम्भातून जन्मलेल्या [अगस्ती] ऋषींनी मात्र महासागरच पिऊन टाकला.

Thursday, March 29, 2012

६३३. ग्रासोद्गलितसिक्थेन का हानि: करिणो भवेत् |

पिपीलिका तु तेनैव सकुटुम्बोपजीवति ||

अर्थ

हत्तीच्या घासातला एखादा तुकडा गळून पडला तर हत्तीच काय नुकसान होणारे? पण तेवढ्या [लहानशा] तुकड्यानी मुंगीच अख्ख कुटुंब पोसलं जाईल ना !

Wednesday, March 28, 2012

६३२. तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं ;वृन्दे वृन्दे तत्वचिन्तानुवाद: |

वादे वादे जायते तत्वबोधो ;बोधे बोधे भासते चन्द्रचूड: ||

अर्थ

प्रत्येक तीर्थक्षेत्री सदाचारसंपन्न; विशुद्ध ब्राह्मण असतील; त्या ब्राह्मणात तत्वज्ञानाची चर्चा चालत असेल; त्या प्रत्येक चर्चेतून तत्वाचा बोध होत असेल तर प्रत्येक बोधात श्री शंकराचा साक्षात्कार होणारच.

Tuesday, March 27, 2012

६३१. दौर्मन्त्र्यात् नृपतिर्विनश्यति; यति: सङ्गात्सुतो लालनाद्विप्रोऽनध्ययनात्कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात् |

-हीर्मद्यादनवेक्षणादपि कृषि:; स्नेह: प्रवासाश्रयान्मैत्री चाप्रणयात्समृद्धिरनयात्त्यागप्रमादाद्धनम् ||

अर्थ

मंत्र्याच्या बदसल्ल्यामुळे राजाचा; लोकसहवासामुळे संन्याशाचा; लाडाने मुलाचा; शिक्षण [अभ्यास] नसेल तर ब्राह्मणाचा [विद्वानाचा] ; कुपुत्रामुळे कुळाचा; दुष्टांच्या सहवासाने चारित्र्याचा; मद्यपानामुळे लोकलज्जेचा; दुर्लक्ष झाल्यामुळे शेतीचा; सतत फिरत राहिल्यामुळे प्रेमाचा; स्नेह नसल्यामुळे मैत्रीचा दुर्वर्तनाने; मस्तीने अमर्याद त्यागाने व नको त्या चुका केल्याने संपत्तीचा नाश होतो.

Monday, March 26, 2012

६३०.अविदित्वात्मन: शक्तिं परस्य च समुत्सुक: |

गच्छन्नभिमुखो नाशं याति दीपे पतङ्गवत् ||

अर्थ

आपली शक्ति आणि शत्रूची शक्ति यांचा [तौलनिक] विचार न करता; जो तडक शत्रूला सामोरा जातो तो दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे नष्ट होतो.

६२९. पुंसामसमर्थानामुपद्रवायात्मनो भवेत्कोप: |

पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् ||

अर्थ

दुबळ्यांचा संताप त्यांनाच तापदायक होतो. चुलीवरची कढई [खालच्या आगीमुळे] अतिशय तापली तरी तिचा स्वतःचाच पृष्ठभाग अधिकाधिक जाळून घेते. [आगीवर त्याचा काहीच परिणाम न होता तिला स्वतःलाच तेवढा त्रास होतो.]

६२८. प्रतिकूलतामुपगते हि विधौ विफलत्वमेति बहुसाधनता |

अवलम्बनाय दिनभर्तुरभून्न पतिष्यत: करसहस्रमपि ||

अर्थ

पुष्कळ मदत हाताशी असली तरी दैव उलटले तर ती सगळी वाया जाते. सूर्य एकदा अस्ताला निघाला की त्याला त्याचे किरण हजारो असले तरी वर यायला उपयोगी पडत नाहीत.

६२७. सकृज्जल्पन्ति राजान: सकृज्जल्पन्ति पण्डिता: |

सकृत्कन्या: प्रदीयन्ते त्रीण्येतानि सकृत्सकृत् ||

अर्थ

राजे लोक [आज्ञा] एकदाच देतात. [पुन्हापुन्हा देत नाहीत] विद्वान् एकदाच बोलतात. [पाल्हाळ लावत नाहीत] कन्यादान एकदाच करायचे असते. या तिन्ही गोष्टी एकेकदाच होतात.

६२६. देवतासु गुरौ गोषु राजसु ब्राह्मणेषु च |

नियन्तव्य: सदा कोपो बालवृद्धातुरेषु च ||

अर्थ

देवदेवता; गुरु-वडिलधारी मंडळी; गाई; राजा; ज्ञानी माणसे; लहान मुले; म्हातारी माणसे यांच्यावरचा राग नेहमी आवरता घ्यावा फार संतापू नये. [त्याचे भलतेच अनर्थ होऊ शकतात.]

६२५. सम्पोष्यं सदपत्यवत्परकराद्रक्ष्यं च सुक्षेत्रवत्; संशोध्यं व्रणिनोऽङ्गवत्प्रतिदिनं प्रेक्ष्यं च सन्मित्रवत् |

बध्यं बन्धवदश्लथं नहि न विस्मर्यं हरेर्नामवन्नैवं सीदति पुस्तकं किल कदाप्येतद्गुरूणां वच:||

अर्थ

मुलाचे जसे चांगल्यारीतीने पोषण करतो त्याप्रमाणे पोषण करावे; चांगल्या शेतीचे ज्याप्रमाणे दुसर्यापासून संरक्षण करतो तसे रक्षण करावे; जखमी माणसाच्या अवयवान्प्रमाणे दररोज निगा राखावी; [पाने फाटत असल्यास चिकटवावी] मित्राप्रमाणे [प्रेमाने] हाताळावे; बद्धाप्रमाणे पक्के बांधावे; ढिले राहू देऊ नये. हरिनामाचे जसे विस्मरण होऊ देऊ नये तसे कुठे विसरून येऊ नये; म्हणजे खरोखर पुस्तक कधीही जीर्ण होत नाही असे मोठी माणसे सांगतात.

Tuesday, March 20, 2012

६२४. अजीर्णे भेषजं वारि ; जीर्णे वारि बलप्रदम् |

अमृतं भोजनार्धे तु भुक्तस्योपरि तद्विषम् ||

अर्थ

अपचन झाले असता पाणी हेच औषध असते. अन्नपचन झाल्यावर प्यायलेले पाणी हे ताकद देते. जेवण निम्म झाल्यावर पाणी पिणे अमृताप्रमाणे असते. मात्र जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे विषाप्रमाणे आहे.

६२३. अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नमनम्बुपानाच्च स एव दोष: |

तस्मान्नरो वह्निविवर्धनार्थं मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि ||

अर्थ

[जेवणानंतर] फार पाणी पिण्याने अन्नाचे अपचन होते. मुळीच पाणी न पिण्यानेही तोच दोष होतो. म्हणून अन्न पचवण्यासाठी [जठरातील] अग्नि प्रदीप्त होण्यासाठी अनेक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे.

Monday, March 19, 2012

६२२. निमित्तमुद्दिश्य हि य: प्रकुप्यति ध्रुवं स तस्यापगमे प्रसीदति |

अकारणद्वेषि मनस्तु यस्य वै कथं जनस्तं परितोषयिष्यति ||

अर्थ

एखादे कारण घडल्यावर जर माणूस संतापला तर त्याचे निरसन झाल्यावर तो निश्चितपणे प्रसन्न होतो. [त्याला नातेवाईक; नोकर संतुष्ट ठेवू शकतात ] पण विनाकारण; क्षुल्लक कारणावरून चिडणा-या [मालकाला] माणूस कसं बर संतुष्ट ठेवणार ?

Saturday, March 17, 2012

६२१. व्याघ्रे च महदालस्यं; सर्पे चैव महद्भयम् |

पिशुने चैव दारिद्र्यं तेन तिष्ठन्ति जन्तवः ||

अर्थ

वाघ हा अत्यंत आळशी असतो; सापालाही सारखी [माणसाची] भीती वाटत असते; तसेच दुष्ट लोक दरिद्री असतात; त्यामुळे [पृथ्वीवरील बरेच] जीव जगू शकतात.

Friday, March 16, 2012

६२०. धर्मार्थं यस्य वित्तेहा वरं तस्य दरिद्रता |

प्रक्षालनाद्धि पङ्कस्य दूरादस्पर्शनं वरम् ||

अर्थ

[दुसऱ्याच्या पैशाने धर्मकार्य करून पुण्य न लागता पापच लागेल म्हणून] धर्मकार्य करण्यासाठी जो धन मागतो [अजून जास्त] गरिबी आलेली बरी. आधी अंगाला चिखल फासून नंतर तो धुण्यापेक्षा मुळातच चिखल न लावलेला बरा. [दुसऱ्याकडून पैसे मागून धर्म करू नये.]

६१९. सदा वक्र: सदा क्रूर: सदा पूजामपेक्षते |

कन्याराशिस्थितो नित्यं जामाता दशमो ग्रह: ||

अर्थ

[शनी पण परवडला पण जावई नावाचा दहावा ग्रह नको कारण] हा नित्य वक्रीच असतो. नेहमी क्रूर [कुरकुरणारा] त्याला [सासूसासर्‍यांकडून] पूजा [ग्रहाच्या बाबतीत अभिषेक व.] हवी असते हा नित्य आपल्या 'कन्या ' राशीतच राहतो असा जामात हा दहावा ग्रहच आहे.

Wednesday, March 14, 2012

६१८. विगतघननिशीथे प्रातरुत्थाय नित्यं पिबति खलु नरो यो घ्राणरन्ध्रेण वारि |

स भवति मतिपूर्णश्चक्षुषा तार्क्ष्यतुल्यो वलिपलितविहीन: सर्वरोगैर्विमुक्त: ||

अर्थ

मध्यरात्र उलटून गेल्यावर - भल्या पहाटे - उठून जो मनुष्य नाकाने पाणी पितो; तो बुद्धिमान; गरुडासारख्या दृष्टीचा होतो. त्याच्या अंगावर सुरकुत्या डोक्याला टक्कल पडणे वगैरे न होता तो सर्व रोगातून मुक्त होतो.

६१७. असहाय: समर्थोऽपि तेजस्वी किं करिष्यति |

निर्वाते ज्वलितो वह्नि: स्वयमेवोपशाम्यति ||

अर्थ

एखादा तेजस्वी माणूस बलवान असूनही जर त्याला कोणी मदतनीस नसेल तर तो काय करू शकेल? निर्वात प्रदेशात आग जरी भडकली तरी ती आपोआपच शान्त होते. [जरी सामर्थ्य खूप असलं तरी मदतनीस पाहिजेत.]

Tuesday, March 13, 2012

६१६. नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन |

इति महति विरोधे विद्यमाने समाने नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ||

अर्थ

राजाच कल्याण करणाऱ्या [व्यक्तीचा] प्रजा द्वेष करते. प्रजेच कल्याण करू इच्छिणाऱ्या [समाजसेवकाला] राजा हाकलतो. असा मोठाच विरोध [अडथळा] असल्यामुळे राजा आणि प्रजा या दोघांच [हित] करणारा कार्यकर्ता मिळणे कठीण असते.

Sunday, March 11, 2012

६१५. वदने विनिवेशिता भुजङ्गी पिशुनानां रसनामिषेण धात्रा |

अनया कथमन्यथावलीढा न हि जानन्ति जना मनागमन्त्रा: ||

अर्थ

ब्रह्मदेवाने जिभेच्या रूपात सर्पिणच दुष्टांच्या मुखात बसवलेली आहे. तसं जर नसतं तर ती डसली [दुष्टांच्या जिभेने चुगल्या केल्या की] मंत्राचा [सर्पाच्या बाबतीत उता-याचा मन्त्र; दुष्टांच्या बाबतीत सदुपदेश] वापर नसेल तर लोकांना कणभर सुद्धा [तो दुष्टपणा] कसा बरे कळत नाही?

६१४. आपाण्डुरा; शिरसिजास्त्रिवली कपोले दन्तावली विगलिता न च मे विषाद: |

एणीदृशो युवतय: पथि मां विलोक्य तातेति भाषणपरा: खलु वज्रपात:||

अर्थ

डोक्यावरचे केस पांढरे झालेत; गालांवर सुरकुत्या पडल्यात; सगळे दात पडलेत; त्याची मला खंत नाही. पण जेंव्हा का रस्त्यात सुंदर तरुणी मला पाहून 'बाबा' अशी हाक मारतात तेंव्हा फारच जबरदस्त धक्का बसतो. [खूप वाईट वाटतं]  ...:)

६१३. दाता क्षमी गुणग्राही स्वामी दु:खेन लभ्यते |

शुचिर्दक्षोऽनुरक्तश्च जाने भृत्योऽपि दुर्लभः ||

अर्थ

[मला] असे वाटते की; [चुका] माफ करणारा; उदार; गुणांची पारख असणारा मालक कष्टानी [फार काळजीपूर्वक शोधण्याच दु;ख सहन केल्यावर मिळतो.] आणि [स्वतःच्या फायद्याचा हिशोब न करता] शुद्ध; [कामास] तत्पर आणि [मालकावर] जीव असणारा नोकरसुद्धा [मिळणे] दुर्लभ आहे.

Thursday, March 8, 2012

६१२. वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि कलभाषी |

विरते पयसि घनेभ्य; शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनय: ||

अर्थ

जोपर्यंत दाता देत राहतो तोपर्यंत सर्वजण त्याच्याबद्दल गोड गोड बोलतात. [मिळायचं बंद झाल्यावर मग ते कौतूक होणार नाही.] ढगांमधलं पाणी संपल्यावर मोरांचा केकारव शान्त होतो .

Wednesday, March 7, 2012

६११. अद्भिः गात्राणि शुध्यन्ति मन: सत्येन शुध्यति |

विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिर्ज्ञानेन शुध्यति ||

अर्थ

शरीर पाण्याने शुद्ध [स्वच्छ] होते, खरे [बोलण्याने] मन शुद्ध होते, [अध्यात्मिक] ज्ञान आणि तपश्चर्या यांनी [जीवाच्या अन्त:करणातील मळ नाहीसा होऊन] आत्मा शुद्ध होतो, ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते.

६१०. अरावप्युचितं कार्यमातिथ्यं गृहमागते |

छेत्तुमप्यागते छायां नोपसंहरते द्रुम: ||

अर्थ

आपल्या घरी जरी शत्रु तरी त्याचा पाहुणचार करावा. झाड तोडणाऱ्याला सुद्धा झाड सावली धरतं. [तो शत्रु असूनही त्याला उन्हात ठेवत नाही.]

Tuesday, March 6, 2012

६०९. यदि न स्यान्नरपति: सम्यङ्नेता तत: प्रजा: |

अकर्णधारा जलधौ विप्लवेतेह नौरिव ||

अर्थ

जर राजामध्ये चांगले नेतृत्वाचे गुण नसतील तर नावाडी नसलेली होडी ज्याप्रमाणे समुद्रात बुडून जाते त्याप्रमाणेच प्रजेची वाताहात होईल.

६०८. उपनिषद: परिपीता गीतापि च हन्त मतिपथं नीता |

तदपि न हा विधुवदना मानससदनात्बहिर्याति ||

अर्थ

[आम्ही] उपनिषदांचा [तत्वज्ञानाचा] सखोल अभ्यास केला; गीता सुद्धा बुद्धीत ठसवली, पण अरेरे ! तरीसुद्धा आमच्या अन्त:करणातून चन्द्रमुखी [सुंदरी; तिचा विचार ] निघून जात नाही.

६०७. ईक्षणं द्विगुणं भुयात्भाषणस्येति वेधसा |

अक्षिणी द्वे मनुष्याणां जिह्वा चैकेव निर्मिता ||

अर्थ

बोलण्याच्या दुप्पट निरीक्षण केले पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवाने माणसांसाठी दोन डोळे आणि एकच जीभ बनवली आहे.

६०६. न स्थातव्यं न गन्तव्यं क्षणमप्यधमै: सह |

पयोऽपि शौण्डिकीहस्ते वारुणीत्यभीधीयते ||

अर्थ

नीच माणसांबरोबर क्षणभर सुद्धा थांबू नये [कारण की] कलालीणीच्या [दारूचा गुत्ता चालवणाऱ्या बाईच्या] हातात दूध असलं तरी [ती] दारु आहे असच म्हटलं जातं.

६०५. जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धा: कवीश्वरा: |

नास्ति येषां यशकाये जरामरणजं भयम् ||

अर्थ

ज्यांच्या कीर्ति रूपी शरीराला म्हातारपण किंवा मरण यांची भीती नाही अशा; रसपरिपोष करण्यात कुशल असलेल्या; ज्यांच्या रचना अतिशय सुंदर आहेत अशा श्रेष्ठ कवींचा जय होतो.