भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, January 31, 2012

५७९. निस्सारस्य पदार्थस्य प्रायेणाडम्बरो महान् |

न सुवर्णें ध्वनिस्तादृक् यादृक्कांस्ये प्रजायते ||

अर्थ

साधारणपणे ज्या गोष्टीत फारसे गुण नसतात त्यांच खूप मोठ अवडंबर माजवलेलं असतं. [त्या भपकेदार असतात ] काशाचा आवाज जितका मधुर असतो तितका सोन्याचा नसतो. [क्षुद्र वस्तू भपक्यामुळे खपवता येतात पण सोन्यासारख्या वस्तूला भपक्याची जरूर नसते.]

Monday, January 30, 2012

५७८. सुवर्णं हि यथा श्रेष्ठं सर्वधातुषु गण्यते |

तथा गुणेषु सर्वेषु सौजन्यं श्रेष्ठमुच्यते ||

अर्थ

ज्याप्रमाणे सोन सगळ्या धातूंमध्ये श्रेष्ठ आहे असं समजतात, त्याच प्रमाणे सर्व गुणांमध्ये सौजन्य [माणुसकी] हा गुण सर्वश्रेष्ठ समजला जातो.

५७७. विप्रास्मिन्नगरे को महान् कथयतां तालदृमाणां गणा: को दाता? रजको ददाति वसनं प्रातर्गृहीत्वा निशि |

को दक्ष:? परदारवित्तहरणे सर्वेऽपि दक्षा: जना: कस्माज्जीवसि हे सखे कृमिविषन्यायेन जीवाम्यहम् ||

अर्थ

'अरे ब्राह्मणा, या गावात महान् [थोर, उंच] सांग रे बाबा' [गावात नवीनच आलेला होतकरू विचारतो]; 'ताडाच्या झाडांच बेट'; 'दाता [उदार] कोण आहे?'; 'धोबी - तो सकाळी कपडे घेऊन जातो आणि रात्री देतो' ; 'कोण दक्ष [लक्षपूर्वक, चटकन आणि कौशल्याने काम करणारा] आहे?'; 'दुसऱ्याची संपत्ती आणि स्त्री यांच हरण [गैरफायदा घेण्याच्या बाबतीत] सर्वच लोक दक्ष आहेत; 'अरे मग तू जगतोस तरी कसा?'; 'अरे मित्रा. विषातल्या किड्यासारखा [मी ही तसलाच रे] ' [आदर्शवादाचा कसा -हास झालाय त्याचं उत्तम वर्णन.]

Saturday, January 28, 2012

५७६. नवं वस्त्रं नवं छत्रं नव्या स्त्री नूतनं गृहम् |

सर्वत्र नूतनं शस्तं सेवकान्ने पुरातने ||

अर्थ

नवीन कपडा; नवी छत्री; नव्याने [तारुण्यात पदार्पण केलेली] स्त्री; नवं घर हे कौतुकास्पद असतं. सर्व गोष्टी नव्या चांगल्या पण, नोकर आणि धान्य [विशेषतः तांदूळ] जुनेच चांगले.

Thursday, January 26, 2012

५७५. जनैर्जनहितार्थाय जनानामेव निर्मितम् |

लोकतन्त्रं भारतस्य वसुधायां विराजते ||

अर्थ

जनांनीच [लोकांनीच] जनांच्या कल्याणासाठीच, लोकांचीच, निर्माण केलेली भारताची लोकशाही पृथ्वीतलावर शोभून दिसते.

५७४. कोऽरुक कोऽरुक कोऽरुक हितभुक् मितभुक् जितेन्द्रियो नियत: |

कोऽरुक कोऽरुक कोऽरुक शतपदगामी च वामशायी च ||

अर्थ

[एकदा सुश्रुत जंगलात गेलेले असताना] त्यांना सुतार पक्षाचा कोरूक असा आवाज आला त्यांनी उत्तर दिले ' कोण निरोगी ,तंदुरुस्त ; स्वस्थ असतो? ' ; योग्य ते खाणारा , मोजके [जास्त न] खाणारा , वासनांवर ताबा असणारा निश्चितपणे सुदृढ असतो. [पुन्हा तोच आवाज आल्यावर ते म्हणाले ] शतपावली करणारा आणि वामकुक्षि घेणारा निरोगी असतो.

Tuesday, January 24, 2012

५७३. मा दद्यात् खलसङ्घेषु कल्पनामधुरागिर: |

यथा वानरहस्तेषु कोमला: कुसुमस्रज: ||

अर्थ

ज्याप्रमाणे माकडांच्या हातात नाजूक अशा फुलांच्या माळा देऊ नयेत, त्याप्रमाणे दुष्ट लोकांच्या समुहाशी सुंदर कल्पना असणाऱ्या चांगल्या गोष्टी सांगू नयेत. [सगळ बिघडवून टाकण्याचा धोका असतो.]

५७२. दूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थित: |

यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरत: ||

अर्थ

ज्याच्याबद्दल [आपल्या] मनात [जिव्हाळा] असेल तो लांब अंतरावर असला तरी परकेपणा नसतो आणि ज्याच्याबद्दल जिव्हाळा नसेल तो जवळ असूनही दूर असल्या सारखाच असतो.

Monday, January 23, 2012

५७१. लक्ष्मी: चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् |

अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः || श्रीराम

अर्थ

[एकवेळ] चंद्राच सौंदर्य नाहीस होईल; हिमालय पर्वतावरच बर्फाचा तो त्याग करेल; समुद्र त्याची सीमा ओलांडून [जमिनीवर] अतिक्रमण करेल. [अशा अशक्य गोष्टी घडल्या तरीही] मी वडिलांची [वडिलांनी केलेली आज्ञा] प्रतिज्ञा मोडणार नाही.

५७०. अमित्रो न विमोक्तव्य; कृपणं बह्वपि ब्रुवन् |

कृपा न तस्मिन् कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ||

अर्थ

कितीही दीनवाणे बोलला तरी [आपण पकडलेल्या] शत्रूला सोडून देऊ नये. आपल्याला त्रास देणाऱ्या शत्रूला ठार करावे. त्याच्यावर कृपा करू नये.

Friday, January 20, 2012

५६९. अपि सम्पूर्णतायुक्तै: कर्तव्या: सुहृदो बुधै: |

नदीश: परिपूर्णोऽपि चन्द्रोदयमपेक्षते ||

अर्थ

जरी अगदी परिपूर्ण असले तरी शहाण्यांनी मित्र जमवावे. [मला काय जरूर असे मानू नये.] सागर ओतप्रोत [भरलेला] असूनही तो चन्द्र उगवण्याची [अधिक आनंद होत असेल, त्यामुळे परिपूर्ण असूनही त्याला भरती येते.] तो इच्छा करतो.

५६८. मरणान्तानि वैराणि निवृत्तं न: प्रयोजनम् |

क्रियतामस्य संस्कार; ममाप्येष यथा तव ||  वाल्मीकि रामायण

अर्थ

शत्रुत्व हे मरणानंतर संपत [आता वैराच] कारण नष्ट झालं आहे. आता ह्या [रावणावर अंत्य] संस्कार करा. हा ज्याप्रमाणे तुझा [भाऊ] आहे तसा माझा पण [आहे असे समज.]

Wednesday, January 18, 2012

५६७. शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खा: यस्तु क्रियावान्पुरुष: स विद्वान् |

सुचिन्तितं चौषधमातुराणां न नाममात्रेण करोत्यरोगम् ||

अर्थ

[खूप खूप] शास्त्रांचा अभ्यास करून सुद्धा [माणसं] मूर्ख असतात. [केलेला अभ्यास आचरणात वापरला पाहिजे.] जो [ज्ञान] कृतीत उतरवील तो मनुष्यच पण्डित होय. आजा-याच्या औषधाबद्दल खूप काथ्याकूट केला तरी नुसत्या औषधाचं नाव बोलण्याने तो निरोगी होत नाही. [ते कृतीत आणून औषध पाजावं लागत.]

५६६. पादाहतं समुत्थाय मूर्धानमधिरोहति |

स्वस्थादेवापमानेऽपि देहिनस्तद्वरं रज: ||

अर्थ

अपमान झाला असूनही गपचूप [सगळ सहन करत राहणाऱ्या] बसून राहणाऱ्या माणसापेक्षा, लाथाडलं गेल्यावर उठून डोक्यावर जाऊन बसणारी धूळ सुद्धा बरी [फुकटचे अपमान सहन करणे म्हणजे सहनशीलता नव्हे स्वाभिमान असणं जरुरी आहे.]

Tuesday, January 17, 2012

५६५. क्रोधो वैवस्वतो राजा तृष्णा वैतरणी नदी |

विद्या कामदुघा धेनु: सन्तोषो नन्दनं वनम् || शुकनीति

अर्थ

राग [येणं] म्हणजे यमराजा [मृत्यूला आमंत्रण], हावरटपणा म्हणजे वैतरणी [नरकातली यातना भोगायला लावणारी] नदी, विद्या [आत्मज्ञान; इतर विद्या सुद्धा] इच्छित वस्तु देणारी कामधेनु आणि मनाचा संतोष म्हणजे स्वर्गातील नंदनवन बाग.

Monday, January 16, 2012

५६४. तिलवत्स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यं तिलगुललड्डुकवत् सम्बन्धे अस्तु सुवृत्तत्वम् |

अस्तु विचारे शुभसङ्क्रमणं मङ्गलाय यशसे कल्याणी सङ्क्रातिरस्तु व: सदाहमाशासे ||

अर्थ

मन हे तिळाप्रमाणे स्निग्ध [तिळाच्या बाबतीत तेल युक्त मनासाठी प्रेमळ] राहो, भाषेत गुळाप्रमाणे गोडवा राहू दे, परस्पर संबंधात घट्ट मैत्री असावी, [खडबडीतपणा नको.] विचार हे अधिकाधिक कल्याणकारक होवोत, त्यामुळे शुभ घडो आणि कीर्ति मिळो असे संक्रमण या संक्रांतीने होवो अशी मी नेहमी इच्छा करते /तो.

५६३. आपदां कथित: पन्था: इन्द्रियाणामसंयम: |

तज्जय: सम्पदां मार्ग: येनेष्टं तेन गम्यताम् || चाणक्यनीति

अर्थ

असं [ज्ञात्यांनी] सांगितलय की संकटे येण्याचा मार्ग म्हणजे इंद्रियांवर ताबा नसणे आणि वासनांवर ताबा असणे हा वैभव [मिळण्याचा] मार्ग आहे. [तर आता] जे [तुम्हाला] हवं असेल [त्या रस्त्याने] जा.

५६२. ये च मूढतमा लोके ये च बुद्धेः परं गता: |

त एव सुखमेधन्ते क्लिश्यन्तरितो जन: ||

अर्थ

या जगामध्ये जे महामूर्ख असतात आणि जे अतिशय बुद्धिमान असतात तेच सुखी होतात आणि अधले मधले असतात त्यांना त्रास सहन करावा लागतो.

Thursday, January 12, 2012

५६१. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पय: |

जातौ जातौ नवाचारा: नवा वाणी मुखे मुखे ||

अर्थ

[प्रत्येक] माणसाच डोकं वेगळ चालतं. प्रत्येक पाणवठ्यावरच्या पाण्याची चव वेगळी असते. सगळ्या जमातींमध्ये रीतिभाति वेगवेगळ्या असतात. प्रत्येक माणसाची बोलण्याची धाटणी वेगळी असते.

Wednesday, January 11, 2012

५६०. मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा |

क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादर: ||

अर्थ

मूर्ख माणसाची पाच लक्षणं आहेत - गर्विष्ठपणा; कडवट बोलणं; चिडणं; हेकटपणे वाद घालणं आणि दुसऱ्याच्या बोलण्याबद्दल तुच्छता दाखवणं [म्हणून त्यांच्या बोलण्याचा नीट विचारच करायचा नाही.]

Tuesday, January 10, 2012

५५९. दोषोऽपि गुणतां याति प्रभोर्भवति चेत्कृपा |

अङ्गहीनोऽपि सूर्येण सारथ्ये योजितोऽरुण: ||

अर्थ

मालकाची जर [चांगली] मर्जी असेल तर [एखादा] दोष असून सुद्धा तो गुणासारखा भासतो. [त्याचे तोटे न होता फायदाच होतो.] अरुणाला पाय नाहीत तर सूर्यानी त्याला सारथी बनवलाय.

Monday, January 9, 2012

५५८. परान्नं प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणेषु दयां कुरु |

दुर्लभानि परान्नानि प्राणा: जन्मनि जन्मनि ||

अर्थ

अरे हलकटा; [दुसऱ्याकडे] जेवण मिळालंय तर [अगदी ओ येई पर्यंत जेव] प्राणाचा विचारसुद्धा करू नको. [असं] परान्न मिळणं अगदी दुर्मिळ असतं. प्राण काय दर जन्माला मिळतातच.

५५७. चतुर: सखि मे भर्ता यल्लिखति तदपरो न वाचयति |

तस्मादप्यधिकं मे स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति ||

अर्थ

[दोन मैत्रिणी बढाई मारत आहेत] अग सखी; माझा नवरा [एवढा] हुशार आहे की तो काय लिहितो ते दुसऱ्याला [मुळी] वाचताच येत नाही. त्यावर दुसरी म्हणते [हे तर काहीच नाही] माझा त्यापेक्षाही जास्त [हुशार आहे] तो स्वतः जे लिहितो ते त्याला स्वतःला सुद्धा वाचता येत नाही.

Saturday, January 7, 2012

५५६. अत्यादरो भवेद्यत्र कार्यकारणवर्जितः |

तत्र शङ्का प्रकर्तव्या परिणामे सुखावहा ||

अर्थ

कुठल्याही कारणाशिवायच जर [कुणी] अतिशय सन्मान; आदर दाखवायला लागलं तर त्याबद्दल नक्कीच [तो असं का करतोय अशी] शंका घ्यावी. त्याचा [शंका घेण्याचा] परिणाम चांगलाच होईल.

Friday, January 6, 2012

५५५. दीपो भक्षयते ध्वान्तं कज्जलं च प्रसूयते |

यदन्नं भक्षयेन्नित्यं तादृशी जायते प्रजा ||

अर्थ

दिवा काळोखाला खातो [नाहीसा करतो] आणि [काळी] काजळी निर्माण करतो. आपण जे खातो तशीच प्रजा निर्माण होते. [त्याचे तसेच परिणाम दिसतात.]

Thursday, January 5, 2012

५५४. क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा |

क्षमा वशीकृतिर्लोके क्षमया किं न सिध्यति ||

अर्थ

क्षमा हे दुबळ्या लोकांचे सामर्थ्य. आहे समर्थ लोकांचा तो अलंकार आहे. हे जग क्षमा या गुणामुळे वश होते. क्षमेमुळे काय काय पूर्ण होणार नाही? [सर्वच गोष्टी साध्य होतील.]

Wednesday, January 4, 2012

५५३. देवानामिदमानन्ति कवय: कान्तं क्रतुं चाक्षुषं रुद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा |

त्रैगुण्योद्भवमत्र लोकचारितं नानारसं दृश्यते नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम् || मालविकाग्निमित्र

अर्थ

[नाटक] देवांना आवडणारा; सुंदर; डोळ्यांना [सुखावणारा ] यज्ञ आहे असे [पुरोहित ] म्हणतात. भगवान शंकराने उमा आणि तो अशा दोन स्वरुपात स्वतःच्या शरीरात [नटराजाच्या] मूर्तीत सामावले आहे. यात विविध रसांचा परिपोष करणारी; [सत्व-रज-तम या] त्रिगुणातुन बनलेली जगाच्या वर्तणुकीची [रहस्य] उलगडत जातात. नाटक ही एकच गोष्ट वेगवेगळ्या आवडी असल्या तरी; बऱ्याच प्रकारे; लोकांचे मनोरंजन करते [कुणाला संवाद; कुणाला नृत्य; एखादा प्रसंग आवडेल एकंदरीत सर्वाना नाटक पाहायला आवडत.]

Tuesday, January 3, 2012

५५२. गणेश: स्तौति मार्जारं स्ववाहस्याभिरक्षणे |

महानपि प्रसङ्गेन नीचं सेवितुमिच्छति ||

अर्थ

स्वतःच्या वाहनाचे रक्षण करावे या इच्छेपोटी गणपती मांजराची स्तुती करतो. माणूस [कितीही] थोर असला तरी प्रसंगोपात्त त्याला हलक्यांची मनधरणी करावी लागते.

Monday, January 2, 2012

५५१. कषायैरुपवासैश्च कृतामुल्लाघतां नृणाम् |

निजौषधकृतां वैद्यो निवेद्य हरते धनम् ||

अर्थ

[आजारी] लोक कडू-तुरट [खूप काळ] खाऊन; उपास करून निरोगी होतात. ते स्वतःच्या औषधांनी झालं असं सांगून वैद्य [मात्र फी म्हणून] धन पळवतो.

५५०. दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् |

बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणामनृतं बलम् ||

अर्थ

राजा हेच दुबळ्यांच सामर्थ्य असतं. लहान मुलांच रडणं हीच ताकद असते. [त्यानीच ते आपल्याला हवं ते करून घेतात.] गप्प बसण्यात मूर्खांचा फायदा असतो. खोटं [बोलणं; वागणं] हे चोरांच बळ असतं.

५४९. किमप्यसाध्यं महतां सिद्धिमेति लघीयसाम् |

प्रदीपो भूमिगेहान्तर्ध्वान्तं हन्ति न भानुमान् ||

अर्थ

काही गोष्टी थोर लोकांना असाध्य असल्या तरी सामान्याकडून होऊ शकतात. घरातील अंधार दिवाच नाहीसा करतो [तिथे] सूर्याचा [उपयोग] होत नाही.

५४८. कलहान्तानि वैराणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |

कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ||

अर्थ

वैर केल्यामुळे शेवटी भांडण होत. वाईट-साईट बोलल्यामुळे मैत्री तुटते. वाईट राजामुळे राज्याचा विनाश होतो. वाईट काम केल्यामुळे माणसांचा बदलौकिक होतो.

५४७. सर्वस्वनाशे संजाते प्राणानामपि संशये |

अपि शत्रुं प्रणम्यापि रक्षेत् प्राणधनानि च ||

अर्थ

आपलं सगळ नाहीस होण्याची वेळ आली; जगतो कि मरतो अशी वेळ आली असता शत्रूला नमस्कार करून का होईना [त्याला शरण जाऊन सुद्धा] प्राण आणि संपत्ती वाचवावी.