भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, September 30, 2012

८०१. मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत् |

ज्ञानाङ्कुशसमा बुद्धिस्तस्य निश्चलते मन: ||
अर्थ

माजल्यामुळे बेफाम झालेल्या बलदंड हत्ती प्रमाणे मन सगळीकडे [बेफामपणे] धावत सुटते [मग अनर्थ होतील पण] अंकुशाप्रमाणे असणारी ज्ञानयुक्त बुद्धि त्याला [टोचणी लाऊन] अगदी स्थिर करते.[आपल मन ताब्यात ठेवण्यासाठी माहिती -ज्ञान यांचा खूप उपयोग होतो.]

८००. गुणेषु क्रियतां यत्न: किमाटोपै: प्रयोजनम् |

विक्रीयन्ते न घण्टाभिर्गावो क्षीरविवर्जिता: ||
अर्थ

गुण [अंगी बाणवण्याचा] प्रयत्न करावा, बडेजावाचा काय बरं उपयोग? जर गाई दूध देत नसतील तर [त्यांच्या गळ्यात बांधलेल्या] घंटांमुळे त्या विकल्या जात नाहीत.

७९९. लाङ्गूलचालनमधश्चरणावपातं भूमौ निपत्य चरणोदरदर्शनं च |

श्वा पिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते || नीतिशतक ; भर्तृहरी
अर्थ

कुत्रा [जेऊ घालतो म्हणून; जेवण मिळवण्यासाठी] मालाकापुढे शेपूट हलवत राहतो. [त्याच्या] पायाशी लोळण घेतो; जमिनीवर लोळून पोट, पय दाखवतो. [अशी लाचारी करतो.] पण श्रेष्ठ असा गजराज मात्र सावकाश नजर फेकतो आणि शेकडो वेळा चुचकारल्यावरच [दिलेलं अन्न] खातो.

७९८. कुर्वन्परहितं गूढश्चोरवत्सुजनो भवेत् |

तदुत्थां कीर्तिमाकर्ण्य जिह्रीयाञ्जनसंसदि ||
अर्थ

सज्जन माणूस दुसऱ्याचं कल्याण करत असताना चोराप्रमाणे लपून ते करतो आणि त्याची पसरलेली कीर्ति लोकांच्या समुदायात ऐकून मात्र त्याला संकोच वाटतो. [आपली टिमकी वाजवत हिंडणाऱ्यांच्या बरोबर उलट त्याच वागणं आहे.]

७९७. स्वच्छन्दं दलदरविन्द ते मरन्दं विन्दन्तो विदधतु गुञ्जितं मिलिन्दा: |

आमोदानथ हरिदन्तराणि नेतुं नैवान्यो जगति समीरणात्प्रवीण: ||
अर्थ

हे उमलणाऱ्या कमळा; तुझ्यामधील मध हवा तितका [पिऊन] घेणारे भुंगे [खुशीतून] गुणगुण करतील, [पण तुझ्याकडील विपुल] सुगंध सर्वं दिशांना टोकापर्यंत पोचवण्याच्या बाबतीत मात्र वाऱ्या शिवाय दुसरा कोणीही [त्या कामात] पटाईत नाही. [एखाद्याकडील वस्तूंचा; गुणांचा उपभोग घेणारे असतात, ते मजा तेवढी करतात काहीजण त्यांचा उपभोग सुद्धा न घेता भरपूर कौतुक आणि ते सगळीकडे जाऊन करतात.]

७९६. किं वाच्यं सूर्यशशिनोर्दारिद्य्रं महतां पुर: |

दिनरात्रिविभागेन परिधत्तो यदम्बरम् ||
अर्थ

थोरामोठ्यांच्या पुढे सूर्य आणि चन्द्र यांच्या दारिद्र्याचे काय वर्णन करणार? अहो ते अम्बर सुद्धा [आकाश आणि वस्त्र ] एकजण दिवसा आणि रात्री असं वाटून घेतात [अम्बर सुद्धा यांच्या कडे फारस नाहीये म्हणून सूर्य दिवसा आणि चन्द्र रात्री असं वाटून वापरतात.]

Monday, September 24, 2012

७९५. को हि तुलामधिरोहति शुचिना दुग्धेन सहजमधुरेण |

तप्तं विकृतं मथितं तथापि यत्स्नेहमुद्गिरति ||

अर्थ

नैसर्गिकपणे गोडवा असणाऱ्या शुद्ध दुधाची कोण बरे बरोबरी करू शकेल? [असं पहा की] ते तापवल; त्याला बिघडवण्याचा [प्रयत्न केला; पक्षी  विरजलं]; घुसळलं [काहीही छळ केला] तरी ते स्नेहच [स्निग्धता - लोणी; तूप; प्रेम] देत [ दुधाच; दही; ताक; काहीही केलं जरी नासवल तरी त्यात " स्नेह" असतोच.]

७९४. सर्वेऽपि नग्ना भुवनं विशन्ति चिन्तासु मग्ना इह सञ्चरन्ति |

नग्ना इतो हन्त कुतोऽपि यान्ति नातोऽधिकं तत्वविदो विदन्ति ||

अर्थ

तत्वज्ञानी लोकांना सर्वं श्रेष्ठ गोष्ट समजते ती ही की; या जगात प्रवेश करताना सर्वं जण नग्न असतात [बरोबर काही आणता येत नाही; आयुष्यभर कसल्या  ना कसल्या] चिंतेमध्ये बुडून जातात; आणि अरेरे! [एक दिवस] जाताना जिथे जातात तिथे नागडेच [बरोबर काही घेऊन जाता येत नाही] निघून जातात. यापेक्षा जास्त काही त्यांना माहित नसतं. [ खरं हीच गोष्ट सर्वात महत्वाची आहे. कितीही चांगली किंवा वाईट कृत्य करून अगदी रगड पैसा मिळवला तरी सगळं इथच सोडून, तत्वज्ञानी लोकांच्या भाषेत "नग्न" च जायचयं मग दुष्कृत्य कशाला करायची? सरळ मार्गाने जागून जेवढ जमेल तेवढ सुखं घ्याव.]

Friday, September 21, 2012

७९३. अस्यां सखे बधिरलोकनिवासभूमौ किं कूजितेन खलु कोकिल! कोमलेन |

एते हि दैवहतकस्तदभिन्नवर्णं त्वां काकमेव कलयन्ति  कलानभिज्ञा: ||

अर्थ

अरे मित्रा  कोकिळा,  या बहिऱ्यांच्या वस्तीमध्ये; खरंतर  तुझ्या कोमल कूजनाचा काय बर उपयोग? कलांची जराही ओळख यांना नसल्यामुळे [आणि श्रवणशक्तीच्या अभावामुळे] हे दुर्दैवी  लोक त्याच [काळ्या] रंगाचा  तू असल्यामुळे  कावळा आहेस असंच समजतील.  [ कोकिलान्योक्ती - कोकीळ = कुठल्या  तरी कलेमध्ये निष्णात; बहिरा ॥  श्रोतृवृंद= अरसिक ]

७९२. जेतुं यस्त्रिपुरं हरेण हरिणा व्याजाद्बलिं बध्नता स्रष्टुं वारिभवोद्भवेन भुवनं शेषेण धर्तुं धराम् |

पार्वत्या महिषासुरप्रमथने सिद्धाधिपै: सिद्धये ध्यात: पञ्चशरेण विश्वजितये पायात्स नागानन: ||
अर्थ

ज्याचे भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्याच्या वेळी; भगवान विष्णुनी फसवून बळीला बांधताना; जगाची निर्मिती करण्याच्या वेळी ब्रह्मदेवाने; शेषनागाने पृथ्वीमंडल उचलताना; महिषासुराचा वध करण्याच्या वेळी पार्वतीने; सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी सिद्ध प्रकारच्या देवानी; विश्वविजय करायला निघालेल्या मदनाने मनात [यश मिळवण्यासाठी; सर्वं प्रथम] ध्यान केले तो गजानन [आपले सर्वांचे] रक्षण करो.

Thursday, September 20, 2012

७९१. तां पार्वतीत्याभिजनेन नाम्ना बन्धुप्रियां बन्धुजनो जुहाव |

उमेति मात्रा तपसो निषिद्धा पश्चादुमाख्यां सुमुखी जगाम || कुमारसंभव; कालिदास

अर्थ


नातेवाईकांना जीव लावणाऱ्या; घराण्यात प्रिय; उत्कृष्ट आशा प्रकारच्या 'पार्वती' या नावाने [सगळे] नातेवाईक तिला संबोधित करत. नंतर त्या सुंदरीला तप करण्यास आईने "उ -मा" असा  विरोध  केल्यानंतर तिला उमा असे नाव प्राप्त झाले [अतिशय नाजूक अशा आपल्या कन्येने असे कठोर तप करू नये अशा इच्छेने मेना  उ - मा {अग नको ना} असे म्हणाली मग तेच तिचे नाव झाले.]

Monday, September 17, 2012

७९०. विपदं सहमानस्य धैर्येणैव प्रयोजनम् |

सम्पदं तूपभुञ्जानो गुणग्राममपेक्षते ||

अर्थ

संकटात सापडलेल्या [माणसाला]  धीर न सोडणे ह्या एकाच गुणाची [मुख्यतः एकाची] जरुरी असते. तर जो वैभवात असेल त्याने  मात्र  बरेच गुण [माणसांची पारख; सर्वाना सांभाळून घेणं; गुणग्राहकता  इत्यादी] जोपासले पाहिजेत.

७८९. भो भो युवानो निजयौवनानि प्राप्तान्यन्तानि कथं मनुध्वम् |

सुदीर्घमप्यत्र दिनं निशान्तं विलोक्य चित्तं कुरुत प्रशान्तम् ||

अर्थ

अरे तरुणांनो; तुम्हाला आपले तारुण्य कायमचे टिकणारे - चिरंतन कसं बरं वाटतं? दिवस कितीही मोठा वाटला तरी रात्र येऊन तो संपतोच. हे नीट पाहून [म्हातारपण येणार हे लक्षात घेऊन] मन [ताळ्यावर ठेवून] अगदी शान्त करा. [चाळे करू नये अस कवीला सुचवायचं आहे.]

७८८. श्रियः प्रसूते विपदो रुणद्धि यशांसि दुग्धे मलिनं प्रमार्ष्टि |

संस्कारशौचेन परं पुनीते शुद्धा हि बुद्धि: किल कामधेनु:  ||

अर्थ

निर्मळ  बुद्धि ही खरोखर आपल्याला होईल ती इच्छा पूर्ण करणारी [कामधेनु] आहे. ती संपत्ती मिळवून देते; संकटाना अडवून टाकते; विपुल कीर्ति मिळवून देते; अपकीर्ति नाहीशी करते; मन उन्नत करणाऱ्या उत्तम संस्कारांनी अतिशय पवित्र करते.

Saturday, September 15, 2012

७८७. कनकभूषणसंग्रहणोचितो यदि मणिस्त्रपुणि प्रणिधीयते |

न स विरौति न चापि हि शोभते भवति योजयितुर्वचनीयता  ||

अर्थ

सोन्याच्या अलंकारात गुंफण्याजोग [तेजस्वी; महागामोलाच] रत्न जर जस्तामध्ये  बसवून घेतलं तर ते खराब काही दिसत नाही. पण [एकदम सुंदर पण दिसत नाही] तस ते चांगलं दिसत, पण [त्याच सौंदर्य  खुलून न दिसण्याबद्दल [ती वस्तु जस्तामध्ये  बनवून घेणाराला] दोष दिला पाहिजे. [आपल्या जवळच्या माणसाबद्दल सुद्धा ज्यात एखाद्याला कौशल्य आहे तेच काम त्याला योजून दिल पाहिजे.]

Thursday, September 13, 2012

७८६. बलिनो बलमाहन्ति भीतिश्चित्ते कृतास्पदा |

रिपोर्बिभ्यत् स्वदौर्बल्यात्सबलं कुरुते रिपुम् ||
अर्थ

मनात घर करून बसलेली भीति [माणूस जरी] ताकदवान [असला तरी] त्याचे बळ ती भीतिच मारून टाकते.[त्याची सगळी ताकद नष्ट होते] आणि तो या स्वतःच्या घाबरटपणा या  दुबळेपणामुळे शत्रूला  भिऊन; त्याला  समर्थ बनवतो.

Wednesday, September 12, 2012

७८५. जन्मेदं वन्ध्यतां नीतं भवभोगोपलिप्सया |

काचमूल्येन विक्रीतो हन्त चिन्तामणिर्मया ||

अर्थ

नश्वर भोगांमध्ये रंगून जाऊन मी हे सर्वं आयुष्य वाया घालवले. अरेरे ! [अगदी उत्कृष्ट गोष्टी ज्याच्या मुळे मिळवता येतील अस>] चिंतामणी रत्नासारखं [जीवन कवडीमोलाने] काचेच्या  किमतीला फुकून टाकलं [परमेश्वर प्राप्ती करता येण हे ध्येय असेल तर ईशचिंतनाला  वेळ दिला  पाहिजे.]

७८४. तद्वाचि माधुर्यं जाने कोकिल! कृत्रिमम् |

प्रपोषितो यैस्तानेव जातपक्षो जहासि यत्  ||
अर्थ

अरे कोकिळा! तुझ्या वाणीतली ही गोडी नकली आहे हे [मला पक्कं]  ठाऊक आहे. कारण ज्यानी तुझं पालनपोषण केलं त्यांना पंख फुटल्या [फुटल्या  लगेच] तू सोडून जातोस! [ कोकिलान्योक्ती -कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. सारखेपणा मुळे फसून कावळीण त्यांना वाढवते पण कामापुरती गोडगोड बोलणारी मंडळी काम झाल्यावर काहीच कृतज्ञता न ठेवता पळून जातात .]

Monday, September 10, 2012

७८३. वृत्तं यत्नेन संरक्षेद्वित्तमायाति याति च |

अक्षीणो वित्तत: क्षीणो वृत्ततस्तु हतो हत: ||

अर्थ

चारित्र्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावं. [आपल्या शीलाची अगदी काळजी घेतली पाहिजे. गरिबी पायी चोरी केली किंवा तसलं काही करायचं नाही.] पैसा [काय] येतो आणि जातो सुद्धा. पैशाची क्षीण [कमतरता] असली तरी तो अक्षीण [ठणठणीत] आहे. पण चारित्र्य डागाळलं तर मात्र आपण मेलोच. [चारित्र्य सगळ्यात महत्वाच असतं. ]

७८२. हारं वक्षसि केनापि दत्तमज्ञेन मर्कट: |

लेढि जिघ्रति संक्षिप्य करोत्युन्नतमानसम् ||

अर्थ

कुणीतरी मुर्खाने हार [हा दागिना] छातीवर फेकल्यावर माकडाने त्याला चाटलं; वास घेतला [आणि ही वस्तु निरुपयोगी दिसतेय असं समजून] गुंडाळून [त्याच्यावर बसला] आपले आसन उंच केले. [मूर्ख माणसाला एखादी उत्तम वस्तु मिळाली तर त्याची किंमत न कळल्याने तो तिचा मातीमोल असा वापर करतो.]

Sunday, September 9, 2012

७८१. नाधर्मश्चरितो लोके सद्य: फलति गौरिव |

शनैरावर्तमानस्तु कर्तुर्मूलानि कृन्तति  ||

अर्थ

या जगात गाय सांभाळली तर त्याचा लगेच फायदा होतो तसं; अधर्माच [अन्यायाच] आचरण केलं तर लगेचच त्याच फळ भोगाव लागत नाही. पण हळू हळू [पापाचा  घडा] भरला की पाप करणाऱ्याचा [अगदी ] मुळापासून नाश करत. [ते पाप]

Friday, September 7, 2012

७८०. यथा हि मलिनैर्वस्त्रैर्यत्र कुत्रोपविश्यते |

एवं चलितवृत्तस्तु वृत्तशेषं न रक्षति ||

अर्थ

ज्याप्रमाणे कपडे मळकटच असले की [माणूस] कुठेही बसतो. [स्वच्छ असले तर कोणी घाणीत बसत नाही; पण मुळातच खराब कपडे असल्यास मग ठीक आहे असं म्हणतो.] तसं ज्याच चारित्र्य घसरलंय तो त्याची उरल्यासुरल्याची [पण] काळजी करत नाही.

Thursday, September 6, 2012

७७९. परिश्रमज्ञं जनमन्तरेण मौनिव्रतं बिभ्रति वाग्मिनोऽपि |

वाचंयमा: सन्ति विना वसन्तं पुंस्कोकिला: पञ्चमचञ्चवोऽपि  ||

अर्थ

[ फर्डे ] वक्ते असले तरी [आपल्या] कष्टांची ज्यांना किंमत कळत नाही, त्यांच्याशी [बोलताना स्वतःच्या कामचे वर्णन न करता] गप्प बसतात. गळ्यामध्ये पंचम [अति मधुर स्वर] असूनसुद्धा नर कोकीळ वसंताचं [आगमन  होई पर्यन्त] आपला आवाज बंद ठेवतात.

७७८. आदरेण यथा स्तौति धनवन्तं धनेच्छया |

तथा चेद्विश्वकर्तारं को न मुच्येत बन्धनात्  ||

अर्थ


जसं [माणूस] संपत्ती मिळावी म्हणून श्रीमंत माणसाची आदराने स्तुती करतो, तसंच जर त्यानी या जगाची निर्मिती करणाऱ्या [परमेश्वराची  मनापासून] स्तुती [प्रार्थना; भक्ती] केली तर कोण बरं या [जन्म -मृत्यूच्या] बंधनातून सुटणार नाही?

७७७. कति वा पाण्डवा भद्र खट्वाखुरमितास्त्रय: |

एवमुक्त्वा जड: कश्चिद्दर्शयत्यङ्गुलिद्वयम्   ||

अर्थ

सद्ग्रूहस्था; पांडव किती रे ? [या प्रश्नाचे उत्तर ] एक मूर्ख खाटेच्या खुरान एवढे तीन अस तोंडाने बोलून [हाताने ] दोन बोटे दाखवतो. 

[अगदी शक्य तेवढ्या चुका केलेल्या आहेत..:)]

Tuesday, September 4, 2012

७७६. न वा कस्य विषादाय वियोग: प्रियवस्तुन: |

न शोचति परं कोऽपि प्रियां कीर्तिं दिवं गताम्  ||

अर्थ

आपल्या आवडत्या वस्तूचा वियोग झाला की कोणाला बरे दु:ख होत नाही? [असं] असूनही आपल्याला हवीहवीशी वाटणारी कीर्ति [दिगंत] दूर पसरल्याबद्दल [ती फार लांब गेली म्हणून] कोणी दु:ख करत नाही.

Monday, September 3, 2012

७७५. सकृत्कृतस्य पापस्य पश्चात्तापेन शुद्धता |

अभीक्ष्णं क्रियमाणस्य नैव केनापि निष्कृतिः ||

अर्थ

एकदाच पाप केलं आणि त्याचा [लगेच] पश्चात्ताप झाला तर त्या पाप करण्याच परिमार्जन होत. [पण] वारंवार पाप केली तर त्याची कशानेही निवृत्ती होत नाही. [सारखी सारखी चूक करून कोणी माफ करणार नाही. पहिल्या वेळेला पश्चात्ताप झाला तर जाऊ देत म्हणून सोडून देतील.]

Sunday, September 2, 2012

७७४. भेतव्यं न तथा शत्रोर्नाग्नेनाहेर्न चाशने: |

इन्द्रियेभ्यो यथा स्वेभ्यस्तैरजस्त्रं हि हन्यते ||

अर्थ

[माणुस] शत्रू; साप; आग; वीज यांना भीतो. त्यापेक्षा जास्त  त्याला  स्वतःच्या इंद्रियांची भीती असते. [आसक्तीमुळे पतन होत म्हणून त्यांच्यावर ताबा पाहिजे.] [कारण शत्रू वगैरे कधीतरी त्रास देतात] पण आपल्या वासना सततच हल्ला करत असतात.