भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, July 30, 2012

७४५. नास्ति विद्यासमं चक्षुः नास्ति सत्यसमं तप: |

नास्ति रागसमं दु:खं  नास्ति त्यागसमं सुखम्  ||

अर्थ

विद्येमुळे [होणाऱ्या ज्ञानाने  जे] दिसत तसं [खरं] दुसऱ्या कशानेही दिसत नाही. ख-याचा [पक्ष घेण्यासारखं] दुसरं तप नाही. आसक्ती [मुळे] सर्वात जास्त दु:ख होत. त्यागात सर्वात जास्त सुख असतं.

७४४. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यं नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |

नष्टारोग्यं सूपचारै: सुसाध्यं नष्टा वेला  या गता सा गतैव  ||

अर्थ

[बरेच] कष्ट करून [का होईना] गेलेली संपत्ती [परत] मिळते. शिकलेलं  विसरलं असलं तर [पुन्हा] अभ्यास करून समजत. चांगल औषध-पाणी केलं तर बिघडलेली तब्बेत सुधारते.  पण वेळ मात्र एकदा [वाया]  घालवला तर गेला तो गेलाच [तो परत मिळवता येत नाही म्हणून आपण वेळ वाया घालवता कामा नये.]

७४३. विसृज्य शूर्पवद्दोषान् गुणान् गृह्णन्ति साधव: |

दोषग्राही गुणत्यागी चालनीव हि दुर्जन:||

अर्थ


सज्जन लोक सूप ज्याप्रमाणे [फोलपट -कचरा उडवून टाकतो आणि चांगल धान्य सुपात रहात त्याप्रमाणे ] दोष टाकून देऊन गुण घेतात. पण  दुष्ट लोक मात्र चाळणी प्रमाणे असतात [ चांगले दिसलं तरी वाईट असेल तेवढ बोलून नाव ठेवायची चांगल्या गोष्टीचं कौतूक करणार नाहीत.]

७४२. साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थेभ्य: साधवो वरम् |

कालेन फलते  तीर्थं सद्य: साधुसमागम: ||

अर्थ

सज्जनांची भेट पुण्यकारक असते. तीर्थक्षेत्री  [यात्रा] करण्यापेक्षा  सज्जनांना भेटणं चांगल. तीर्थाटनाचे पुण्य [काही] काळाने मिळते. सज्जनांच्या सहवासाचा फायदा लगेच होतो.

Friday, July 27, 2012

७४१. अमित्रो न विमोक्तव्य: कृपणं बह्वपि ब्रुवन् |

कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम्  ||

अर्थ

कितीही दीनवाणे बोलत असला तरी शत्रूला [आपल्या तावडीत मिळाल्यावर ] सोडून देऊ नये. त्याच्यावर दया न करता त्या शत्रूला ठार मारावे. [महंमद घोरीला सोडून दिल्यावर पुढच्या वेळेला पृथ्विराजाचा नाशच केला आणि इतिहासाला फार वेगळं वळण लागलं. त्या ऐवजी तेंव्हाच मारलं असतं तर त्यानी  कृतघ्नपणा करायचा प्रश्नच आला नसता.]

Wednesday, July 25, 2012

७४०. जीवनं स्वं परार्थाय नित्यं यच्छत मानवा: |

इति संदेशमाख्यातुं समुद्रं यान्ति निम्नगा: ||

अर्थ

हे माणसांनो आपले जीवन  [आयुष्य] नेहमी दुसऱ्याला द्या,  हा संदेश देण्यासाठीच नद्या समुद्राकडे जात असतात. [नद्या स्वतःचे जीवन {पाणी } स्वतः न वापरता फक्त दुसऱ्याला देत असतात. त्यामुळे त्यांनी आधी आचरणात आणून हे तत्व सांगितलेलं आहे.]

Tuesday, July 24, 2012

७३९. हीयते हि मतिस्तात हीनै: सह समागमात् |

समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम्  ||

अर्थ

अरे  बाळ; कमी [बुद्धी]  असलेल्यांशी संगत पडली तर [आपली] बुद्धी ऱ्हास पावते. [आपल्या इतक्याच] बुद्धीच्या [विद्यार्थ्यांशी] सहवास असेल तेवढीच राहते आणि तल्लख  [मुलाबरोबर  मैत्री] झाल्यास अधिक तल्लख बनते.

Monday, July 23, 2012

७३८. यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले |

तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति  ||

अर्थ

पृथ्वीतलावर जोपर्यंत नद्या आणि पर्वत आहेत, तोपर्यंत रामायणाच कथानक लोक गात राहतील. [रामकथेचा महिमा कधी कमी होणार नाही.]

७३७. देशाटनं राजसभाप्रवेशो व्यापारिविद्वज्जनसंगतिश्च |

सर्वेषु शास्त्रेंष्ववलोकनं च चातुर्यमूलानि भवन्ति पञ्च  ||

अर्थ

देशोदेशीचे प्रवास; राजदरबारी वावर; ज्ञानी माणसे आणि व्यापारी यांचा सहवास; सर्व शास्त्रांचा अभ्यास या पाच गोष्टी हुशारी निर्माण करणाऱ्या [वाढवणाऱ्या] आहेत.

७३६. सेवितव्यो महावृक्ष: फलच्छाया समन्वितः |

यदि दैवात्फलं नास्ति छाया केन निवार्यते ||

अर्थ

फळे आणि सावली असणाऱ्या मोठ्या वृक्षाचा आश्रय घ्यावा. [म्हणजे आपल्या कम] नशिबाने [झाडाला] फळे धरली नाहीत तरी सावली तर कुठे जात नाही. [आपण आधार घेताना चांगला भक्कम घ्यावा, निदान थोडा तरी फायदा होईलच.]

Friday, July 20, 2012

७३५. परिश्रमो मिताहारश्चेद् भेषजद्वयम् |

स्वायत्तं यदि सर्वेषां किं वैद्यस्य प्रयोजनम्  ||

अर्थ

जर सर्व लोकांच्या स्वतःच्या ताब्यात [हातात] कष्ट [करणे] आणि मोजके जेवण ही दोन औषधे आहेत तर वैद्याची जरूरच काय?

Wednesday, July 18, 2012

७३४. ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदाध्ययनदक्षता |

एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थिगुणपञ्चकम्  ||

अर्थ

ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा; [आपल्या] गुरुवर दृढ विश्वास; अभ्यासाबाबत सतत जागरूक असणे; लक्ष [अभ्यासावरच] केंद्रीत करणे आणि महत्त्वाकांक्षा हे पांच गुण विद्यार्थ्यासाठी [अगदी] जरूर आहेत.

Tuesday, July 17, 2012

७३३. वस्तुतस्तु स्वयंसिद्धो भिषगेव स्वयं नर: |

हितभुक् मितभुक् चैव पथ्यभुक् स्यात्‌ विशेषतः ||
अर्थ

तो जर [तब्बेतीला] चांगल;  [आवडल म्हणून अति न खाता ] मोजक; आणि विशेषे करून त्याच्या तब्बेतीला पथ्याच अन्न जेवेल तर; खर म्हणजे माणूस स्वत: स्वत: पुरता तरी वैद्य आहे.

Monday, July 16, 2012

७३२. यो ध्रुवाणि परित्यज्य ह्यध्रुवं परिषेवते |

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति ह्यध्रुवं नष्टमेव च ||

अर्थ

खात्रीच्या [गोष्टी] सोडून जो असंभाव्य [होण कठिण  अशा] गोष्टींच्या पाठीमागे लागतो; त्याच्या बाबतीत खात्रीच्या गोष्टी नाहीशा होतात आणि बेभरवशाच्या गोष्टी तर [मुळातच] घडायच्या नसतात. [त्यामुळे त्याच्या हातात काहीच पडत नाही ]

७३१. दानेन तुल्य: निधिरस्ति नान्य: संतोषतुल्यं सुखमस्ति किं वा ?

विभूषणं शीलसमं कुतोऽस्ति? लाभोऽस्ति नारोग्यसम: पृथिव्याम्  ||

अर्थ

दान करण्यासारखा दुसरा [चांगला] संचय नाही. समाधानासारखे दुसरे सुख  असते काय?  चारित्र्यासारखा दुसरा [इतका चांगला] दागिना कुठे असतो? या जगात निरोगी राहण्यासारखा दुसरा फायदा नाही.

७३०. अर्थातुराणां न गुरुर्न बन्धु: कामातुराणां न भयं न लज्जा |

विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला  ||

अर्थ

पैशाची हाव असणारी [माणसे] गुरु किंवा नातेवाईक यांचेबद्दल [प्रेम] ठेवत नाहीत. विषयासक्त माणसांना लाज किंवा भीती वाटत नाही. विद्याभ्यास करणाऱ्या [नक्की चांगले यश हवे असले तर] सुखही मिळत नाही आणि झोप सुद्धा मिळत नाही. भूकेजलेल्यांना  चव ही कळत नाही [कश्याही चवीच असलं तरी त्यांना ते अन्न चांगलं लागत. ] आणि कुठलीही वेळ असली तरी खायला तयार असतात.

Friday, July 13, 2012

७२९. शाठ्येन धर्मं कपटेन मित्रं परोपतापेन समृद्धिभावम् |

सुखेन विद्यां परुषेण नारीं वाञ्छन्ति ये व्यक्तमपण्डितास्ते  ||

अर्थ

जे गुंडगिरी करून पुण्य मिळवू इच्छितात; कपट करून मित्राकडून प्रेम मिळवू इच्छितात; दुसऱ्याला त्रास देऊन श्रीमंती मिळवू पहातात; शिक्षण [कुठलीही विद्या] आरामाने [तिच्यासाठी कष्ट न करता] मिळवू इच्छितात  कठोर [कृत्ये]  करून एखाद्या स्त्रीचे [प्रेम] मिळवू इच्छितात ते मूर्ख आहेत हे अगदी उघड आहे.

७२८. सुखस्य दु:खस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा |

अहं करोमीति वृथाभिमान: स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोक: ||

अर्थ

[आपल्याला] सुख किंवा दु:ख कोणी [दुसरा] देत नसतो, हे [दु:ख] मला दुसऱ्याने भोगायला लावले ही विचारसरणी चुकीची आहे. 'मी [मोठा] कर्तृत्ववान आहे ' असं वाटणं हा खोटा गर्व आहे. माणूस हा स्वतः पूर्वी केलेल्या [संचित] कर्माच्या धाग्याने बांधलेला असतो. [आपले भोग असतात; त्यामुळे कुणाला तरी आपल्याला त्रास देण्याची बुद्धी होते. तसंच आपण अगदी करायचं म्हटलं तरी सर्व काम होतातच अस कुठे आहे? आपण आपल्याला जमेल तेवढा चांगला प्रयत्न करावा आणि परमेश्वरावर हवाला ठेवावा. दुसऱ्यांनी त्रास दिला म्हणून बदला घ्यायला जाऊ नये.]

Thursday, July 12, 2012

७२७. अप्रदाता समृद्धोऽसौ दरिद्रश्च महामना: |

अश्रुतश्च  समुन्नद्धस्तमाहुर्मूढचेतसम्  |

अर्थ

खूप श्रीमंत असून जो दान करत नाही तो; गरिबी असून उदारपणे देत राहतो तो; अशिक्षित असून गर्व करतो तो. - यांना मूर्ख म्हणतात

Tuesday, July 10, 2012

७२६. परस्परामिषतया जगतो भिन्नवर्त्मन: |

दण्डाभावे परिध्वंसी मात्स्यो न्याय: प्रवर्तते  ||

अर्थ

जगातील  [सर्वांचे] मार्ग [अत्यंत] वेगवेगळे असल्यामुळे जर [कठोर] शिक्षा होत नसेल तर सगळ्यांचा नाश होईल असा; एक दुसऱ्याचे भक्ष्य अशा प्रकारचा 'मात्स्य' न्याय जगात बळावतो. [मोठा मासा लहान माशाला खातो थोडक्यात गुंडगिरी; अराजक म्हणून कडक  न्यायव्यवस्थेची जरूर आहे.]

७२५. क्षन्तव्यो मन्दबुद्धीनामपराधो मनीषिणा |

न हि सर्वत्र पाण्डित्यं सुलभं पुरुषे क्वचित् ||
अर्थ

कमी बुद्धी असणाऱ्यांची चूक थोर माणसाने माफ केली पाहिजे. कारण कधी कधी माणसांमध्ये एवढी हुशारी नसते. [मुद्दाम केल नसेल; लक्षात आल नाही तर सोडून द्याव; सगळ्यांनाच तेवढ डोकं नसत.]

Saturday, July 7, 2012

७२४. रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतामम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा: |

केचिद्वृष्टिभिराद्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:||चातकान्योक्ती

अर्थ

अरे मित्रा चातका; क्षणभर लक्षपूर्वक ऐक. आकाशात भरपूर ढग असतात, पण सगळेच [पाऊस पाडणारे] असे नसतात. काही [खूप] पाऊस पाडून पृथ्वीला चिंब भिजवतात, तर काही उगाचच गडगडाट करतात. तर तू जो जो दिसेल त्याच्यासमोर करुण याचना करू नकोस. [फक्त गडगडाट करणाऱ्या ढगांना काही पाझर फुटणार नाही आणि तुला पाणी मिळणार नाही.] [इथे चातक म्हणजे गरजू; पांढरे ढग = कंजूष श्रीमंत; काळे  ढग = दाता]

Friday, July 6, 2012

७२३. विशाखान्ता मता मेघा: प्रसूतान्तं च यौवनम् |

प्रणामान्त: सतां कोपो याचनान्तं हि गौरवम्  ||

अर्थ

[पाऊस पाडणारे] ढग विशाखा नक्षत्रापर्यंत असतात. तारुण्य बाळंतपणानंतर संपत. सज्जन लोकांचा राग नमस्कार केल्यावर [नम्रपणे चूक कबूल केल्यावर] जातो. याचना केल्यावर माणसाचा मोठेपणा रहात नाही.

Thursday, July 5, 2012

७२२. जामातृसम्पत्तिमचिन्तयित्वा पित्रा तु दत्ता स्वमनोभिलाषात् |

कुलद्वयं हन्ति मदेन नारी कूलद्वयं क्षुब्धजला नदीव || अविमारक; भास

अर्थ

स्वतःच्या हौसेला अनुसरून; जावयाच्या संपत्तीचा विचार न करता [आणि तिच्या इच्छेचा विचार न करता ] पित्यानी जर [मुलीच लग्न] लावलं तर [पूराचं] पाणी उसळलेली नदी दोन्ही काठावरील [गावांचा] नाश करते. त्याप्रमाणे माजाने मुलगी दोन्ही घराण्यांचा नाश करते.

Wednesday, July 4, 2012

७२१. परोऽपि हितवान्बन्धु: बन्धु: अप्यहित: पर: |

अहित: देहज: व्याधि: हितमारण्यमौषधम्  ||

अर्थ

जो हिताची काळजी घेतो तो जरी लांबचा असला तरी त्याला बांधव [ असं म्हणावं]  आणि जवळचा माणूस [कट करून वगैरे ] नुकसान करत असेल तर त्याला परक्या [प्रमाणे समाजावं ] अगदी आपल्या शरीरात असला तरी रोग हा वाईटच असतो आणि [लांब ] अरण्यातून [आणावं लागल तरी ] औषध हे कल्याणकारक असते.

Tuesday, July 3, 2012

७२०. अधिगत्य गुरोर्ज्ञानं छात्रेभ्यो वितरन्ति ये |

विद्यावात्सल्यनिधय: शिक्षका: मम दैवतम् ||

अर्थ

[आपल्या]  गुरूंकडून ज्ञान मिळवून ते [सर्व] विद्यार्थ्यांना शिकवणारे; ज्ञान आणि प्रेमळपणा यांचा खजिनाच असणारे गूरू हे मला देव आहेत.

आज गुरुपौर्णिमा आहे.

Monday, July 2, 2012

७१९. पण्डिते चैव मूर्खे च बलवत्यपि दुर्बले |

ईश्वरे च दरिद्रे च मृत्योः सर्वत्र तुल्यता  || भोजप्रबंध

अर्थ

ज्ञानी किंवा मूर्ख मनुष्य; सामर्थ्यवान किंवा दुबळा; श्रीमंत किवा गरीब [कोणीही असो]  मृत्यूला काही फरक करत नाही [राजाला सुद्धा मरण येतच ना !]

७१८. तत्कर्म यन्न बन्धाय सा विद्या या विमुक्तये |

आयासायापरं कर्म विद्याऽन्या शिल्पनैपुणम्  ||

अर्थ

ती [उत्तम] कृती की जिच्यामुळे आपण अडकून बसणार नाही [मुक्त होऊ]  आणि जी विद्या आपल्याला मुक्त करते तीच खरी विद्या. [अध्यात्म विद्या अशी मुक्त करणारी आहे.] बाकीची कामे म्हणजे [खरं तर फक्त] कष्टच आणि बाकीच्या विद्या म्हणजे वेगळी कलाच असतात.

७१७. महायोगपीठे तटे भीमरथ्या: वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः |

समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं  भजे पाण्डुरङ्गम्  ||  शंकराचार्य

अर्थ

थोर योग्याचे व्यासपीठ असलेल्या भीमा नदीच्या काठी; श्रेष्ठ अशा ऋषींना बरोबर घेऊन; पुंडलिकाला वर देण्यासाठी येऊन उभे राहिलेल्या; आनंदाचा गड्डाच असणाऱ्या;  परब्रह्मस्वरूप अशा विट्ठलाची  [मी]  भक्ती करतो.

७१६. भेतव्यं न तथा शत्रोर्नाग्नेर्नाहेर्न चाशने: |

इन्द्रियेभ्यो यथा स्वेभ्यस्तैरजस्रं हि हन्यते ||

अर्थ

[माणसानी] शत्रू ; आग; साप; वीज [वगैरे गोष्टीं] पेक्षाही स्वतःच्या पंचेंद्रियांना अधिक भ्याव [त्यांच्यामुळे होणाऱ्या पतनाची काळजी घ्यावी.] कारण [शत्रूवगैरे अधून मधून त्रास देतात. पण आपली पंचेंद्रिये  सतत आपल्याला [त्यांच्या विषयांकडे खेचत असतात.] आघात करत असतात.