भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, December 22, 2014

१३७७. भवभयमपहन्तुं ज्ञानविज्ञानसारं निगमकृदुपजऱ्हे भृङ्गवद्वेदसारम् |

अमृतमुदधितश्चापाययद् भृत्यवर्गान् पुरुषमृषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि |

अर्थ

भगवान शुक म्हणतात - भ्रमराप्रमाणे [भुंगा जसा कमलाला जराही धका न लावता फुलातून मध घेतो तसं वेदाची ओढाताण न करता] वेदाची निर्मिती करणाऱ्या देवाने वेदाचं सारं [भागवतात कृष्ण-उद्धव संवादात ] काढून किंवा  समुद्र मंथनातून अमृत काढून भक्तांना पाजले आहे, अशा त्या श्रेष्ठ कृष्ण नावाच्या परब्रह्माला मी वंदन करतो.

Monday, December 15, 2014

१३७६. नष्टं मृतमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः |

पण्डितानां च मूर्खाणां विशेषोऽयं यतः स्मृतः ||

अर्थ

मेलेले [संबंधित] नाहीशा झालेल्या [वस्तू] आणि गतकाळ याबद्दल ज्ञानी लोक दुःख करीत नाहीत. [आणि सामान्य शोक करत बसतात.] म्हणून ज्ञानी आणि मूर्ख यातला हाच [महत्वाचा] फरक सांगितला आहे.

१३७५. किं कौमुदी: शशिकलाः सकला विचूर्ण्यसंयोज्य चामृतरसेन पुनः प्रयत्नात् |

कामस्य घोरहरहुंकृतिदग्धमूर्तेः संजीवनौषधिरियं विहिता विधात्रा ||

अर्थ

[सुंदर युवतीच वर्णन] भगवान शंकराच्या भयंकर हुंकाराने भस्म झालेल्या कामदेवाला पुन्हा जिवंत करण्या [च अतिदुर्धर काम असल्याने तितकाच उपाय जालीम हवा म्हणून] ब्रह्मदेवाने सर्व लखलखत्या चंद्रकोरींची बारीक पूड करून प्रयत्नपूर्वक त्यावर अमृताचा रस ओतून ओतून या [सुंदरीची] निर्मिती केली आहे .

Wednesday, December 10, 2014

१३७४. बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |

न च्छन्दसा केनचिदुधृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||

अर्थ

[खूप शिक्षण झालं; व्याकरण येत असलं तरी] भुकेजलेला असताना व्याकरण खात नाहीत. [त्यानी भूक भागत नाही.] तहानलेल्याला काव्य रस पिऊन [तहान भागत नाही]. वेदांच अध्ययन करून कुणीही घर वर काढलेलं नाही. हे गुण निरुपयोगी आहेत. संपत्ती मिळव बाबा.

Monday, December 8, 2014

१३७३. मालाकमण्डलू अधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले |

यस्य स्त उर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ||

अर्थ

सहा भुजा असणाऱ्या; की ज्या खालच्या दोन करकमलात जपमाळ आणि कमंडलू आहे; मधल्या करद्वयात डमरू आणि त्रिशूल आहे आणि वरच्या हातात कल्याणकारक शंख आणि चक्र आहे, अश्या भगवान दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो की  ज्याने अत्री ऋषींना वर दिला.

Friday, December 5, 2014

१३७२. उच्चैरेष तरुः फलं च विपुलं दृष्ट्वैव हृष्टः शुकः पक्वं शालिवनं विहाय जडधीस्तं नालिकेरं गतः |

तत्रारुह्य बुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा तस्य न केवलं विगलिता चञ्चूर्गता चूर्णताम्  ||

अर्थ

मूर्ख  पोपट "हे झाड खूप उंच आहे आणि फळ पण भरपूर लागल्यैत" असं पाहून पिकलेलं भाताच शेत सोडून देऊन 'त्या' नारळाच्या झाडाकडे गेला. त्यावर चढून भूकेजलेल्या वृत्तीने त्यानी [नारळ] फोडायचा प्रयत्न केला. त्याची आशाच फक्त नव्हे तर चोचीचा सुद्धा पार चुराडा झाला.

Thursday, December 4, 2014

१३७१. चातक धूमसमूहं दृष्ट्वा मा धाव वारिधरबुद्ध्या |

इह हि भविष्यति भवतो नयनयुगादेव वारिणां पूरः ||


अर्थ

अरे चातका; धुरांचे लोट पाहून ढग आहेत अशा कल्पनेने धावत सुटू नको. [त्यामुळे पाणी तर मिळणार नाहीच पण] तुझ्या डोळ्यातून मात्र घळघळा अश्रू ओघळतील. [चातकान्योक्ती चातक = गरजू याचक; धुराचा लोट = कंजूष श्रीमंत.]

Tuesday, November 25, 2014

१३७०. आक्रान्तं मरणेन जन्म जरया यात्युल्बणं यौवनं संतोषो धनलिप्सया शमसुखं प्रौढाङ्गनाविभ्रमैः |

लोकैर्मत्सरिभिर्गुणा वनभुवो व्यालैर्नृपा दुर्जनैरस्थैर्येण विपत्तयोऽप्युपहता ग्रस्तं न किं केन वा ||

अर्थ

आयुष्यावर मृत्युनी आक्रमण केलाय [संपवतो] बेफाम [जोश असणार] तारुण्य म्हातारपणानी संपत. संपत्तीच्या हव्यासानि समाधान नाहीस होत.नखऱ्यांकडे लक्ष जाऊन शांती मावळते. मत्सर करणाऱ्या लोकांमुळे गुणांच चीज होत नाही. अरण्यावर सापांच आक्रमण होतं. दुष्ट लोक राजांवर प्रभुत्व मिळवतात. संकटावर अस्थैर्याचे आक्रमण होत. [एकूण काय] कुठलीही गोष्ट कशानितरी संपतेच. [सर्व स्थितींना नाश आहे.]

Thursday, November 20, 2014

१३६९. श्रुतिः शिथिलतां गता स्मृतिरपि प्रनाष्टाधुना गतिर्विषयमागता विगलिता द्विजानां ततिः |

गवामपि च संहतिः समुचितक्रियातश्च्युता कृता नु जरया तया कलियुगस्य साधर्म्यता ||

अर्थ

श्रुति [कान आणि वेदांच ज्ञान] मंदावल आहे; आता स्मृति [ते ग्रंथ आणि आठवण] नाश पावली आहे; गति [परलोक आणि चालणं] विषय [ऐहिक इच्छा किंवा जरुरी] एवढीच राहिली आहे; द्विजांची [ज्ञानी माणसे किंवा  दात] रांग नाहीशी झालीय; गो [इंद्रिय आणि गाई] चा समुदाय त्याचं काम करत नाहीये, खरोखर म्हातारपण अगदी कलियुगासारख वागतंय!

Friday, November 14, 2014

१३६८. आलस्यं स्थिरतामुपैति भजते चापल्यमुद्योगितां मूकत्वं मितभाषितां वितनुते मौढ्यं भवेदार्जवम् |

पात्रापात्रविचारणाविरहिता यच्छत्युदारात्मतां मातर्लक्ष्मि तव प्रसादवशतो दोषा अमी स्युर्गुणाः ||

अर्थ

अहो आईसाहेब लक्ष्मीदेवी; आपल्या कृपाप्रसादाने [ज्यांच्या घरी आपण वास्तव्य करता त्यांचा] आळशीपणाला स्थैर्य असा मान मिळतो; [घिसाड] घाई उद्योगीपणा होतो; बोलता न येणं मितभाषी असं नाव मिळवत; मूर्खपणा सरलता बनते आणि [दुसऱ्याची] पात्रता न समजणं म्हणजे 'तो उदार आहे' असा सन्मान मिळवून देत.

Wednesday, November 5, 2014

१३६७. यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम् |

यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ

या किंवा त्या  कुठल्यातरी झाडाच मूळ [घेऊन] त्यात हे नाहीतर ते मिसळलं [आणि औषध म्हणून] कुणाला पण दिलं [तर काय होणार? आजारी] असा [बरा] किंवा तसा [अजून खराब] होईल. [नीट निदान; योग्य औषध; त्याची प्रकृती पाहून उपाय योजना केली तर फायद्याची होते. कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक उपाययोजना हवी.]

Tuesday, November 4, 2014

१३६६. म्रियामाणं मृतं बन्धुं शोचन्ते परिदेविनः |

आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम् ||

अर्थ

शोक करणारे [नातेवाईक] मरणपंथाला निघालेल्या बद्दल; मृत व्यक्तींबद्दल शोक करतात [पण] आपण सुद्धा काळाच्या घशात चाललोय याच ते दुःख करत नाहीत. [आपला पण मृत्यु जवळ येतोय हे कुणाच्या लक्षातच येत नाही.]

Monday, November 3, 2014

१३६५. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतम् |

गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ||

अर्थ

महाभारताचं सारसर्वस्व; जे स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर पडलं आहे, ते गीता रूपी गंगेच तीर्थ प्यायल्यावर [शिकून घेतल्यावर] पुनर्जन्म येणारच नाही. [मोक्ष मिळेल.]

Sunday, November 2, 2014

१३६४. अप्युन्नतपदारूढः पूज्यानैवापमानयेत् |

नहुषो शक्रतां प्राप्य च्युतोऽगस्त्यावमाननात् ||

अर्थ

जरी [कोणताही माणूस] फार मोठ्या अधिकाराच्या जागेवर असला तरी त्याने आदरणीय व्यक्तींचा अपमान करू नये. इंद्रपद मिळालं असूनही अगस्त्य ऋषींचा अपमान केल्यामुळे ते पद त्याला गमवावं लागलं.

Friday, October 31, 2014

१३६३. ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः |

ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः ||

अर्थ

ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात. ज्ञानाशिवाय काहीच साध्य होत नाही. असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान [मिळवण्याचा प्रयत्न] कधीही सोडत नाहीत.

Wednesday, October 29, 2014

१३६२. संग्रामे सुभटेन्द्राणां कवीनां कविमण्डले |

दीप्तिर्वा दीप्तिहानिर्वा मुहूर्तादेव जायते ||

अर्थ

कसलेले योद्धे रणांगणात युद्ध करत असताना किंवा पंडितांच्या सभेत [पराक्रमाचा किंवा प्रतिभेचा] लखलखाट पसरणं नाहीतर एकदम काळोखी येते ती अगदी क्षणात!

Monday, October 27, 2014

१३६१. बहुभिर्बत किं जातैः पुत्रैर्धर्मार्थवर्जितैः |

वरमेकः पथि तरुर्यत्र विश्रमते जनः ||

अर्थ

धर्म; अर्थ [असे पुरुषार्थ] संपादन न करणारी पुष्कळ अपत्ये असून काय हो उपयोग ? एक झाड [लावून अपत्याप्रमाणे वाढवलेलं] बरं! की जिथे माणूस विश्रांती घेतो. [वृक्षसंवर्धन अपत्या इतकं चांगलं आहे.]

१३६०. दुर्मन्त्रिणं कमुपयान्ति न नीतिदोषाः सन्तापयन्ति कमपथ्यभुजं न रोगाः |

कं श्रीर्न दर्पयति कं न निहन्ति मृत्युः कं स्वीकृता न विषया ननु तापयन्ति ||

अर्थ

चुकीचा / वाईट सल्ला देणाऱ्या कुणाला नीतिमत्तेचे दोष चिकटत नाहीत? [बदसल्ला दिल्यावर नाचक्की होतेच] कुपथ्य केल्यावर कोणाचा आजार बळावत नाही? संपत्ती कुणाला माज आणत नाही? मरण कुणाला चुकलय? भौतिक सुखांच्या मागे लागून कोणाला त्रास होत नाही? [या कुपथ्य वगैरे गोष्टी टाळणं चांगलं.श्रीमंतानी गर्विष्ठपणा करू नये. मृत्यु अटळ आहे तरी वाईट कामे करू नये.]

Friday, October 17, 2014

१३५९. न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः |

यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः || भागवत

अर्थ

दुष्ट लोकांच्या मर्मावर बोट ठेवणाऱ्या वाग्बाणांनी माणसाची जशी तडफड होते, तितकी बाणांनी अगदी मर्मावर जखम झाली तरी [वाग्बाणांएवढी] तडफड होत नाही.

Tuesday, October 14, 2014

१३५८. अयि बत गुरुगर्वं मा स्म कस्तूरि यासीरखिलपरिमलानांमौलिना सौरभेण |

 गिरिगहनगुहायां लीनमत्यन्तदीनं स्वजनकममुनैव प्राणहीनं करोषि ||

अर्थ

हे कस्तूरी; सर्व सुवासांमध्ये [माझा सुगंध]सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून अगदी ताठ्यात राहू नकोस. [सुगंध जरी श्रेष्ठ असला तरी अगदी अंधाऱ्या गुहेत दडून बसणाऱ्या; गरीब बिचाऱ्या स्वतःच्या बापाचे प्राण त्या [सुवासा] पायीच  गमावलेले आहेस.

Monday, October 13, 2014

१३५७. दुरधीता विषं विद्या अजीर्णे भोजनं विषम् |

विषं गोष्ठी दरिद्रस्य विषं व्याधिरवीक्षितः ||

अर्थ

शिक्षण वाईट रीतीने [लक्ष न देता; गर्वाने अभ्यास न करता; वाईट हेतू मनात ठेऊन] घेतल्यास विषाप्रमाणे असते. आधीच अजीर्ण झालं असताना जेवण हे विष होय. घोळक्यात [नुसतं गप्पा] मारत बसणं गरीब माणसाला विषाप्रमाणे आहे. औषध न करता ठेवलेला आजार अगदी धोकादायक आहे.

Friday, October 10, 2014

१३५६. नाविदग्धः प्रियं ब्रूयात्स्फुटवक्ता न वञ्चकः |

निःस्पृहो नाधिकारी स्यान्नाकामी मण्डनप्रियः ||

अर्थ

अपरिपक्व माणूस गोड बोलत नाही. स्पष्टवक्ता लबाड [फसवणारा] नसतो. निरिच्छ माणूस  कुठल्या जबाबदाऱ्या घेत नाही. कामेच्छा नसणारा कधी नटणमुरडणं करत नाही.

१३५५. स्थान एव नियोज्यन्ते भृत्याश्चाभरणानि च |

नहि चूडामणि: पादे नूपुरं  मूर्ध्नि  धार्यते ||

अर्थ

दागिने आणि नोकर यांना योग्य ठिकाणीच ठेवावं. [नोकराशी फ़ार जवळिक करु नये; फ़ार लाड करु नयेत तसंच अपमान पण करु नये.] जसं [डोक्यावर घालण्याचं] चूडामणि [रत्न] पायात घालत नाहीत आणि पैन्जण डोक्यात घालत नाहीत.

Saturday, October 4, 2014

१३५४. ॐअक्षसृक्परशुं गदेषुकुलिशं पद्मं धनुष्कुण्डिकां दण्डं शक्तिमसिं च चर्म जलजं घण्टां सुराभाजनम् |

शूलं पाशसुदर्शने च दधतीं हस्तैः प्रसन्नाननां सेवे सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मींं सरोजस्थिताम्  ||
अर्थ

मी कमल या आसनावर बसलेल्या; प्रसन्न मुख असणाऱ्या; भगवती महालक्ष्मीचे ध्यान [गुणगान] करतेअशी की  जिच्या हातात जपमाळ; परशू; गदा; बाण; वज्र; कमल; धनुष्य; कुण्डिका; दण्ड; शक्ति; तरवार; ढाल; शंख; घंटा; सुरापात्र; शूल; पाश आणि चक्र आहे.

१३५३. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना |

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्ड्यापहा ||
 
अर्थ
 
बुद्धीच्या मंदपणाचा संपूर्णपणे नाश करणारी; कुंडाची फुलं; चंद्र आणि तुषाराप्रमाणे शुभ्र दिसणारी; शुभ्र वस्त्रे परिधान करणारी; श्रेष्ठ अशा प्रकारचा वीणेचा दांडा जिच्या हातात आहे अशी; शुभ्र कमलावर बसलेली; ब्रह्मदेव; शंकर आणि श्रीविष्णू जिला नेहमी प्रणाम करतात अशी देवी सरस्वती माझे रक्षण करो.

१३५२. तव करकमलस्थां स्फाटिकीमक्षमालां नखकिरणविभिन्नां दाडिमीबीजबुद्ध्या|

प्रतिकलमनुकर्षन्येन कीरो निषिद्धः स भवतु मम भूत्यै वाणि ते मन्दहासः ||

अर्थ

हे सरस्वती देवी; कमलाप्रमाणे असणाऱ्या [सुंदर] हातातील स्फटिकाची जपमाळ [तुझ्या गुलाबी] नखातून पडलेल्या किरणामुळे [मालेचा मणी] डाळिंबाचा दाणा आहे असं वाटल्याने प्रत्येक क्षणी त्यावर चोच मारणाऱ्या [तुझ्या हातातल्या] पोपटाला तुझ्या ज्या स्मितहास्याने अडवलं ते माझी भरभराट करो. [देवीच्या तांबूस नखावरील किरण जपमालेवर पडल्यामुळे ति डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे भासली व पोपट टोचू लागला साहजिक देवीला हसू आलं त्यामुळे तिच्या शुभ्र दंतकळ्या मधून परावर्तित झालेले शुभ्र किरण मण्यावर पडले आणि पोपटाला हे स्फटिकाचे मणी आहेत हे समजलं मग तो चोच मारायचं थांबला.]

१३५१. पार्वतीमोषधीमेकामपर्णांं मृगयामहे |

शूली हालाहलं पीत्वा यया मृत्युंजयोऽभवत् ||

अर्थ

आम्ही एका औषधीचा शोध [तिला प्रसन्न करून घेण्याची मनापासून इच्छा करतोय] ती [हिमालय] पर्वतातील [त्याची कन्या] अपर्णा [एका वनस्पतीचे नाव; देवी पार्वती] की जिच्यामुळे शूली [पोट दुखणारा; भगवान शंकर] हालाहल [हे जहाल विष] पिऊन मृत्युंजय झाले.

Thursday, September 25, 2014

१३५०. सत्वादिस्थैरगणितगुणैर्हन्त विश्वं प्रसूय व्यक्तं धत्ते प्रहसनकरीं या कुमारीति संज्ञाम् |

मोहध्वान्तप्रसरविरतिर्विश्वमूर्तिः समन्तादाद्या शक्तिः स्फुरतु मम सा दीपवद्देहगेहे ||
 
अर्थ 
 
केवढे हे आश्चर्य! [देवी अंबिका] असंख्य  सत्वगुणांनी संपूर्ण विश्व निर्माण करून सुद्धा अगदी गमतीशीर असं "कुमारी " हे [यथार्थ] नामाभिधान धारण करते. ती विश्व हेच जिचं रूप आहे अशी अशी; माया रूपी अंधाराचा व्याप्ती नष्ट करणारी; आद्य शक्ती अशी [देवी]  दिव्याप्रमाणे माझ्या देहरूपी घरात प्रकट होऊन [आत्मस्वरूप प्रकाशित करो.]

Wednesday, September 24, 2014

१३४९. नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कृथाः |

अत्यन्तसरसहृदयो यतः परेषां गुणग्रहीतासि ||

अर्थ

हे कूपा [विहिरी] मी अतिशय नीच [हलकट; कमी उंची असणारा] आहे, याबद्दल अजिबात दुःख करू नकोस. कारण अगदी रसाळ [पाण्याने संपृक्त] असं हृदय असूनही तू दुसऱ्यांचे गुण [दोऱ्या पुढे आल्यावर] घेऊन [त्यांची पात्रे भरून] देतो.

Tuesday, September 16, 2014

१३४८. कान्तं वक्ति कपोति काकुलतया नाथान्तकालोऽधुना व्याधोऽधो धृतचापसज्जितशरः श्येनः परिभ्रामति |

इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतस्तूर्णं तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||

अर्थ

रडवेली होउन मादी कबुतरीण नराला म्हणते; "स्वामी; आता शेवट आलाय. [झाडा] खाली  पारधी धनुष्याला बाण लावून [आपल्याला मारायला] सज्ज झालाय [आणि वरती ] ससाणा घिरट्या घालतोय". असं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्याचा नेम चुकल्याने] त्या बाणाने ससाणा पण जखमी होऊन ते दोघे लगेचच यमाच्या दरबारी गेले. नशिबाची चाल वेगळीच होती. [अगदी मृत्युच्या दाढेतून ते सुटले.]

१३४७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |

अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

अर्थ

सज्जन [नुसत] पाहिल्यावर नारळासारखे [खडबडीत; कडक; कठोर असावेत असं दिसत]; पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे [दुर्जन] बाहेरूनच बोराप्रमाणे आकर्षक असतात. [पण अनुभव चांगला येत नाही.]

Thursday, September 11, 2014

१३४६. सुगन्धं केतकीपुष्पं कण्टकैः परीवेष्टितम् |

यथा पुष्पं तथा राजा दुर्जनैः परिवेष्टितः ||

अर्थ

सुवास असणारा केवड्याला जसे [नेहमीच] काटे असतात, तसा राजा दुष्ट लोकांनी वेढलेला असतो.

१३४५. अमितगुणोऽपि पदार्थो दोषेणैकेन निन्दितो भवति |

सकलरसायनसारो दोषेणैकेन लशुन इव || पण्डित राज  जगन्नाथ

अर्थ

सर्व औषधीमधे महत्वाची असलेली लसूण तिच्या [उग्र वास] या एकाच दोषाने निंद्य ठरते, तसे असंख्य गुण असून सुद्धा एखाद्या दोषाने एखाद्या पदार्थाला [एखाद्या व्यक्तीला] नावे ठेवली जातात.

Tuesday, September 9, 2014

१३४४. आयातो भवतः पितेति मातुर्निशम्योदितं धूलीधूसरितो विहाय शिशुभिः क्रीडारसान्प्रस्तुतान् |

दूरात्स्मेरमुखः प्रसार्य ललितं बाहुद्वयं बालको नाधन्यस्य पुरः समेति परया प्रीत्या रटन्घर्घरम् ||

अर्थ

"तुझे बाबा आले रे" असं आईनी म्हटलेलं ऐकल्यावर;  चालू असलेली  मित्रांबरोबरची भरपूर गम्मत टाकून हसत हसत सुंदर हात पसरून घशातून आनंदाचे उद्गार काढत धुळीने माखलेलं आपलं मूल आनंदाने ज्याच्या  सामोर येत; असा [पिता] खरोखर धन्य होय.

Monday, September 8, 2014

१३४३. कुत्र विधेयो यत्नो विद्याभ्यासे सदौषधे दाने |

अवधीरणा क्व कार्या खलपरयोषित्परधनेषु ||


अर्थ

कशाच्या बाबतीत [अविरत;अथक] प्रयत्न करावा? शिक्षण; चांगलं औषध आणि दान. केंव्हा दुर्लक्ष करावं? दुष्ट लोक; दुसऱ्याची पत्नी आणि परधन.

Friday, September 5, 2014

१३४२. सम्प्रति न कल्पतरवो न सिद्धयो नापि देवता वरदाः|

जलद त्वयि विश्राम्यति सृष्टिरियं भुवनलोकस्य  ||

अर्थ

आजकाल कल्पतरू [त्याच्या खाली बसून इच्छित वस्तू देणारे वृक्ष  कुठेही] नसतात; [अष्ट] सिद्धि पण नसतात देव सुद्धा वर देत नाहीत. [बाबारे] जलदा [पाणी देणाऱ्या मेघा] तू जर विश्रांती घेतलीस [धारा बरसायचं सोडून दिलंस] तर हे सगळं जग गळाठून जाईल [त्याला सक्तीची विश्रांती मिळेल.]

Thursday, September 4, 2014

१३४१. अयं रत्नाकरोऽम्भोधिरित्यसेवि धनाशया |

धनं दूरेऽस्तु वदनमपूरि क्षारवारिभिः ||

अर्थ

हा सागर रत्नांची खाण आहे म्हणून पैशाच्या आशेने मी ह्याचं सेवन [सेवा; पाण्याचं सेवन] केलं. पण [अरेरे] संपत्ती दूरच [मिळण्याची जराही शक्यता नाही] तोंड मात्र खारट पाण्यानी खराब झालं. [समुद्रान्योक्ती  समुद्र = कंजूष श्रीमंत मनुष्य; कवि =गरजू माणूस.]

Tuesday, September 2, 2014

१३४०. किं पौरुषं रक्षति यो न वार्तान्किं वा धनं नार्थििजनाय यत्स्यात् |

सा किं क्रिया या न हितानुबद्धा किं जीवितं साधुविरोधि यद्वै ||

अर्थ

दीनदुबळ्यांच जो रक्षण करत नसेल त्याच्या पराक्रमांचा काय बरं उपयोग? गरजूंना ज्या संपत्तीचा उपयोग होत नाही तिच्या पासून काय फायदा? जे काम कल्याणासाठी नाही त्याचा काय उपयोग? सज्जनांना त्रास देणाऱ्या आयुष्याचा काय बरं उपयोग?

Monday, September 1, 2014

१३३९. लोभमूलानि पापानि व्याधयो दोषमूलकाः |

स्नेहमूलानि दुःखानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||

अर्थ

हाव [या दुर्गुणामुळे माणूस] पापे करतो; [आपल्याच] चुकांमुळे आजार होतात; आसक्तीने कुठेतरी जीव जडल्यामुळे, दुःख होतात. या तीन गोष्टींचा त्याग करून सुखी हो.

Tuesday, August 12, 2014

१३३८. स्वमस्तकसमारूढं मृत्युं पश्येज्जनो यदि |

आहारोsपि न रोचेत किमुतान्या विभूतयः ||

अर्थ

जर आपल्या डोक्यावर [अगदी अटळ असलेला] मृत्यू माणसाला दिसेल [त्या गोष्टीच भान राहील] तर माणसाला जेवण सुद्धा गोड लागणार नाही. दुसऱ्या श्रीमंतीच्या वस्तूंची काय कथा? [आपोआप वैराग्य येईल ]

Monday, August 11, 2014

१३३७. क्रतौ विवाहे व्यसने रिपुक्षये यशस्करे कर्मणि मित्रसंग्रहे |

प्रियासु नारीष्वधनेषु बन्धुषु धनव्ययस्तेषु  न गण्यते बुधैः ||

अर्थ

यज्ञ [धर्मकृत्य]; लग्न; संकट; शत्रूवर मात; कीर्तिदायक काम; मित्रासाठी; जवळच्या [नातेवाईक] स्त्री साठी आणि गरीब बांधवासाठी [जास्त] खर्च झाला तरी सूज्ञ माणसांना त्याच काही वाटत नाही. [तो अनाठायी वाटत नाही; सत्कारणी लागला असं वाटत.]

Friday, August 8, 2014

१३३६. स्थान एव नियोज्यन्ते भृत्याश्चाभरणानि च |

न हि चूडामणि: पादे  नूपुरं मूर्ध्नि धार्यते ||

अर्थ

दागिने आणि नोकर यांना योग्य स्थानावर राखलं पाहिजे. [फाजील सलगी पण उपयोगाची नाही किंवा अपमानास्पद वागणूक देऊन चालणार नाही.] मस्तक सुशोभित करणार रत्न  पायात किंवा पैंजण डोक्यावर ठेवत नाहीत.

१३३५. मलोत्सर्गं गजेन्द्रस्य मूर्ध्नि काकः करोति चेत् |

कुलानुरूपं तत्तस्य यो गजो गज एव सः ||

अर्थ

जर कावळ्याने एखाद्या हत्ती राजाच्या डोक्यावर विष्ठा केली तर ते त्याच्या [नीच] कावळा या जातीला धरूनच आहे. [म्हणून हत्तींच्या महात्म्याला बाधा येत नाही.] हत्ती तो [श्रेष्ठ असा]  गजराजच असतो.

Wednesday, August 6, 2014

१३३४. क्षतात्किल त्रायत इत्युदग्रः क्षत्रस्य शब्दः भुवनेषु रूढः |

राज्येन किं तद्विपरीतवृत्तेः प्राणैरुपक्रोशमलीमसैर्वा || रघुवंश

अर्थ

त्रिभुवनात क्षत्रीयांबद्दल  खरोखर "क्षतात् त्रायते" [जखमांपासून - सर्व संकटापासून - रक्षण करणारा] अशी महान कीर्ति पसरलेली आहे. त्याच्या उलट वागून काळजाला बट्टा लागल्यावर मिळालेल्या राज्याचा काय बरे उपयोग? [दिलीप राजा गोमातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देण्यास सिद्ध झाला असता वरील संवाद होतो. मला खाऊन तू गाईला सोडून दे असं तो सिंहाला सांगतो.]

१३३३. मण्डलीकृत्य बर्हाणि कण्ठैर्मधुरगीतिभिः |

कलापिनः  प्रनृत्यन्ति काले जीमूतमालिनि ||

अर्थ

ढगांनी [आकाश] झाकोळल्यावर मोर गोड गळ्यानी [गाणी] गाऊन पिसाऱ्याचा गोल [पंखा] करून नाच नाच नाचतात.

Sunday, August 3, 2014

१३३२. भार्यावियोगः स्वजनापवादो ऋणस्य शेषं कृपणस्य सेवा |

दारिद्र्यकाले प्रियदर्शनं च विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

अर्थ

पत्नीचा वियोग; आपल्याच [जवळच्यानी] दोष देणं; कर्ज फेडायचं असणं; कंजूष माणसाची सेवा [नोकरी] करायला लागणं आणि आवडती लोक [अगदी] गरिबी आली असताना भेटायला येणं, या पाच गोष्टी आग नसून सुद्धा होरपळवतात.

१३३१. चन्द्रबिम्बरविबिम्बतारकामण्डलानि घनमेघडम्बरैः |

भक्षितानि जलदोदरेषु तद्रोदनध्वनिरिवैष गर्जितम् ||
 
अर्थ
 
सूर्यबिम्ब; चन्द्रबिम्ब आणि सगळे तारे मोठाल्या ढगांनी जणू काही खाल्ले आहेत. [इतकं आकाश ढगाळलं आहे] आणि त्यांच्या रडण्याचा [आवाज] म्हणजे जणूकाही हे गडगडणं.

Thursday, July 31, 2014

१३३०. अश्वः शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नरश्च नारी च |

पुरुषविशेषं प्राप्ता भवन्ति योग्या अयोग्याश्च ||

अर्थ

घोडा; कुठलही हत्यार; शास्त्र; वीणा [कुठलंही वाद्य अगदी] माणसं सुद्धा विशिष्ट माणसांचा [आश्रय मिळाल्यास] चांगली [गुणांचा परिपोष होऊन] किंवा सामान्य [विकास न झाल्यामुळे] राहतात. [मित्र; मालक किंवा मोठे नातेवाईक हे पारख करून आणि चांगला वाव देऊन; प्रेरणा देऊन  प्रगती करतात त्या त्या वस्तूंची तेच योजक चांगला नसेल तर अधोगती सुद्धा होते.]

Monday, July 28, 2014

१३२९. अकिञ्चनः सन्प्रभवः स सम्पदां त्रिलोकनाथः पितृसद्मगोचरः |

स भीमरूपः शिव इत्युदीर्यते न सन्ति याथार्थ्यविदः पिनाकिनः || कुमारसंभव पाचवा सर्ग

अर्थ

[भगवान शंकर] कफल्लक [दिसले] तरी सर्व संपत्तीचे ते जनक आहेत. स्मशानात त्यांचा वास असला तरी ते त्रैलोक्याचे स्वामी आहेत. रौद्र दिसत असूनही शिव [कल्याणकारक] असं त्यांना म्हणतात. त्यांच्या  खऱ्या स्वरूपाचं आकलन कोणाला होत नाही.

Sunday, July 27, 2014

१३२८. रामाद्याचय मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्लाङ्गलं प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभः फालं त्रिशूलं तव |

शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कन्दोऽस्ति गोरक्षणे खिन्नाहं हर भिक्षया कुरु कृषिं गौरीवचः पातु वः ||

अर्थ

हे शंकरा; [परशु] रामाला जमीन मागा; कुबेराकडून बियाण घ्या; बलरामाकडून नांगर; यमाचा रेडा; तुमच्याकडे बैल; फाळ आणि त्रिशूल आहेच. मी [अन्नपूर्णा असल्याने] अन्न द्यायला समर्थ आहे; कार्तिकस्वामी गुर सांभाळेल. भीक मागण्यामुळे मला नैराश्य आलय. तेंव्हा तुम्ही जमीन कसा. हे देवी पार्वतीचे वचन तुमचे रक्षण करो.

१३२७. कृतान्तस्य दूती जरा कर्णमूले समागत्य वक्तीति लोकाः श्रुणुध्वम् |

परस्त्रीपरद्रव्यवाञ्छां त्यजध्वं भजध्वं रमानाथपादारविन्दम् ||

अर्थ

[अगदी] कानापाशी येऊन यमाची दूत असलेली जरा [म्हातारपण] म्हणते "अरे बाबांनो; ऐका; [मी यमाचीच दूती आहे मरण जवळ येऊन ठेपलंय तर आता तरी] परस्त्रीची किंवा दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा सोडून द्या. लक्ष्मीपतीच्या चरणकमलांची भक्ती करा.

Friday, July 25, 2014

१३२६. यद्धात्रा निजभालपट्टलिखितं स्तोकं महद्वा धनं तत्प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ ततो नाधिकम् |

तद्धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृतिं वृथा मा कृथाः कूपे पश्य पायोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् ||

अर्थ

ब्रह्मदेवाने [माणसाच्या] कपाळावर जी काही थोडी किंवा बहुत संपत्ती लिहिली असेल तेवढीच तो वाळवंटात गेला तरी मिळते; [सोन्याच्या] मेरु पर्वतावर गेला तरी  तेवढीच मिळते, त्यापेक्षा जास्त मिळतच नाही. म्हणून [तू] धीर धर. श्रीमंतांपुढे लाचारी करू नकोस. असं पहा की विहिरीवर गेलं काय की समुद्राशी दोन्हीकडे सारखचं [आपला] घडा भरूनच पाणी मिळणार.

Thursday, July 24, 2014

१३२५. कष्टा वृत्तिः पराधीना कष्टो वासो निराश्रयः |

निर्धनो व्यवसायश्च सर्वकष्टा दरिद्रता ||

अर्थ

उपजीविकेचं साधन दुसऱ्यावर अवलंबून असलं तर फार त्रासाचं असतं. कुणाचाही आधार नसताना राहणं कठीण आहे. पैसे नसताना धंदा काढणे अवघड आहे. आणि या सर्वापेक्षा गरिबी फार त्रासदायक आहे.

१३२४. यथा चतुर्भिःकनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः|

तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ||

अर्थ

ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा चार प्रकारांनी करतात घासून; तुकडा पाडून; तापवून आणि आघात करून तसंच माणसांची परीक्षा त्याच शिक्षण; चारित्र्य; घराणं आणि काम यावर करतात.

Tuesday, July 22, 2014

१३२३. अम्भसा भिद्यते सेतुस्तथा मन्त्रोऽप्यरक्षितः |

पैशुन्याद्भिद्यते स्नेहो वाचा भिद्येत कातरः ||

अर्थ

पाण्याच्या [लोंढ्याच्या जोराने] भिंत भंगते. त्याचप्रमाणे गुप्तता पाळली नाही तर  मसलत फुटते. [षटकणीं होते] दुष्टपणा मुळे प्रेम नाहीस होत. [नुसतं] तोंडाच्या [धाकाने] घाबरट माणूस भिऊन जातो.

१३२२. चन्दनं शीतलं लोके चन्दनादपि चन्द्रमाः |

चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः ||

अर्थ

या जगात चंदन हे शीतल असत. चंदनापेक्षाही चन्द्र अधिक शीतल असतो. [पण] सज्जनांचा सहवास हा चन्द्र आणि चंदन यांपेक्षाहि अधिक शीतल असतो.

Monday, July 21, 2014

१३२१. अनुभवत ददत वित्तं मान्यान्मानयत सज्जनान्भजत |

अतिपरुषपवनविलुलितदीपशिखाचञ्चला लक्ष्मीः ||

अर्थ

[सुखदायक गोष्टींचा] अनुभव घ्या; संपत्ती दान करा; आदरणीय लोकांना मान द्या. सज्जनांचा आश्रय घ्या. [श्रीमंती आहे यावर विसंबून या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका कारण] झंझावाती  वाऱ्याच्या झोतात असल्यामुळे फडफडणाऱ्या दिव्याच्या ज्योति प्रमाणे लक्ष्मी ही अतिशय चंचल असते.

१३२०. मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान्विषवत्त्यजेः |

क्षमार्जवदयाशौचं सत्यं पीयूषवत्पिबे: ||

अर्थ

जर तुला मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विषाप्रमाणे त्याज्य समजून त्याग कर आणि क्षमा; सरळपणा; दया; पवित्रता आणि सत्य अमृतासमान मानून त्याचे ग्रहण कर.

Monday, July 14, 2014

१३१९. सर्वे कङ्कणकेयूरकुण्डलप्रतिमा गुणाः |

शीलं चाकृत्रिमं लोके लावण्यमिव भूषणम् ||

अर्थ

या जगात [कलेमधलं कौशल्य; श्रीमंती; हुशारी असे] सगळे गुण हे बांगड्या; बाजूबंद कर्णभूषणे याप्रमाणे आहेत. चारित्र्य हा गुण नैसर्गिक सौंदर्यासारखा सर्वश्रेष्ठ आहे.

१३१८. वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैस्तनूमार्जनं भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |

पाठः संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे हा हा हन्त तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

अर्थ

[पोपट महाराज बोलतायत] माझा निवास सोन्याच्या पिंजऱ्यात आहे; राजेसाहेबांच्या करकमलानी स्नान होतय; गोडगोड आंबे, डाळिंब याचा आहार; अमृतासारखे पाणी प्यायला मिळतय; बुद्धिमान अशा मला दरबारात सतत रामनाम घ्यायचं काम [इतक्या सगळ्या आनंददायी गोष्टी लाभून सुद्धा] अरेरे माझं मन मात्र जिथे जन्म झाला त्या वृक्षाच्या फांदीकडेच धाव घेतय. [शुकान्योक्ती - शुक = पारतंत्र्यातली व्यक्ती ]

Wednesday, July 9, 2014

१३१७. वयं काका वयं काका जल्पन्तीति प्रगे द्विकाः |

तिमिरारिस्तमो हन्यादिति शङ्कितमानसाः ||

अर्थ

पहाटे कावळे [सूर्याला सांगण्यासाठी] "आम्ही कावळे आहोत; आम्ही कावळे आहोत असं ओरडत असतात. कारण तिमिरारि [अंधाराचा शत्रु असलेला] सूर्य तम [असं समजून] त्यांना मारून टाकेल ना, म्हणून ते घाबरलेले असतात!

१३१६. लङ्कापतेः संकुचितं यशो यद्यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्रः |

स सर्व एवादिकवेः प्रभावः न कोपनीयाः कवयः क्षितीन्द्रैः ||

अर्थ


रावणाची कीर्ति जी कमी झालीय आणि श्रीरामाचा मात्र सगळीकडे कीर्तीचा डंका; हा सगळा आदिकवी [वाल्मिकी यांच्या मताचा] प्रभाव होय. [थट्टेत कवि म्हणतो] राजांनी कवींचा रोष ओढवून घेऊ नये. [ते जर रागावले तर निंदा करतील ना!]

Monday, July 7, 2014

१३१५. ययोरेव समं वित्तं ययोरेव समं कुलम् |

तयोर्मैत्री विवाहश्च न तु पुष्टविपुष्टयोः ||

अर्थ

ज्या दोन घराण्यात सांपत्तिक स्थिती [साधारण] सारखी असते आणि रितीरिवाज [बरेचसे] सारखे असतात त्यांच्यात मैत्री व विवाह करावेत खूप फरक असल्यास करू नये.

१३१४. को लाभो गुणिसंगमः किमसुखं प्राज्ञेतरै: संगतिः का हानिः समयच्युतिर्निपुणता का धर्मतत्वे रतिः |

कः शूरो विजितेन्द्रियःप्रियतमा कानुव्रता किं धनं विद्या किं सुखमप्रवासगमनं राज्यं किमाज्ञाफलम् ||
अर्थ = [या जगात] फायदा कुठला? गुणी लोकांशी सहवास. दुःख कशाला म्हणाव? मूर्ख लोकांशी संगत. तोटा कुठला? वेळ वाया जाणं. कौशल्य म्हणजे काय? धर्मावर प्रेम असणं. शूर कुणाला म्हणावं? ज्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा आहे त्याला. अगदी आवडती कोण? जी आपल्या कल्याणासाठी झटते ती. संपत्ती कुठली? विद्या. दुःख कोणते? पापाची आवड. राज्य म्हणजे काय? आपली आज्ञा पाळली जाणं.

१३१३. नवे वयसि यः शान्तः स शान्त इति मे मतिः |

धातुषु क्षीयमाणेषु शान्तिः कस्य न जायते ||

अर्थ

तरुणपणी जो शान्त स्वभावाचा असतो तो खरा शान्त असे मला वाटते. ताकदीचा ऱ्हास व्हायला लागल्यावर [नाईलाजाने] कोण शान्त बसत नाही?

Saturday, July 5, 2014

१३१२. परिचरितव्याः सन्तः यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |

यास्तेषां स्वैरकथाः ता एव भवन्ति शास्त्राणि ||

अर्थ

सज्जन जरी सदुपदेश करत बसले नाहीत तरी त्यांची सेवा करावी [त्यांच्या सहवासात रहावे] त्यांच्या [नुसत्या] सहजी गप्पा सुद्धा शास्त्रांना धरूनच असतात. [त्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर ज्ञान होऊन जात.]

Wednesday, July 2, 2014

१३११ . हंसो विभाति नलिनीदलपुञ्जमध्ये सिंहो विभाति गिरिगव्हरकन्दरासु |

जात्यो विभाति तुरगो रणयुद्धमध्ये विद्वान्विभाति पुरुषेषु विचक्षणेषु ||

अर्थ

कमळांच्या ताटव्या मधे हंस शोभून दिसतो; पर्वतावरील कडेकपारीत सिंह शोभून दिसतो; जातिवंत घोडा युद्धभूमीवर शोभून दिसतो; [या गोष्टींप्रमाणेच] विद्वान पण्डित हा ज्ञानी लोकांमध्ये शोभून दिसतो.

Tuesday, July 1, 2014

१३१०. न केनापि श्रुतं दृष्टं वारिणा वारि शुष्यति |

अहो गोदावरीवारा भवसिन्धुर्विनश्यति ||

अर्थ

कुणीही असं पाहिलेलं किंवा ऐकलेलं नाही की [एका] पाण्यानी [दुसरं] पाणी सुकून जात. पण काय आश्चर्य हा [अख्खा] संसारसागर  गोदावरी मातेच्या तीर्थाने नाहीसा होतो.

Monday, June 30, 2014

१३०९. सदयं हृदयं यस्य भाषितं सत्यभूषितम् |

कायः परहिते यस्य कलिः तस्य करोति किम् ||

अर्थ

जो मनानी दयाळू आहे; अगदी खरं बोलतो आणि दुसऱ्याला मदत करण्यास देह झिजवतो, त्याच्यावर कलियुगाचा काय [वाईट परिणाम] होणार?

१३०८. पूरोत्पीडे तडागस्य परीवाहः प्रतिक्रिया |

शोकक्षोभे च हृदयं प्रलापैरेव धार्यते || उत्तररामचरित्र

अर्थ

तलावात पाणी भरून वरती यायला लागलं तर जादा पाण्याचा [पाट काढून निचरा करणं] हाच उपाय आहे. मनात दुःख खदखदत राहील तर शोकाच्या  [रडत जिवलगाना सांगून] विलापानीच हृदय सावरत.

१३०७. गुणवत्तरपात्रेण च्छाद्यन्ते गुणिनां गुणाः |

रात्रौ दीपशिखाकान्तिः न भानावुदिते सति ||

अर्थ

जरी [काही व्यक्ती खूप] गुणी असल्या त्यांच्या पेक्षा अधिक गुणवान लोकांसमोर त्यांचे गुण झाकोळून जातात. जसं दिव्याच्या ज्योतीच तेज रात्री पडत पण सूर्य उगवल्यावर [त्याच्या प्रखर तेजापुढे ते फिकं पडत आणि दिसतच] नाही.

१३०६. गाढं गुणवती विद्या न मुदे विनयं विना |

मूर्खतापि मुदे भुयान्महत्सु विनयान्विता ||

अर्थ

नम्रपणा नसला तर सखोल ज्ञान असून सुद्धा [श्रोत्याला] आनंद होणार नाही. थोर लोक जरी [एखाद्या विषयात] अडाणी असले तरी नम्रपणामुळे [आनंददायी] होतील. [माहित नसलेल्या गोष्टी ते नीट विचारून जाणून घेतील. गर्विष्ठपणा लोकांना तापदायक वाटतो.]

Thursday, June 26, 2014

१३०५. रे रे घरट्ट मा रोदीहि ! कं कं न भ्रामयन्त्यमूः |

कटाक्षवीक्षणादेव कराकृष्टस्य का कथा ||

अर्थ

अरे जात्या; [घरघर असा आवाज करत] रडू नकोस बाबा! या [स्त्रिया] कोणाला [गरा गरा] फिरायला [भाग पाडत] नाहीत बरे? अरे [एका] नजरफेकीनेच [त्या पळायला भाग पाडतात; तुला तर] हातानी खेचत असल्यावर गरगर फिरायला लागेल यात काय विशेष? [त्याच दुःख करू नकोस.]

Wednesday, June 25, 2014

१३०४. यावत्स्वस्थमिदं शरीरमरुजं यावज्जरा दूरतो यावच्चेन्द्रियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुषः|

आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान्संदीप्ते सदने तु कूपखननं प्रत्युद्यमःकीदृशः ||
अर्थ

शहाण्या माणसानी जोपर्यंत आपली तब्बेत चांगली आहे; देहाला दुखणं झालेलं नाही; म्हातारपण अजून लांब आहे; सगळ्या अवयवात भरपूर जोम आहे; मरायला टेकलो नाही; तोपर्यंतच पारमार्थिक कल्याण करून घेण्याचा प्रयत्न नेटानी करावा. घर जळायला लागल्यावर विहीर खणायला घेऊन काय उपयोग?

Tuesday, June 24, 2014

१३०३. अर्थाःहसन्ति उचितदानविहीनलुब्धं भूम्यो हसन्ति मम भूमिरिति ब्रुवाणम् |

जारा हसन्ति तनयानुपलालयन्तं मृत्युर्हसत्यवनिपं रणरङ्गभीरुम् ||

अर्थ

पात्र व्यक्तीला दान न करणाऱ्या कंजूष माणसाला पाहून संपत्ती [त्याची कीव येऊन] उपरोधाने हसते. ही जागा माझी आहे असं म्हणणाऱ्याला पृथ्वी हसते. [ही जमीन सोडून देऊन हा मृत्यूनंतर निघून जाणारच आहे म्हणून] मुलांच कोडकौतुक करणाऱ्या [बापाला] पाहून जार [मनातल्या मनात] हसतात. युद्धात घाबरणाऱ्या राजाला बघून यम हसतो.

Monday, June 23, 2014

१३०२. पुत्रपौत्रवधूभृत्यैः सम्पूर्णमपि सर्वदा |

भार्याहीनगृहस्थस्य शून्यमेव गृहं मतम् ||

अर्थ

अगदी नेहमी मुलं; नातवंड; सुना; नोकरचाकर यांनी घर भरलेलं असलं तरी पत्नी नसेल तर त्याला ते रित रितच वाटत.

१३०१. मूर्खशिष्योपदेशेन दुष्टस्त्रीभरणेन च |

द्विषतां संप्रयोगेण पण्डितोsप्यवसीदति ||

अर्थ

मूर्ख विद्यार्थ्याला शिकवलं; एखाद्या दुष्ट बाईला खूप मदत केली; शत्रूंच भलं करत राहील तर; अगदी पंडिताचा सुद्धा नाश होतो.

Friday, June 20, 2014

१३००. उद्योगिनः करालम्बं करोति कमलालया |

अनुद्योगिकरालम्बं करोति कमलाग्रजा ||

अर्थ

कमलामध्ये निवास करणारी लक्ष्मी उद्योगी माणसाचा हात पकडते, [त्याला साथ देते] आणि अक्काबाई [लक्ष्मीची मोठी बहीण-गरिबी] आळशी माणसाची साथ करते.

Thursday, June 19, 2014

१२९९. सद्विद्या यदि का चिन्ता वराकोदरपूरणे |

शुकोsपि लभते वृत्तिं राम रामेति च ब्रुवन् ||

अर्थ

जर शिक्षण चांगलं घेतलं असेल तर ते बिचारं पोट भरण्याची कसली काळजी? "राम राम " असं बोलून पोपटाचा सुद्धा [व्यवस्थीत] उदरनिर्वाह होतो.

Wednesday, June 18, 2014

१२९८. त्यजति भयमकृतपापं सुमित्रमयशः प्रमादिनं विद्या |

ह्री: कामिनमलसं श्रीः क्रूरं स्त्री दुर्जनं लोकः ||

अर्थ

ज्यानी पाप [वाईट काम] केलेलच नाही, त्याला भीती वाटत नाही. ज्यानी सन्मित्र सांभाळलेले आहेत, त्याचा बदलौकिक होत  नाही. चुका करणाराला [अभ्यासात सातत्य न ठेवणाऱ्याला] विद्या सोडून जाते; विषयी माणसाला लाजलज्जा सोडून जाते; लक्ष्मी आळशाला सोडून पळते; क्रूर माणसाजवळ स्त्री टिकत नाही; दुष्ट मनुष्य या जगात [कोणालाच] नको असतो.

Tuesday, June 17, 2014

१२९७. इन्दुं निन्दति तस्करो गृहपतिं जारो सुशीलं खलः साध्वीमप्यसती कुलीनमकुलो जह्याज्जरन्तं युवा |

विद्यावन्तमनक्षरो धनपतिं नीचश्च रूपोज्वलं वैरूप्येण हतः प्रबुद्धमबुधो कृष्टं निकृष्टो जनः ||

अर्थ

चोर चंद्राला नाव ठेवतो; जार [प्रेयसीच्या] नवऱ्याची निंदा करतो; दुष्ट सज्जनांना नाव ठेवतो; कुलटा गर्तीच्या स्त्रीची निंदा करते; हलक्या कुळातला घरंदाज माणसाला सोडून जातो; तरुण म्हाताऱ्यांची सांगत सोडतो; अडाणी सुशिक्षिता जवळ रहात नाही; गरीब श्रीमंताजवळ टिकत नाही; कुरूप व्यक्ती देखण्याची निंदा करते; मंद माणूस हुशार व्यक्तीची निंदा करतो [तात्पर्य] गुणांनी निकृष्ट आपल्यापेक्षा गुणी माणसाचा मत्सर करतो.

Monday, June 16, 2014

१२९६. तटस्थैः ख्यापिताश्चेतो विशन्ति गुणिनां गुणाः |

उत्कोचितानां पद्मानां गन्धो वायुभिराहृतः ||

अर्थ

गुणी लोकांच्या गुणांच; तिऱ्हाईतानी गुणवर्णन केल्यावर [श्रोत्याच्या] मनात त्याच  कौतुक वाटायला सुरवात होते. [आपले आपण गुण सांगितले तर कुणाला खात्री वाटत नाही,] जसं की उमललेल्या कमळांचा सुगंध जेंव्हा वारा वाहून नेतो तेंव्हाच सगळीकडे पसरतो. [कमळ स्वतः सांगत नाहीत ]

१२९५. यस्मै ददाति विवरं भूमिः फुत्कारमात्रभीतेव |

आशीविषः स दैवाड्डौम्बकरण्डे स्थितिं सहते ||

अर्थ

ज्यानी केवळ फूत्कार सोडल्यावर जमीनसुद्धा भ्याल्याप्रमाणे त्याला वारुळाला जागा देते, असा [खरं तर सामर्थ्यवान] ज्याच्या दाढेमध्ये विष आहे असा [साप] दुर्दैवाने डोम्बाऱ्याच्या करंडीत वेटोळ करून आयुष्य [रखडत रखडत] घालवतो. [दुर्दैवाने सामर्थ्यवान माणसाला सुद्धा वाईट दिवस येतात.]

Thursday, June 12, 2014

१२९४. राजंस्त्वत्कीर्तिचन्द्रेण तिथयः पूर्णिमाः कृताः |

मद्गेहान्न बहिर्याति तिथिरेकादशी भयात् ||

अर्थ

हे राजा तुझ्या कीर्तिरूप चंद्राने [सर्व] तिथ्या पौर्णिमा बनवल्या आहेत. [तुझी परिपूर्ण कीर्ती पूर्ण चंद्राप्रमाणे आहे, त्यामुळे सतत पौर्णिमाच ] [आता माझी मात्र उपासमार {एकादशी } रोजच तर जणू काही हि एकादशी] माझ्या घराबाहेर [पडली तर तिची पण पौर्णिमा होईल या] भीतिनी ती माझ्या घरातून बाहेर पडत नाही. [माझी गरिबी हटत नाही तर तूच बघ आता माझ्याकडे.]

१२९३. यथोर्ध्वाक्षः पिबत्यम्बु पथिको विरलाङ्गुलिः |

तथा प्रपापालिकापि धारां वितनुते तनुम् ||

अर्थ

[पाणपोईवर आलेला] वाटसरू नजर वर [पाणपोईवरच्या सुंदरीकडे] लावून [जास्त वेळ उभं राहता यावं म्हणून] बोट [पाणी गळून जावं यासाठी] लांब ताणतो, तर [भेट अधिक वेळ टिकावी म्हणून] सुंदरी सुद्धा धार अगदी लहानलहान करत जाते.

Tuesday, June 10, 2014

१२९२. कुदेशमासाद्य कुतोऽर्थसंचयः कुपुत्रमासाद्य कुतो जलाञ्जलिः |

कुगेहिनीं प्राप्य गृहे कुतः सुखं  कुशिष्यमध्यापयतः कुतो यशः ||

अर्थ

अयोग्य प्रदेशात वास्तव्य केल्यास पैसे कसे साठणार? मुलगा वाईट [असंस्कृत] असला तर श्राद्ध कोण करणार [म्हातारपणी शांतता सुख कुठलं मिळायला?] पत्नी चांगली [गुणी आणि अनुकूल] नसेल तर घरात सुख कसलं मिळतय? वाईट [शिकवण्याकडे; अभ्यासाकडे लक्ष न देणारे दंगिष्ट] विद्यार्थी शिकवत राहिल तर कीर्ति कसची मिळणार?

Monday, June 9, 2014

१२९१. अत्यच्छेनाविरुद्धेन सुवृत्तेनातिचारुणा |

अन्तर्भिन्नेन संप्राप्तं मौक्तिकेन निबन्धनम् ||

अर्थ

मोती अतिशय सुंदर; गोल अगदी  स्वच्छ [कठीणपणा नाही; खुपणारा नाही असा] जमवून घेणारा. त्यांनी जर स्वतःत फट पडून घेतली तर त्याला [दागिन्यात अडकून पडाव लागत] [मौक्तीकान्योक्ती सर्व चांगले गुण आणि त्यात स्वतः कणखर न राहता भोक पडू दिलं, तर त्याचा फायदा घेतला जातो.]

Friday, June 6, 2014

१२९०. तवैतद्वाचि माधुर्यं जाने कोकिल कृत्रिमम् |

प्रपोषितो यैस्तानेव जातपक्षो जहासि यत् ||

अर्थ

अरे कोकिळा; तुझ्या बोलण्यातला हा गोडवा नकली आहे हे [मला] ठाऊक आहे, कारण पंख फुटल्यावर लगेच ज्यानी तुझं पालनपोषण केलं त्यांना सोडून देतोस. [जर हा गोडवा खरा असता तर ज्यानी संभाळलं त्यांचा असा त्याग तू केलाच नसतास. मनापासून चांगुलपणाचा अभावच आहे. बोलण नुसत गोडगोड] कोकिलान्योक्ती

Thursday, June 5, 2014

१२८९. अयि मलयज महिमायं कस्य गिरामस्तु विषयस्ते |

उद्गिरतो यद्गरलं फणिनः पुष्णासि परिमलोद्गारैः ||

अर्थ

अरे चंदनवृक्षा; तुझा मोठेपणा कोणाला बरं [योग्य इतका] वर्णन करता येईल. तू तर गरळ ओकणाऱ्या सापांच  सुद्धा सुगंध देऊन पोषणच करतोस. [चंदनान्योक्ती]

Wednesday, June 4, 2014

१२८८. उच्चैरेष तरुः फलं च विपुलं दृष्ट्वैव हृष्टःशुकः पक्वं शालिवनं विहाय जडधीस्तं नारिकेलं गतः |

तत्रारुह्यबुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा तस्य न केवलं विगलिता चञ्चूर्गता चूर्णताम् ||

अर्थ

"हे झाड खूप उंच आहे आणि फळे पण भरपूर आहेत" असा विचार करून आनंदित झालेला मंद पोपट तयार आशा साळीच शेत सोडून  "त्या " नारळाच्या झाडाकडे गेला. भुकेजलेल्या त्यानी त्या झाडावर फळ फोडायचा प्रयत्न केला [पण अरेरे] त्याची आशाच फक्त लयाला गेली असं नाही तर चोचीच सुद्धा पीठ पीठ झालं. [शुकान्योक्ती]

Monday, June 2, 2014

१२८७. यः परस्य विषमं विचिन्तयेत्प्राप्नुयात्स कुमतिः स्वयं हि तत् |

पूतना हरिवधार्थमाययौ प्राप सैव वधमात्मनस्ततः ||

अर्थ

जो दुष्ट माणूस दुसऱ्याच वाईट करण्याच ठरवतो त्याच स्वतःचच तसेच वाईट घडत. पूतना श्रीकृष्णाला ठार मारायला गेली पण तिलाच मृत्यू आला.

१२८६. माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी |

अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ||

अर्थ

आई घरात नसेल आणि पत्नी कडवटपणे बोलणारी [पतीला समजून घेऊन गोड शब्दात आपलं मत सांगणारी अशी नसेल] तर अशा माणसाने जंगलात निघून जावे, कारण घर आणि वन यात काही फरकच नाही ना!

१२८५. तावत्गर्जन्ति मण्डुकाः कूपमाश्रित्य निर्भयाः |

यावत्करिकराकारः कृष्णसर्पो न विद्यते ||

अर्थ

विहिरीच्या आश्रयाने  बेडूक न घाबरता तोपर्यंत  डराव डराव करत ओरडत राह्तात की जोपर्यंत हत्तीच्या सोंडेप्रमाणे [बळकट] असा काळा कुळकुळीत साप तिथे नसतो. [सर्पान्योक्ती ]

Thursday, May 29, 2014

१२८४. वातोल्लासितकल्लोल धिक्ते सागर गर्जितम् |

यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकाम् ||

अर्थ

उसळलेल्या वाऱ्यामुळे मोठी गर्जना करणाऱ्या सागरा तुझा धिक्कार असो [कारण] तुझ्या किनाऱ्यावर तहानलेला वाटसरू विहीर कुठे असेल त्याची विचारणा करतो. [सागरान्योक्ती  सागर = कंजूष श्रीमंत; वाटसरू = गरीब याचक]

Wednesday, May 28, 2014

१२८३. शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना |

तथापि कृशतां धत्ते कष्टः खलु पराश्रयः ||

अर्थ

स्वभावानी शांत [राहून] अशा भगवान शंकरांनी अगदी डोक्यावरच [अगदी कौतुकानी] सांभाळलाय तरीही चन्द्र [मधून का होईना] रोडावतो. बरोबरच आहे दुसऱ्याच्या आधारावर जगणं कठीणच असत.

Tuesday, May 27, 2014

१२८२. मन्त्रिणां भिन्नसंधाने भिषजां सान्निपातिके |

कर्मणि व्यज्यते प्रज्ञा स्वस्थे को वा न पण्डितः ||

अर्थ

[आपल्या राज्यातील उच्चपदस्थामध्ये] एकी नसेल अशावेळी मंत्र्याची किंवा सन्निपात आजाराच्या  [टॉयफाइड] आजा~यावर उपचार करताना वैद्याची हुशारी स्पष्ट होते. सगळ सरळ चाललं असेल तर सगळेच तल्लख असतात.

Monday, May 26, 2014

१२८१. ऊर्णां नैष दधाति नापि विषयो वाहस्य दोहस्य वा तृप्तिर्नास्य महोदरस्य बहुशो घासैः पलालैरपि |

हा कष्टं कथमस्य पृष्ठशिखरे गोणी समारोप्यते को गृह्णाति कपर्दकैरमुमिति ग्राम्यैर्गजो हस्यते ||

अर्थ

"याच्या अंगावर  [मेंढीसारखी] लोकर पण उगवत नाही. बरं दूध देणारा किंवा वाहून नेणारा पण हा प्राणी नाही. याचा एवढा मोठा पोटोबा टरफल किंवा केवढा तरी चारा घालून सुद्धा भरायचा नाही. बाप रे उंच अशा पाठीवर पोती तरी कशी चढवायची हो [मग अशा {निरुपयोगी} प्राण्याला] केवढ्यातरी रुपड्या खर्चून कोण बरं विकत घेईल? असं म्हणून गावंढळ लोक हत्तीला हसतात. [गजांतलक्ष्मी वगैरे राजे लोकांनाच कळणार ना?]

१२८०. अम्भांसि जलजन्तूनां दुर्गं दुर्गनिवासिनाम् |

स्वभूमिः श्वापदादीनां राज्ञां मन्त्री परं बलम् ||

अर्थ

पाणी ही जलचरांची ताकद असत. किल्ल्यावरील लोकांच गड हे [महत्वाच] बळ असत, आपली हद्द  ही जनावरांची [पशू; साप वगैरे] ताकद असते. तर मन्त्री हा राजाचा मुख्य आधार असतो.

Saturday, May 24, 2014

१२७९. मद्यपाः किं न जल्पन्ति किं न भक्षन्ति वायसाः |

कवयः किं न पश्यन्ति किं न कुर्वन्ति दुर्जनाः ||

अर्थ

दारुडे काय बडबडत नाहीत? [वाट्टेल ते - खरं खोटं बोलतात.] कावळे काहीही खातात. कवी काय पहात नाहीत बरे? [जे न देखे रवि ते देखे कवि] दुष्ट लोक वाट्टेल ती कुकर्मे करतात.

१२७८. सर्वेन्द्रियाणि संयम्य बकवत्पतितो जनः |

कालदेशोपपन्नानि सर्वकार्याणि साधयेत् ||

अर्थ

आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून माणसाने त्या त्या वेळी आणि त्या त्या ठिकाणी जसं वागणं योग्य आहे तसा व्यवहार ठेऊन आपली काम साधून घ्यावी. [मासे पकडण्यासाठी बगळा जसा तासनतास एका पायावर चित्रासारखा उभा राहतो, सगळं व्यवधान तिकडे लावतो तसं.]

Thursday, May 22, 2014

१२७७. नष्टं मृतमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः |

पण्डितानां च मूर्खाणां विशेषोऽयं यतः स्मृतः ||

अर्थ

मृत व्यक्ती; नष्ट झालेल्या वस्तु आणि भूतकाळात [घडलेल्या] घटना यांच्या बद्दल विद्वान शोक  करत [वेळ आणि स्वास्थ्य नाश करत] नाहीत. विद्वान आणि मूढ [सामान्य माणसं] यातला हा फरक सांगितलेला आहे.

१२७६. निरक्षरे वीक्ष्य महाधनत्वं विद्यानवद्या विदुषा न हेया |

रत्नावतंसाः कुलटा: किमार्यनार्यो कुलटा भवन्ति ||

अर्थ

अशिक्षित माणूस खूप श्रीमंत आहे असं दिसल्यामुळे विद्वानाने आपल्या उत्कृष्ट अशा विद्येकडे [उच्चशिक्षणाकडे] दुर्लक्ष करू नये. [आपण मनापासून ज्ञानार्जन करावं. पैसा कमी मिळतो याची खंत बाळगू नये.] वाईट चालीच्या बायका जडजवाहीरानी मढलेल्या पाहून गर्तीच्या स्त्रिया कधी सुशीलपणा सोडतात काय?

१२७५. देहे पातिनि का रक्षा यशो रक्ष्यमपातवत् |

नरः पतितकायोऽपि यशःकायेन जीवति ||

अर्थ

[केंव्हातरी निश्चितपणे मृत्युमुखी] पडणाऱ्या शरीराच्या रक्षणाबद्दल [अतिचिंता] कशाला करायची?  कीर्तिला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. [कारण] मरून गेल्यावर सुद्धा मनुष्य कीर्तिरूपं शरीराने जिवंत राहतो.

Monday, May 19, 2014

१२७४. कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो हंसः कुतो मानसात्किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासंनिभम् |

रत्नानां निचयाःप्रवालमणयो वैदूर्यरोहः क्वचिच्छम्बुकाः किमु सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

अर्थ

[बगळे नवीन आलेल्या पक्ष्याला पाहून विचारतात] तांबडे तांबडे डोळे, तोंड [चोच] आणि पाय असणारा तू कोण आहेस? " कोण बरे तू ?"; "हंस "; "कुठून आलास बरं?"; "मानससरोवरातून "; "तिथ काय असत?"; " तिकडे ना सोनेरी कमळांचे ताटवेच्या ताटवे. अमृतासारखं पाणी. रत्नांच्या राशीच असतात. कुठे कुठे वैदूर्याचे कोंबसुद्धा मिळतात." [इतकं वैभव ऐकून परत बगळे विचारतात] "शिंपले असतात का रे ?"; "नाही बाबा" हे ऐकून बगळे खदाखदा हसले. [काय एकेकाची आवड असते.]

१२७३. कलारत्नं गीतं गगनतलरत्नं दिनमणिः सभारत्नं विद्वाञ्श्रवणपटुरत्नं हरिकथा |

निशारत्नं चन्द्रःशयनतलरत्नं शशिमुखी महीरत्नं श्रीमाञ्जयति रघुनाथो नृपवरः ||

अर्थ

सर्व कलामध्ये उत्कृष्ट [रत्न] गानकला सूर्य हा आकाशमंडळाचे रत्न होय. विद्वान हा सभेच रत्न. सर्वात  श्रवणीय ही हरिकथाच असते. श्रेष्ठ राजा श्रीराम हा पृथ्वीतलाचा अलंकार, असून त्याचा [नेहमी] विजय होतो.

१२७२. एकसार्थप्रयातानां सर्वेषां तत्र गामिनाम् |

यद्येकस्त्वरितं यातस्तत्र का परिदेवना ||

अर्थ

सर्वच लोक जिथे [परलोकी] जाणार आहेत अशा तांड्यातील एक जण जर पटकन गेला तर त्याच काय दुःख करायचय ? [एखाद्या आप्ताला लवकर मृत्यू आला म्हणून दुःख करण्यापेक्षा आपल्याला पण मृत्यू येणार आहे] म्हणून आसक्ति घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Wednesday, May 14, 2014

१२७१. ध्यानशस्त्रं बकानां च वेश्यानां मोहशस्त्रकम् |

साधुत्वशस्त्रं मैन्दानां परप्राणार्थहारकम् ||

अर्थ

बगळ्यांच ध्यान करण्याच [सोंग हेच] शस्त्र; वेश्यांच भुरळ पाडणं हे हत्यार आणि ठगांच  शहाजोगपणाच ढोंग ही  हत्यार दुसऱ्यांचे प्राण आणि द्रव्य लुबाडत असतात.

Monday, May 12, 2014

१२७. प्रेम सत्यं तयोरेव ययोर्योगवियोगयोः |

वत्सरा वासरीयन्ति वासरीयन्ति वत्सराः ||

अर्थ

त्यांच्यातच खर प्रेम आहे असं म्हंटल पाहिजे; की जे जवळ असताना वर्ष हे दिवसासारखं [पटकन गेलं असं वाटत] आणि विरहकाळात एक दिवस हा वर्षाप्रमाणे भासतो.

१२६९. क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम् |

धर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्क्रोधं विवर्जयेत् ||
अर्थ

संताप हे संकटांचे कारण आहे. राग हे संसाराच्या [जन्ममरणाच्या येरझारांचे] बंधनाचे मूळ आहे. संतापामुळे धर्माची हानी होते [संताप झाल्यामुळे शाप दिला तर सगळं तप वाया जाते शिवाय त्यापायी परमेशाच्या भक्तीत व्यत्यय येतो] म्हणून रागावणं संपूर्णपणे सोडून द्यावं. 

१२६८. दोषोऽपि गुणतां याति प्रभोर्भवति चेत्कृपा |

अङ्गहीनोऽपि सूर्येण सारथ्ये योजितोऽरुणः ||

अर्थ

जर धन्याची कृपादृष्टी असेल तर असलेला एखादा दोष गुणाप्रमाणे भासतो. [त्या दोषाचा तोटा न होता फायदाच होतो] विकलांग [पांगळा] असूनही सूर्याने अरुणाला सारथी नेमले आहे. [त्याला पाय नसले तरी त्याचा वेळ अगदी चांगला जातो. त्याला काही फरकच पडत नाही.]

१२६७. न पश्यति च जन्मान्धः कामान्धो नैव पश्यति |

न पश्यति मदोन्मत्तो ह्यथीं दोषं न पश्यति ||

अर्थ

जन्मापासून अंधाला दिसत नाहीच. विषयांधाला [पाप; धोके; परिणाम] दिसत नाहीत. मस्तवाल माणसाला [सद्गुणी; गरजवंत वगैरे] दिसत नाही. गरजवंताला [कशात] दोष दिसत नाहीत.

Thursday, May 8, 2014

१२६६. ब्रह्मन्; कृष्णकथाः पुण्याः माध्वीर्लोकमलापहाः |

को नु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो   नित्यनूतनाः || भागवत

अर्थ

हे [शुक] महर्षे; अतिशय रसाळ; नेहमी नव्याप्रमाणे वाटणाऱ्या; पुण्य मिळवून देणाऱ्या; या जगाच काळबेरं [वाईट; पाप] नाहीसं करणाऱ्या अशा कृष्णकथा ऐकताना कोणाला बरे समाधानी वाटणार नाही? [त्या अजून अजून ऐकाव्या असंच वाटेल.]

Wednesday, May 7, 2014

१२६५. देशे देशे किमपि कुतुकादद्भुतं लोकमानाः संपाद्यैव द्रविणमतुलं सद्म भूयोऽप्यवाप्य |

संयुज्यन्ते सुचिरविरहोत्कण्ठिताभिःसतीभिः सौख्यं धन्याःकिमपि दधते सर्वसंपत्समृद्धाः ||

अर्थ

अगदी भरपूर संपत्ती मिळवून परदेशातल्या आश्चर्य वाटेल अशा विविध गोष्टी पाहून आपल्या घरी परत आल्यावर, अतिशय श्रीमंती मिळवलेल्या; कृतकृत्य अशा [कामासाठी परदेशी राहिलेल्याना] पुष्कळ काळपर्यंत झालेल्या विरहामुळे उत्कंठित झालेल्या प्रियेचा सहवास मिळाल्याने अपूर्व सुखाचा अनुभव मिळतो.

Monday, May 5, 2014

१२६४. नीरसान्यपि रोचन्ते कार्पासस्य फलानि मे |

येषां गुणमयं जन्म परेषां गुह्यगुप्तये ||

अर्थ

कापसाची फळ [बोंड] शुष्क [रसहीन] असून सुद्धा मला आवडतात. [जरी रसदार नसली] तरी गुणी [गुण किंवा धागा यांनी युक्त] अशा यांच्या जन्मामुळे दुसऱ्यांच लज्जारक्षण होत. [त्यांचा परोपकाराचा गुण स्तुत्य आहे.]

१२६३. अवशेन्द्रियचित्तानां हस्तिस्नानमिव क्रियाः |

दुर्भगाभरणप्रायो ज्ञानं भारो क्रियां विना ||

अर्थ = ज्यांची इंद्रिये स्वतःच्या ताब्यात नाहीत त्यांच कुठलहि काम हत्तीच्या आंघोळी प्रमाणे असत. [हत्ती पाण्यात डुंबल्यावर लगेच मातीत सुद्धा लोळेल मग त्या अंग स्वच्छ करण्याला काय अर्थ? तसंच काही केल्यावर त्याच्या उलट सुद्धा वर्तन हे लोक करू शकतात.] कुठलही ज्ञान झाल्यावर ते जीवनात आचरणात आणलं नाही तर ते कमनशिबी माणसाने घातलेल्या दागिन्या प्रमाणे ओझच होय.


१२६२. अपराधो न मेऽस्तीति नैतद्विश्वासकारणम् |

विद्यते हि नृशंसेभ्यो भयं गुणवतामपि ||

अर्थ

कर्दनकाळ माणसांच्या बाबतीत "मी काही गुन्हा केला नाही" त्यामुळे [तो छळणार नाही अशी] खात्री; अगदी गुणी लोकांना सुद्धा; धरता येत नाही.

१२६१. अलभ्यं लब्धुकामस्य जनस्य गतिरीदृशी |

अलभ्येषु मनस्तापः संचितार्थो विनश्यति ||

अर्थ

असाध्य गोष्टीच्या पाठीमागे लागलेल्या माणसाची अवस्था अशी होते की; असाध्य वस्तु न मिळाल्याने मनस्ताप तर होतोच [आणि ती मिळवण्यासाठी] जमवलेली पुंजी मात्र खलास होऊन जाते.

Wednesday, April 30, 2014

१२६०. कुटिला लक्ष्मीर्यत्र प्रभवति न सरस्वती वसति तत्र |

प्रायः श्वश्रूस्नुषयोर्न दृश्यते सौह्रुदं लोके ||

अर्थ

जीथे कारस्थानी लक्ष्मी येऊन राहते, तिथे सरस्वती [विद्वत्ता] कधी राहायला येत नाही. या जगात सासवा सुनांची सहसा मैत्री नसतेच. [पटतच नाही]

Tuesday, April 29, 2014

१२५९. दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता |

अभ्यासेन न लभ्येयुश्चत्वारः सहजाः गुणाः ||

अर्थ

औदार्य; गोड बोलणं; धैर्य आणि बरोबर किंवा चूक समजणे हे चारी गुण [काही व्यक्तींना] जन्मजात असतात. ते प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत .

Monday, April 28, 2014

१२५८. अगाधजलसंचारी गर्वं नायाति रोहितः |

अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फुर्फुरायते ||

अर्थ

अथांग पाण्यामध्ये पोहणारा रोहित मासा कधी माज करत नाही. पण अंगठ्या एवढ्या पाण्यात तरंगणारी मासोळी मात्र भारीच माज करते.

१२५७. अग्निदाहे न मे दुःखं छेदे न निकषे न वा |

यत्तदेव महादुःखं गुञ्जया सह तोलनम् ||

अर्थ

मला अग्निमधे टाकून चटके देतात त्याच किंवा कापल्याच किंवा कस लावायच्या दगडावर घासून घेण्याच दुःख होत नाही. [अधिक शुद्धतेसाठी किंवा परीक्षा घेण्याच मला दुःख नाही. मी अधिक कष्ट घेऊन अधिक मौल्यवान होईन.] पण गुंजे सारख्या [क्षुद्र वस्तू] बरोबर तुलना करतात हेच माझं तीव्र दुःख आहे. [सुवर्णान्योक्ती]

१२५६. सकृदपि दृष्ट्वा पुरुषं विबुधा जानन्ति सारतां तस्य |

हस्ततुलयापि निपुणा: पलप्रमाणं विजानन्ति ||


अर्थ

एका दृष्टीक्षेपातच जाणकार एखाद्या माणसाच कर्तृत्व किती आहे ते ओळखतात. हुशार लोक हातानी जोखूनच गुंजेच वजन सांगू शकतात.

Friday, April 25, 2014

१२५५. स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम् |

परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जीवति ||

अर्थ

ज्याने आपल्या [सामर्थ्याने] घराण्याच नाव उज्वल केलं; तोच खरा जन्माला आला [त्याच्या जगण्याचं सार्थक झालं नाहीतर]  या जगाच्या रहाटगाडग्यात मेलेला कोण बरे पुन्हा जन्माला येत नाही? सगळे जन्म घेऊन आपल आयुष्य रेटत राहतात, पण याचा जन्म सार्थक होतो.]

Thursday, April 24, 2014

१२५४. उद्धाटितनवद्वारे पञ्जरे विहगोऽनिलः |

यत्तिष्ठति तदाश्चर्यं प्रयाणे विस्मयः कुतः ||

अर्थ

प्राण पक्षी हा [शरीराची] नउ दार सताड उघडी असूनही उडून जात नाही [आयुष्य आहे तेवढा जगतो] हेच खरं आश्चर्य आहे. तो निघून गेला [माणूस मेला ] तर त्यात काय नवल ?

Wednesday, April 23, 2014

१२५३. यच्छक्यं ग्रसितुं ग्रासं ग्रस्तं परिणमेच्च यत् |

हितं च परिणामे स्यात्तत्कार्यं भूतिमिच्छता ||

अर्थ

भरभराट व्हावी अशी इच्छा असणाऱ्या माणसाने; जेवढा [मोठा] घास घेणं आपल्याला शक्य आहे आणि तसा तो घेतल्यावर तो पचेल [अशी आपल्याला खात्री असेल] तेवढा ग्रहण करणं आपल्याला [नक्की] फायद्याच असेल तरच तेवढाच घास घ्यावा. [कुठली गोष्ट करताना आत्ता आपल्याला एवढं करण झेपलं तरी ते शेवटपर्यंत नेण जमेल का? त्याचा आपल्याला फायदा आहे का? नंतर त्याचा उपभोग घेता येईल का या सर्वाचा विचार करून मगच त्यात उडी घ्यावी.]

Monday, April 21, 2014

१२५२. पूरयेदन्नेनार्धं तृतीयमुदकेन नु |

वायोस्सञ्चारणार्थाय चतुर्थमवशेषयेत् ||

अर्थ

[आपल्या पोटाचा] अर्धा भाग भरेपर्यंत अन्न खावं आणि खरोखर पाव भाग पाणी प्यावं. वाऱ्याच्या हालचालीसाठी पाव भाग मोकळा ठेवावा.

१२५१. सर्वेषामेव शौचानामर्थशौचं परं स्मृतम् |

योऽर्थे शुचिः स हि शुचिर्न मृद्वारिशुचिः शुचिः ||

अर्थ

अगदी सर्व शुद्धतांमध्ये पैशाच्या बाबतीतील शुद्धता [निस्वार्थता; कुठल्याही प्रकारे -कॅश ऑर काइंड] ही सर्वात श्रेष्ठ होय जो पैशाच्या बाबतीत निर्मळ असेल तो खरा शुचिर्भूत माती; पाणी यांनी शुद्ध झालेला खरा शुद्ध नव्हे.

Friday, April 18, 2014

१२५०. आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका |

१२५०. आसिन्धुसिन्धुपर्यन्ता   यस्य भारतभूमिका |
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृतः || स्वातंत्र्यवीर सावरकर

अर्थ

[हिंदुधर्म हे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष किंवा अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची आणि पंथांची] संधू नदी पासून तर समुद्रापर्यंत ज्यांची ही पितृभूमी आणि पुण्य भूमि  आहे त्या साऱ्यांना समाविष्ट करणाऱ्या धर्मसंघाचे हिंदूधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. [त्यामुळे कुठल्याही धर्मातील जो माणूस या भूमीचा आदर करतो तो हिंदू होय.]

Tuesday, April 15, 2014

१२४९. अशेषलङ्कापतिसैन्यहन्ता श्रीरामसेवाचरणैककर्ता |

अनेकदुःखाहतलोकगोप्ता त्वसौ हनुमांस्तव सौख्यकर्ता ||

अर्थ

रावणाच्या सर्व सैन्याला मारून टाकणारा; मनोभावे श्रीरामाची सेवा करणारा; कित्येक दुःखीकष्टी लोकांची संकटे नाहीशी करणारा हा मारुतीराया तुला सुखी करेल.

आज हनुमान जयंती आहे. 

Monday, April 14, 2014

१२४८. त्वं चेत्संचरसे वृषेण लघुता का नाम दिग्दन्तिनां व्यालैः काञ्चनकुण्डलानि कुरुषे हानिर्न हेम्नः पुनः |

मूर्ध्ना चेद्वहसे जडांशुमयशः किं नाम लोकत्रयीदीपस्याम्बुजबान्धवस्य जगतामीशोऽसि किं ब्रूमहे ||

अर्थ

[हे भगवान शंकरा] तू बैलावर बसून भटकलास म्हणून [अष्ट] दिग्गजांना कमीपणा येत नाही. [खरं तर आपल्या योग्यतेनुसार वाहन निवडलं पाहिजे.] कानात सर्पाच वेटोळं अडकवलस म्हणून सोन्याचा काय तोटा होणार? जडांशु [ मंद किरण असणारा / चन्द्र] ला डोक्यावर घेतलास म्हणून लोकत्रयीला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा काही बदलौकिक होत नाही. [खरं आपल्या योग्यतेनुसार सोबती निवडावे पण तू तर] त्रिलोकीचा धनी आम्ही काय बोलणार हो.

Saturday, April 12, 2014

१२४७. एकः स एव जीवति हृदयविहीनोऽपि सहृदयो राहुः |

यः सकललघिमकारणमुदरं न बिभर्ति दुःपूरम् ||

अर्थ

खरोखर तो राहू हा एकटा  [अगदी निष्काळजी असा मजेत  ऐश करून] राहतो. [त्याच्या कठोर  वागण्यानी असं वाटत की हळव असं] मन त्याला नाही. [पण आपल्याला अमृत मिळाल पाहिजे असं वाटणार ] हृदय आहे आणि [त्याच धड अमृतमंथनाच्या वेळी कापल्यामुळे] सर्व अपमानाचं कारण असणार आणि पूर्तता करण्यास फार कठीण असं उदर नाहीये [त्यामुळे त्याला काही चिंताच नाही.]

१२४६. राजन्दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेनां तेनाद्य वत्समिव लोकमिमं पुषाण |

तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाणे नानाफलैः  फलति कल्पलतेव भूमिः ||

अर्थ

हे राजा; जर ह्या पृथ्वी [राज्य] रूपी गाईचे तू दोहन करू इच्छित असशील तर आजपासूनच [तिला] पाडसाप्रमाणे असणाऱ्या प्रजेच [उत्तमप्रकारे] पालनपोषण करून त्यांची भरभराट कर. त्यांच
सतत आणि चांगल्या प्रकारे पोषण केलं तर पृथ्वी कल्पवृक्षाप्रमाणे विविध फळांनी लगडते.

Friday, April 11, 2014

१२४५. पातकानां समस्तानां द्वे परे तात पातके |

एकं दुःसचिवो राजा द्वितीयं च तदाश्रयः ||

अर्थ

अरे बाबा; सगळ्या पापांमध्ये ही  दोन पाप महाभयंकर आहेत एक म्हणजे वाईट मंत्री असणारा राजा आणि दुसरं तर त्याच्यावर आपण आश्रयाला असणं.

Thursday, April 10, 2014

१२४४. शरीरस्य गुणानां च दूरमत्यन्तमन्तरम् |

शरीरं क्षणविध्वंसि  कल्पान्तस्थायिनो गुणाः ||पंचतंत्र

अर्थ

गुण आणि आपला देह यात पराकोटीचा फरक आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे तर [गुणी माणसाच्या] गुणांची [कीर्ति] तर हे युग संपेपर्यंत टिकते.

Tuesday, April 8, 2014

१२४३. राज्यं येन पटान्तलग्नतृणवत्त्यक्तं गुरोराज्ञया पाथेयं परिगृह्य कार्मुकवरं घोरं वनं प्रस्थितः |

स्वाधीनः शशिमौलिचापविषये प्राप्तो न वै विक्रियां पायाद्वः स बिभीषणाग्रजनिहा रामाभिधानो हरिः ||

अर्थ

वडलांची आज्ञा [शिरोधार्य मानून] ज्यानी राज्य [वरील हक्क] कपड्याच्या टोकाला अडकलेल्या कुसळाप्रमाणे झटकला; जो श्रेष्ठ असं धनुष्यच केवळ शिदोरी म्हणून बरोबर घेऊन भयंकर अशा अरण्याला गेला; भगवान शंकरच्या धनुष्याबाबत ज्यानी काही माघार घेतली नाही [आणि पराशुरामावर विजय मिळवला] तो राम हे नाव धारण करणारा भगवान विष्णु की ज्यानी बिभीषणाच्या मोठा भाऊ [रावणाचा] वध केला, तो तुमचे रक्षण करो.

॥ रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा ॥

१२४२. मण्डलीकृत्य बर्हाणि कण्ठैर्मधुरगीतिभिः |

कलापिनः प्रनृत्यन्ति काले जीमूतमालिनी ||

अर्थ

ढगांनी [आकाश] व्यापलेलं असताना पिसारा गोल फुलवून गोड गळ्यानी गात मोर सुंदर नृत्य करतात.

Monday, April 7, 2014

१२४१. पृथिवी दह्यते यत्र मेरुश्चापि विशीर्यते |

 सुशोषं सागरजलं शरीरे तत्र का कथा ||

अर्थ

माणूस हा मरणाधीन आहे अस कवि सांगतोय - जिथे [सम्पूर्ण] पृथ्वी जळून खाक होते; मेरु पर्वताचा चक्काचूर होतो; समुद्राचं पाणी अगदी नाहीसं होत तिथे शरीराचा काय पाड?

Friday, April 4, 2014

१२४०. व्यतिषजति पदार्थानान्तरः कोऽपि हेतुर्न खलु बहिरुपाधीन्प्रीतयः संश्रयन्ते |

विकसति हि पतङ्गस्योदये पुण्डरीकं द्रवति च हिमरश्मावुद्गते चन्द्रकान्तः ||


अर्थ

खरोखर प्रीति ही कुठल्यातरी बाह्य कारणावर अवलंबून नसते. अन्तःकरणातून ती पाझरते. पद्म [सूर्यविकासी कमळ] हे सूर्योदय झाला की [आपलं आपण] उमलत [खरं त्यांच्यात दृश्य असं काही संबंध नसला तरी] चंद्रकांत रत्न चंद्रोदय झाला की पाझरतो.

Thursday, April 3, 2014

१२३९. अकृत्वा निजदेशस्य रक्षां यो विजिगीषते |

स नृपः परिधानेन वृतमौलिः पुमानिव ||

अर्थ

स्वतःच्या राज्याची [पक्की] संरक्षणव्यवस्था केल्याशिवायच जो पर राज्य जिंकण्याची इच्छा करेल तो राजा कमरेच वस्त्र सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्या माणसाप्रमाणे [मूर्ख] होय.

Wednesday, April 2, 2014

१२३८. सुखार्थी चेत्त्यजेद्विद्यां विद्यार्थी चेत्त्यजेत्सुखम् |

सुखार्थिनः  कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम् ||

अर्थ

आराम /मजा  हवी असेल तर विद्या मिळणार नाही. [उत्तम यशासाठी आरामाचा] त्याचा त्याग करावा. विद्या हवी असेल तर सुखाचा त्याग करावा. आरामात मजा करणाऱ्याला विद्या कोठून मिळणार? आणि विद्येसाठी झटणाऱ्याला सुख कोठून मिळणार?

१२३७. त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये |

तेन त्वदङ्घ्रिकमले रतिं मे यच्छ शाश्वतीम् ||

अर्थ

हे परमेश्वरा हे [या जगातील सर्व वस्तु तुझ्याच आहेत त्यातलं काही] मी तुलाच अर्पण करते. तर  [त्याच फळ म्हणून] तू; माझं प्रेम तुझ्या चरणकमली कायम जडेल असा [वर] मला दे.

१२३६. प्रजापीडनसंतापात्समुद्भूतो हुताशनः |

राज्ञः कुलं श्रियं प्राणान्नादग्ध्वा विनिवर्तते ||

अर्थ

प्रजेला त्रास दिल्यामुळे झालेल्या तळतळाटातून निर्माण झालेली आग राजाच [प्रशासकाचं] वैभव; घराणं आणि प्राण नष्ट केल्याशिवाय शांत होत नाही.

Thursday, March 27, 2014

१२३५. अदृष्टपूर्वाः बहवः सहायाः सर्वे पदस्थस्य भवन्ति वश्याः |

अर्थाद्विहीनस्य पदच्युतस्य भवन्ति काले स्वजनोऽपि शत्रुः ||

अर्थ

[अधिकाराच्या] पदावर विराजमान झाल्यावर पूर्वी कधी न दिसलेले असे बरेच मदतनीस त्याच्या अगदी मनाप्रमाणे वागतात. पण एकदा का पद गेलं आणि पैसे पण संपले की [गोळा झालेली भुतावळच काय पण पूर्वीचे] संबधित सुद्धा शत्रु सारखे वागू लागतात.

Wednesday, March 26, 2014

१२३४. एकः स्वादु न भुञ्जीत नैकः सुप्तेषु जागृयात् |

एको न गच्छेदध्वानं नैकश्चार्थान्प्रचिन्तयेत् ||

अर्थ

[बरोबरच्या इतरांना वगळून] एकट्याने गोड [किंवा स्वादिष्ट] खाऊ नये. [सगळे] झोपलेले असताना एकट्याने जागू नये. रस्त्याने [प्रवासाला] एकट्याने जाऊ नये. [इतर भागीदार सोडून] एकट्यालाच फायदा; समृद्धी मिळवायचा विचार करू नये.

Tuesday, March 25, 2014

१२३३. अभिमानवतां पूसामात्मसारमजानताम् |

अन्धानामिव दृश्यन्ते पतनान्ता: प्रवृत्तयः || पंचतंत्र

अर्थ

स्वतःच्या [मर्यादांची] जाण नसणाऱ्या आणि गर्विष्ठ लोकांच वागणं आंधळ्याप्रमाणे धडपडत शेवटी अधःपात करून घेणारं असं असत.

Monday, March 24, 2014

१२३२. ब्रह्मघ्ने च सुरापे च चौरे भग्नव्रते शते |

निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ||

अर्थ

शहाण्या लोकांनी विद्वानाला ठार करणाऱ्याला; दारु पिणाराला; चोराला; शपथा मोडणाऱ्याला प्रायश्चित्त [घेऊन त्या पापातून मुक्त होता येईल असं] सांगितलेलं आहे. पण कृतघ्नपणाला प्रायश्चित्त नाही. [ही गोष्ट त्या सर्वांपेक्षाही वाईट आहे.]

१२३१. शास्त्रोपस्कृतशब्दसुन्दरगिरः शिष्यप्रदेयागमा विख्याताः कवयो वसन्ति विषये यस्य प्रभोर्निधनाः |

तज्जाड्यं वसुधाधिपस्य कवयो ह्यर्थं विनापीश्वराः कुत्स्याः स्युः कुपरीक्षकाः मणयो यैरर्घतः पातिताः ||

अर्थ

ज्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम विद्यादान केलं आहे असे; ज्याचं सुंदर लिखाण शास्राला धरून मांडलेले आहे असे, सुप्रसिद्ध विद्वान ज्या राजाच्या राज्यात गरिबीत दिवस कंठत असतील तो त्या राजाचा मठ्ठपणा आहे. ते विद्वान काय पैशाशिवाय देखील ईश्वर असतात. रत्नांची किंमत ज्यांनी त्यांच्या मोलापेक्षा कमी केली त्या  परीक्षकांचाच धिक्कार असो. [ रत्नांची किंमत त्यामुळे कमी होत नाही.]

Wednesday, March 19, 2014

१२३०. दृष्ट्वाऽऽत्मनि जये व्यग्रान्नृपान्हसति भूरियम् |

अहो मां विजिगीषन्ति मृत्योः क्रीडनका नृपाः ||

अर्थ

आपल्याला [पृथ्वीला] जिंकण्याचा खटाटोप करणाऱ्या राजांकडे पाहून ही पृथ्वी [त्यांचा उपहास करत] हसून म्हणते "मृत्यूच्या हातातली बाहूल असलेले हे राजे आणि मला जिंकायची हाव धरतायत !"

Monday, March 17, 2014

१२२९. काकचेष्टा बकध्यानं श्वाननिद्राल्पभोजनम् |

स्वाध्यायः संयमश्च छात्राणां लक्षणानि षट् ||

अर्थ

कावळ्याप्रमाणे जागरुकता; बगळ्याप्रमाणे एकाग्रता; कुत्र्याप्रमाणे सावध झोप; कमी जेवण; संयम आणि स्वतः अभ्यास करणं ही सहा [उत्तम] विद्यार्थ्याची लक्षणे आहेत.

१२२८. अपृष्ट्वैव भवेन्मूढः ज्ञानं मनसि चिन्तनात् |

अपूर्णः कुरुते शब्दं न पूर्णः कुरुते घटः ||

अर्थ

[शंका] न विचारल्यास [न समजल्यामुळे माणूस] मूर्खच राहील. [पण माहिती मिळाल्यावरही त्याच्यावर] विचार केल्याने [नीट] समजत. [ज्याच]ज्ञान अपूर्ण असत तो अधिक बडबड करतो, जसं अर्धवट भरलेल्या मडक्याचा आवाज येतो व पूर्ण भरलेल्या घड्याचा येत नाही तसं.

१२२७. अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् |

परपापैर्विनश्यन्ति मत्स्या नागहृदे यथा |

अर्थ

स्वतः पाप केलं नसलं आणि अगदी शुद्ध असलं तरी पापी लोकांच्या सहवासाने सुद्धा नाश होतो. सापांचा निवास असलेल्या तळ्यातल्या माशांप्रमाणे.

Monday, March 10, 2014

१२२६. अर्थो नराणां पतिरङ्गनानां वर्षा नदीनामृतुराट् तरूणाम् |

स्वधर्मचारी नृपतिः प्रजानां गतं गतं यौवनमानयन्ति ||

अर्थ

तारुण्य ओसरल्यावर सुद्धा या गोष्टी सर्वाना नवाळी प्राप्त करून देतात. पैशामुळे माणसांना; पती पत्नीला; पावसाळा नद्यांना; वसन्त ऋतु वृक्षांना आणि राजधर्माचे पालन करणारा राजा प्रजेला.

१२२५. भाग्यवन्तं प्रसूयेथाः मा शूरं मा च पण्डितम् |

शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः || कुन्ती

अर्थ

नशीबवान [अपत्यांना] जन्म दे. तो शूर हवा असं नाही किंवा विद्वान असला पाहिजे असं पण नाही. अगदी शूर आणि विद्वान अशा माझ्या मुलाचं [या दोन्ही गोष्टी असून सुद्धा] युद्ध [करायला लागल्याने] वाटोळ झालंय.

Sunday, March 9, 2014

१२२४. एता हसन्ति च रुदन्ति च वित्तहेतोर्विश्वासयन्ति पुरुषं न च विश्वसन्ति |

तस्मान्नरेण कुलशीलसमन्वितेन वेश्या: श्मशानघटिका इव वर्जनीयाः   ||

अर्थ

वेश्या या पैशासाठी [कृत्रिम] हसतात किंवा रडतात. त्या गिऱ्हाइकाला [नाटक करून त्यांच प्रेम असल्याची] खात्री पटवतात, पण त्या त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हे राजा; स्मशानातील मडक्याप्रमाणे घरंदाज माणसाने त्यांना टाळावं.

Friday, March 7, 2014

१२२३. अतिव्ययोऽनवेक्षा च तथार्जनमधर्मतः |

मोक्षणं दूरसंस्थानं कोषव्यसनमुच्यते ||

अर्थ

अतिशय खर्च करणं [करात सूट; फाजील सवलती; बरोबर आय होतेय का नाही इकडे] दुर्लक्ष त्याचप्रमाणे अन्यायाने [कर] गोळा करणे किंवा सोडून देणे, दूर निघून जाणे ही खजिन्याची संकटे आहेत असे [जाणकार] सांगता.

Wednesday, March 5, 2014

१२२२. हे हेमकार परदुःखविचारमूढ किं मां मुहुः क्षिपसि वारशतानि वह्नौ |

संदीप्यते मयि सुवर्णगुणातिरेको लाभः परं तव मुखे खलु भस्मपातः ||

अर्थ

हे दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा न करणाऱ्या सोनारा; मला सारखा सारखा आगीत काय फेकातोयस? त्यामुळे [हीण जळून जाईल आणि] माझा सोनेरी रंग अधिक झळाळून उठेल आणि [माझा] फायदाच होईल, पण तुला मात्र [आग फुंकून फुंकून] राख खायला लागेल ना. [ सुवर्णकारान्योक्ती सोनार = नाव ठेवणारे]

१२२१. वसन्त्यरण्येषु चरन्ति दूर्वा: पिबन्ति तोयान्यपरीग्रहाणि |

तथापि वध्या हरिणा नराणां को लोकमाराधयितुं समर्थः ||

अर्थ

हरणं जंगलात राहतात; कुणाची मालकी नसलेलं [जंगलातीलच] पाणी पितात; [इतर कोणाला नको असलेलं] गवत खातात. [म्हणजे कुणाचा ते तोटा करत नाहीत] तरीही माणसं त्यांना ठार करतात. [काय म्हणून मारतात? सर्व] जगाला कोणी संतुष्ट करू शकत नाही.

१२२०. निःस्नेहो याति निर्वाणं स्नेहोऽनर्थस्य कारणम् |

निःस्नेहेन प्रदीपेन यदेतत्प्रकटीकृतम् ||

अर्थ

स्नेह [तेल संपलेला] नसलेला दिवा [विझतो; शांत होतो] त्यानी हे दाखवून दिलं की स्नेह [आसक्ती]चा त्याग केला तर शांतता [समधातता] येते. स्नेह हेच अनर्थाच कारण आहे.

Thursday, February 27, 2014

१२१९. कदा वाराणस्याममरतटिनीरोधसि वसन्वसानः कौपीनं शिरसि निदधानोऽञ्जलिपुटम् |

अये गौरीनाथ  त्रिपुरहर शम्भो त्रिनयन प्रसीदेत्याक्रोशन्निमिषमिव नेष्यामि दिवसान् ||

अर्थ

स्वर्धुनी गंगेच्या काठी; वल्कले परिधान करून; डोक्यावर [नम्रपणे भक्तिपूर्वक] हातानी नमस्कारासाठी अंजली धारण करत हे शंकरा; पार्वतीपती; त्रिपुरारी; त्र्यंबका असा भगवंताच्या नामाचा जप करत एका क्षणाप्रमाणे मी आयुष्य कधी बरं घालवीन?

१२१८. वृक्षान्छित्वा पशून्हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम् |

यद्येवं गम्यते स्वर्गं नरकं केन गम्यते ||

अर्थ

झाड तोडून; प्राण्यांना मारून; रक्ताचा चिखल करून [या नरकात पडण्यासारख्या  सद्गुणांमुळे{?}] जर स्वर्गात जाता येत असेल तर नरकात कोण जातो?

Wednesday, February 26, 2014

१२१७. रोलम्बैर्निमितं गृहं विघटितं धूमाकुलै: कोकिलैर्मायूरैश्चलितं पुरैव रभसा कीरैरधीरैर्गतम् |

ऐकेनापि सपल्लवेन तरुणा दावानलोपद्रव: सोढ: को न विपत्सु मुञ्चति जनो मूर्ध्नापि यो लालितः ||

अर्थ

भुंगे निघून गेले; धुरानी त्रासलेल्या कोकीळानी घरे मोडली; मोर आधीच पळाले. धास्तावलेले पोपट तर जोरात पळाले; वणवा पेटल्यावर एकट्या पर्णायुक्त वृक्षानी त्या वणव्याच्या यातना सोसल्या. अगदी लाडानी  डोक्यावर घेतलं [त्या साऱ्या पाखरांना] तरी, संकटामध्ये कोण बरे साथ करतो?

Monday, February 24, 2014

१२१६. गुणानामन्तरं प्रायस्तज्ञो वेत्ति न चापरः |

मालतीमल्लिकाऽमोदं घ्राणं वेत्ति न लोचनम् ||

अर्थ

त्या त्या गोष्टीतला ज्ञान्याला त्यातलं बिनचूक कळत इतरांना ते समजत नाही. मालतीचा सुवास नाकालाच कळतो डोळ्याला नाही.

Saturday, February 22, 2014

१२१५. कपाले मार्जार: पय इति करांल्लेढि शशिनस्तरुछिद्रप्रोतान्बिसमिति करी संकलयति |

रतान्ते तल्पस्थान्हरति वनिताप्यंशुकमिति प्रभामत्तश्चन्द्रः जगदिदमहो विप्लवयति ||

अर्थ

चांदण्याचा वर्षाव करून हा चन्द्र सगळ्या जगाला वेगळेच भास घडवतोय, मडक्यातले चांदण्याचे किरण दूधच समजून मांजर ते चाटतय. झाडाच्या ढोलीतले किरण, हत्ती कमळ तंतू म्हणून गोळा करतोय. एक सुंदरी पलंगावरच चांदणच वस्त्र म्हणून पांघरतेय. [भ्रांतीमान अलंकाराच उदाहरण]

Thursday, February 20, 2014

१२१४. शाठ्येन धर्मं कपटेन मित्रं परोपतापेन समृद्धिभावम् |

सुखेन विद्यां परुषेण नारीं वाञ्छति ये व्यक्तमपण्डितास्ते ||

अर्थ

लबाडी करून धर्म केला असं ज्यांना वाटत ते मूर्ख आहेत हे अगदी उघड आहे. तसंच  कपट करून मित्र मिळेल; दुसऱ्याला त्रास देऊन भरभराट होईल; विद्या कष्टांवाचून मिळेल; कठोरपणे वागून एखादी बाई वश होईल; अशी इच्छा करणारे अगदी निश्चित मूर्ख असतात.

Wednesday, February 19, 2014

१२१३. सप्रतिबन्धं कार्यं प्रभुरधिगन्तुं सहायवानेव |

दृश्यं तमसि न पश्यति दीपेन विना सचक्षुरपि ||

अर्थ

[माणूस] सामर्थ्यवान असलातरी अडथळे असलेले [अडचणी असलेल] काम पूर्ण करायला मदतनीस [चांगले मित्र; हितचिंतक] असले तरच शक्य होत. चांगले डोळे असले तरी अंधारात दिव्याशिवाय दिसू शकत नाही.

Tuesday, February 18, 2014

१२१२. वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि भवति कलभाषी |

विरते पयसि घनेभ्यः शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः ||

अर्थ

जोपर्यंत उदार मनुष्य दान करत असतो तोवर सर्वजण त्याच्याबद्दल गोड बोलत असतात. [पण त्याच्या कडचे पैसे संपले की स्तुती थांबते ] ढगांमधल पाणी संपल की मोरांचा केकारव थांबलाच.

Monday, February 17, 2014

१२११. क्षणात्प्रबोधमायाति लङ्घ्यते तमसा पुनः |

निर्वास्यतः प्रदीपस्य शिखेव जरतो मतिः ||

अर्थ

विझायला निघालेल्या दिव्याची वात ज्याप्रमाणे एखादवेळेस एकदम मोठी होऊन तेजाळते तर परत अंधारानी ग्रासली जाते, त्याप्रमाणे म्हातारपणी बुद्धी कधी [खूप अनुभवांमुळे] तल्लख चालते तर कधीकधी मंद होते. [समई विझताना ज्योत अशी होते तसं प्राणज्योत मालवायाची वेळ आल्यावर होत]

१२१०. अजानन्दाहार्तिं पतति शलभस्तीव्र दहने न मीनोऽपि ज्ञात्वा बडिशयुतमश्नाति पिशितम् |

विजानन्त्योऽप्येते वयमिह विषज्वालजटिलान्न मुञ्चामः कामानहह गहनो मोहमहिमा ||

अर्थ

टोळ आगडोंबामुळे होणाऱ्या तीव्र वेदनांच ज्ञान नसल्यामुळे ज्योतीवर झेप घेतो. गळ झाकून जाईल असं लावलेला मासाचा तुकडा [खाताना] माशाला सुद्धा कळत नसत. [आपलं मरण यामुळे येणारे] पण [आपल्याला बुद्धी आहे; सगळं समजत असत] तरी विष आणि आग याप्रमाणे त्रासदायक असणारे विषय आपण टाकून देत देत नाही, केवढा हा जटिल मोहाचा पगडा असतो पहा!

१२०९. लक्ष्मी: वसति जिह्वाग्रे जिह्वाग्रे मित्रबान्धवा: |

जिह्वाग्रे बन्धनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवम् ||

अर्थ

आपल्या जिभेच्या टोकावर [आपल्या वाक्चातुर्यावर] लक्ष्मी [संपत्तीची स्थिती] अवलंबून असते. नातेवाईक आणि मित्र [खरं आणि गोड] बोलण्यावर टिकवता येतात. अडकायला जीभेमुळेच होत आणि जिभेवर [ताबा न ठेवता खादाडत राहील तर] मृत्यू [त्यामुळे] येतो.

१२०८. स्तब्धस्य नश्यति यशो विषमस्य मैत्री नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्मः |

विद्याफलं व्यसनिनः कृपणस्य सौख्यं राज्यं प्रमत्तसचिवस्य नराधिपस्य ||

अर्थ

गर्विष्ठ माणसाला कीर्ति मिळत नाही. [कोणी त्याला चांगलं म्हणत नाही] त्रासदायक माणसाशी मैत्री टिकत नाही. आळशी माणसाच घर बसत. पैशाच्या पाठीमागे लागेल त्याच्या हातून धर्म घडत नाही. व्यसनी माणसाच्या शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही. चिक्कू माणसाला कधी सुख लागत नाही. मंत्री चुका करणारा असेल, त्या राजाच राज्य लयाला जात.

Friday, February 14, 2014

१२०७. अस्य दग्धोदरस्यार्थे किं न कुर्वन्ति पण्डिता: |

वानरीमिव वाग्देवीं नर्तयन्ति गृहे गृहे ||

अर्थ

विद्वान लोक [बिच्चारे] या जळल्या पोटासाठी काय काय करीत नाहीत? दारोदार सरस्वतीला माकडाप्रमाणे [शाब्दिक] कोलांट्या उड्या मारायला लावतात. [त्यांची प्रतिभा पोट भरण्यासाठी वापरतात.]

Tuesday, February 11, 2014

१२०६. विषस्य विषयाणां च दृश्यते महदन्तरम् |

उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||

अर्थ

विषय आणि विष [सारखेंच असं काहीना वाटत पण] त्यांच्यात फार फरक आहे. विष खाल्लं तरच मारत विषयांच्या मात्र स्मरणाने सुद्धा माणसाला मृत्यू येईल.

Monday, February 10, 2014

१२०५. व्रजत्यध: प्रयात्युच्चैर्नरः स्वैरेवचेष्टितैः |

अधः कूपस्य खनक ऊर्ध्वं प्रासादकारकः ||

अर्थ

स्वतःच्या कृत्यान्मुळेच माणसाची प्रगती किंवा अधोगती होते. [आपण त्याबद्दल दुसऱ्याला दोष देऊ नये, जसं] खणत राहील तो खालीखाली जातो, मोठ घर बांधत राहिलं तर [आपोआप] वरवरच चढेल.

१२०४. संसाररात्रिदु:स्वप्ने शून्ये देहमये भ्रमे |

आस्थां चेदनुबध्नामितन्मूर्खो नास्ति मत्परः ||

अर्थ

या संसाररात्रीच्या वाईट स्वप्नात; या शरीर रूपी खोट्या  भ्रमात अडकून जर मी [या जगातील सर्व गोष्टीत]  आसक्ति ठेवली तर माझ्या इतकं दुसरं कोणी मूर्ख नाही. [सर्व नश्वर गोष्टीत अडकलो तर माझ्या इतका मूर्ख मीच]

१२०३. वाक्चक्षु:श्रोत्रलयं लक्ष्मी: कुरुते नरस्य को दोषः |

गरलसहोदरजाता तच्चित्रं यन्न मारयति ||

अर्थ

[श्रीमंत माणसाना {देतो असं}] बोलताना वाणी: [ऐकताना] कान आणि नजर काम करत नाही यात त्याचा काय दोष? लक्ष्मी वाणी; कर्ण आणि डोळ्याना क्षीण करते. अहो साक्षात् हलाहालाची ती सख्खी बहीण आहे ती या इंद्रियाचा नाश करते [हे योग्यच आहे त्या माणसाना] ती मारून टाकत नाही हेच नवल!

Sunday, February 9, 2014

१२०२. पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका |

भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा ||

अर्थ = [खरं तर ] ही वसुंधरा [संपत्तीचा साठा असणारी पृथ्वी] तिचामध्ये भरपूर रत्ने [जातौ जातौ यत् उत्कृष्टं तत् रत्नम् इति कथ्यते - सर्व प्रकारातल्या सर्वात चांगल्या गोष्टी ही रत्नच आहेत] आहेत. पावलो पावली रत्न आहेत आणि दोन मैलावर अमृताच्या विहिरी [उत्कृष्ट संधी] आहेत पण दुर्दैवी लोकांना ते दिसतच नाही.

Friday, February 7, 2014

१२०१. अकृतोपद्रवः कश्चिन्महानपि न पूज्यते |

अर्चयन्ति नरा नागं न तार्क्ष्यं न गजादिकम् ||

अर्थ

अगदी थोर व्यक्ती असली तरी निरुपद्रवी असेल तर कोणी तिला मान देत नाही [त्याचा मान न राखल्याने काही नुकसान नाहीये मग कशाला चढवून ठेवा] गरुड [प्रत्यक्ष भगवान विष्णूच वाहन]; हत्ती वगैरेची लोक पूजा करत नाहीत; पण नागाची [नाहीतर चावेल अशा भीतिनी] पूजा करतात.

Wednesday, February 5, 2014

१२००. आहारे वडवानलश्च शयने यः कुम्भकर्णायते संदेशे बधिरः पलायनविधौ सिंहः श्रुगालो रणे |

अन्धो वस्तुनिरीक्षणेऽथ गमने खञ्जः पटुः क्रन्दने भाग्येनैव हि लभ्यते पुनरसौ सर्वोत्तमः सेवकः ||

अर्थ

नोकर म्हणजे जेवण्याच्या बाबतीत वडवानल [त्याच्या पोटात सतत भयंकर  आग पडलेली] झोपला  की कुंभकर्ण; निरोप सांगायला लागलं की बहिरा; [काम करायच्या वेळी] पळून जायला अगदी [वेगवान असा] सिंहच; [मालकाच्या वतिनी] भांडायला [भित्रट] कोल्हा; वस्तु शोधायच्या वेळी आंधळा; [कुठे] जायला [सांगितलं तर] लंगडा; रडण्यात निपुण आणि असा अतिसद्गुणी [?] नोकर मिळायला सुद्धा नशीब लागत हो!

Tuesday, February 4, 2014

११९९. सत्यं वक्तुमशेषमस्ति सुलभा वाणी मनोहारिणी दातुं दानवरं शरण्यमभयं स्वच्छं पितृभ्यो जलम् |

पूजार्थं परमेश्वरस्य विमलः स्वाध्याययज्ञः परं क्षुद्वयाधेःफलमूलमस्ति शमनं क्लेशात्मकैः किं धनैः ||

अर्थ

खरं बोलण्याला सोपी; चित्ताकर्षक अशी सम्पूर्ण भाषा [आपल्याला] अवगत आहे; आश्रयाला आलेल्याला; दानात अगदी श्रेष्ठ असं अभय आपण देऊ शकतो. पितरांना तर्पण स्वच्छ पाण्यानी करता येत. परमेश्वराची पूजा करायला पवित्र असा स्वाध्याय रूपी यज्ञ आहेच. भूक आणि आजारपण फळ आणि [औषधी] कंदांनी घालवता येत [या कशासाठी पैशांची जरुरीच नाहीये तर मग] अतिशय क्लेशदायक अशा संपत्तीच्या [वाटेला] कशाला जायचं?

Friday, January 31, 2014

११९८. जन्मैव व्यर्थतां नीतं भवभोगप्रलोभिना |

काचमूल्येन विक्रीतो हन्त चिन्तामणिर्मया ||

अर्थ

विषय भोगाच्या हावरटपणामुळे मी सगळं आयुष्य वाया घालवलं अरेरे! इच्छित वस्तु देणारा; चिंतामणीच मी काचेच्या किमतीला विकून की हो टाकला! [तत्वज्ञानाचा अभ्यास फक्त केला; ईशचिंतन केलं नाही ती आयुष्याची खरी किंमत होती.]

Wednesday, January 29, 2014

११९७. तस्करस्य कुतो धर्मो दुर्जनस्य कुत: क्षमा |

वेश्यानां च कुत: स्नेह: कुत: सत्यं च कामिनाम् ||

अर्थ

चोर कुठला  धर्म [पाळतो]? [कसलाच नाही] दुष्ट क्षमा कुठली करायला? वेश्या कुणाला जीव लावणार? [पैशाच्या पाकिटाकडे बघणार] [खरंच] विषयांध लोक खऱ्या खोट्याचा विचार करत नाहीत.

Monday, January 27, 2014

११९६. भूः पर्यङ्को निजभुजलतागेन्दुकः खं वितानं दीपश्चन्द्रो विरतिवनितालब्धयोगप्रमोदः |

दिक्कन्यानां व्यजनपवनैर्वीज्यमानोऽनुकूलैर्भिक्षुः शेते नृप इव सदा वीतरागो जितात्मा ||
 
अर्थ
 
[जितेंद्रिय यतीचे वर्णन] आसक्तीचा त्याग केलेला जितेंद्रिय भिक्षु - जमीन हाच पलंग; स्वतःचा हात हीच उशी; आकाश हे छत्र; चन्द्र हा दिवा; दिशा रूपी कन्या शीतल  वायुरूपी पंख्यानी वारा घालतायत; अशा वेळी  वैराग्य सुंदरीच्या सहवासाने मिळालेल्या परम सुखाने राजाप्रमाणे सुखात राहतो.

Thursday, January 23, 2014

११९५. साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः |

यत्तस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचोराः प्रगुणीभवन्ति ||

अर्थ

हे श्रेष्ठ अशा कवीनो; सारस्वत रूपी समुद्र घुसळून [तुमच्या प्रतिभेनी आणलेलं उत्कृष्ट] काव्य रूपी अमृत सांभाळून ठेवा कारण की ते [त्यातील सुंदर वेच] चोरण्यासाठी [अगदी] राक्षसांसारखेच चोर, कवडे टपलेले असतात. [उत्तम वाङ्गमयातील सुंदर उतारे ढापून स्वतःच्या नावावर ते चोरटे कवि  खपवतील, तुमचं सुंदर काव्य त्यांच्यापासून रक्षण करा.]

Wednesday, January 22, 2014

११९४. मारस्य मित्रमसि किं च सुधामयूख शम्भावपि प्रणयितां प्रकटीकरोषि |

विश्वासपात्रमसि यद्द्विषतोस्तयोरप्येतत्तव प्रकृतिशुद्धतनोश्चरित्रम् ||

अर्थ

हे अमृतांशु [ज्याच्या किरणातून अमृत पाझरत अशा] चंद्रा; मदनाचा तू मित्र आहेस तसंच भगवान शंकरावर सुद्धा तुझ प्रेम अगदी स्पष्ट दिसत. ते दोघेही  [एकमेकांचे] शत्रु असून सुद्धा [दोघांचाही] तुझ्यावर विश्वास आहे. हेच तुझ्या शुद्ध चारित्र्याचे कौतुक आहे. [चंद्रान्योक्ती ]

Monday, January 20, 2014

११९३. वयसि गते क: कामविकार: क्षीणे वित्ते क: परिवार: |

शुष्के तीरे क: कासार: ज्ञाते तत्त्वे क: संसार: ||

अर्थ

तारुण्य संपल्यावर काम चाळे करता येत नाहीत; श्रीमंती आटल्यावर लवाजमा नाहीसा होतो. पाणी आटलं तर तलावाचा काही उपयोग नाही; एकदा तत्वज्ञान झालं की संसाराची काही कटकट रहात नाही. [ज्ञात्याला त्यामुळे काही दुःख-गोंधळ-तणाव होत नाही.]

११९२. अल्पीयसामेव निवासभूमित्यागाद्विपत्तिर्महतां न जातु |

रत्नाकरान्सन्मणयोऽभियान्ति राज्ञां शिरः काकमुखानि भेकाः ||
 
अर्थ 
 
आपलं स्थान सोडल्यामुळे सामान्य लोकांवर संकट येत थोरांना कधी येत नाही. रत्नाकरातून [समुद्रातून] रत्ने दूर गेली तर राजांच्या डोक्यावर जाऊन बसतात. पण [तिथून बाहेर पडलेले] बेडूक मात्र कावळ्याच्या तोंडी पडतात.

Friday, January 17, 2014

११९१. तात त्वं निजकर्मणैव गमितः स्वर्गं यदि स्वस्ति ते ब्रूमस्त्वेकमिदं वधूहृतिकथां तातान्तिकं मा कृथाः |

रामोऽहं यदि तद्दिनैः कतिपयैर्व्रीडानमत्कन्धरः सार्धं बन्धुजनैः सुरेन्द्रविजयी वक्ता स्वयं रावणः ||

अर्थ

[जटायु आणि रावणाच्या युद्धानंतर जेंव्हा श्रीराम जटायूला भेटला तेंव्हा म्हणतो आहे; "अहो जटायु ताता; तुम्ही तर स्वतःच्या [पुण्याईने] स्वर्गात जाताय तुमचं कल्याण झालं आहेच, एक गोष्ट सांगायचीय सुनेच्या अपहरणाची बातमी [आमच्या] बाबांना [दशरथ महाराजांना] सांगू नका मी [पराक्रमी] राम आहे! इंद्रावर विजय मिळवणारा रावण सगळ्या लवाजम्यासह काही दिवसांनी येईल आणि शरमून लाजेनी मान खाली घालून तो स्वतःच [ही कथा] सांगेल.

Wednesday, January 15, 2014

११९०. व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती रोगाश्च शत्रव इव प्रहारन्ति देहम् |

आयुः परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम् ||

अर्थ

म्हातारपण वाघिणी सारखं भेडसावत असत; शरीरावर शत्रूसारखे रोग हल्ला करत असतात. फुटक्या मडक्यातून पाणी गळून जात त्यासारखं आयुष्य संपत चाललंय आणि इतक असूनही माणूस कुकृत्य कशी करतो हेच नवल आहे.

Tuesday, January 14, 2014

११८९. अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्तः फणी तं च क्रौञ्चपतेः शिखी च गिरिजासिंहोऽपि नागाननम् |

गौरी जह्नुसुतामसूयति कालानाथं कपालानलो निर्विण्णः स पपौ कुटुम्बकलहादीशोऽपि हलाहलम् ||

अर्थ

भूकेजलेला [भगवान शंकराच्या कंठावरील] सर्प गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला खायला बघतोय आणि कार्तिकस्वामीचा मोर त्या [सापालाच खावं म्हणून] धरतोय [तर इकडे] पार्वतीच [वाहन असलेला] सिंह गणपतीलाच पकडतोय, पार्वतीला गंगेचा द्वेष वाटतोय तर कवटीत पेटवून ठेवलेल्या अग्नीला चंद्राचा ! [ असल्या] कौटुंबिक झगड्याला वैतागून [खुद्द] परमेश्वराने सुद्धा हालाहल विष की हो प्यायलन्‌!

Monday, January 13, 2014

११८८. आपाण्डुरा शिरसिजास्त्रिवली कपोले दन्तावली विगलिता न च मे विषादः |

एणीदृशो युवतयः पथि मां विलोक्य तातेति भाषणपराः खलु वज्रपातः ||

अर्थ

[गम्मत अशी आहे की] केस सगळे पांढरे झालेत, गालावर [भरपूर] सुरकुत्या पडल्यात, दान्तांची ओळच पडून गेलीय. त्याच मला दुःख होत नाहीये [पण] रस्त्यात मला बघून हरिणाक्षी [सुंदऱ्या] "तात" [अहो बाबा] असं जेंव्हा म्हणतात तेंव्हा मात्र वज्र आदळल्यासारखं [दुःख] होत.

११८७. जीवेन तुलितं प्रेम सखि मूढेन वेधसा |

लघुर्जीवो ययौ कण्ठं गुरु प्रेम हृदि स्थितम् ||

अर्थ

अगं सखे; त्या मूर्ख ब्रह्मदेवाने प्राण आणि प्रेम यांची तुला केली, [एका पारड्यात जीव आणि माझं प्रेम दुसऱ्या पारड्यात] तर प्रेमाच्या मानाने हलका प्राण [विरहाने] कंठाशी आला. प्रेम मात्र वजनदार असल्यामुळे हृदयात आहेच.

Saturday, January 11, 2014

११८६. धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः |

धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ||

अर्थ

[उत्कृष्ट अशा] धर्माच स्वरूप या दहा गोष्टीत येत - दृढनिश्चय; क्षमा करण; मनावर ताबा; चोरी न करणं; शुद्धता; इंद्रीयावर ताबा; सदसद्विवेक; शिक्षण; सत्य आणि न रागावणं;

Thursday, January 9, 2014

११८५. स्वतःप्रमाणं परतःप्रमाणं कीराङ्गना यत्र गिरो गिरन्ति |

द्वारस्थनीडान्तरसंनिविष्टा जानीहि तत्पण्डितमण्डनौकः  ||

अर्थ

[शंकराचार्यांनी मंडन मिश्र या पंडिताच घर कुठाय असा प्रश्न नदीवरच्या स्त्रियांना विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर] ज्या घराच्या दरवाज्यात असलेल्या पिंजऱ्यातील पोपट [शब्दशः पोपटाच्या माद्या] स्वतः प्रमाण;  परत: प्रमाण [सांख्य दर्शनातील पारिभाषिक शब्द] असं बडबडत असतील ते पण्डित मंडन मिश्रांच घर आहे असं तुम्ही समजा. [त्या पंडिताकडे सतत असेच संवाद होत असल्यामुळे अनुकरणशील पोपट अर्थ न समजतासुद्धा ती भाषा बोलत होते.]

Wednesday, January 8, 2014

११८४. गाङ्गमम्बु सितमम्बु यामुनं कज्जलाभमुभयत्र मज्जतः |

राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न चापचीयते ||

अर्थ

हे राजहंसा; गंगानदीच पाणी धवल असत; यमुनेच मात्र काळसर असत, पण दोन्ही पाण्यात विहार करत असताना तुझ शुभ्रपणा तस्साच असतो, तो वाढतही नाही आणि कमी सुद्धा होत नाही. [राजहंसान्योक्ती - राजहंस = ज्ञानी मनुष्य; भोवतालची परिस्थिती.]

Monday, January 6, 2014

११८३. अर्थानर्थौ विनिश्चित्य व्यवसायं भजेत हि |

गुणतः सङ्ग्रहं कुर्याद्दोषतस्तु विसर्जयेत् ||

अर्थ

कुठलही काम करण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटे [उपयोग -त्रास] याबद्दल सखोल विचार करावा. ते करायचा विचार गुणांवर ठरवावा. दोष असतील तर मात्र [करायचा विचार] सोडून द्यावा.

११८२. सत्यस्य वचनं श्रेयः सत्यादपि हितं वदेत् |

यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम || नारदमुनी

अर्थ = खरं [बोलणं] कल्याणकारक असत. खऱ्यापेक्षा हिताचे [कल्याणकारक] बोलावे. माझ्या मते जे सर्व प्राणिमात्राना कल्याणकारक असेल तेच खरं.

Saturday, January 4, 2014

११८१. उत्पन्नपश्चात्तापस्य बुद्धिर्भवति यादृशी |

तादृशी यदि पूर्वं स्यात्कस्य न स्यान्महोदयः ||

अर्थ

[वाईट परिणाम भोगायला लागल्यावर त्या] माणसाच्या [मनात] पश्चात्ताप होऊन जसे विचार येतात तसा जर त्यांनी [चुका करण्याच्या] आधीच विचार केला तर कुणाचा बरे उत्कर्ष होणार नाही?