भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, April 25, 2013

९९३. शुभं वा यदि वा पापं यन्नृणां हृदि संस्थितम् |

सुगूढमपि तज्ज्ञेयं स्वप्नवाक्यात्तथा मदात् ||

अर्थ

चांगले असो की वाईट; शुभ किंवा अशुभ माणसाच्या अंतर्मनात खोलवर प्रयत्नपूर्वक दडवून ठेवलेले असते. ते झोपेतल्या बडबडीत तसेच दारु प्यायल्यावरच्या बरळण्यात जाणून घ्यावे. [तेंव्हा माणूस नक्की बोलतो.]

Wednesday, April 24, 2013

९९२. उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकवन्हिं जनकात्मजायाः |

आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम् ||

अर्थ

अगदी सहजपणे समुद्राचा [प्रचंड] जलाशय ओलांडून, जनककन्या सीतेच्या शोकरूपी अग्नि [पासून तिला मुक्त करून] तीच आग पकडून तिनेच ज्याने लंकादहन केले, त्या अंजनीच्या सुपुत्राला मी हात जोडून नमस्कार करतो.

Tuesday, April 23, 2013

९९१. गुणैः सर्वत्र तुल्योऽपि सीदत्येको निराश्रयः |

अनर्घ्यमपि माणिक्यं हेमाश्रयमपेक्षते ||

अर्थ

सर्व गुणांनी इतरांएवढाच तुल्यबळ असला, त्याला कुणाचा आधार नसेल, तर तो [मनुष्य] जगात असफल बनतो. माणिक हे रत्न बहुमोल असले तरी त्याला कोंदण म्हणून सोन्याची जरुरी असतेच.

Monday, April 22, 2013

९९०. प्रतिकूलतामुपगते हि विधौ विफलत्वमेति बहुसाधनता |

अवलम्बनाय दिनभर्तुरभून्न पतिष्यतः करसहस्रमपि ||

अर्थ

अपार साधने हाताशी असली तरीही दैव उलटले तर ती सर्व निष्फळ ठरतात. एकदा सूर्यास्ताची वेळ आली की हजारो हात [किरण] असूनही त्याला आधार द्यायला ते पुरे पडत नाहीत.

९८९. श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम् |

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ||

अर्थ

श्रुति [वेदात] वेगवेगळे सांगितलेलं असतं; स्मृती आणि ऋषि वेगळेच सांगतात. एकही भाष्यकार ऋषि असा नाही की ज्याच सर्वस्वी मान्य होईल. त्यामुळे धर्माच खरं तत्त्व [जसं काही] गुहेत दडून बसलंय. [त्यामुळे झालंय काय की ] मोठे लोक ज्या मार्गाने जातात तोच मार्ग [आपण] ठरवायचा झालं !

९८८. अन्नदानसमं नास्ति विद्यादानं ततोऽधिकम् |

अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं तु विद्यया ||

अर्थ

विद्यादान हे अन्नदानाएवढेच नाही तर त्याहूनही अधिक श्रेष्ठ आहे. अन्नाने थोडावेळा पुरतीच तृप्ति मिळते; विद्येने मात्र जन्मभराचे समाधान मिळते.

Friday, April 19, 2013

९८७. वन्दामहे महेशानचण्डकोदण्डखण्डनम् |

जानकीहृदयानन्दचन्दनं रघुनन्दनम् ||
अर्थ

भगवान शंकराच्या प्रचंड धनुष्याचे तुकडे करणाऱ्या; सीतेच्या मनाला चंदनाप्रमाणे [आल्हाददायक वाटणाऱ्या] रघुकुलावतंस श्रीरामचंद्राला [आम्ही] प्रणाम करतो.

Thursday, April 18, 2013

९८६. शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां वहन्ति वासनासरित् |

पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि ||

अर्थ

शुभ आणि अशुभ [चांगल्या आणि वाईट] दोन्ही मार्गानी वाहू शकणारी वासना रूपी नदी [माणसाने चांगले; मनापासून आणि न कंटाळता ] प्रयत्न करून केवळ शुभ मार्गाने वहात राहील अशी व्यवस्था केली पाहिजे.

Wednesday, April 17, 2013

९८५. परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌ |

इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||

अर्थ

ज्याच्या गुणांच वर्णन दुसरे करतात त्याच्यात [खरे एवढे] गुण नसले तरी तो गुणी समजला जातो. [तर अतिशय श्रेष्ठ अशा] इंद्राने स्वतःचे गुण स्वतःच गायले तर तो क्षुद्र ठरेल.

Tuesday, April 16, 2013

९८४. परवादे दशवदन: पररन्ध्रनिरीक्षणे सहस्राक्ष: |

सद्वृत्तवृत्तिहरणे बाहुसहस्रार्जुन: पिशुन: ||

दुसऱ्याशी भांडताना दुष्टाला दहा तोंडे असतात. [रावणासारखं दहापट बळ येते] दुसऱ्याच्या उणिवा बघायला त्याला हजार डोळे असतात. [सहस्राक्ष इंद्र - बरेच अश्वमेध यज्ञ केले तर त्यांचे घोडे पळवण्यासाठी बळ असायचं तसं] सुस्वभावी माणसाच उपजीविकेच साधन हरण करताना त्याला हजार हात येतात. [असंच सहस्रार्जुनाने हजार हाताच्या गर्वाने जमदग्नि ऋषींची गाय पळवली होती.]

Monday, April 15, 2013

९८३. न च विद्यासमो बन्धुर्न च व्याधिसमो रिपुः |

न चापत्यसमः स्नेही न च धर्मो दयापरः ||

अर्थ

विद्येसारखा श्रेष्ठ आप्त -नातेवाईक नाही. रोगासारखा दुसरा शत्रू नाही. मुलाबाळासारखं विशुद्ध मित्र कोणी नसतात आणि दये एवढा मोठा धर्म कुठलाच नाही.

९८२. न मोक्षो नभस: पृष्ठे न पाताले न भूतले |

मोक्षो हि चेतो विमलं सम्यग्ज्ञानविबोधितम् ||

अर्थ

मोक्ष हा कुठे आभाळात नाहीये; पाताळात नाही आणि पृथ्वीवर सुद्धा कुठे वसलेला नाही. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विशुद्ध आत्मज्ञानाने जागृत झालेले निर्मल मन.

९८१. आरोग्यं विद्वत्ता सज्जनमैत्री महाकुले जन्म |

स्वाधीनता च पुंसां महदैश्वर्यं विनाप्यर्थैः ||

अर्थ

[निर्दोष]  आरोग्य; विद्वत्ता; सज्जनांशी मैत्री असणं; मोठ्या खानदानी घराण्यात जन्म; स्वतंत्रता या गोष्टी म्हणजे माणसाला द्रव्याशिवाय मिळालेली अफाट श्रीमंतीच होय.

Saturday, April 13, 2013

९८०. आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थ: को न बहुधनको ; बहुश्रुतो वा |

आलस्यादियमवनि: ससागरान्ता सम्पूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च ||

अर्थ

आळस नावाचा अनर्थ जर जगात उरला नाही तर श्रीमंत किंवा विद्वान व्हायचा कोण बरे शिल्लक राहील? या जगात आळस [पुरून उरलाय] म्हणून ही संपूर्ण पृथ्वी - अगदी समुद्रापर्यन्त नरपशूनी- क्रूर माणसांनी आणि दरिद्री लोकांनी भरून गेलीय.

९७९. वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छतश्च विशेषतः |

प्रोक्तं श्रद्धाविहीनस्यारण्यरूदितोपमम् ||

अर्थ

ऐकणाऱ्याची श्रद्धा- विश्वास असेल तरच आणि विशेषतः विचारल्यावरच सांगावे. श्रद्धाहीन माणसाला कितीही चांगले सांगितले तरी ते निर्जन अरण्यात रडल्याप्रमाणे निष्फळ ठरते. [त्याचा बिलकूलच उपयोग होत नाही.]

Wednesday, April 10, 2013

९७८. सर्वौषधीनाममता प्रधाना सर्वेषु सौख्येष्वशनं प्रधानम् |

सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानं सर्वेषु गात्रेषु शिरः प्रधानम् ||

अर्थ

कुठल्याही औषधाची गरज न पडणे हेच श्रेष्ठ औषध असते. सर्व सुखात भोजनसौख्य श्रेष्ठ होय. सर्व ज्ञानेन्द्रियात डोळा महत्वाचा असतो. तर सर्व अवयवात मस्तक हे श्रेष्ठ असते

Tuesday, April 9, 2013

९७७. शरदि न वर्षति गर्जति वर्षासु निस्वनो मेघ: |

नीचो वदति न कुरुते वदति न सुजन: करोत्येव ||

अर्थ

शरद ऋतूत आकाशात ढग येतात; प्रचंड गडगडाट करतात पण पाऊस मात्र पडत नाही. तर वर्षा ऋतूत येणारे मेघ कदाचित गर्जना करणार नाहीत, पण वर्षाव मात्र भरपूर करतात. त्याचप्रमाणे दुर्जन बोलतात पण तसे वागत नाहीत. [नुसत्याच थापा आणि भरघोस आश्वासने देतात] या उलट सज्जन कमी बोलतात किंवा बोलत नाहीत पण कृती नक्की करतात.

Monday, April 8, 2013

९७६. सप्तैतानि न पूर्यन्ते पूर्यमाणान्यनेकशः |

ब्रह्मणोऽग्निर्यमो राजा पयोधिरुदरं गृहम् ||

अर्थ

कितीही भरती केली तरी ब्राह्मण [पुरोहित - फार थोडे भटजी समाधानी दिसतात]; अग्नि; यम; राजा; समुद्र; पोट आणि घर कधीच भरत नाहीत. [या सात गोष्टींचे समाधान कधी होत नाही.]

९७५. अविचारयतो युक्तिकथनं तुषखण्डनम् |

निचेषूपकृतं राजन् वालुकाष्विव मूत्रितम् ||

अर्थ

हे राजा; अविचारी माणसाला तर्कशुदध विचार सांगणे, भूस कांडत बसणे आणि हलकट माणसावर उपकार करणे म्हणजे वाळूत लघुशंका करणे. [अगदी वाया]

९७४. व्याघ्रे च महदालस्यं सर्पे चैव महद्भयम् |

पिशुने चैव दारिद्र्यं  तेन तिष्ठन्ति जन्तवः ||

अर्थ

वाघ हा अत्यंत आळशी असतो; साप फार भित्रा असतो आणि [बरेचदा] दुष्ट लोक दरिद्री असतात, त्यामुळे पृथ्वीवरील बरेच जीव जगू शकतात.

Friday, April 5, 2013

९७३. सुभाषितमयैर्द्रव्यैः सङ्ग्रहं न करोति यः |

प्रस्तावयज्ञे सम्प्राप्ते कां प्रदास्यति दक्षिणाम् ||

अर्थ

ज्या माणसाकडे सुभाषित रूपी संपत्तीचा साठा नसेल तो मनुष्य गप्पाष्टक रूपी यज्ञ सुरु झाल्यावर दक्षिणा काय देईल? [ गप्पा झोडायला सुरवात झाल्यावर सुभाषितांच्या चटपटीत पेरणीने गप्पांना एकदम रंग चढतो. यज्ञात जशी दक्षिणा तशी गप्पात सुभाषित.]

Tuesday, April 2, 2013

९७२. उपायेन यथा व्यालो गजः सिंहोऽपि साध्यते |

भूमिष्ठाः स्वर्गमायान्ति वज्रं भिन्दत्युपायतः ||

अर्थ

जसं काहीतरी युक्तीनी साप, हत्ती आणि सिंहसुद्धा ताब्यात आणता येतात, तसंच अगदी जमिनीवर राहणारे स्वर्गात [अत्यंत सुखात] राहू शकतात आणि काहीतरी उपायाने वज्र [अत्यंत कठीण वस्तु] सुद्धा फोडता येते. [प्रयत्नांती परमेश्वर ]

Monday, April 1, 2013

९७१. कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति |

अस्पृशन्नेव वित्तानि य: परेभ्यः प्रयच्छति ||

अर्थ

कंजूष माणसासारखा उदार पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधीही होणार नाही. [उदार माणूस स्वतः उपभोग घेईल; आणि निदान द्यायच्या वस्तूंना हात लावून ते देऊन टाकेल कंजूष मात्र] हात सुद्धा न लावता भरपूर संपत्ती दुसऱ्याला [निदान वारसाला किंवा; चोराला ; किंवा कर रूपाने राजाला] देऊन टाकतो.

९७०. उदीरितोऽर्थः पशुनापि गृह्यते हयाश्च नागाश्च वहन्ति चोदिताः |

अनूक्तमप्यूहति पण्डितो जनः परेङ्गितज्ञानफला हि बुद्धयः ||

अर्थ

सांगितल्यावर काय पशूना सुद्धा समजत. [अंकुश] टोचल्यावर घोडे काय हत्ती काय [ओझ] वाहतातच. पण हुशार मनुष्य न सांगता सुद्धा तर्कानी दुसऱ्याच्या मनातली गोष्ट ओळखतो. [पशू आणि माणूस यातला फरक म्हणजे] तीक्ष्ण बुद्धीने दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येत.

९६९. उत्साहसम्पन्नमदीर्घसूत्रं क्रियाविधिज्ञं व्यसनेष्वसक्तम् |

शूरं कृतज्ञं दृढसौहृदं च लक्ष्मीः स्वयं याति निवासहेतोः ||

अर्थ

अतिशय उत्साही असणाऱ्या; चेंगटपणा न करणाऱ्या; नियम कृती यांची माहिती असणाऱ्या; व्यसन नसणाऱ्या; शूर; कृतज्ञ; मैत्री सांभाळणाऱ्या अशा [माणसाकडे] लक्ष्मी [संपत्ती] स्वतः [कायम] राहण्यासाठी येते.