भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 17, 2013

१०१४. माता गुरुतरा भूमेः खात्पितोच्चतरस्तथा |

मनः शीघ्रतरं वाताच्चिन्ता बहुतरी तृणात् ||

अर्थ

आई ही पृथ्वीहून थोर असते. वडील हे योग्यतेने आकाशाहून थोर -विशाल असतात. मन वाऱ्या पेक्षाही चंचल असते. तर चिन्ता ही गवताहूनही उदंड वाढत राहते.

Thursday, May 16, 2013

१०१३. असहायः पुमानेकः कार्यान्तं नाधिगच्छति |

तुषेणापि परित्यक्ता न प्ररोहन्ति तण्डुलाः ||

अर्थ

कुणी मदतनीस नसेल तर एकटा माणूस काम तडीस नेऊ शकत नाही. भातावर जर तुसकट नसेल ते उगवत नाही. [तुसकट हे जरी क्षुल्लक असलं तरी भात रुजण्यासाठी त्याची जरुरी असते. अगदी एकटा काही करू शकत नाही.]

Wednesday, May 15, 2013

१०१२. हर्तुर्याति न गोचरं ;किमपि शं पुष्णाति यत्सर्वदा ह्यर्थिभ्यः प्रतिपाद्यमानमनिशं प्राप्नोति वृद्धिं पराम्|

कल्पान्तेष्वपि न प्रयाति निधनं विद्याख्यमन्तर्धनं येषां तान्प्रति मानमुज्झत नृपाः कस्तैः सह स्पर्धते ||

अर्थ

विद्या नावाचे गुप्त धन  - चोरांना कुठे, किती आहे ते दिसतच नाही. ते [विद्याधन] नेहमी अतिशय हित करतच असते. [विद्या] मागणाऱ्याला सतत देत राहीलं, तरी ते कमी न होता उदंड वाढतच राहते. कल्पांती सुद्धा ह्याचा नाश होत नाही. राजे लोकांनो, असं हे धन ज्यांच्याकडे असते, त्यांच्याशी वागताना उर्मटपणा करू नका. अरे त्यांच्याशी कोण स्पर्धा करू शकेल?

१०११. भूमौ स्खलितपादानां भूमिरेवावलम्बनम् |

त्वयि जातापराधानां त्वमेव शरणं मम ||

अर्थ

जमिनीला अडखळून ठेचकाळून एखादा जर पडला तरी तो भूमीचाच आधार घेतो. मग हे दयाघना परमेश्वरा; तुझ्या बाबतीत मी अपराधी असलो तरी तुलाच शरण येणार. दुसरं कोण मला सांभाळणार?

Monday, May 13, 2013

१०१०. तृणं ब्रह्मविदः स्वर्गस्तृणं शूरस्य जीवितम् |

जिताक्षस्य तृणं नारी; निस्पृहस्य तृणं जगत् ||

अर्थ

ब्रह्मज्ञानी माणसाला स्वर्गसुख कस्पटासमान वाटते. पराक्रमी माणसाला आयुष्य गवताच्या काडीप्रमाणे [बिनमहत्वाचे ] वाटते. ज्याने दृष्टीवर विजय मिळवलेला आहे, त्याला स्त्री [च्या सौंदर्याचे] बिलकुल महत्व नसते. निरिच्छ माणसाला अवघे जग तुच्छ वाटते.

१००९. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जन: श्मशाने |

देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक: ||

अर्थ

[आयुष्यभर मिळवलेल सारं धन आपण मेल्यावर सोबत घेऊन जाता येत नाही] ते जिथे ठेवलं आहे तिथेच - जमिनीवर - रहात प्राणी गोठ्यात राहतात. बायको दारापाशीच थांबते. नातेवाईक स्मशानापर्यंत येतात. आपलं शरीर [स्वतःच सुद्धा] चितेवर जळून जात [ते सुद्धा पुढे येत नाही] आणि आपली भलीबुरी कर्म घेऊन जीवाला एकट्यालाच परलोकी  जावे लागते.

१००८. मुख्यमेकं पुरस्कृत्य शून्यात्मानोऽपि साधकाः |

भवन्ति; तं विना नैव; यथा संख्याङ्कबिन्दवः ||

अर्थ

मुख्य [कर्तृत्ववान माणसाला] पुढे केल्यावर मागून जाणारे शून्य किमतीचे असले तरी [त्यांच काम] साधून जात. तो मुख्य नसेल तर मात्र त्यांची किंमत शून्यच राहते. जशी आकड्याच्या संख्येवरची शून्ये. त्या आकड्याचे मोल पुढच्या शून्यांमुळे दसपट, शतपट, हजारपट होते आणि तो आकडा असल्याशिवाय त्या शून्याना पण किंमत नसते.