भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, September 28, 2011

४६२. भक्ष्योत्तमप्रतिछन्नं मत्स्यो बडिशमायसम् |

लोभाभिपाती ग्रासते नानुबन्धमवेक्षते ||

अर्थ

हावरटपणाने मासा उत्तम प्रकारच्या खाद्याने चांगल्या प्रकारे झाकलेला लोखंडाचा गळ पकडतो; परिणामाचा विचार करत नाही [ त्या हावरटपणाचा परिणाम म्हणून त्याला प्राण गमवावे लागतात म्हणून कोणतही काम करण्या आधी परिणामाचा विचार करावा.]

४६१. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मन: |

किन्नु मे पशुभिस्तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति ||

अर्थ

मी आचरण करतो त्यापैकी काय जनावराच्या सारखं आहे आणि काय सज्जनासारखे आहे असं माणसांनी रोज आत्मपरिक्षण केले पाहिजे. [म्हणजे योग्य ती सुधारणा करता येईल ]

४६०. भोजनान्तेऽमृतं तक्रं स्वापादौ दुग्धममृतम् |

निशान्ते चामृतं वारि सर्वदैवामृतं मधु ||

अर्थ

जेवणाच्या शेवटी ताक पिणं हे अमृतासारखं [तब्बेतीला चांगलं] असतं. झोपण्यापूर्वी दूध पीण चांगले. रात्र संपल्यावर [पहाटे] पाणी पीण अमृतासारखं असतं आणि मध नेहमीच [तब्बेतीला चांगला असतो.]

४५९. भद्र सूकर; गच्छ त्वं ; ब्रूहि सिंहो मया जित: |

पण्डिता एव जानन्ति सिंहसूकरयोर्बलम् ||

अर्थ

हे भल्या डुकरा; तू [खुशाल] जा [आणि सगळ्या जगाला] सांग की मी सिंहाला जिंकलं आहे. सिंह आणि डुक्कर या दोघांचे सामर्थ्य विद्वानांना [नक्कीच] ठाऊक असते. [अन्योक्ती अलंकाराचे हे सुंदर उदाहरण आहे जेंव्हा एखाद्याची स्तुती किंवा निंदा करायची असेल तेंव्हा सरळ त्याच्या बद्दल न बोलता दुसऱ्याशीच बोलून त्या भावना व्यक्त केलेल्या असतात तेंव्हा अन्योक्ती हा अलंकार होतो.]

४५८. अनुबन्धमवेक्षेत सर्वकार्येषु सर्वदा |

संप्रधार्य च कुर्वीत; सहसा न समाचरेत् ||

अर्थ

नेहमी सगळ्याच कामांच्या बाबतीत परिणामांचा नीट विचार करून मगच कुठलही काम करावं. अचानक [काही विचार न करता] करू नये.

४५७. या लोभात् या परद्रोहात् य: पात्रे य: परार्थके |

प्रीति: लक्ष्मी: व्यय: क्लेश: सा किं सा किं स किं स किम् ||

अर्थ

जे प्रेम लोभातून केलेलं असतं त्याचा काय बरं उपयोग? दुसऱ्याचा द्वेष करून मिळवलेल्या संपत्तीचा काय बर उपयोग? जो खर्च योग्य ठिकाणी [लायक व्यक्ती साठी] केला असेल त्याचं [दु:ख ] करण्याचं काही कारण नाही. दुसऱ्यासाठी त्रास करून घेतला तर त्याचा काय बरं उपयोग? [यथासांख्य अलंकाराच हे सुंदर उदाहरण आहे.]

Thursday, September 22, 2011

४५६. शुभं वाप्यशुभं वा स्यात्‌ ; द्वेष्यं वा यदि वा प्रियम् |

अपृष्टोऽपि वदेत्सत्यं यस्य नेच्छेत् पराजयम् ||महाभारत ; विदुरनीति

अर्थ

ज्याचा पराभव [तोटा; अपमान ] होऊ नये अशी आपली इच्छा असेल; त्याने विचारले नाही तरी; आपण सांगत असलेली गोष्ट जरी [तुझं] चांगले होईल किंवा वाईट होईल असं सांगाव लागत असलं तरी; [त्याला] आवडत असेल किंवा राग येत असेल तरी सुद्धा खरं असेल तसच सांगून टाकावे.