भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, February 8, 2011

२९४. अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठतः |

स्वकार्यमुद्धरेत् प्राज्ञः कार्यध्वंसो हि मूर्खता ||

अर्थ

अपमान स्वीकारून, गर्व बाजूला ठेऊन शहाण्या माणसाने आपल काम तडीस न्याव [मान अपमानाचा विचार करून] कामाचा नाश करणं हा मूर्खपणा आहे.

२९३. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |

इति विमृशन्तः सन्तः सन्तप्यन्ते न ते विपदा ||

अर्थ

वृक्ष तोडला तरीसुद्धा तो पुन्हा वाढतो आणि चन्द्र क्षीण झाला तरीदेखील तो पुन्हा हळूहळू मोठा होतो असा विचार करून सज्जन संकटाने कधीही खचून जात नाहीत.

२९२. वासः प्रधानं खलु योग्यतायाः वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः |

पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ||

अर्थ

खरोखर योग्यता समजण्याच्या बाबतीत पोशाख महत्वाचे [काम] करतो. कपडे [चांगले नसतील त्याचा लक्ष्मी देखील त्याग करते [विष्णूचा] पितांबर [झुळझुळीत वस्त्र] पाहून सागराने त्याला स्वतःची मुलगी दिली तर दिगंबर अशा [दिशा हेच वस्त्र असणाऱ्या शंकराला] पाहून त्याने विष दिले.

२९१. यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता साऽप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः |

अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ||

राजा भर्तृहरि

अर्थ

[अशी आख्यायिका आहे की त्या राजाच्या दरबारात एक यती आला आणि त्यानी राजाला एक अप्रतीम फळ दिलं. हे खाऊन तु अमर होशील असं सांगितलं. राजाला पत्नी फार प्रिय असल्यामुळे त्याने ते राणीला दिलं. तिनी ते ठेवून दिलं आणि नंतर प्रधानाला दिलं. प्रधानाने त्याच्या आवडत्या दासीला दिलं आणि तिनी पुन्हा ते लपवून परत राजालाच दिलं. त्यामुळे राजा एकदम विरक्त झाला]

मी जिचा नित्य विचार करतो ती माझ्याबाबत उदास आहे, तिला दुसऱ्याच माणसाची आवड आहे तो तिसरीवरच प्रेम करतो आणि आमच्यासाठी सुद्धा वेगळीच स्त्री झुरते आहे. तिचा [राणीचा], त्याचा [प्रधानाचा, असा बेबनाव करणाऱ्या] मदनाचा, हिचा [दासीचा] आणि माझा सुद्धा धिक्कार असो.

२९०. यदा किञ्चिज्ज्ञोऽहं द्विप इव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः |

यदा किञ्चित्किञ्चिद् बुधजनसकाशादवगतं तदा मुर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः ||

राजा भर्तृहरि नीतिशतक

अर्थ

जेंव्हा मी अगदी थोडस शिकलो तेंव्हा मी अगदी सर्वज्ञ आहे असा मला गर्व झाला. मी हत्तीप्रमाणे मदांध झालो. [नंतर] जेंव्हा मी, थोडा थोडा ज्ञानी लोकांच्या सहवासात आलो, तेंव्हा मला समजलं [की खरं तर] मी मूर्खच आहे. [आणि] ताप ज्याप्रमाणे उतरतो त्याप्रमाणे माझा माज निघून गेला.

Thursday, February 3, 2011

२८९. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान्पूरयितुं समर्थः |

अन्यैर्नृपैर्यद् परिदीयमानं शाकाय वा स्याल्लवणाय वा स्यात् ||

पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

[आमचं] ईप्सित पूर्ण करण्यास एक तर दिल्लीचे राजे [शहाजहान] किंवा जगाचा स्वामी समर्थ आहे दुसऱ्या राजांनी जरी सर्वतोपरी दिलं तरी ते [फक्त] मिठापुरतं किंवा [फार तर फार] भाजी पुरतं होईल.

Tuesday, February 1, 2011

२८८. मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः |

बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्‌ ||

अर्थ

[आपले] मन हेच मुक्ती आणि बन्धन याला कारणीभूत असते. ते विषयात गुंतलेले असते त्यामुळे ते अडकते आणि जर ते आसक्त नसेल तर ते मुक्तच आहे असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.