भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, September 27, 2017

१३९४. सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् |

चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ||

विवेकचूडामणि, २४.

अनायास जे सर्व दुख: आपल्याला प्राप्त होतं, त्याचा प्रतिकार न करता किंवा त्याचा शोक न करता, शान्तचित्ताने त्याला सामोरे जाणे म्हणजेच तितिक्षा.

Thursday, November 3, 2016

१३९३. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च|

पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् II

शत्रू , रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना , रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे.

Monday, March 16, 2015

१३९२. भिक्षाशनं भवनमायतनैकदेशः शय्या भुवः परिजनो निजदेहभारः |

वासश्च जीर्णपटखण्डनिबद्धकन्था हा हा तथापि विषयान्न जहाति चेतः ||

अर्थ

जेवण भिक्षा मागून; घर म्हणजे बसलोय तेवढी जागा; अंथरूण जमीन; आपलं स्वतःच शरीर हाच नोकरवर्ग; जुन्या फाटक्या चिंध्यांची गोधडी एवढेच कपडे [थोडक्यात जवळ काही सुद्धा नाही] तरीही; अरेरे!  मन विषयांचा त्याग करत नाही. [ विषयांमध्ये घोटाळतय!]

Thursday, March 12, 2015

१३९१. तृष्णां चेह परित्यज्य को दरिद्रः क ईश्वरः |

तस्याश्चेत्प्रसरो दत्तो दास्यं च शिरसि स्थितम् ||

अर्थ

[माणसांनी] जर हाव सोडून दिली तर मग कोण गरीब आणि कोण श्रीमंत? [आहे त्यात समाधान राखलं तर सगळेच सारखे होतील] पण तृष्णेला जर शिरकाव करू दिला तर गुलामी ठरलेलीच. [आपल्याला हे हवं ते हवं म्हणजे कष्ट; लाचारी सगळ आलं]

Monday, March 9, 2015

१३९०. श्रुत्वा षडाननजनुरर्मुदितान्तरेण पञ्चाननेन सहसा चतुराननाय |

शार्दूलचर्म भुजगाभरणं सभस्म दत्तं निशम्य गिरिजाहसितं पुनातु ||

अर्थ

षडानन [सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाच्य] जन्माची [खबर मिळाल्याच्या] आनंदात पंचाननाने [पाच मुखे असणाऱ्या भगवान शंकराने] चटकन चतुराननाला [चार मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला; आपल्या जवळ असणारी संपत्ती [?] वाघाच चर्म; सापांची कडी आणि भस्म दिलं हे ऐकून पार्वतीला जे हसू फुटलं ते [आपल्या सर्वांच] रक्षण करो.

Sunday, March 8, 2015

१३८९. विषस्य विषयाणां हि दृश्यते महदन्तरम् |

उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||

अर्थ

विषय [हे विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर] आणि विष यात फार फरक आहे. विष खाल्लं तर [ते खाणाराला] मारून टाकत पण विषय मनात नुसते घोळवून [दुष्परिणाम होतो आणि] मरण ओढवत. [म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की नाही?]

Monday, February 23, 2015

१३८८. चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः |

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ||

अर्थ

[जरी पर्वत वादळामुळे हलत नसले तरी] प्रलय काळातील झंझावातामुळे ते [सुद्धा] डळमळले तर खुशाल घसरू देत पण धैर्यवान; बुद्धिमान लोकांची स्थिर बुद्धी कुठल्याहि संकटात विचलित होत नाही.