भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, September 21, 2010

२७२. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |

रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति ||

कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

अर्थ

हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे [न थांबता, सतत ] समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक [दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच] विचार येवो

Monday, September 13, 2010

२७१. विपदः सन्तु नः शश्वत्तत्र तत्र जगद्गुरो |

भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् || कुन्ती भागवत १स्कन्ध ८ अध्याय.

अर्थ

हे या जगात श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णा, आम्हाला सतत संकटे येवोत [कि ज्यामुळे तुझे स्मरण होईल व त्यामुळे ] जन्ममृत्यूचा फेरा संपवणारे तुझे दर्शन होईल.

Thursday, September 9, 2010

२७०. असारे खलु संसारे सारं श्वशुरमन्दिरम् |

हरो हिमालये शेते हरिः शेते महोदधौ ||

अर्थ

या मिथ्या वैतागवाण्या जगात चांगली गोष्ट म्हणजे [फक्त] सासुरवाडी. [म्हणूनच कि काय] भगवान शंकर हिमालयात राहतात तर श्रीविष्णु महासागरात.

२६९. भाग्यवान् जायतां पुत्रः मा शूरो मा च पण्डितः |

शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः ||

कुन्ती महाभारत

अर्थ

मुलगा नशीबवान असावा शूर किंवा विद्वान् असण्याची [जरूर] नाही [कारण] शूर आणि ज्ञानी [असूनही] माझे पुत्र युद्धात कुजून जात आहेत.

Tuesday, September 7, 2010

२६८. सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या |

नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा || नीतिशतक

अर्थ

[कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.

Monday, September 6, 2010

२६७. सामैव हि प्रयोक्तव्यमादौ कार्यं विजानता |

सामसिद्धानि कार्याणि विक्रियां यान्ति न क्वचित् ||

अर्थ

काम [चांगले कसे करावे हे] जाणणाऱ्याने पहिल्यांदा गोड बोलून समजावून सांगावे. अशाप्रकारे सामाचा उपयोग करून पूर्ण केलेली कामे कधीही बिघडत नाहीत.

२६६. नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदम्बराय गुञ्जावतंसपरिपिच्छलसन्मुखाय |

वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपाङ्गजाय || भागवत

अर्थ

हे परमेश्वरा, घनश्यामा, ज्याचे मस्तक गुंजानी सुशोभित केले आहे. अशा, वस्त्रे तेजस्वी असणाऱ्या, स्निग्ध आणि सुंदर मुख असणाऱ्या, वनमाला धारण करणाऱ्या, बासरी, शिंग, वेत एका हाती घास यामुळे सुंदर दिसणाऱ्या, कोमल चरण असणाऱ्या गोपराजाच्या मुलाला [श्रीकृष्णाला, देवा तुला] मी वन्दन करतो.

२६५. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे |

तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः || भागवत मङगल १ . १

अर्थ

विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय वगैरेना कारणीभूत असणाऱ्या, सत्, चित् आणि आनंद हेच स्वरूप असणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाची आम्ही अध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक तापनिवारणासाठी स्तुती करतो.

Thursday, September 2, 2010

२६४. पिकस्तावत्कृष्णः परमरुणया पश्यति दृशा परापत्यद्वेषी स्वसुतमपि नो पालयति यः|

तथाप्येषोऽमीषां सकलजगतां वल्लभतमो न दोषा गण्यन्ते खलु मधुरवाचां क्वचिदपि ||

अर्थ

खरोखर कोकीळ हा [अन्तर्बाह्य] काळाकुट्ट आहे, तो तांबड्या लाल डोळ्यांनी [रागानेच] बघतो. दुसऱ्यांच्या पिल्लांचा द्वेष तर करतोच, पण स्वतःच्या पिलांचा देखील सांभाळ करीत नाही. तरीसुद्धा तो सर्व जगाचा अत्यंत आवडता असतो.  मधाळ बोलणाऱ्यांच्या दोषांचा कधीही विचार केला जात नाही. [साखरपेर्‍या भाषेमुळे लोक फसतात आणि त्यांची गैरकृत्य लपतात.]

२६३. स्वायत्तमेकान्तगुणं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञतायाः |

विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपण्डितानाम् ||

अर्थ

मौन म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले, स्वतःच्या ताब्यात असलेले, फक्त गुणच असलेले [काहीच दोष नसलेले] विशेषतः ज्ञानी लोकांच्या सभेमध्ये अलंकाराप्रमाणे वाटेल असे, मुर्खपणा [लपवता येईल असे] झाकण आहे.

Wednesday, September 1, 2010

२६२. अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक्रमः |

अन्यस्य दशति श्रोत्रमन्यः प्राणैर्वियुज्यते ||

अर्थ

दुष्ट मनुष्य रूपी सापाची मारण्याची रीत केवढी विचित्र आहे! तो [वेगळ्याच] एकाच्या कानात [चाहाडीचे विष घालून] चावतो, [आणि ज्याच्याबद्दल चाहाडी केली असेल तो] दुसराच प्राणांना मुकतो.

२६१. पुंसामसमर्थानामुपद्रवायात्मनो भवेत्कोपः |

पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् ||

अर्थ

दुबळ्या माणसांचा संताप हा त्यांना स्वतःलाच त्रासदायक होतो. [जसे] अतिशय तापलेले पातेले त्याच्या जवळ असणार्‍यांनाच होरपळून टाकते.