भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, October 31, 2012

८३०. स्वयं स्वंधर्मं चरता शुभं यद्यद्वाशुभं प्राप्यत एव किञ्चित् |

स्वस्थेन चित्तेन तदेव सर्वमनन्यगत्या मनुजेन भोग्यम् ||

अर्थ

आपण आपली कर्तव्य करत असतानाही काही थोड वाईट किंवा चांगल [फळ] आपल्या वाट्याला येतच. ते माणसाने स्थिर अशा अन्त:करणाने भोगले [किंवा उपभोगले] पाहिजे [कारण] त्याला दुसरा पर्याय नसतो. [हे फार मोठ तत्वज्ञान आहे आणि ते यथाशक्ती आचरणात आणावं.]

Tuesday, October 30, 2012

८२९. आनन्दं द्विगुणीकुर्वञ् शोकं संविभजंश्च न: |

वृद्धिं सुखस्य दु:खस्य क्षयं च तनुते सुहृद् ||

अर्थ

चांगला मित्र हा आपला आनंद दुप्पट करतो आणि दु;ख वाटून घेतो [त्यामुळे] आपल्या सुखात वाढ होते आणि दु;ख [खूप] कमी होतात.

Monday, October 29, 2012

८२८. श्रद्धधान: शुभां विद्यामाददीतावरादपि |

अमित्रादपि सद्व्रृत्तं बालादपि सुभाषितम् ||

अर्थ

[चांगला] विश्वास ठेवणाऱ्याने कल्याणकारक विद्या आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या माणसाकडून सुद्धा शिकावी. [आपण थोर असून असल्या हलक्या माणसाकडून काय शिकायच? असा अहंगंड बाळगू नये.] तसंच शत्रु असला तरी चांगली सवय त्याच्याकडून सुद्धा शिकावी. चांगले भाषण [योग्य सूचना] असेल तर लहान मुलाकडून आली तरी स्वीकारावी.

८२७. सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम् |

प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्म: सनातन: ||

अर्थ

पूर्वापार चालत आलेला असा धर्म आहे की, सत्य असलेलं खरं बोलावं, कडू लागेल असं खरं सांगू नये. पण आवडावं म्हणून खोटच गोडगोड बोलू नये. [शक्यतो प्रेमळ शब्दात चांगल्या रीतीने खरी गोष्ट समजावून सांगावी.]

Friday, October 26, 2012

८२६. आदौ चित्ते तत: काये सतां सम्पद्यते जरा |

असतां तु पुन: काये नैव चित्ते कदाचन  ||

अर्थ

सज्जनांच्या मनात आधी जरा म्हातारपणी यायला पाहिजे असं वैराग्य] येते आणि नंतर त्यांच्या शरीरावर वृद्धत्व दिसू लागते. [विचारी लोकांना तरुणपणीच वैराग्य येते] दुष्टांच्या मात्र शरीरालाच म्हातारपण येत, मनात वैराग्य कधीच येत नाही.

Thursday, October 25, 2012

८२५. तीक्ष्णधारेण खड्गेन वरं जिह्वा द्विधा कृता |

न तु मानं परित्यज्य यच्छ यच्छेति भाषितम्  ||

अर्थ

[स्वाभिमानी माणूस म्हणतो] लाचारीने 'दे रे, दे ना रे बाबा ' असं म्हणण्यापेक्षा  धारदार तलवारीने  जिभेचे दोन तुकडे केलेले परवडले.

८२४. अवज्ञात्रुटितं प्रेम नवीकर्तुं क ईश्वर: |

सन्धिं न याति स्फुटितं लाक्षालेपेन मौक्तिकम् ||

अर्थ

अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा निर्माण करण्यास कोण बरे समर्थ आहे? [एखाद्याचा अपमान केल्यावर पुन्हा त्याला प्रेम वाटणं फार कठिण आहे.] जसं फुटलेला मोती लाखेचा लेप लावून पुन्हा सांधता येत नाही.

Tuesday, October 23, 2012

८२३. निर्माय खलजिह्वाग्रं सर्वंप्राणहरं नृणाम् |

चकार किं वृथा शस्त्र-विष-वह्नीन्प्रजापति: ||

अर्थ

माणसाचा सगळा प्राण [नक्की] घेईल असं दुर्जनाच्या जिभेच टोक [एकदा] निर्माण केल्यावर ब्रह्मदेवाने प्राणघातक शस्त्रे, विष, अग्नि ह्या वस्तू उगाचच का बरे बनवल्या? [दुष्टांचे बोलणे हे शस्त्रे, विष किंवा आग यांपेक्षा घातक असते अस कवीला म्हणायचे आहे.]

Monday, October 22, 2012

८२२. उत्तमा आत्मना ख्याता: पितु: ख्याताश्च मध्यमा: |

अधमा मातुलात् ख्याता:  श्वशुराच्चाधमाधमा: ||

अर्थ

ज्यांची प्रसिद्धी स्वतः मुळेच होते ते थोर असतात. सामान्य लोक हे त्यांच्या वडिलांच्या [घराण्या] मुळे ठाऊक असतात. मामाच्या प्रसिद्धी मुळे प्रसिद्धी मिळते ते अतिसामान्य [त्यांना फारस कर्तृत्व नसत] सासऱ्यामुळे प्रसिद्ध असणारे अगदीच क्षुद्र असता.

[हा श्लोक हजारएक वर्षांपूर्वी रचला गेला असेल, त्यामुळे त्यातील काही मत हि त्याकाळातील सामाजिक परिस्थिती मुळे होती.]

Saturday, October 20, 2012

८२१. नेदं नभोमण्डलमम्बुराशिर्न ताश्च तारा नवफेनभङ्गा: |

नायं शशी कुण्डलित: फणीन्द्रो नासौ कलङ्क: शयितो मुरारि: ||

अर्थ

[कवी आकाश हे तसं नसून समुद्रच आहे असं वर्णन करतोय] हे विशाल आकाश नाहीये हो! हा तर महासागर आहे. त्या चांदण्या नाहीयेत! तो तर नवनव्या लाटांवरचा फेस आहे. तो चन्द्र तर नाहीच आहे, वेटोळ घातलेला शेषनाग आहे आणि त्यावर आपला शेषशायी विष्णु आहे डागबीग काही नाही. [अपह्नुति अलंकाराचे उदाहरण ]

८२०. अवशेन्द्रियचित्तानां हस्तिस्नानमिव क्रिया: |

दुर्भगाभरणप्रायो ज्ञानं भारो क्रियां विना ||

अर्थ

ज्याचं मन आणि इतर वासना ताब्यात नाहीत अशांच्या बाबतींत त्यांची कृत्य ही हत्तीनी केलेल्या अंघोळी प्रमाणे [निरुपयोगी - हत्ती स्नान करून परत मातीत लोळतात] असतात. आचरणात आणल्याशिवाय नुसत ज्ञान हे कमनशीब्यानी घातलेल्या दागिन्यांप्रमाणे ओझेच असते. [तत्वज्ञान हे आचरणात आणलं पाहिजे नाहीतर ती नुसती पोपटपंची उपयोगाची नाही.]

Friday, October 19, 2012

८१९. काक आह्वयते काकान्याचको न तु याचकान् |

काकयाचकयोर्मध्ये वरं काको न याचक: ||

अर्थ

[अन्न मिळालं तर एक] कावळा [इतर] कावळ्यांना बोलावतो, पण [कोणताही] याचक [भिकारी दुसऱ्या] याचकांना सांगत नाही [म्हणून] कावळा आणि भिकारी या दोघांमध्ये कावळा बरा.

Wednesday, October 17, 2012

८१८. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे |

सर्वदा सर्वदाऽस्माकं संन्निधिं सन्निधिं  क्रियात् ||

अर्थ

शरदऋतूतील कमलाप्रमाणे मुख असणारी; सर्वं गोष्टी मिळवून देणारी सरस्वती देवी, नेहमी आमच्या मुखकमलाच्या जवळ उत्तम [ज्ञानाचा] वस्तूंचा संग्रह करो.

८१७. सत्वादिस्थैरगणितगुणैर्हन्त विश्वं प्रसूय व्यक्तं धत्ते प्रहसनकरीं या कुमारीति संज्ञाम् |

मोहध्वान्तप्रसरविरतिर्विश्वमूर्ति: समन्तादाद्या शक्ति: स्फुरतु मम सा दीपवद्देहगेहे ||
 
अर्थ 
 
केवढे हे आश्चर्य ! सत्व वगैरे असंख्य गुणांच्या सहाय्याने सम्पूर्ण जगाला जन्म देऊन परत अगदी  'कुमारी ' असे, पण गम्मत वाटेल असं नाव असणारी  [कन्याकुमारीच देवीच नाव] दाटलेला मोहरूपी अंधकार नाहीसा करणारी; आद्य शक्ति; हे जग हेच जिच शरीर आहे अशी [देवी] माझ्या शरीर रूपी  घरात प्रकट होवो.

Tuesday, October 16, 2012

८१६. गुणवत्तरपात्रेण च्छाद्यन्ते गुणिनां गुणा: |

रात्रौ दीपशिखाकान्ति: न भानावुदिते सति ||

अर्थ

माणूस [खूप] गुणी [असला तरी] त्याच्या पेक्षा अधिक गुणी [ज्ञानी] विद्वान जवळ असला तर त्याचे  गुण झाकले जातात. [तितक कौतुक होत नाही; ते डोळ्यात भरत नाहीत] दिव्याच्या ज्वाळेचा उजेड रात्री जसा पडतो तसा सूर्य उगवल्यावर  काहीच वाटत नाही.

Monday, October 15, 2012

८१५. महतां योऽपराध्येत दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत् |

दीर्घौ बुद्धिमतो बाहू ताभ्यां हिंसति हिंसकम् ||

अर्थ

ज्याने चांगल्या बुद्धिमान माणसाचा गुन्हा केला असेल, त्याने 'मी खूप दूर आहे म्हणून निर्धास्त राहू नये. चाणाक्ष लोकांचे हात फार लांब टेकलेले असतात. त्यांनी ते त्रास देणाऱ्याला शिक्षा करतात. [त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते कितीही लांब असलं तरी हुडकून काढून शिक्षा करतात.]

८१४. न यस्य चेष्टितं विद्यान्न कुलं न पराक्रमम् |

न तस्य विश्वसेत्प्राज्ञ: यदीच्छेच्छ्रियमात्मन: || पञ्चतन्त्र
अर्थ

आपण श्रीमंत व्हावं अशी ज्या शहाण्या माणसाची इच्छा असेल, त्याने ज्याचं घराण माहित नाही; कृत्य माहित नाहीत; ताकद माहित नाही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.

Friday, October 12, 2012

८१३. पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवा: |

निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तमः ||

अर्थ

ज्याच्या राज्यामध्ये माणसं, ज्याप्रमाणे मूले  आपल्या वडलांच्या घरात वावरतात, तितकी निर्भयपणे भटकतील, तो राजा [किंवा सत्ताधारी] सर्वात चांगला प्रशासक होय.

Thursday, October 11, 2012

८१२. मक्षिका व्रणमिच्छन्ति धनमिच्छन्ति पार्थिवा: |

नीचा: कलहमिच्छन्ति वादमिच्छन्ति गर्विता: ||

अर्थ

माश्यांना जखमेवर [चोखायला] आवडत. राजे [सत्ताधारी] लोकांना पैशाची हाव असते. हलकट लोकांना भांडण झालेली आवडतात. गर्विष्ठ लोकांना वादविवाद करत बसायची हौस असते.

८११. छिन्नोऽपि रोहति तरु: क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्र: |

इति विमृशन्त: सन्त: सन्तप्यन्ते न ते विपदा ||

अर्थ

वृक्ष तोडला तरी तो पुन्हा वाढतो; चन्द्र क्षीण झाला तरी पुन्हा हळूहळू मोठा होतो. असा विचार करून सत्पुरुष संकटांनी कधीही खचून जात नाहीत किंवा दु:खी कष्टी होत नाहीत.

Wednesday, October 10, 2012

८१०. श्व: कार्यमद्य कुर्वीत पूर्वाह्णे चापराह्णिकम् |

न हि प्रतीक्षते मृत्यु: कृतमस्य न वा कृतम् ||

अर्थ

उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारचे काम सकाळीच करावे, कारण या माणसाचे काम करून झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पहात नाही. [आपण बेसावध असलं तरी मृत्यु गाठेलच.]

Tuesday, October 9, 2012

८०९. मनीषिणःसन्ति न ते हितैषिणःहितैषिणःसन्ति न ते मनीषिणः |

सुहृच्च विद्वानपि दुर्लभो नृणां यथौषधं स्वादु हितं च दुर्लभम् ||

अर्थ

जे विद्वान [हुशार] असतात त्यांना [आपल्या] कल्याणाची कळकळ नसते. ज्यांना आपल्या सुखाची चिन्ता असते ते [फारसे] ज्ञानी नसतात. [खरं तर] हितचिंतक आणि तो ज्ञानी असं असणं फार कठिण आहे, जसं औषध हे आपल्या उपयोगाच आणि परत गोड मिळण अवघड आहे. [औषध आपली कडूच असतात.]

Monday, October 8, 2012

८०८. नि:स्वो वष्टि शतं शती दशशतं लक्षं सहस्राधिप: लक्षेश: क्षितिपालतां क्षितिपतिश्चक्रेशतां वाञ्छति |

चक्रेश: सुरराजतां सुरपति: ब्राहमं पदं वाञ्छति ब्रह्मा विष्णुपदं हरि: शिवपदम् आशावधिं को गत: ||
 
अर्थ

ज्याच्याजवळ काहीच नाही तो शंभर [रुपयाची नाणी तरी] मिळावी अशी इच्छा करतो. ज्याच्याजवळ शंभर आहेत त्याला त्याच्या दसपट मिळावे अस वाटत. हजार असतील त्याला लाख मिळावे असं वाटत. [हा फार जुन्या काळातील श्लोक असल्यामुळे लाख हेच भरपूर आहेत अस कवीला वाटतंय.] लक्षधीशाला आपण राजा असाव असं वाटत. [मांडलिक] राजाला चक्रवर्ती राजा व्हाव असं वाटत. चक्रवर्ती राजाला देवांचा राजा [इंद्र] व्हाव असं वाटत. इंद्राला ब्रह्मदेव असाव असं वाटत. ब्रह्मदेवाला विष्णु व्हायला पाहिजे असं वाटत विष्णु देवाला भगवान शंकर व्हावं असं वाटत. [खरी गोष्ट म्हणजे] आशा [खरं तर हाव] कुणाची बर शान्त झालीय? [सगळे आशेचे दास आहेत.]

८०७. यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद्भयम् |

एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ||

अर्थ

ज्याप्रमाणे पिकलेले फळ हे पडतच; त्याला दुसरी गतीच नाही, तसंच जन्माला आलेला माणूस हा मरणारच त्याला दुसरी काही भीती नाही.

Friday, October 5, 2012

८०६. तृणादपि लघुस्तूल: तूलादपि च याचक: |

वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति  ||

अर्थ

गवतापेक्षाही कापूस हलका असतो. कापसापेक्षाही याचक [भिकारी] हलका [क्षुद्र] असतो. [कविनी असं म्हटल्यावर चाणाक्ष वाचक विचारतो ] मग [इतका हलका असल्यास] वाऱ्यानी त्याला का उडवलं नाही बरं? [कवीचे उत्तर - वाऱ्यालाही भीती वाटली -भिकारीच हा ] मला पण काहीतरी मागेल. [भिकाऱ्याला सगळेच टाळतात.]

८०५. शिरसा धार्यमाणोऽपि सोम: सोमेन शम्भुना |

तथापि कृशतां धत्ते कष्ट: खलु पराश्रय: ||

अर्थ

भगवान शंकराने  पार्वती बरोबर असताना चंद्राला [अगदी] डोक्यावर धारण केलाय तरी [एवढा कौतुकाचा असूनही] तो कृश होत जातो. [यावरून असं दिसत की] खरोखर दुसऱ्याच्या आधारानी राहणं कठीणच असतं.

Wednesday, October 3, 2012

८०४. कार्यं हृदा विनिश्चिन्वन्नुपायं चिन्तयन् धिया |

निवर्तयंश्च हस्तेन संसिद्धिं लभते नर: ||

अर्थ

[आपल्याला नक्की काय] काम करायचं आहे ते मनात पक्क ठरवून; ते पुर करण्यासाठी लागणाऱ्या कृतीचा डोक्यात नीट विचार करून; ते हातानी अमलात आणलं की [तरच] कार्य सुफळ सम्पूर्ण होते. [एखाद काम पूर्ण होण्यास या सर्वं गोष्टी जरूर आहेत.]

८०३. दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकी गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् |

विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोष

अर्थ

अरे दारिद्र्या; तू अतिशय विचारी आहेस. खूप गुणी माणसावर तुझं अगदी नेहमी प्रेम असतं. [गुणी माणसाना गरिबी ठरलेलीच, ते दारिद्र्य त्यांना मुळी सोडत नाही] आणि अशिक्षित किंवा काही कला नसणाऱ्या माणसांवर तू जराही प्रेम करत नाहीस. [गरिबी त्यांच्या कडे फिरकत सुद्धा नाही.]

Tuesday, October 2, 2012

८०२. त्याज्यं न धैर्यं विधुरेऽपि काले धैर्यात्कदाचिद्गतिमाप्नुयात्स: |

यथा समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति तर्तुमेव ||

अर्थ

[कितीही] वाईट परिस्थिती आली तरी धीर सोडू नये. [गळाठून गेला तर आत्ताच नष्ट होईल पण] धीर एकवटून राहील तर केंव्हा तरी त्याला [संकटातून] बाहेर पडता येईल. समुद्रात जहाज फुटलं तरी सुद्धा [इतक्या अवघड परिस्थितीत असूनही] नावाडी [पोहून; फळकुटाला धरून; कोणाच्यातरी मदतीने] समुद्र  कसातरी पार करण्याची इच्छा करतो.