भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, January 31, 2013

९१४. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |

आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

अर्थ

दुष्ट माणसाला दुसऱ्याच वैगुण्य मोहोरी एवढ असलं तरी डोळ्यावर येत, पण स्वतः मधे मात्र बेलफळाएवढा [मोठा] दोष दिसत असून सुद्धा तो न दिसल्याप्रमाणे वागतो.

Wednesday, January 30, 2013

९१३. खादन्न गच्छेदध्वानं न च हास्येन भाषणम् |

शोकं न कुर्यान्नष्टस्य स्वकृतेरपि जल्पनम् ||

अर्थ

रस्त्याने खात खात चालू नये. बोलताना [उगाचंच] हसू नये. [हरवलेल्या वस्तूंचे किंवा] गेलेल्या [माणसाचे] दु:ख करत बसू नये आणि स्वतःच्या कर्तृत्वाची शेखी मिरवू नये.

९१२. प्राणा यथात्मनोऽभीष्टा भूतानामपि ते तथा |

आत्मौपम्येन सर्वत्र दयां कुर्वन्ति साधवः ||

अर्थ

आपल्याला आपला जीव जसा प्यारा तसे सगळ्यांना [आपापले] प्राण प्यारे असतात. [पीडीताच्या ठिकाणी आपण आहोत असा] आत्म्या सारखाच दुसरा पण आहे, या विचाराने सज्जन लोकांनी सगळ्यावर दया करावी.

Monday, January 28, 2013

९११. परस्परभयादेके पापा: पापं न कुर्वते |

एवं सांसिद्धिके लोके सर्वं दण्डे प्रतिष्ठितम् || महाभारत शांतिपर्व

अर्थ

काही पापी [दुष्ट बुद्धीचे] लोक एकमेकांच्या भीतीने पाप [वाईट कृत्य] करीत नाहीत. अशा पद्धतीमुळे सर्व जगातील [सुरळीत व्यवहार] दंडावर [शिक्षेच्या भीतीमुळे] होत असतात.

९१०. राजदण्डभयादेके नराः पापं न कुर्वते |

यमदण्डभयादेके परलोकभयादपि  ||

अर्थ

काही लोक राजा [सरकार; प्रशासक] च्या भीतीने पाप करीत नाहीत. काही लोक यमाच्या किंवा नरकाच्या भीतीने पाप करीत नाहीत.

९०९. दण्डः शास्ति प्रजाः सर्वा दण्ड एवाभिरक्षति |

दण्डः सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः || महाभारत शांतिपर्व

अर्थ

प्रशासनामुळे [चूक झाल्यास शिक्षा करणे]  सर्व जनतेचे [व्यवहार]  सुरळीत होतात. दंडामुळे [दुबळ्या लोकांच] रक्षण होत. अज्ञानी लोकांच्या बाबतीत प्रशासन जागृत असत [त्यांना चुका करू देत नाही] त्याला जाणकार धर्म असं मानतात.

९०८. पङ्गो वन्द्यस्त्वमसि; न गृहं यासि योऽर्थी परेषां धन्योऽन्ध त्वं; धनमदवतां नेक्षसे यन्मुखानि |

श्लाघ्यो मूक त्वमपि; कृपणं स्तौषि नार्थाशया यः स्तोतव्यस्त्वं बधिर; न गिरं यः खलानां शृणोषि ||

अर्थ

 अरे पांगळ्या [माणसा] तुला नमस्कार करायला पाहिजे, [कारण] तू याचना करण्यास दुसऱ्यांच्या घरी जात नाहीस. बा अंधा; तू कृतार्थ आहेस कारण तू संपत्तीने माजलेल्या लोकांच [काही मिळण्याच्या आशेने] तोंडसुद्धा बघत नाहीस. मुक्या माणसा तू स्तुतीस पात्र आहेस कारण तू चिक्कू लोकांची पैशाच्या आशेने स्तुती करत नाहीस, अरे बहिऱ्या तुझं कौतुक केलं पाहिजे कारण दुष्ट लोकांच बोलणं तू ऐकत नाहीस. [कवि गरीब असल्यामुळे त्याला नाईलाजाने या गोष्टी कराव्या लागतात या मंडळीना त्यांच्या व्यंगामुळे अपोआपच ते टळतं, तर त्यामुळे जसं काही त्याला त्यांच कौतुक वाटत आहे.]

Friday, January 25, 2013

९०७. पक्षविकलश्च पक्षी शुष्कश्च तरु: सरश्च जलहीनम् |

सर्पश्चोधृतदंष्ट्रस्तुल्यं लोके दारिद्रस्य ||  मृच्छकटिक 
अर्थ

या जगात गरीब मनुष्य हा पंख दुखावलेल्या पाखरासारखा; वठलेल्या झाडासारखा; पाणी आटलेल्या तळ्यासारखा; किंवा [विषारी] दात उपटलेल्या सापासारखा [कळाहीन] असतो.

Thursday, January 24, 2013

९०६. भये वा यदि वा हर्षे सम्प्राप्ते यो विमर्शयेत् |

कृत्यं न कुरुते वेगान्न स सन्तापमाप्नुयात् || पञ्चतन्त्र

अर्थ

[एकदम खूप] भीती [दायक] किंवा आनंद होईल असं घडलं की जो घाईघाईने काहीतरी न करता जो [त्याचा समग्र] विचार करून मगच [योग्य ते करील] त्याला [नंतर] दु:ख करण्याची वेळ येणार नाही.

Wednesday, January 23, 2013

९०५. एतेन मापयति भित्तिषु कर्ममार्गमेतेन मोचयति भूषणसम्प्रयोगान् |

उद्धाटको भवति यन्त्रदृढे कपाटे दष्टस्य कीटभुजगैः परिवेष्टनं च || मृच्छकटिक

अर्थ

[जानव्याचे चोराला उपयोग] [कुठे आणि किती काम { खोदण्याचं किंवा वेगळं} करायचं आहे ते] ह्या [जानव्यानी] मोजता येत; एकमेकात घट्ट गुंतलेले दागिने सोडवता येतात. कुलपाने घट्ट लावलेली कपात उघडता येतात आणि किडे; साप चावले तर [दंश केलेली जागा] घट्ट बांधता येते.

९०४. अनिर्वेद: श्रियो मूलमनिर्वेदःपरं सुखम् |

अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तक: || रामायण सुंदरकांड

अर्थ

आत्मविश्वास [आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वावलंबनानी काम करणं] हे वैभवाचा आधार आहे. स्वावलंबनात श्रेष्ठ सुख सामावलेले आहे. सर्व गोष्टीना हे प्रेरणा देते.

Tuesday, January 22, 2013

९०३. स्पृशन्नपि गजो हन्ति जिघ्रन्नपि भुजङ्गमः |

हसन्नपि नृपो हन्ति मानयन्नपि दुर्जनः || हितोपदेश

अर्थ

हत्ती नुसता स्पर्श करून सुद्धा मारू शकतो. [इतकी ताकद त्याच्यात असते.] [काही] साप फूत्काराने मारतात. [जहाल विष असणारे] राजा [कडे सत्ता मोठी असल्याने तो] हसत हसत मारू शकतो. दुष्ट मनुष्य एकीकडे मान  देत असला तरी ठार करू शकतो.

Monday, January 21, 2013

९०२. बकवच्चिन्तयेदर्थान् सिंहवच्च पराक्रमेत् |

वृकवच्चावलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत् || मनुस्मृति

अर्थ

बगळ्याप्रमाणे [गुपचूप; एकाग्रतेने भरपूर] संपत्ती [कशी मिळवावी याबद्दल] विचार करावा. शौर्य गाजवावं सिंहासारखं, झडप घालावी लांडग्या सारखी [आणि पळून जायची वेळ आली तर] सशासारखं निसटावं.

९०१. अपुत्रस्य गृहं शून्यं; चिरशून्यं नास्ति यस्य सन्मित्रम् |

मूर्खस्य दिश: शून्या: ;सर्वं शून्यं दरिद्रस्य ||

अर्थ
ज्याला मूल [बाळ] नाही त्याला घर भकास वाटत. ज्याला चांगला मित्र नाही, त्याला  बरंच [काळ] उदास वाटत. मूर्ख माणसाच्या दृष्टीनी त्याला सगळीकडे अंधार वाटतो. दरीद्र्याला सगळंच पोकळी आहे असं वाटत. [त्याला जगायला काहीच  उत्साहवर्धक दिसत नाही.]

Friday, January 18, 2013

९००. मृगा मृगै: सङ्गमनुव्रजन्ति गावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः |

मूर्खाश्च मूर्खैः सुधिय: सुधीभि: समानशीलव्यसनेषु सख्यम् ||

अर्थ

हरणे  हरणांच्या बरोबर राहतात; गाईंना गाईंचा सहवास हवा;घोड्यांना घोड्यांचा [हे जसं आहे तसं] मूर्ख लोकांची [मैत्री] मूर्खांशी होते; हुशार तशाच मित्रांशी मैत्री करतात. स्वभाव आणि आवडी सारख्या असतील त्यांची मैत्री होते.

Thursday, January 17, 2013

८९९. केचिदज्ञानतो नष्टाः केचिन्नष्टाः प्रमादतः |

केचित् ज्ञानावलेपेन केचिनष्टैस्तु नाशिताः ||
अर्थ

मूर्खपणामुळे काही लोकांचा नाश झाला. काहींच्या घोडचुकांमुळे त्यांचा नाश झाला. ज्ञानाचा माज आल्यामुळे काही लोक वाया गेले आणि काही [बिचारे जे आपल्या कर्मांनी मेले ते] मारले गेले.

Wednesday, January 16, 2013

८९८. नवनीतसमां वाणीं कृत्वा चित्तं सुनिर्दयम् |

तथा प्रबोध्यते शत्रु: सान्वयो म्रियते यथा || पंचतंत्र

अर्थ

मन अगदी दगडासारखं निष्ठूर करून अगदी लोण्यासारखं [मृदु] बोलून असं शत्रूला फसवतात की जेणेकरुन मुलाबाळांच्या सकट त्याचा नाश होईल.

Tuesday, January 15, 2013

८९७. परेषामात्मनश्चैव योऽविचार्य बलाबलम् |

कार्यायोत्तिष्ठते मोहादापदः ससमीहते ||

अर्थ

आपली आणि दुसऱ्यांच्या ताकदीचा विचार न करता जो अडाणीपणाने [भांडण] करायला उठतो तो संकटात सापडतो.

८९६. अनाचारेण मालिन्यमत्याचारेण मूर्खता |

विचाराचारयोर्योग: स सदाचार उच्यते ||

अर्थ

कुकृत्य करण्यामुळे [शीलाला] बट्टा लागतो. [काही न करण्याने आळशीपणा येतो.] उतावीळपणाने मूर्खपणा पदरात पडतो. [म्हणून] विचारपूर्वक कृती केल्यास, त्याला सदाचरण म्हणतात.

Monday, January 14, 2013

८९५. विहाय पौरुषं यो हि दैवमेवावलम्बते|

प्रासादसिंहवत्तस्य मूर्ध्नि तिष्ठन्ति वायसाः ||


अर्थ

विशाल इमारतीवर असणाऱ्या सिंहाच्या शिल्पावर जसे कावळे बसतात त्याप्रमाण; पराक्रम [प्रयत्न] करायचा सोडून जो नशिबावर अवलंबून राहतो, त्याच्या डोक्यावर [कमी कुवत असणारे लोक] मिरे वाटतात.

८९४. नीहारपरुषो लोक: पृथिवी सस्यमालिनी |

जलान्यनुपभोग्यानि सुभगो हव्यवाहन: ||


अर्थ


घट्ट बसलेल्या हिमामुळे जगात [सर्वत्र जमिनीला] कडकपण आले आहे; धान्य [पूर्ण पिकल्यामुळे] पृथ्वी शोभून दिसत आहे [एकदम थंड असल्यामुळ] पाणी [तसंच] वापरता येत नाही. [पण] अग्नि [मात्र उबदारपणामुळ] चांगला वाटतो आहे.

८९३. अयं स काल: सम्प्राप्त: प्रियो यस्ते प्रियंवद |

अलङ्कृत इवाभाति येन संवत्सर: शुभ: || वाल्मिकी रामायण

अर्थ

हे मधुरभाषी [लक्ष्मणा] तुला आवडणारा हा [ऋतु] आला आहे. ह्या [थंडीच्या] दिवसांमुळे जणू काही हे सुंदर वर्ष शोभून दिसत आहे

Saturday, January 12, 2013

८९२. एह्यागच्छ गृहाण चासनमिदं कस्माच्चिरात् दृश्यसे ? का वार्ता ?ह्यतिदुर्बलोऽसि कुशलं प्रीतोऽस्मि ते दर्शनात् |

एवं ये समुपागतान्प्रणयिन: प्रल्हादयन्त्यादरात्तेषां युक्तमशङ्कितेन मनसा हर्म्याणि गन्तुं सदा ||

अर्थ

जे प्रेमळ लोक त्यांच्या घरी गेल्यावर; " ये ,ये ह्या बैठकीवर बैस. किती दिवसांनी भेटतोयस, काय [नवी] बातमी? खूप खराब झालायस. [सगळं] ठीक आहे ना? तुला भेटून खूप बर वाटलं" अशाप्रकारे बोलून [पाहुण्याला] आनंदित करतात, त्यांच्या घरी निर्भय मनाने नेहमी जावं.

Thursday, January 10, 2013

८९१. अल्पाक्षररमणीयं य: कथयति निश्चितं स खलु वाग्मी |

बहुवचनमल्पसारं य:कथयति विप्रलापी स: ||

अर्थ

थोडक्यात; सुंदर शब्दात आणि नेमक असं जो वर्णन करतो, त्याला खरोखर वाग्मी [भाषाप्रभू] असं म्हणतात. पुष्कळ घोळवून; तथ्य कमी असलेल बोलेल तो [फक्त] बोलघेवडा असतो.

Wednesday, January 9, 2013

८९०. आरोप्यते शिला शैले यत्नेन महता यथा |

निपात्यते क्षणेनाधस्तथात्मा गुणदोषयोः  ||

अर्थ 

ज्याप्रमाणे एखादा मोठा दगड पर्वतावर चढवायचा असेल तर त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात, [पण] अगदी पटकन खाली ढकलता येतो. तसंच एखादा गुण अंगी बाणवण फार प्रयत्नांनी जमत, पण दोष मात्र कसेही जोडता येतात.

Tuesday, January 8, 2013

८८९. संस्थितस्य गुणोत्कर्षः प्रायः प्रस्फुरति स्वयम् |

दग्धस्यागरुखण्डस्य स्फारीभवति सौरभम् ||

अर्थ

मृत्यूच्या वेळी साधारणपणे [त्या व्यक्तीच्या] गुणाचा सर्वोच्च बिन्दू आपोआपच येतो. अगरूचा [चंदनाप्रमाणे एक सुगंधी वृक्ष]  तुकडा जाळल्यानंतर त्याचा सुगंध [अधिकच] दरवळतो.

८८८. आकारेणैव चतुरास्तर्कयन्ति परेङ्गितम् |

गर्भस्थं केतकीपुष्पमामोदेनैव षट्पदाः ||

अर्थ

दुसऱ्याच्या मनातली गोष्टीचा  हुशार लोक त्यांच्या वागण्यावरून [चांगला] अंदाज करतात. अगदी कळीमधे असलेलं केवड्याच फूल त्याच्या सुगंधामुळे भुंगे ओळखतात, त्याचप्रमाणे हे असत.

Monday, January 7, 2013

८८७. यावज्जीवं सुखं जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |


भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
चार्वाक [नास्तिक आणि सदसद्विवेकबुद्धी नसणाऱ्या लोकांचा मोठा आचार्य ]

अर्थ

जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मजेत; आरामात रहावं. कर्ज काढून [त्या पैशानी चैन करीत] तूप प्यावं. [ते काही फेडावं लागणार नाही कारण मेल्यावर] एकदा का शरीराची राख झाली की पुन्हा [प्रायश्चित्त] कुणाला घ्यावं लागणार आहे?

Saturday, January 5, 2013

८८६. न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा: वृद्धा: न ते ये न वदन्ति धर्मम् |

धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यं सत्यं न तद्यच्छलनानुविद्धम् ||

अर्थ

जिथे पोक्त [विचारांनी परिपक्व] सभासद नाहीत, ती कसली आलीय सभा? जे धर्माच विवरण करत नाहीत ते वृद्धच नव्हेत. ज्यात खरेपणा नाही त्याला काय धर्म म्हणणार? जे   कपटामधे  गुरफटलेलं आहे ते सत्यच  नव्हे.

Friday, January 4, 2013

८८५. नात्मानमवमन्येत पूर्वाभिरसमृद्धिभिः |

आ मृत्योः श्रियमन्विच्छेनैनां मन्येत दुर्लभाम् | |

अर्थ

आपण याच्या आधी खूप गरीब होतो म्हणून स्वतःला कमी लेखू नये. [अगदी म्हातारपणी सुद्धा ] मरण येई पर्यंत [न्याय्य मार्गाने] संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा. ती मिळणे फार कठीण आहे असे समजू नये.

Tuesday, January 1, 2013

८८४. पठक: पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रपाठका:|

सर्वे व्यसनिनो ज्ञेया य: क्रियावान्स पण्डित: ||

अर्थ

[फक्त] वाचणारा [किंवा पाठ करणारा]; शिकवणारा; आणि दुसरे जे जे [धर्म] शास्त्र [वगैरेच नुसतच] वाचन करतात, ते सगळे व्यसन जडलेले आहेत असं ओळखाव. [ते वाचून] ते जो कृतीत आणतो तोच [खरा] ज्ञानी.