भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, December 31, 2013

११७८. एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च हन्यते |

सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ||

अर्थ

विष [पाजल्यावर] एकालाच मारता येत. शस्त्रांनी एखादाच [मेला तर] मरतो. पण गुप्त खलबत्ताच्या वादळाने सगळ्या प्रजेसकट आणि राजासकट सर्व राष्ट्र नाश पावत.

Monday, December 30, 2013

११७७. परोपदेशवेलायां शिष्टा: सर्वे भवन्ति हि |

विस्मारन्तीह शिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते ||

अर्थ

दुसऱ्यावर वेळ आली असता उपदेशाचे डोस पाजायला सगळेच एकदम हुशार असतातच. पण [तशीच] वेळ स्वतःवर आली असता ती सगळी हुशारी विसरून जातात. [आणि स्वार्थाला योग्य तसं वागतात.]

११७६. हठादाकृष्टानां कतिपयपदानां रचयिता जनः स्पर्धालुश्चेदहह कविना वश्यवचसा |

भवेदद्य श्वो वा किमिह बहुना पापिनि कलौ घटानां निर्मातुस्त्रिभुवनविधातुश्च कलहः ||

अर्थ

शब्दांवर ज्याची हुकमत आहे अशा कविश्रेष्ठाशी जर ओढूनताणून चार पद कशीबशी जुळवणारा बरोबरी करायला लागला तर, अरेरे! या पापी कलियुगात आज नाहीतर उद्या [लवकरच] तीन लोकांच्या [जनतेच्या मस्तकरूपी घडे बनवणाऱ्या ब्रह्मदेवा बरोबर [मातीची] मडकी बनवणाऱ्या [कुंभाराची  मी मोठा म्हणून] झटापट होईल.

Thursday, December 26, 2013

११७५. मदोपशमनं शास्त्रं खलानां कुरुते मदम् |

चक्षुःप्रकाशकं तेज उलूकानामिवान्धताम् ||

अर्थ

[वास्तविक] शास्त्र हे माज नाहीसा करणार असत, पण दुष्ट [मुळात माजोरड्या] लोकांना शास्त्र शिकून जास्तच माज चढतो. जसं [सूर्य] प्रकाशामुळे [सर्व जगात] डोळ्यांनी दिसायला लागत, पण त्याच उजेडानी घुबड मात्र आंधळी होतात.

११७४. मृत्योर्बिभेषि किं मूढ भीतं मुञ्चति किं यमः |

अजातं नैव गृह्णाति कुरु यत्नमजन्मनि ||

अर्थ

अरे मूर्खा; मरणाला घाबरतोस का काय? घाबरलं म्हणून यम सोडून दिल का काय? [ते तर शक्य नाही पण तो] जन्माला न आलेल्याला पकडत नाही, [मारत] नाही, म्हणून जन्म घ्यावा लागणार नाही असा प्रयत्न कर. [मोक्ष मिळव.]

Monday, December 23, 2013

११७३. किञ्चिदाश्रयसंयोगाद्धत्ते शोभामसाध्वपि |

कान्ताविलोचने न्यस्तंमलीमसमिवाञ्जनम् ||

अर्थ

एखादी वस्तू वाईट असून सुद्धा ती [उत्कृष्ट वस्तूचा] आश्रय घेतल्यामुळे मोठंच सौंदर्य तिला प्राप्त होत. काळकुट्ट काजळ सुंदरीच्या डोळ्यात रेखल्याने फारच सुंदर दिसते.

११७२. भवत्येकस्थले जन्म गन्धस्तेषां पृथग्पृथक् |

उत्पलस्य मृणालस्य मत्स्यस्य कुमुदस्य च ||

अर्थ

चंद्रविकासी कमळ; सूर्यविकासी कमळ; नीलकमल आणि मासे या सर्वांचा जन्म एकच ठिकाणी झाला असला तरी प्रत्येकाचा वास वेगवेगळा असतो. [एका घरातल्या माणसांचे स्वभाव वेगवेगळे असू शकतात.]

Friday, December 20, 2013

११७१. आदरेण यथा स्तौति धनवन्तं धनेच्छया |

तथा चेत्विश्वकर्तारं को न मुच्येत बन्धनात् ||

अर्थ

संपत्ती मिळवण्यासाठी [माणूस] ज्याप्रमाणे श्रीमंताची आदराने स्तुती करतो, तशाच प्रकारे जर परमेश्वराची केली तर कोण बरे मुक्त होणार नाही? [आपण परमेश्वराची भक्ती त्या ओढीने केली तर मुक्त होऊ.]

Thursday, December 19, 2013

११७०. दिनमेकं शशी पूर्णः क्षीणस्तु बहुवासरान् |

सुखाद्दुःखं सुराणामप्यधिकं का कथा नृणाम् ||

अर्थ

[देव असूनसुद्धा] चन्द्र एकाच [पौर्णिमेच्या रात्री] पूर्ण बिंब अश्या स्थितीत असतो. तो पुष्कळ दिवस क्षीण राहतो. मग देवांना सुद्धा सुखापेक्षा दुःख अधिक भोगवं लागत, तर माणसांची काय कथा?

Monday, December 16, 2013

११६९. अपि दोर्भ्यां परिबद्धा बद्धापि गुणैरनेकधा निपुणैः |

निर्गच्छति क्षणादिव जलधिजलोत्पत्तिपिच्छला लक्ष्मीः ||

अर्थ

निपुण [कुशल] मंडळीनी जरी हातांनी बळकट पकडली; गुणांनी [आपल्या अंगीच्या कौशल्याने किंवा दोरखंडाने] पुष्कळवेळा जखडली तरी लक्ष्मी जशी काही क्षणभरात सटकते. ती समुद्राच्या पाण्यातून जन्माला आल्यामुळे निसरडी असते ना!

Sunday, December 15, 2013

११६८. सीदन्ति सन्तो विलसन्त्यसन्त: पुत्रा: म्रियन्ते जनकश्चिरायु: |

परेषु मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोकाः कलिकौतुकानि ||
अर्थ
या कलीयुगात काय काय अनर्थ घडतील ते लोकांना दिसतीलच. [इथे] सज्जनांचा नाश होईल दुष्टांची मात्र भरभराट होईल. वडील [बिचारे] खूप जगातील आणि मुलंच मरतील. आपल्या लोकांशी सगळे भांडतील आणि परक्यांशी मैत्री करतील.

Saturday, December 14, 2013

११६७. व्यसनं प्राप्य यो मोहात्केवलं परिदेवयेत् |

क्रन्दनं वर्धयत्येव तस्यान्तं नाधिगच्छति ||

अर्थ

संकटात सापडल्यावर गोंधळल्यामुळे जर फक्त रडारड केली तर [संकटातून सुटायला काही मदत तर  होतच नाही पण ते] वाढतच. त्यातून बचाव होत नाही. [माणसानी धीर न सोडता उपाय शोधला पाहिजे.]

Friday, December 13, 2013

११६६. प्रणमत्युन्नतिहेतोर्जीवितहेतोर्विमुञ्चति प्राणान् |

दुःखीयति सुखहेतोः को मूढः सेवकादन्यः ||
 
अर्थ
 
नोकर [पेशा स्वीकारणाऱ्या] नोकरासारखा दुसरा कोणीतरी मूर्ख आहे काय. तो उन्नत होण्यासाठी [आर्थिक भरभराटी साठी मालकापुढे] वाकत राहतो; [उप] जीविकेसाठी जीव टाकतो. [सगळ आयुष्य गहाण ठेवतो.] सुख मिळावं [म्हणून नोकरी करून सतत] दुःखात राहतो

११६५. वरं दारिद्र्यमन्यायप्रभवाद्विभवादिह |

कृशताभिमता देहे पीनता न तु शोफत: ||
 
अर्थ
 
अन्यायानी मिळवलेल्या श्रीमंती पेक्षा [लोकांना; नातेवाईकांना गंडवून मिळवलेल्या संपत्तीपेक्षा] गरिबी परवडली. सूज आल्यामुळे लठ्ठ दिसण्यापेक्षा सडपातळ असण चांगलं.

११६४. यशस्करे कर्मणि मित्रसङ्ग्रहे प्रियासु नारीष्वधनेषु बन्धुषु |

कृतौ विवाहे व्यसने रिपुक्षये धनव्ययस्तेषु न गण्यते बुधैः ||
अर्थ
मित्रांसाठी; कीर्तिदायक कामासाठी; आवडत्या स्त्री साठी; गरीब नातेवाईकांसाठी; लग्नात केलेला; संकटातून सुटण्यासाठी केलेला; शत्रूंच पारिपत्य करण्यासाठी केलें; खर्चाबद्दल शहाणे लोक दुःख करीत नाहीत. [मनापासून तो खर्च करतात.]

Monday, December 9, 2013

११६३. चलं वित्तं चलं चित्तं चले जीवितयौवने |

चलाचलमिदं सर्वं कीर्तिर्यस्य स जीवति ||

अर्थ

संपत्ती ही चंचल आहे. मनसुद्धा स्थिर रहात नाही. तारुण्य आणि आयुष्य क्षणभंगूर आहेत. त्यामुळे ज्यानी कीर्ति मिळवली तोच खरा जगला त्याचच आयुष्य सफल झालं.

११६२. मार्जारो महिषो मेषः काकः कापुरुषस्तथा |

विश्वासात्प्रभवन्त्येते विश्वासस्तत्र नो हितः ||

अर्थ

मांजरे; रेडा; मेंढी; कावळा आणि दुष्ट मनुष्य हे विश्वास ठेवावा तेवढे बळावतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याने तोटा होतो. [ठेवूच नये.]

Friday, December 6, 2013

११६१ . यस्य नास्ति विवेकस्तु केवलं यो बहुश्रुतः |

न स जानाति शास्त्रार्थान्दर्वी पाकरसानिव ||

अर्थ

ज्यानी फक्त शास्त्रांचा अभ्यास [घोकंपट्टी] केली आहे. पण [ते कसं वापरायच याचा] विचार केलेला नाही त्याला त्यागोष्टींचा सखोल अर्थ कळत नाही; जसं रश्शाची चव [जरी] पळी [सारखी त्यातच ठेवलेली असली तरी तिला] कळत नाही.

Thursday, December 5, 2013

११६०. न तच्छस्त्रैर्न नागेन्द्रैर्न हयैर्न च पत्तिभिः |

कार्यं संसिद्धिमभ्येति यथा बुद्ध्या प्रसाधितम् ||

अर्थ

एखाद काम बुद्धिकौशल्य पणाला लावल्यावर जसं परिपूर्ण होत तसं शस्त्र; हत्तीदल; घोडदळ किंवा पायदळ [यांनी युद्ध करून] होत नाही.

११५९. सेवा श्ववृत्तिर्यैरुक्ता न तैः सम्यगुदाहृतम् |

स्वच्छन्दचारी कुत्र श्वा विक्रीतासुः क्व सेवकः ||

अर्थ

ज्यानी नोकरी म्हणजे कुत्र्याच जिणं असं वर्णन केलंय त्यांच ते बरोबर नाहीये. अहो कुत्रा स्वतःच्या मनाला येईल तसं भटकणारा कुत्रा कुठे [किती भाग्यवान !] आणि आपले प्राणच ज्याने विकून टाकले आहेत असा नोकर कुठे ?

Tuesday, December 3, 2013

११५८. यममिव करधृतदण्डं हरिमिव सगदंशशाङ्कमिव वक्रम् |

शिवमिव च   विरूपाक्षं जरा करोत्यकृतपुण्यमपि ||

अर्थ

[आपण जरी] पुण्य केलं नाही, तरी म्हातारपण [माणसाला]; हातात दण्ड धारण करतो म्हणून यमाप्रमाणे; सगद विष्णु प्रमाणे; [देवाच्या हातात गदा हे आयुध; माणसाला गद=आजार] चंद्राप्रमाणे वक्र; भगवान शंकराप्रमाणे विरूपाक्ष बनवते.

Monday, December 2, 2013

११५७. जिह्वैकेव सतामुभे फणवतां स्रष्टुश्चतस्रश्च तास्ताः सप्तैव विभावसोर्नियामिताः षट्कार्तिकेयस्य च |

पौलस्त्यस्य दशाभवन्फणिपतेर्जिह्वासहस्रद्वयं जिह्वालक्षशतैककोटिनियमो नो दुर्जनानां मुखे ||

अर्थ

सज्जन लोकांना एकच जीभ असते [ते उलटसुलट - दोन प्रकारे बोलत नाहीत, खरं तसच बोलतात] सर्पांना दोन जिभा असतात. ब्रह्मदेवाला [चार मुखे असल्याने] चार जिभा असतात. अग्नीला सातच जिभा असतील असं ब्रह्मदेवाने ठरवले आहे. कार्तिकस्वामीला सहा जिभा आहेत. दशमुखी [रावणाला] दहा होत्या. शेषाला दोन हजार [सहस्र फणा असल्यामुळे] जिभा असतात. [या सर्वाना जिभा किती याला बंधन आहे पण] लाखो कोटी किती जिभा दुर्जनांच्या मुखांमध्ये आहेत, त्याला काही हिशोबच नाही. [ते कितीही वेळा आपलं बोलणे फिरवू शकतात.]

११५६. हंसो विभाति नलिनीदलपुंजमध्ये सिंहो विभाति गिरिगह्वरकन्दरासु |

जात्यो विभाति तुरगो रणयुद्धमध्ये विद्वान्विभाति पुरुषेषु विचक्षणेषु ||
अर्थ

हंस हा कमळाच्या ताटव्यामधे शोभून दिसतो. डोंगरावरच्या कडेकपारीत सिंह शोभून दिसतो. जातिवंत घोडा युद्धभूमीवर शोभून दिसतो. [त्याचप्रमाणे] विद्वान हा विद्वत्सभेत शोभून दिसतो.

११५५. दातव्यं भोक्तव्यं सति विभवे सञ्चयो न कर्तव्यः |

पश्येह मधुकरीणां सञ्चितमर्थं हरन्त्यन्ये ||

अर्थ

आपल्याकडे जर खूप संपत्ती असेल तर दान करावं; उपभोग घ्यावा. साठवत बसू नये. असं पहा की मधमाशांनी साठवलेला [मध ना त्या स्वतः खातात ना दान करतात] दुसरेच [त्यांचं पोळ जाळून मध] पळवतात.