भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, March 29, 2013

९६८. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: |

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते || भगवद्‌गीता अध्याय ३:२१

अर्थ

थोर लोक जसं वागतात तसच सर्व लोक वागतात. तो जे योग्य ठरवतो त्याचच सर्वजण अनुकरण करतात.

Thursday, March 28, 2013

९६७. यं सर्वशैला: परिकल्प्य वत्सं मेरौ स्थिते दोग्धरि दोहदक्षे |

भास्वन्ति रत्नानि महौषधीश्च पृथूपदिष्टां दुदुहुर्धरित्रीम् || कुमारसंभव  कालिदास

अर्थ

पृथु राजाने [गोरूपी] पृथ्वीला  [सर्व सार देण्याची] आज्ञा केली असताना; तत्पर असा मेरु दोहन करत   असताना; सर्व पर्वतांनी ज्याला वासरू केलं [गाय त्याला मुख्यतः दूध पाजते अस लाडकं] तेंव्हा [त्या हिमालय पर्वतराजाला] तेजस्वी अशी रत्ने आणि श्रेष्ठ औषधी रूपी दूध प्राप्त झालं.

Wednesday, March 27, 2013

९६६. अपराधो न मेऽस्तीति नैतद्विश्वासकारणम् |

विद्यते हि नृशंसेभ्यो भयं गुणवतामपि || हितोपदेश

अर्थ

क्रूर लोकांच्या बाबतीत आपण त्यांचा काही गुन्हा केला नाही, [म्हणून ते छळणार नाहीत असा] विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. जरी गुणी असले [त्यांची खोडी काढली नसली तरी] त्यांच्यापासून भीती असतेच.

Tuesday, March 26, 2013

९६५. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् |

लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति || पंचतंत्र

अर्थ

ज्याला स्वतःला काहीच अक्कल नाही त्याला शास्त्राचा काय बर उपयोग? ज्याला डोळ्यांनी [दिसत] नाही त्याला आरसा काय उपयोगी पडणार?

९६४. क्षान्तं न क्षमया गृहोचितसुखं त्यक्तं न सन्तोषतः सोढो दुःसहशीततापपवनक्लेशो न तप्तं तपः |

ध्यातं वित्तमहर्निशं नित्यमितप्राणैर्न  शम्भोः पदं तत्तत्कर्म कृतं यदेव मुनिभिस्तैस्तैर्फलैर्वञ्चितः || वैराग्यशतक; राजा भर्तृहरी

अर्थ

[आम्ही] क्षमा केली पण क्षमाशीलता या गुणाने नव्हे [आपण बोलून काहीच फायदा नाही म्हणून चडफडत गप बसलो.] अगदी ऐशारामाच्या सुख सोडली पण समाधानात नाही. सहन करण्यास कठीण असं थंडी; उन; वाऱ्याचा त्रास सहन तर केलाच [तापसी सुद्धा हेच करतात पण तपाचरणाच्या ओढीने तसं] तप मात्र केलं नाही. आपल्या ताकदीप्रमाणे रात्रंदिवस आम्ही ध्यास घेतला तो पैशाचा; भगवान शंकराच्या चरणांचा नाही घेतला [अरेरे!] ऋषिमुनि जे जे करतात [ते सर्व कष्ट  आम्ही घेतले पण त्यांना त्याच जे उत्कृष्ट फळ मिळतं ते] त्या फळाला मात्र वंचित राहिलो.

Monday, March 25, 2013

९६३. य: स्वभावो हि यस्य स्यात्तस्यासौ दुरतिक्रमः |

श्वा यदि क्रियते राजा तत्किं नाश्नात्युपानहम् ||

अर्थ

माणसाचा जो मुळातला स्वभाव असतो तो त्याला मुळीच बदलता येत नाही. कुत्र्याला जरी अगदी राजा केलं तरी तो चपला चघळायचं सोडेल काय? [कधीच नाही]

Friday, March 22, 2013

९६२. अतीत्य बन्धूनवलङ्घ्य मित्राण्याचार्यमागच्छति शिष्यदोषः |

बालं ह्यपत्यं गुरवे प्रदातुर्नैवापराधोऽस्ति पितुर्न मातुः || पञ्चरात्र  भास

अर्थ

विद्यार्थ्याला [नीट येत नसेल तर त्याबद्दलचा] दोष नातेवाईकांना सोडून देऊन; मित्रांना टाळून शिक्षकाच्या माथ्यावर फुटतो. लहानपणीच मूल शिक्षकाच्या स्वाधीन केल्यामुळे, ही चूक आईची नसते की बापाची नसते. [मुलांना येई पर्यंत शिकवणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे.]

९६१. सत्यां तु फलनिष्पतौ पुरुषस्येह पौरुषम् |

परथा परिहासाय तदेव खलु साहसम् || कवीन्द्र परमानंद, शिवभारत

अर्थ

माणसाने केलेल्या पराक्रमाचं कौतुक जर तो यशस्वी झाला तरच होत. जर उलट झालं तर  मात्र  तेच धाडस थट्टेचा विषय बनत.

Thursday, March 21, 2013

९६०. अत्यन्तबलवन्तोऽपि पौरजानपदा जनाः |

दुर्बलैरपि बाध्यन्ते पुरुषैः पार्थिवाश्रितैः ||

अर्थ

मोठ्या शहरातले किंवा खेड्यातले असोत  माणसं अगदी सामर्थ्यवान असली तरीसुद्धा राजाचं [सत्ताधा-याचं] पाठबळ असणारे दुबळे लोक सुद्धा त्यांना त्रास देऊ शकतात.

Tuesday, March 19, 2013

९५९. मरुस्थल्यां यथा वृष्टिः क्षुधार्ते भोजनं तथा ।

दरिद्रे दीयते दानं सफलं पाण्डुनन्दन ॥

अर्थ

हे पांडवा; अगदी कोरड्या जमिनीवर पडलेला पाऊस; तसंच भुकेजलेल्याला जेवण देणं; गरिबाला दान करणं हे सुफळ [अति उपयोगी] आहे.

Monday, March 18, 2013

७५८. को न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरित: |

मृदुङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम् ||

अर्थ

या जगात तोंडी [काहीतरी लाच] मिळाल्यावर कोण बरे अनुकूल होत नाही ? [निर्जीव असा] तबला [सुद्धा] त्याच्या मुखावर [शाईचा] लेप लावल्या [नंतर] मधुर आवाज काढू लागतो.

७५७. यद्ददासि विशिष्टेभ्यो यच्चाश्नासि दिने दिने |

तत्ते वित्तमहं मन्ये शेषं कस्यापि रक्षसि ||

अर्थ

दररोज [तू] जे खातोस [वापर करतोस; उपभोग घेतोस] आणि विशेष व्यक्तींना [गुणांनी उत्कृष्ट किंवा खऱ्या गरजू ] दान करतोस, ते तुझे पैसे. उरलेली [संपत्ती] दुसऱ्या कोणाचीतरी आणि [तू फक्त] रखवालदार असं मला वाटत. [माणूस खरं तर पैशाचा उपभोग किंवा पात्र व्यक्तीला दान करेल तर ते पैसे मालकीने उपभोगले. नाहीतर वारस; चोर; कर यांनाच त्याचा उपयोग. त्यांचाच तो पैसा.]

७५६. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये |

भावे हि विद्यते देवस्तस्माद् भावो हि कारणम् ||

अर्थ

देवाच [अस्तित्व] लाकडात असत असं नाही किंवा दगडात असत असं नाही. तसंच मातीच पण आहे. [भक्ताच्या] भावनेमुळे देव असतो. [भक्ती भगवंताला खेचून तेथे आणते] म्हणून भाव हेच [देवाच्या जागृततेच] कारण आहे.

Friday, March 15, 2013

९५५. मुग्धा दुग्धधिया गवां विदधते कुम्भानधो बल्लवाः कर्णे कैरवशङ्कया कुवलयं कुर्वन्ति कान्ता अपि |

कर्कन्धूफलमुच्चिनोति शबरी मुक्ताफलाशङ्कया सान्द्रा चन्द्रमसो न कस्य कुरुते चित्तभ्रमं चन्द्रिका ||

अर्थ

[प्रसन्न असं ] दाट चांदण कुणाच्या मनात गोंधळ निर्माण करत नाही बरे? [ज्योत्स्ना सर्वांनाच फसवते] साधे असे गवळी [शुभ्र अशा चन्द्रकिरणांना] दूध समजून गाईंच्या [अचळां] खाली चरव्या धरतात. नीलकमल हे पद्म आहे [श्वेत कमळ] असं वाटून तरुणी ते कानावर ठेवतात. भिल्लीण मोती समजून बोरच उचलते झालं. [भ्रन्तिमान अलंकाराच उदाहरण]

Thursday, March 14, 2013

९५४. न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिर: |

यो वै युवाप्यधीयानस्तं देवा: स्थविरं विदु: ||

अर्थ

ज्याच्या डोक्यावरचे केस पांढरे झाले आहेत त्यामुळे तो म्हातारा असं नसत. [माणूस] जरी तरुण असला तरी [खूप] अभ्यास करत असेल, तर त्याला देव 'वृद्ध ' असे म्हणतात.[ नुसत वय वाढलं म्हणून म्हातारे सगळेच होतात पण ज्ञानवृद्ध होण्यासाठी वय वाढण्याची जरुरी नाही. तसं होण कौतुकास्पद आहे.]

Wednesday, March 13, 2013

९५३. षट्पद: पुष्पमध्यस्थो यथा सारं समुद्धरेत् |

तथा सर्वेषु शास्त्रेषु सारं गृह्णन्ति पण्डिताः ||

अर्थ

फुलाच्या मधल्या भागामधून ज्याप्रमाणे भुंगा त्यातलं सार [मकरंद अचूक] घेतो, त्याप्रमाणे ज्ञानी लोक सर्व शास्त्रांमधून त्यातील अगदी गाभा समजून घेतात.

Tuesday, March 12, 2013

९५२. मयूखैर्जगत: सारं ग्रीष्मे पेपीयते रवि: |

स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम् || सुश्रुत

अर्थ

ग्रीष्म ऋतु मध्ये सूर्य पृथ्वीवरील आर्द्रता संपूर्णपणे शोषून घेतो. अशावेळी गोड, थंड; ओलसर आणि स्निग्ध  अशा खाद्य आणि पेय पदार्थांच सेवन करणे हितकर असते.

Monday, March 11, 2013

९५१. असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमूर्वी |

लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति ||

अर्थ

हे देवा [भगवान शंकरा]; समुद्राची पात्र [दौत] करून त्यात डोंगराएवढं काळकाळ काजळ [शाई म्हणून ओतलं], कल्पवृक्षाची सुंदर फांदीची लेखणी [टाक; पेन] केली, [लिहायला कागदाचं] पान म्हणून [सगळी] पृथ्वी, आणि  असं जर समजलं की [प्रत्यक्ष] शारदा [ज्ञानाची देवता] सतत लिहितेय तरी सुद्धा तुझं गुणवर्णन पूर्ण होऊ शकणार नाही. [एवढा तुझा महिमा थोर आहे.]

९५०. संस्थितस्य गुणोत्कर्ष: प्राय: प्रस्फुरति स्वयम् |

दग्धस्यागरुखण्डस्य स्फारीभवति सौरभम् ||

अर्थ
बहुशः मृत्यूच्या वेळी आपोआपच जो गुण माणसात असेल त्याचा प्रकर्ष होतो. अगरुचं खोड जाळलं की सुवास फारच दरवळतो.

Saturday, March 9, 2013

९४९. आरभन्तेऽल्पमेवाज्ञाः कामं व्यग्रा भवन्ति च |

महारम्भा कृतधियः तिष्ठन्ति च निराकुलाः ||

अर्थ

अडाणी लोक एखाद्या  छोट्याशाच कामाला सुरवात करतात आणि त्यात अगदी बुडून जातात. पूर्ण निश्चय केलेले थोर लोक मात्र खूप मोठ काम अंगीकारलं तरी शांत राहतात. [ते कसं करू म्हणून घाबरत नाहीत किंवा अस्वस्थ होत नाहीत.]

Friday, March 8, 2013

९४८. अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः |


धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः || मनुस्मृति

अर्थ

अडाणी लोकांपेक्षा जे पुस्तक जवळ ठेवतात ते बरे. ग्रंथसंग्रह करणारांपेक्षा जे [त्यातला मजकूर] पाठ करतात ते चांगले. [नुसतं] पाठ करणारांपेक्षा अर्थ ज्यांना समजतो ते चांगले आणि त्याही पेक्षा जे त्या गोष्टी आचरणात आणतात ते सर्वात चांगले.

Thursday, March 7, 2013

९४७. जले तैलं; खले गुह्यं; पात्रे दानं मनागपि |

प्राज्ञे शास्त्रं स्वयं याति विस्तारं वस्तुशक्तित: ||

अर्थ

जरी अगदी थोड्याप्रमाणात असल्या तरी पाण्यामध्ये तेल ; दुष्ट लोकांना रहस्य ठाऊक होणं; लायक व्यक्तीला केलेल दान; हुशार विद्यार्थ्याला शिकवलेली विद्या ही शक्य तेवढी विस्तृत होते. [त्यांच्या त्यांच्या सामर्थ्यामुळेच तसं घडत.]

९४६. शुन: पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्यया विना |

न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे ||

अर्थ

कुत्र्याची शेपूट जशी केवळ निरुपयोगी असते- ना ती लज्जा रक्षण करू शकते ना चावा थांबवू शकते अगदी तसंच शिक्षणाशिवाय जगणं निरर्थक आहे. [कुठलीही एक तरी  विद्या शिकणं अगदी जरूर आहे.]

Tuesday, March 5, 2013

९४५. लालने बहवो दोषास्ताडने बहवो गुणा: |

तस्मात् पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत् ||

अर्थ

[मुलगा किंवा विद्यार्थी] यांना लाडावून ठेवण्यात बरेच दोष आहेत आणि शिस्त लावण्याचे बरेच गुण [हितकारक] आहे म्हणून मुलांना किंवा विद्यार्थ्यांना शिस्त लावावी, लाडावून ठेवू नये.

Monday, March 4, 2013

९४४. मूढानुमानसंसिद्धं दैवं यस्यास्ति दुर्मतेः |

दैवाद्दाहोऽस्ति नैवेति गन्तव्यं तेन पावके || योगवासिष्ठ

अर्थ

जो  मूर्ख माणूस तर्कट रचून नशीब आहे असं सिद्ध करत असेल त्यानी; आपल्या नशिबानीच भाजणार असं म्हणत असेल त्यानी आगीत शिराव. [तुम्ही आगीत गेलात; तसंच वाईट परिणामाची कृत्य केली तर ते भोगावेच लागतील. नशिबाला दोष देऊन उपयोग नाही.]

९४३. लोले ब्रूहि ; कपालिकामिनि? पिता कस्ते ?पति: पाथसां क: प्रत्येति जलादपत्यजननं? प्रत्येति य: प्रस्तरात् |


इत्थं पर्वतराजसिन्धुसुतयोराकर्ण्य वाक्चातुरीं सस्मेरस्य हरेर्हरस्य च मुदो निघ्नन्तु विघ्नं तव ||

अर्थ

"अग चंचल अशा लक्ष्मी; सांग."; "काय गं रुंडमाळ घालणाऱ्या शंकराची बायको असलेल्या [बये]?"; "बाप कोण ग तुझा?"; उदकाचा स्वामी [समुद्र]"; "पाण्यापासून मूल जलमलेलं कुणाला गं पटेल?" ज्याला दगडातून मूल पटत त्यालाच."अशा प्रकारे गिरिजा आणि लक्ष्मी यांच्या बोलण्यातलं चातुर्य बघून स्मितहास्य करणाऱ्या भगवान शंकर आणि भगवान विष्णु यांचा आनंद तुझे संकट हरण करो.

९४२. य: परस्य विषमं विचिन्तयेत्प्राप्नुयात्स कुमतिः स्वयं हि तत् |

पूतना हरिवधार्थमाययौ प्राप सैव वधमात्मनस्तत: ||

अर्थ

जो दुष्टबुद्धीचा मनुष्य दुस-याचं वाईट चिंतेल त्याच्या स्वतःच्याच वाट्याला ते येत. बाळ श्रीकृष्णाला मारण्यासाठी पूतना राक्षशीण गेली, पण ती स्वतःच मरून गेली.

Friday, March 1, 2013

९४१. निमित्तमुद्दिश्य च यः प्रकुप्यति ध्रुवं स तस्यापगमे प्रसीदति |

अकारणद्वेषि मनस्तु यस्य वै कथं जनस्तं परितोषयिष्यति ||

अर्थ

जर कुठल्यातरी कारणाने एखादा माणूस खूप चिडत असेल तर ते कारण नाहीस झाल्यावर तो नक्कीच खूष होतो. [म्हणून अशा माणसाना खुश करणं जमेल] पण ज्याचा स्वभाव उगाचच चिडचिडेपणा करण्याचा असेल त्याला कसं बरं खुश करणार हो?