भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, July 31, 2014

१३३०. अश्वः शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नरश्च नारी च |

पुरुषविशेषं प्राप्ता भवन्ति योग्या अयोग्याश्च ||

अर्थ

घोडा; कुठलही हत्यार; शास्त्र; वीणा [कुठलंही वाद्य अगदी] माणसं सुद्धा विशिष्ट माणसांचा [आश्रय मिळाल्यास] चांगली [गुणांचा परिपोष होऊन] किंवा सामान्य [विकास न झाल्यामुळे] राहतात. [मित्र; मालक किंवा मोठे नातेवाईक हे पारख करून आणि चांगला वाव देऊन; प्रेरणा देऊन  प्रगती करतात त्या त्या वस्तूंची तेच योजक चांगला नसेल तर अधोगती सुद्धा होते.]

Monday, July 28, 2014

१३२९. अकिञ्चनः सन्प्रभवः स सम्पदां त्रिलोकनाथः पितृसद्मगोचरः |

स भीमरूपः शिव इत्युदीर्यते न सन्ति याथार्थ्यविदः पिनाकिनः || कुमारसंभव पाचवा सर्ग

अर्थ

[भगवान शंकर] कफल्लक [दिसले] तरी सर्व संपत्तीचे ते जनक आहेत. स्मशानात त्यांचा वास असला तरी ते त्रैलोक्याचे स्वामी आहेत. रौद्र दिसत असूनही शिव [कल्याणकारक] असं त्यांना म्हणतात. त्यांच्या  खऱ्या स्वरूपाचं आकलन कोणाला होत नाही.

Sunday, July 27, 2014

१३२८. रामाद्याचय मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्लाङ्गलं प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभः फालं त्रिशूलं तव |

शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कन्दोऽस्ति गोरक्षणे खिन्नाहं हर भिक्षया कुरु कृषिं गौरीवचः पातु वः ||

अर्थ

हे शंकरा; [परशु] रामाला जमीन मागा; कुबेराकडून बियाण घ्या; बलरामाकडून नांगर; यमाचा रेडा; तुमच्याकडे बैल; फाळ आणि त्रिशूल आहेच. मी [अन्नपूर्णा असल्याने] अन्न द्यायला समर्थ आहे; कार्तिकस्वामी गुर सांभाळेल. भीक मागण्यामुळे मला नैराश्य आलय. तेंव्हा तुम्ही जमीन कसा. हे देवी पार्वतीचे वचन तुमचे रक्षण करो.

१३२७. कृतान्तस्य दूती जरा कर्णमूले समागत्य वक्तीति लोकाः श्रुणुध्वम् |

परस्त्रीपरद्रव्यवाञ्छां त्यजध्वं भजध्वं रमानाथपादारविन्दम् ||

अर्थ

[अगदी] कानापाशी येऊन यमाची दूत असलेली जरा [म्हातारपण] म्हणते "अरे बाबांनो; ऐका; [मी यमाचीच दूती आहे मरण जवळ येऊन ठेपलंय तर आता तरी] परस्त्रीची किंवा दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा सोडून द्या. लक्ष्मीपतीच्या चरणकमलांची भक्ती करा.

Friday, July 25, 2014

१३२६. यद्धात्रा निजभालपट्टलिखितं स्तोकं महद्वा धनं तत्प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ ततो नाधिकम् |

तद्धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृतिं वृथा मा कृथाः कूपे पश्य पायोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् ||

अर्थ

ब्रह्मदेवाने [माणसाच्या] कपाळावर जी काही थोडी किंवा बहुत संपत्ती लिहिली असेल तेवढीच तो वाळवंटात गेला तरी मिळते; [सोन्याच्या] मेरु पर्वतावर गेला तरी  तेवढीच मिळते, त्यापेक्षा जास्त मिळतच नाही. म्हणून [तू] धीर धर. श्रीमंतांपुढे लाचारी करू नकोस. असं पहा की विहिरीवर गेलं काय की समुद्राशी दोन्हीकडे सारखचं [आपला] घडा भरूनच पाणी मिळणार.

Thursday, July 24, 2014

१३२५. कष्टा वृत्तिः पराधीना कष्टो वासो निराश्रयः |

निर्धनो व्यवसायश्च सर्वकष्टा दरिद्रता ||

अर्थ

उपजीविकेचं साधन दुसऱ्यावर अवलंबून असलं तर फार त्रासाचं असतं. कुणाचाही आधार नसताना राहणं कठीण आहे. पैसे नसताना धंदा काढणे अवघड आहे. आणि या सर्वापेक्षा गरिबी फार त्रासदायक आहे.

१३२४. यथा चतुर्भिःकनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः|

तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ||

अर्थ

ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा चार प्रकारांनी करतात घासून; तुकडा पाडून; तापवून आणि आघात करून तसंच माणसांची परीक्षा त्याच शिक्षण; चारित्र्य; घराणं आणि काम यावर करतात.

Tuesday, July 22, 2014

१३२३. अम्भसा भिद्यते सेतुस्तथा मन्त्रोऽप्यरक्षितः |

पैशुन्याद्भिद्यते स्नेहो वाचा भिद्येत कातरः ||

अर्थ

पाण्याच्या [लोंढ्याच्या जोराने] भिंत भंगते. त्याचप्रमाणे गुप्तता पाळली नाही तर  मसलत फुटते. [षटकणीं होते] दुष्टपणा मुळे प्रेम नाहीस होत. [नुसतं] तोंडाच्या [धाकाने] घाबरट माणूस भिऊन जातो.

१३२२. चन्दनं शीतलं लोके चन्दनादपि चन्द्रमाः |

चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः ||

अर्थ

या जगात चंदन हे शीतल असत. चंदनापेक्षाही चन्द्र अधिक शीतल असतो. [पण] सज्जनांचा सहवास हा चन्द्र आणि चंदन यांपेक्षाहि अधिक शीतल असतो.

Monday, July 21, 2014

१३२१. अनुभवत ददत वित्तं मान्यान्मानयत सज्जनान्भजत |

अतिपरुषपवनविलुलितदीपशिखाचञ्चला लक्ष्मीः ||

अर्थ

[सुखदायक गोष्टींचा] अनुभव घ्या; संपत्ती दान करा; आदरणीय लोकांना मान द्या. सज्जनांचा आश्रय घ्या. [श्रीमंती आहे यावर विसंबून या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका कारण] झंझावाती  वाऱ्याच्या झोतात असल्यामुळे फडफडणाऱ्या दिव्याच्या ज्योति प्रमाणे लक्ष्मी ही अतिशय चंचल असते.

१३२०. मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान्विषवत्त्यजेः |

क्षमार्जवदयाशौचं सत्यं पीयूषवत्पिबे: ||

अर्थ

जर तुला मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विषाप्रमाणे त्याज्य समजून त्याग कर आणि क्षमा; सरळपणा; दया; पवित्रता आणि सत्य अमृतासमान मानून त्याचे ग्रहण कर.

Monday, July 14, 2014

१३१९. सर्वे कङ्कणकेयूरकुण्डलप्रतिमा गुणाः |

शीलं चाकृत्रिमं लोके लावण्यमिव भूषणम् ||

अर्थ

या जगात [कलेमधलं कौशल्य; श्रीमंती; हुशारी असे] सगळे गुण हे बांगड्या; बाजूबंद कर्णभूषणे याप्रमाणे आहेत. चारित्र्य हा गुण नैसर्गिक सौंदर्यासारखा सर्वश्रेष्ठ आहे.

१३१८. वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैस्तनूमार्जनं भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |

पाठः संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे हा हा हन्त तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

अर्थ

[पोपट महाराज बोलतायत] माझा निवास सोन्याच्या पिंजऱ्यात आहे; राजेसाहेबांच्या करकमलानी स्नान होतय; गोडगोड आंबे, डाळिंब याचा आहार; अमृतासारखे पाणी प्यायला मिळतय; बुद्धिमान अशा मला दरबारात सतत रामनाम घ्यायचं काम [इतक्या सगळ्या आनंददायी गोष्टी लाभून सुद्धा] अरेरे माझं मन मात्र जिथे जन्म झाला त्या वृक्षाच्या फांदीकडेच धाव घेतय. [शुकान्योक्ती - शुक = पारतंत्र्यातली व्यक्ती ]

Wednesday, July 9, 2014

१३१७. वयं काका वयं काका जल्पन्तीति प्रगे द्विकाः |

तिमिरारिस्तमो हन्यादिति शङ्कितमानसाः ||

अर्थ

पहाटे कावळे [सूर्याला सांगण्यासाठी] "आम्ही कावळे आहोत; आम्ही कावळे आहोत असं ओरडत असतात. कारण तिमिरारि [अंधाराचा शत्रु असलेला] सूर्य तम [असं समजून] त्यांना मारून टाकेल ना, म्हणून ते घाबरलेले असतात!

१३१६. लङ्कापतेः संकुचितं यशो यद्यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्रः |

स सर्व एवादिकवेः प्रभावः न कोपनीयाः कवयः क्षितीन्द्रैः ||

अर्थ


रावणाची कीर्ति जी कमी झालीय आणि श्रीरामाचा मात्र सगळीकडे कीर्तीचा डंका; हा सगळा आदिकवी [वाल्मिकी यांच्या मताचा] प्रभाव होय. [थट्टेत कवि म्हणतो] राजांनी कवींचा रोष ओढवून घेऊ नये. [ते जर रागावले तर निंदा करतील ना!]

Monday, July 7, 2014

१३१५. ययोरेव समं वित्तं ययोरेव समं कुलम् |

तयोर्मैत्री विवाहश्च न तु पुष्टविपुष्टयोः ||

अर्थ

ज्या दोन घराण्यात सांपत्तिक स्थिती [साधारण] सारखी असते आणि रितीरिवाज [बरेचसे] सारखे असतात त्यांच्यात मैत्री व विवाह करावेत खूप फरक असल्यास करू नये.

१३१४. को लाभो गुणिसंगमः किमसुखं प्राज्ञेतरै: संगतिः का हानिः समयच्युतिर्निपुणता का धर्मतत्वे रतिः |

कः शूरो विजितेन्द्रियःप्रियतमा कानुव्रता किं धनं विद्या किं सुखमप्रवासगमनं राज्यं किमाज्ञाफलम् ||
अर्थ = [या जगात] फायदा कुठला? गुणी लोकांशी सहवास. दुःख कशाला म्हणाव? मूर्ख लोकांशी संगत. तोटा कुठला? वेळ वाया जाणं. कौशल्य म्हणजे काय? धर्मावर प्रेम असणं. शूर कुणाला म्हणावं? ज्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा आहे त्याला. अगदी आवडती कोण? जी आपल्या कल्याणासाठी झटते ती. संपत्ती कुठली? विद्या. दुःख कोणते? पापाची आवड. राज्य म्हणजे काय? आपली आज्ञा पाळली जाणं.

१३१३. नवे वयसि यः शान्तः स शान्त इति मे मतिः |

धातुषु क्षीयमाणेषु शान्तिः कस्य न जायते ||

अर्थ

तरुणपणी जो शान्त स्वभावाचा असतो तो खरा शान्त असे मला वाटते. ताकदीचा ऱ्हास व्हायला लागल्यावर [नाईलाजाने] कोण शान्त बसत नाही?

Saturday, July 5, 2014

१३१२. परिचरितव्याः सन्तः यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |

यास्तेषां स्वैरकथाः ता एव भवन्ति शास्त्राणि ||

अर्थ

सज्जन जरी सदुपदेश करत बसले नाहीत तरी त्यांची सेवा करावी [त्यांच्या सहवासात रहावे] त्यांच्या [नुसत्या] सहजी गप्पा सुद्धा शास्त्रांना धरूनच असतात. [त्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर ज्ञान होऊन जात.]

Wednesday, July 2, 2014

१३११ . हंसो विभाति नलिनीदलपुञ्जमध्ये सिंहो विभाति गिरिगव्हरकन्दरासु |

जात्यो विभाति तुरगो रणयुद्धमध्ये विद्वान्विभाति पुरुषेषु विचक्षणेषु ||

अर्थ

कमळांच्या ताटव्या मधे हंस शोभून दिसतो; पर्वतावरील कडेकपारीत सिंह शोभून दिसतो; जातिवंत घोडा युद्धभूमीवर शोभून दिसतो; [या गोष्टींप्रमाणेच] विद्वान पण्डित हा ज्ञानी लोकांमध्ये शोभून दिसतो.

Tuesday, July 1, 2014

१३१०. न केनापि श्रुतं दृष्टं वारिणा वारि शुष्यति |

अहो गोदावरीवारा भवसिन्धुर्विनश्यति ||

अर्थ

कुणीही असं पाहिलेलं किंवा ऐकलेलं नाही की [एका] पाण्यानी [दुसरं] पाणी सुकून जात. पण काय आश्चर्य हा [अख्खा] संसारसागर  गोदावरी मातेच्या तीर्थाने नाहीसा होतो.