भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, September 28, 2011

४६२. भक्ष्योत्तमप्रतिछन्नं मत्स्यो बडिशमायसम् |

लोभाभिपाती ग्रासते नानुबन्धमवेक्षते ||

अर्थ

हावरटपणाने मासा उत्तम प्रकारच्या खाद्याने चांगल्या प्रकारे झाकलेला लोखंडाचा गळ पकडतो; परिणामाचा विचार करत नाही [ त्या हावरटपणाचा परिणाम म्हणून त्याला प्राण गमवावे लागतात म्हणून कोणतही काम करण्या आधी परिणामाचा विचार करावा.]

४६१. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मन: |

किन्नु मे पशुभिस्तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति ||

अर्थ

मी आचरण करतो त्यापैकी काय जनावराच्या सारखं आहे आणि काय सज्जनासारखे आहे असं माणसांनी रोज आत्मपरिक्षण केले पाहिजे. [म्हणजे योग्य ती सुधारणा करता येईल ]

४६०. भोजनान्तेऽमृतं तक्रं स्वापादौ दुग्धममृतम् |

निशान्ते चामृतं वारि सर्वदैवामृतं मधु ||

अर्थ

जेवणाच्या शेवटी ताक पिणं हे अमृतासारखं [तब्बेतीला चांगलं] असतं. झोपण्यापूर्वी दूध पीण चांगले. रात्र संपल्यावर [पहाटे] पाणी पीण अमृतासारखं असतं आणि मध नेहमीच [तब्बेतीला चांगला असतो.]

४५९. भद्र सूकर; गच्छ त्वं ; ब्रूहि सिंहो मया जित: |

पण्डिता एव जानन्ति सिंहसूकरयोर्बलम् ||

अर्थ

हे भल्या डुकरा; तू [खुशाल] जा [आणि सगळ्या जगाला] सांग की मी सिंहाला जिंकलं आहे. सिंह आणि डुक्कर या दोघांचे सामर्थ्य विद्वानांना [नक्कीच] ठाऊक असते. [अन्योक्ती अलंकाराचे हे सुंदर उदाहरण आहे जेंव्हा एखाद्याची स्तुती किंवा निंदा करायची असेल तेंव्हा सरळ त्याच्या बद्दल न बोलता दुसऱ्याशीच बोलून त्या भावना व्यक्त केलेल्या असतात तेंव्हा अन्योक्ती हा अलंकार होतो.]

४५८. अनुबन्धमवेक्षेत सर्वकार्येषु सर्वदा |

संप्रधार्य च कुर्वीत; सहसा न समाचरेत् ||

अर्थ

नेहमी सगळ्याच कामांच्या बाबतीत परिणामांचा नीट विचार करून मगच कुठलही काम करावं. अचानक [काही विचार न करता] करू नये.

४५७. या लोभात् या परद्रोहात् य: पात्रे य: परार्थके |

प्रीति: लक्ष्मी: व्यय: क्लेश: सा किं सा किं स किं स किम् ||

अर्थ

जे प्रेम लोभातून केलेलं असतं त्याचा काय बरं उपयोग? दुसऱ्याचा द्वेष करून मिळवलेल्या संपत्तीचा काय बर उपयोग? जो खर्च योग्य ठिकाणी [लायक व्यक्ती साठी] केला असेल त्याचं [दु:ख ] करण्याचं काही कारण नाही. दुसऱ्यासाठी त्रास करून घेतला तर त्याचा काय बरं उपयोग? [यथासांख्य अलंकाराच हे सुंदर उदाहरण आहे.]

Thursday, September 22, 2011

४५६. शुभं वाप्यशुभं वा स्यात्‌ ; द्वेष्यं वा यदि वा प्रियम् |

अपृष्टोऽपि वदेत्सत्यं यस्य नेच्छेत् पराजयम् ||महाभारत ; विदुरनीति

अर्थ

ज्याचा पराभव [तोटा; अपमान ] होऊ नये अशी आपली इच्छा असेल; त्याने विचारले नाही तरी; आपण सांगत असलेली गोष्ट जरी [तुझं] चांगले होईल किंवा वाईट होईल असं सांगाव लागत असलं तरी; [त्याला] आवडत असेल किंवा राग येत असेल तरी सुद्धा खरं असेल तसच सांगून टाकावे.

४५५. उपकारिषु य: साधु: साधुत्वे तस्य को गुण: |

अपकारिषु य: साधु: स साधु; सद्भिरुच्यते ||

अर्थ

आपल्यावर उपकार करणा-यांशी जो चांगला वागतो त्यात त्याचा चांगुलपणा तो काय? [हा तर व्यवहार आहे] आपल्याला त्रास देणाराशीही जो चांगला वागतो [त्याला मदत करतो] त्याची सज्जन लोक सज्जन अशी [प्रशंसा ] करतात.

Tuesday, September 20, 2011

४५४. किं कोकिलस्य विरुतेन गते वसन्ते? किं कातरस्य बहुशस्त्रपरिग्रहेण |

मित्रेण किं व्यसनकालपराङ्मुखेण? किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण ||

अर्थ

वसंत ऋतु संपल्यावर कोकिळेच्या ओरडण्याचा काय बरं उपयोग? [वसंत ऋतु मध्येच कोकीलाचा आवाज सुरेल येतो. नंतर फारसा चांगला नसतो.] भित्र्या माणसाजवळ खूप शस्त्रे असून काय उपयोग? [तो ती वापरत नाही] संकटाच्यावेळी निघून जाणाऱ्या मित्राचा काय बरं उपयोग? अशिक्षित माणसाच जगणं तसच निरर्थक असत.

४५३. अपां निधिं वारिभिरर्चयन्ति दीपेन सूर्यं प्रतिबोधयन्ति |

ताभ्यां तयोः किं परिपूर्णता स्यात्‌ भक्त्या हि तुष्यन्ति महानुभावा: ||

अर्थ

पाण्याचा [फार मोठा] साठा असणाऱ्या [समुद्राला] पाण्याने [अर्घ्य सोडून] त्याची पूजा करतात. [तेजाचा केवळ पुंज असणाऱ्या] सूर्याला दिवा ओवाळून त्याची पूजा करतात. [मुळातच त्या पदार्थांचा खजिना असणाऱ्या त्याच गोष्टी दिल्यामुळे त्यांच्यात काय वाढ होणार आहे? [त्यासाठी अर्घ्य किंवा ओवाळणं नसतच ] थोर लोक त्यांना दाखवलेल्या भक्तीनेच प्रसन्न होतात.

४५२. अभ्रच्छाया खलप्रीति: समुद्रान्ते च मेदिनी |

अल्पेनैव विनश्यन्ति यौवनानि धनानि च ||

अर्थ

[आकाशातील] ढगांची रचना; दुष्ट माणसाचं प्रेम; समुद्र किनाऱ्यावरची जमीन; तारुण्य आणि [फार मोठ्या प्रमाणात असूनही] संपत्ती झटक्यात नष्ट होऊ शकतात.

४५१. यद्वञ्चनाहितमतिर्बहुचाटुगर्भं कार्योन्मुख: खलजन: कृतकं ब्रवीति |

तत्साधवो न न विदन्ति ; विदन्ति किन्तु कर्तुं वृथा प्रणयमस्य न पारयन्ति ||

अर्थ

फसवण्याची बुद्धी धरून कुठलं तरी आपलं काम करवून घेण्यासाठी दुष्ट मनुष्य जे खोटं असं अतिशय गोड बोलतो ते सज्जनांना समाजात नाही असे नाही. त्यातला खोटारडेपणा त्यांना समजतो. पण [आपल्याला त्याने केलेली] विनंती वाया जाऊ देणं त्यांना बरं वाटत नाही. [दुष्ट माणसाचा खोटारडेपणा समजूनही ते त्याला मदत करतात.]

Thursday, September 15, 2011

४५०. श्रद्दधान: शुभां विद्यामाददीतावरादपि |

अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम् ||

अर्थ

श्रद्धाळू माणसाने कल्याणकारक विद्या जरी हीन माणसाकडे असली तरी शिकून घ्यावी. आपल्या शत्रूकडून सुद्धा चांगला गुण असेल तर शिकून घ्यावा. शहाण वचन असलं तर लहान मूल बोलल असलं तरी विचारात घ्यावं.

४४९. सुखमर्थो भवेत्‌ दातुं सुखं प्राणा: सुखं तप: |

सुखमन्यत् भवेत्सर्वं दुःखं न्यासस्य रक्षणम् || स्वप्न - वासवदत्त ; भास

अर्थ

पैशाचं दान करण सोप आहे. प्राण देणसुद्धा सुखानी जमेल. पुण्य सुद्धा दान करता येईल. इतर काहीही सुखाने दान करता येईल. [पण दुसऱ्याची] ठेव सांभाळण फार कठीण असतं.

४४८. वाच्यतां समयोऽतीत: स्पष्टमग्रे भविष्यति |

इति पाठयतां पाठे काठिन्यं कुत्र वर्तते ?

अर्थ

"वाचा; वाचा [तुम्ही स्वतः वाचल्याशिवाय समजणार नाही]; आता वेळ संपला; [हे ना] पुढे नीट कळेल" आशा प्रकारे शिकवणाराना धड्यात अवघड ते काय असणार ?

४४७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनै: सज्जनैरपि |

स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिका: ||

अर्थ

[एकाच वेळेला] खूप जणांशी विरोध करू नये. ते सज्जन असूत का दुर्जन [पण एकाच वेळी खूप लोकांशी भांडल्यामुळे आपला पराभवच होईल.] अगदी सळसळता नागराज असला तरी [अगदी क्षुद्र असूनही संख्या मोठी असल्यामुळे] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.

४४६. काव्यस्फूर्ति: कवीन्द्रस्य गायकस्य तथा स्वर : |

रोदनं बालकस्यापि कालं पश्यन्ति न क्वचित् ||

अर्थ

गायकाचा आवाज श्रेष्ठ; कवीच्या प्रतिभेचा उन्मेष आणि लहान मुलाच रडणं काळवेळाच भान ठेवत नाहीत.

४४५. कर्णामृतं सूक्तिरसं विमुच्य दोषेषु यत्नः सुमहान् खलस्य |

अवेक्षते केलिवनं प्रविष्टः क्रमेलक: कण्टकजालमेव ||

अर्थ

दुष्ट माणूस अमृताप्रमाणे असणारी चांगली वचने सोडून देऊन दोष शोधण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतो. उंट केळीच्या बागेत गेला तरी काटेच शोधत राहतो.

४४४. एह्यागच्छ गृहाणमासनमिदं कस्माच्चिरात् दृश्यसे? का वार्ता? ह्यतिदुर्बलोऽसि कुशलं प्रीतोऽस्मि ते दर्शनात् |

एवं ये समुपागतान्प्रणयिन: प्रल्हादयन्त्यादरात् तेषां युक्तमशङ्कितेन मनसा हर्म्याणि गन्तुं सदा ||

अर्थ

"या; या; ह्या आसनावर बसा; किती दिवसांनी भेटलात! [तुमच्याकडची] काय बातमी? किती खराब झालात [सगळं] खुशाल आहे ना? तुमच्या भेटीमुळे [मला फार] आनंद झाला" अशाप्रकारे प्रेमळ असे जे लोक पाहुण्यांना आनंदित करतात त्यांच्या घरी नेहमी निर्धास्तपणे जाणे चांगल [कंटाळा करणाऱ्याकडे जाऊ नये.]

४४३. एहि गच्छ पतोत्तिष्ठ वद मौनं समाचर |

एवमाशाग्रहग्रस्तैः क्रीडन्ति धनिनोऽर्थिभिः ||

अर्थ

"ये रे; [नको] जा; पड; उभा रहा; बोल; [नको बोलूस] गप्प बस" अशाप्रकारे श्रीमंत लोक आशा रूपी भुताने पछाडलेल्या याचकांशी खेळ करतात.

४४२. तावद्भयाद् हि भेतव्यं यावद्भयमनागतम् |

आगतं तु भयं वीक्ष्य प्रहर्तव्यमभीतवत् ||

अर्थ

जो पर्यंत भीतीदायक परिस्थिती आली नाही तोपर्यंतच आपण घाबरावं. पण तशी परिस्थिती आल्यावर अगदी न भीता उलट प्रतिकार करावा.

४४१. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: |

गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||

अर्थ

गुरु हा ब्रह्मा; विष्णु: महेश या देवांचे रूपच असतो. तो मुर्तीमंत परब्रह्मच होय. अशा प्रकारच्या गुरुंना माझा नमस्कार असो.

४४०. भक्तापराधमन्त: स्थापयितुं स्थूलमस्ति यज्जठरम् |

श्रोतुं दु;खं कर्णौ यस्य च शूर्पाकृती नमस्तस्मै || कवि मुकुंदराय

अर्थ

भक्तांचे अपराध सामावून घेण्यासाठी ज्याचे पोट विशाल आहे अशा; भक्तांची दु:खे ऐकून घेण्यासाठी ज्याचे कान सुपासारखे मोठे अशा [देवा गजाननाला] माझा नमस्कार असो.