भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, September 30, 2013

११११. ज्ञानेन पुंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः |

ज्ञानस्य मत्वेति गुणान् कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः

अर्थ

ज्ञान असल्यामुळे सर्व इच्छित गोष्टी पूर्ण होतात; ज्ञान असल्याशिवाय काहीच [संपत्तीसुद्धा] मिळत नाही. या ज्ञानाच्या गुणांवर विचार करून थोर लोक कधीही ज्ञान संपादन करणे सोडून देत नाहीत.

Friday, September 27, 2013

१११०. अणुपूर्वं बृह्त्पश्चाद्भवत्यार्येषु सङ्गतम् |

विपरीतमनार्येषु यथेच्छसि तथा कुरु ||

अर्थ

सज्जन लोकांशी मैत्री करताना सुरवातीला थोडा वेळ सहवास झाला तरी हळूहळू ति [मैत्री] वाढत जाते. [स्नेह उत्तरोत्तर वृद्धिंगत होतो.] याच्या उलट दुर्जानांच्या मैत्रीच आहे. [याचा विचार करून] तुला जसं [योग्य] वाटेल तसं [मैत्री] कर.

Thursday, September 26, 2013

११०९. कदर्थितस्यापि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम् |

अधोमुखस्यापि कृतस्य वह्नेर्नाधः शिखा यान्ति कदाचिदेव || नीतिशतक  राजा भर्तृहरी

अर्थ

धैर्यशील माणसाचा अपमान करून कधीही त्याचं धैर्य खच्ची करता येत नाही. [मशालीचा]  दांडा वर करून ठेवला तरी ज्वाळा नेहमी वरच उसळून येतात.

Wednesday, September 25, 2013

११०८. यो यमर्थं प्रार्थयते यदर्थं घटतेऽपि च |

अवश्यं तदवाप्नोति न चेच्छ्रान्तो निवर्तते ||

अर्थ

जर एखाद्या व्यक्तीला कुठलं ध्येय गाठण्याची इच्छा असेल; तो त्या मार्गाने प्रयत्न करत असेल; तर मधेच थकून [किंवा कंटाळून] जर तो माघारा फिरला नाही तर तो ते ध्येय नक्कीच गाठतो. [इच्छित गोष्ट मिळेपर्यंत अथक प्रयत्न केले तर कितीही अवघड असलं तरी ती मिळवता येतेच.]

Tuesday, September 24, 2013

११०७. धृतिः क्षमा दया शौचं कारुण्यं वागनिष्ठुरा |

मित्राणां चानभिद्रोहः सप्तैताः समिधः श्रियः ||

अर्थ

तितिक्षा [सहनशीलता ] दया; पावित्र्य [खोटेपणा न करण्याचं पावित्र्य]; दुसऱ्यांचा विचार करणं; गोड बोलणं; मित्रांचा विश्वासघात न करणं; श्रीमंती प्राप्त करण्याच्या यज्ञातल्या या सात समिधा आहेत.

Monday, September 23, 2013

११०६. तन्मूलं गुरुतायास्तत्सौख्यं तद्यशस्तदौर्जित्यम् |

तत्सौभाग्यं पुंसां यदेतदप्रार्थनं नाम ||

अर्थ

याचना न करणे [आणि ती करायला न लागणे] म्हणजे [ खरं तर] त्यातच मोठेपणा आहे; सुख सामावलेलं आहे; त्यातच सत्कीर्ती आहे; तीच ताकद आहे; ते सुदैव होय.


English Meaning

Asking nothing to anybody is a greatness, is a happiness, is a popularity, is a strength, is a fortune.

११०५. मृदो: परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यश:|


उत्सृज्यैतद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

अर्थ

मऊ [बोटचेप] वागणाऱ्यांचा नेहमी अपमान होतो आणि [फार] कडक असेल तर त्याच सगळ्यांशी सतत भांडण [शत्रुत्व] होत. म्हणून ही दोन्ही टोक टाळून मध्यम मार्गाचा अवलंब करावा.

११०४. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः |

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ||

अर्थ

जेथे स्त्रियांची पूजा केली जाते [त्यांना मान दिला जातो] तेथे देवता आनंदाने राहतात. जेथे त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व कार्ये निष्फळ होतात.

English Meaning :

Where women are worshiped, goddesses dwell.
Where they are not worshiped, all actions are fruitless.

Friday, September 20, 2013

११०३. विषादप्यमृतं ग्राह्यममेंध्यादपि काञ्चनम् |

अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम् ||

अर्थ

विषातून [सुद्धा] अमृत [सापडल्यास] घ्यावे. अपवित्र ठिकाणापासूनही सोने घ्यावे. शत्रूपासूनही सदाचरण घ्यावे. [शिकावे] जर लहान मूले काही चांगलं बोलली तर ते जरूर [ऐकून त्यातलं ]चांगलं घ्यावं.

Thursday, September 19, 2013

११०२. सछिद्रो मध्यकुटिल: कर्ण: स्वर्णस्य भाजनम् |

धिग्दैवं विमलं नेत्रं पात्रं कज्जलभस्मनः ||

अर्थ

[मधेच] छिद्र असलेला; वाकडा असलेला कान हा सोन्याच्या अलंकाराचे स्थान होतो आणि [काय हे] दुर्दैव! अगदी निर्मळ अशा डोळ्याला मात्र काजळ फासतात.

Wednesday, September 11, 2013

११०१. हीनसेवा न कर्तव्या कर्तव्यः महदाश्रयः |

राममासाद्य लङ्कायां लेभे राज्यं बिभीषणः ||

अर्थ

मोठ्या लोकांचा आधार घ्यावा. क्षुल्लक माणसांची सेवा करत बसू नये. [प्रत्यक्ष] रामाची [सेवा] करून बिभीषणाला [सोन्याच्या] लंकेच राज्य मिळालं.

११००. जेतुं यस्त्रिपुरं हरेण हरिणा व्याजाद्बलिं बध्नता स्रष्टुं वारिभवोद्भवेन भुवनं शेषेण धर्तुं धराम् |

पार्वत्या महिषासुरप्रमथने सिद्धाधिपैः सिद्धये ध्यातः पञ्चशरेण विश्वजितये पायात्स नागाननः ||

अर्थ

[विजय मिळावा; विघ्न येऊ नयेत म्हणून ज्या गजमुखाच] त्रिपुरासुराच्या तीन पुरांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी; याचनेच्या मिषाने बळीला पकडण्यासाठी श्रीविष्णूनी; जगताची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाने; शेषाने पृथ्वीचा [भार घेण्याची ताकद यावी] म्हणून; महिषासुराचा वध करण्याच्यावेळी जगदंबेने; सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धानी; सर्व विश्व पादाक्रांत करण्यासाठी मदनाने ज्याचं मनात चिंतन केलं तो गजमुख [जशा त्यांच्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या तशा आमच्या पण पूर्ण करून आमचे] रक्षण करो.

Tuesday, September 10, 2013

१०९९. अमितगुणोऽपि पदार्थो दोषेणैकेन निन्दितो भवति |

सकलरसायनसारो दोषेणैकेन लशुन इव ||

अर्थ

असंख्य गुण असले तरी एखाद्याच दोषामुळे त्याला नाव ठेवली जातात. सर्व चांगल्या [उपयुक्त] सत्वांचा साठा असला, तरी दर्पामुळे लसणीला लोक नाक मुरडतात.

Friday, September 6, 2013

१०९८. यस्मिन्देशे न संमानो न प्रीतिर्न च बान्धवाः |

न च विद्यागमः कश्चिन्न तत्र दिवसं वसेत् ||

अर्थ

ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळत नाही; आपल्याला तिथे राहून आनंद होत नाही; आप्तेष्ट तिथे नाहीत आणि [नवीन] काहीतरी शिकण्याची संधी पण नाही; अशा स्थळी एक दिवस सुद्धा राहू नये.

Thursday, September 5, 2013

१०९७. सुखमापतितं सेव्यं दु:खमापतितं तथा |

चक्रवत्परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च ||

अर्थ

ज्याप्रमाणे प्राप्त झालेले सुखं आपण [आनंदाने उप] भोगत असतो, त्याच प्रमाणे दुःखही भोगले [सोसले] पाहिजे. कारण सुखे आणि दुःखे चाकाप्रमाणे फिरत असतात. [जसं नेहमी सुख मिळत नाही, तसं सतत दुःखसुद्धा सोसावे लागत नाही. तर तक्रार न करता आनंदाने प्रारब्धाला तोंड दिलं पाहिजे.]

Wednesday, September 4, 2013

१०९६. स्तोकेनोन्नतिमायाति स्तोकेनायात्यधोगतिम् |

अहो सुसदृशी वृत्ति: तुलाकोटे: खलस्य च ||

अर्थ

अहो! तराजूची दांडी आणि दुष्टाचे वागणे किती सारखे आहे बरे! थोड्याशा [तागडीच्या बाबतीत वजनाने] कारणाने वर चढतो [संतुष्ट होतो; त्याला गर्व होतो] आणि अगदी थोड्याने खाली जातो. [जरा कमी फायदा वाटला तर दुष्ट खालच्या थराला जाऊन नुकसान करतो.]

Tuesday, September 3, 2013

१०९५. शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसम्पदा |

शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिः नमोऽस्तु ते ||

अर्थ

दीपज्योतीमुळे  [प्रकाशामुळे] आरोग्य; संपत्ती मिळते, ति हितकारक असते. [मनातील] वाईट बुद्धी तिच्यामुळे नाहीशी होते. [हे दीपज्योति] तुला नमस्कार असो.

Monday, September 2, 2013

१०९४. यस्य वर्णनं बुधा सदादरेण कुर्वते भारतस्य भूषणं हिमालयो विराजते |

यो हिमेन दुर्गमेन कञ्चुकेन संवृतः
 उन्नतः सुतीक्ष्णशृङ्गशस्त्रजालकावृतः
भारतस्य रक्षणाय सज्ज एव वर्तते
भारतस्य भूषणं हिमालयो विराजते ||

अर्थ

विद्वान लोक ज्याचे वर्णन नेहमी आदराने करतात तो भारताचे भूषण असलेला हिमालय पर्वत नेहमी शोभून दिसतो. ज्यातून शिरणे अत्यंत कठीण, अशा बर्फ रूपी कवचाने झाकलेला [बर्फाचे चिलखत चढवलेला] ज्यात अति उंच आणि टोकदार अशी शिखरे सर्वत्र पसरली आहेत असा, हिमालय पर्वत भारताच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे.

१०९३. प्रथमदिवसचन्द्र: स च सकलकलाभि: पूर्णचन्द्रो न वन्द्य: |

अतिपरिचयदोषात्कस्य नो मानहानिर्नवनवगुणरागी प्रायशो जीवलोकः ||

अर्थ

पहिल्या दिवशी [शुद्ध प्रतिपदेला] उगवलेल्या चंद्राला सर्वजण वंदन करतात. सर्व कलांनी पूर्ण असलेल्या [पौर्णिमेच्या] चंद्राला नमस्कार करत नाहीत. अतिपरिचयाने कोणाची मानहानी होत नाही बरे? बहुतांशी मानवप्राणी नवनवीन गोष्टींवर प्रेम करतो.

१०९२. अन्तःसारैरकुटिलैरच्छिद्रैः सुपरिक्षितैः |

मन्त्रिभिर्धार्यते राज्यं सुस्तम्भैरिव मन्दिरम् ||

अर्थ

वजनदार; सरळ; भरीव [वाळवी वगैरे न लागलेल्या] नीट पारखून [चांगल्या जातीचे टिकाऊ लाकूड असलेल्या] खांबांनी मंदिर जसं भक्कम रहात तसच पोक्त; सुस्वभावी; चुगल्या ऐकून न घेणाऱ्या परिक्षेला पूर्ण उतरलेल्या  मंन्त्र्यांमुळे राज्याचे रक्षण होते.