भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, March 27, 2014

१२३५. अदृष्टपूर्वाः बहवः सहायाः सर्वे पदस्थस्य भवन्ति वश्याः |

अर्थाद्विहीनस्य पदच्युतस्य भवन्ति काले स्वजनोऽपि शत्रुः ||

अर्थ

[अधिकाराच्या] पदावर विराजमान झाल्यावर पूर्वी कधी न दिसलेले असे बरेच मदतनीस त्याच्या अगदी मनाप्रमाणे वागतात. पण एकदा का पद गेलं आणि पैसे पण संपले की [गोळा झालेली भुतावळच काय पण पूर्वीचे] संबधित सुद्धा शत्रु सारखे वागू लागतात.

Wednesday, March 26, 2014

१२३४. एकः स्वादु न भुञ्जीत नैकः सुप्तेषु जागृयात् |

एको न गच्छेदध्वानं नैकश्चार्थान्प्रचिन्तयेत् ||

अर्थ

[बरोबरच्या इतरांना वगळून] एकट्याने गोड [किंवा स्वादिष्ट] खाऊ नये. [सगळे] झोपलेले असताना एकट्याने जागू नये. रस्त्याने [प्रवासाला] एकट्याने जाऊ नये. [इतर भागीदार सोडून] एकट्यालाच फायदा; समृद्धी मिळवायचा विचार करू नये.

Tuesday, March 25, 2014

१२३३. अभिमानवतां पूसामात्मसारमजानताम् |

अन्धानामिव दृश्यन्ते पतनान्ता: प्रवृत्तयः || पंचतंत्र

अर्थ

स्वतःच्या [मर्यादांची] जाण नसणाऱ्या आणि गर्विष्ठ लोकांच वागणं आंधळ्याप्रमाणे धडपडत शेवटी अधःपात करून घेणारं असं असत.

Monday, March 24, 2014

१२३२. ब्रह्मघ्ने च सुरापे च चौरे भग्नव्रते शते |

निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ||

अर्थ

शहाण्या लोकांनी विद्वानाला ठार करणाऱ्याला; दारु पिणाराला; चोराला; शपथा मोडणाऱ्याला प्रायश्चित्त [घेऊन त्या पापातून मुक्त होता येईल असं] सांगितलेलं आहे. पण कृतघ्नपणाला प्रायश्चित्त नाही. [ही गोष्ट त्या सर्वांपेक्षाही वाईट आहे.]

१२३१. शास्त्रोपस्कृतशब्दसुन्दरगिरः शिष्यप्रदेयागमा विख्याताः कवयो वसन्ति विषये यस्य प्रभोर्निधनाः |

तज्जाड्यं वसुधाधिपस्य कवयो ह्यर्थं विनापीश्वराः कुत्स्याः स्युः कुपरीक्षकाः मणयो यैरर्घतः पातिताः ||

अर्थ

ज्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम विद्यादान केलं आहे असे; ज्याचं सुंदर लिखाण शास्राला धरून मांडलेले आहे असे, सुप्रसिद्ध विद्वान ज्या राजाच्या राज्यात गरिबीत दिवस कंठत असतील तो त्या राजाचा मठ्ठपणा आहे. ते विद्वान काय पैशाशिवाय देखील ईश्वर असतात. रत्नांची किंमत ज्यांनी त्यांच्या मोलापेक्षा कमी केली त्या  परीक्षकांचाच धिक्कार असो. [ रत्नांची किंमत त्यामुळे कमी होत नाही.]

Wednesday, March 19, 2014

१२३०. दृष्ट्वाऽऽत्मनि जये व्यग्रान्नृपान्हसति भूरियम् |

अहो मां विजिगीषन्ति मृत्योः क्रीडनका नृपाः ||

अर्थ

आपल्याला [पृथ्वीला] जिंकण्याचा खटाटोप करणाऱ्या राजांकडे पाहून ही पृथ्वी [त्यांचा उपहास करत] हसून म्हणते "मृत्यूच्या हातातली बाहूल असलेले हे राजे आणि मला जिंकायची हाव धरतायत !"

Monday, March 17, 2014

१२२९. काकचेष्टा बकध्यानं श्वाननिद्राल्पभोजनम् |

स्वाध्यायः संयमश्च छात्राणां लक्षणानि षट् ||

अर्थ

कावळ्याप्रमाणे जागरुकता; बगळ्याप्रमाणे एकाग्रता; कुत्र्याप्रमाणे सावध झोप; कमी जेवण; संयम आणि स्वतः अभ्यास करणं ही सहा [उत्तम] विद्यार्थ्याची लक्षणे आहेत.

१२२८. अपृष्ट्वैव भवेन्मूढः ज्ञानं मनसि चिन्तनात् |

अपूर्णः कुरुते शब्दं न पूर्णः कुरुते घटः ||

अर्थ

[शंका] न विचारल्यास [न समजल्यामुळे माणूस] मूर्खच राहील. [पण माहिती मिळाल्यावरही त्याच्यावर] विचार केल्याने [नीट] समजत. [ज्याच]ज्ञान अपूर्ण असत तो अधिक बडबड करतो, जसं अर्धवट भरलेल्या मडक्याचा आवाज येतो व पूर्ण भरलेल्या घड्याचा येत नाही तसं.

१२२७. अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् |

परपापैर्विनश्यन्ति मत्स्या नागहृदे यथा |

अर्थ

स्वतः पाप केलं नसलं आणि अगदी शुद्ध असलं तरी पापी लोकांच्या सहवासाने सुद्धा नाश होतो. सापांचा निवास असलेल्या तळ्यातल्या माशांप्रमाणे.

Monday, March 10, 2014

१२२६. अर्थो नराणां पतिरङ्गनानां वर्षा नदीनामृतुराट् तरूणाम् |

स्वधर्मचारी नृपतिः प्रजानां गतं गतं यौवनमानयन्ति ||

अर्थ

तारुण्य ओसरल्यावर सुद्धा या गोष्टी सर्वाना नवाळी प्राप्त करून देतात. पैशामुळे माणसांना; पती पत्नीला; पावसाळा नद्यांना; वसन्त ऋतु वृक्षांना आणि राजधर्माचे पालन करणारा राजा प्रजेला.

१२२५. भाग्यवन्तं प्रसूयेथाः मा शूरं मा च पण्डितम् |

शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः || कुन्ती

अर्थ

नशीबवान [अपत्यांना] जन्म दे. तो शूर हवा असं नाही किंवा विद्वान असला पाहिजे असं पण नाही. अगदी शूर आणि विद्वान अशा माझ्या मुलाचं [या दोन्ही गोष्टी असून सुद्धा] युद्ध [करायला लागल्याने] वाटोळ झालंय.

Sunday, March 9, 2014

१२२४. एता हसन्ति च रुदन्ति च वित्तहेतोर्विश्वासयन्ति पुरुषं न च विश्वसन्ति |

तस्मान्नरेण कुलशीलसमन्वितेन वेश्या: श्मशानघटिका इव वर्जनीयाः   ||

अर्थ

वेश्या या पैशासाठी [कृत्रिम] हसतात किंवा रडतात. त्या गिऱ्हाइकाला [नाटक करून त्यांच प्रेम असल्याची] खात्री पटवतात, पण त्या त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हे राजा; स्मशानातील मडक्याप्रमाणे घरंदाज माणसाने त्यांना टाळावं.

Friday, March 7, 2014

१२२३. अतिव्ययोऽनवेक्षा च तथार्जनमधर्मतः |

मोक्षणं दूरसंस्थानं कोषव्यसनमुच्यते ||

अर्थ

अतिशय खर्च करणं [करात सूट; फाजील सवलती; बरोबर आय होतेय का नाही इकडे] दुर्लक्ष त्याचप्रमाणे अन्यायाने [कर] गोळा करणे किंवा सोडून देणे, दूर निघून जाणे ही खजिन्याची संकटे आहेत असे [जाणकार] सांगता.

Wednesday, March 5, 2014

१२२२. हे हेमकार परदुःखविचारमूढ किं मां मुहुः क्षिपसि वारशतानि वह्नौ |

संदीप्यते मयि सुवर्णगुणातिरेको लाभः परं तव मुखे खलु भस्मपातः ||

अर्थ

हे दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा न करणाऱ्या सोनारा; मला सारखा सारखा आगीत काय फेकातोयस? त्यामुळे [हीण जळून जाईल आणि] माझा सोनेरी रंग अधिक झळाळून उठेल आणि [माझा] फायदाच होईल, पण तुला मात्र [आग फुंकून फुंकून] राख खायला लागेल ना. [ सुवर्णकारान्योक्ती सोनार = नाव ठेवणारे]

१२२१. वसन्त्यरण्येषु चरन्ति दूर्वा: पिबन्ति तोयान्यपरीग्रहाणि |

तथापि वध्या हरिणा नराणां को लोकमाराधयितुं समर्थः ||

अर्थ

हरणं जंगलात राहतात; कुणाची मालकी नसलेलं [जंगलातीलच] पाणी पितात; [इतर कोणाला नको असलेलं] गवत खातात. [म्हणजे कुणाचा ते तोटा करत नाहीत] तरीही माणसं त्यांना ठार करतात. [काय म्हणून मारतात? सर्व] जगाला कोणी संतुष्ट करू शकत नाही.

१२२०. निःस्नेहो याति निर्वाणं स्नेहोऽनर्थस्य कारणम् |

निःस्नेहेन प्रदीपेन यदेतत्प्रकटीकृतम् ||

अर्थ

स्नेह [तेल संपलेला] नसलेला दिवा [विझतो; शांत होतो] त्यानी हे दाखवून दिलं की स्नेह [आसक्ती]चा त्याग केला तर शांतता [समधातता] येते. स्नेह हेच अनर्थाच कारण आहे.