भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, August 31, 2011

४३९. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् |

लोचनाभ्यां विहीनस्य दर्पण: किं करिष्यति ||

अर्थ

ज्याला मूळचीच अक्कल म्हणजे विचारशक्ती नाही त्याला शास्त्राभ्यासाचा काय उपयोग? ज्याला डोळे नसतील त्याला आरशात काय दिसणार कपाळ?

४३८. अरावप्युचितं कार्यमातिथ्यं गृहमागते |

छेत्तुः पार्श्वगतां छायां नोपसंहरते द्रुमः ||

अर्थ

शत्रु जरी असला तरी आपल्या घरी आल्यावर [सज्जन] त्याचा चांगला पाहुणचार करतात - त्याच भलंच करतात. झाड तोडायला आलेल्या सुद्धा झाड आपल्या सावलीत सामावून घेत. सावली आखडून घेत नाही.

४३७. विगतघननिशीथे प्रातरुत्थाय नित्यं पिबति खलु नरो यो घ्राणरन्ध्रेण वारि |

स भवति मतिपूर्णश्चक्षुषा तार्क्ष्यतुल्यो वलिपलितविहीन: सर्वरोगैर्विमुक्त: ||

अर्थ

मध्यरात्र उलटून गेल्यावर - भल्या पहाटे - उठून जो मनुष्य नाकाने पाणी पितो तो बुद्धिमान; गरुडासारख्या दृष्टीचा तसेच अंगाला सुरकुत्या; डोक्याला टक्कल पडणे इत्यादी न होता सर्व रोगापासून मुक्त होतो.

Tuesday, August 23, 2011

४३६. गुणिनि गुणज्ञो रमते; नागुणशीलस्य गुणिनि परितोष: |

अलिरेति वनात्पद्मं ; न दर्दुरस्त्वेकवासोऽपि ||

अर्थ

गुणी माणसालाच गुणवंताबद्दल प्रेम; आस्था असते. जो स्वतः गुणी नसतो त्याला त्यांच्याबद्दल आदर नसतो. भुंगा लांबून - वनातून - कमळाकडे धावत येतो. पण बेडूक त्याच जलाशयात राहत असून हि कधी कमळाच्या जवळपासहि फिरकत नाही.

४३५. पात्रविशेषे न्यस्तं गुणान्तरं व्रजति शिल्पमाधातु: |

जलमिव समुद्रशुक्तौ मुक्ताफलतां पयोदस्य ||

अर्थ

गुरूने विशेष चांगल्या - सत्पात्र - व्यक्तीला एखादा विशेष गुण - कला; ज्ञान - दिल्यावर त्याचे सुंदर शिल्प तयार होते. जसे मेघाचे पाणी सर्वत्र पडते पण तेच समुद्रातील शिम्पेत पडले की त्याचे मोत्यात रुपांतर होते.

४३४. दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते |

व्यायामदृढगात्रस्य व्याधीर्नास्ति कदाचन ||

अर्थ

व्यायामामुळे शारीरिक दोष नाहीसे होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. [त्यामुळे सपाटून भूक लागते व अन्न पचते.] तसेच सर्व अवयव बळकट झाल्यामुळे रोग कधीही होत नाहीत.

४३३. सर्पाणां च खलानां च सर्वेषां दुष्टचेतसाम् |

अभिप्राया न सिध्यन्ति तेनेदं वर्तते जगत् ||

अर्थ

सापांचे; दुष्टांचे आणि सगळ्या हीन प्रवृत्तीच्या लोकांचे सगळे मनोरथ पूर्ण होत नाहीत, म्हणून तर हे जग चाललंय. [नाहीतर केव्हाच त्याचं वाटोळं झाल असतं]

४३२. खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |

उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

अर्थ

दुष्ट माणसे आणि काटे यांच्या बाबतीत दोनच प्रकारे वागता येते. एक तर पायताणाने त्यांचे थोबाड फोडणे किंवा त्यांना सदैव दुरूनच टाळणे.

Thursday, August 18, 2011

४३१. अम्ब; श्राम्यसि तिष्ठ; गोरसमहं मथ्नामि; मन्थानकं प्रालम्ब्य स्थितमीश्वरं सरभसं दीनाननो वासुकि: |

सासूयं कमलालया, सुरगण: सानन्दमुद्यद्भयं राहु: प्रैक्षत यं; स वोऽस्तु शिवदो गोपालबालो हरि: ||

अर्थ

" आई ; तू दमलीस ; थांब जराशी . मी दही घुसळतो " असं म्हणून मोठ्या आवेशाने उभा राहिलेला भगवान श्रीकृष्णला पाहून " आता पुन्हा आपल अंग सोलून निघणार " म्हणून वासुकि नाग व्याकुळ होऊन ; " या मंथनातून अजून एखादी लक्ष्मी तर निघणार नाही ना ?" अशा असूयेने भीतीग्रस्त लक्ष्मी; देव " आता यातून अनेक रत्ने आणि अमृत निघेल " म्हणून आनंदाने; तर उरलेलं हे मस्तक तरी या वेळी धड राहील ना म्हणून घाबरून राहू ज्याच्याकडे पाहू लागला तो गोपालबालक श्रीहरी तुम्हाला कल्याणकारक होवो.

४३०. रत्नाकरधौतपादां हिमालयकिरीटिनीम् |

ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्‌ ||

अर्थ

रत्नांची खाण असणारा [सागर] जिचे चरणप्रक्षालन करत आहे अशा; हिमालय हाच मुगुट धारण करणाऱ्या; जिच्यामध्ये थोर असे तत्वज्ञानी आणि शासनकर्ते जन्माला आले आहेत अशा भारतमातेला मी नमस्कार करते.

१५ ऑगस्ट्च्या निमित्ताने.


४२९. नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुन: पुच्छम् |

तद्वत्खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||

अर्थ

कुत्र्याच शेपूट जरी [वर्षानुवर्ष] नळीत घालून ठेवलं तरी ते [थोडसुद्धा ] सरळ होत नाही. [वाकड ते वाकडंच राहत] दुर्जनाच हृदय सुद्धा अगदी तस्सच असत त्याला कोणीही कितीही उपदेंश केला तरी ते प्रेमळ होणार नाहीच नाही.

४२८. क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं धनक्षये दीप्यति जाठराग्निः |

आपत्सु वैराणि समुल्लसन्ति छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति || पञ्चतन्त्र

अर्थ

जखम झाली की तिच्यावरच सारखे धक्के ठेचा लागतात; दारिद्र्य असले की भूक वाढते. संकटात असताना भांडणे उपटतात. एखादे छिद्र निर्माण झाले की त्यातून अनेक अनर्थ निर्माण होतात; वाढतच राहतात.

४२७. अन्यस्माल्लब्धपदो प्रायो नीचोऽपि दुस्सहो भवति |

रविरपि न दहति तादृग्यादृग्दहति वालुकानिकरः ||

अर्थ

दुसऱ्याकडून अधिकारपद मिळालेला नीच मनुष्य बहुधा अतिशय त्रासदायक ठरतो. अधिकारपद देणारा सुद्धा एवढा त्रासदायक नसतो. सूर्याचे उन जितके तापदायक असते त्याहून कितीतरीपट उन्हाने तापलेली वाळू भाजणारी ठरते.

Tuesday, August 9, 2011

४२६. निद्राप्रियो य: खलु कुम्भकर्णो हत: समीके स रघूत्तमेन |

वैधव्यमापद्यत तस्य कान्ता; श्रोतुं समायाति कथां पुराणम् ||

अर्थ = झोप लाडकी असलेल्या कुम्भकर्णाला रामाने युद्धात मारले. मग विधवा झालेली त्याची ती प्रिया - बिचारी झोप - कथा पुराणाला जाऊ लागली. [ पुराण ऐकणाऱ्या श्रोत्यांना बऱ्याचदा डुलक्या येतात.]

४२५. तस्करेभ्यो नियुक्तेभ्य: शत्रुभ्यो नृपवल्लभात् |

नृपतिर्निजलोभाच्च प्रजा रक्षेत्पितेव हि ||

अर्थ

राजाने चोरांपासून; आपल्या सेवकांपासून; मर्जीतल्या लोकांपासून; एवढेच काय स्वतःच्या लोभापासुनही प्रजेचे पितृवत् पालन करावे.

४२४. कर्तव्य: भ्रातृषु स्नेह: विस्मर्तव्या: गुणेतरा: |

सम्बधो बन्धुभि: श्रेयान् लोकयोरुभयोरपि || महाकवी भास ; श्रीकृष्ण

अर्थ

दोन्ही लोकात [इह आणि पर] नातेवाईकांशी [चांगले] संबध असणे अधिक चांगले असते. [म्हणून ] त्यांचे दोष विसरावे आणि त्यांच्यावर प्रेम करावे.

Saturday, August 6, 2011

४२३. उद्योगिन: करालम्बं करोति कमलालया |

अनुद्योगिकरालम्बं करोति कमलाग्रजा ||

अर्थ

साक्षातलक्ष्मी उद्योगी माणसाचा हात आपल्या हाती घेते. निरुद्योगी माणसाचा हात अक्काबाई - तिची थोरली बहिण; अवदसा - धरते.

४२२. अत्यादरो भवेद्यत्र कार्यकारणवर्जित: |

तत्रशङ्काप्रकर्तव्यापरिणामे सुखावहा ||

अर्थ

जिथे कारण नसतानाही अतिशय आदर दाखवला तेथे संशय मनात धरून [ काही काळबेर नाही याची खात्री करून ] वागणे हे परिणामाच्या दृष्टीने चांगले असते.

४२१. आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थ: को न स्याद्बबहुधनको बहुश्रुतो वा |

आलस्यादियमवनि: ससागरान्ता सम्पूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च ||

अर्थ

आळस नावाचा अनर्थ या जगात नसेल [उरला नाही] तर कोण बरे श्रीमंत किंवा विद्वान होणार नाही [प्रत्येकजण उत्कृष्ट ज्ञान मिळवेल ] यापृथ्वीवर आळस टिकून आहे म्हणूनच समुद्राने वेढलेली ही पृथ्वी नरपशूंनी - क्रूर लोकांनी आणि दळभद्री लोकांनी भरून उरलीय.

४२०. खल: करोति दुर्वुत्तं नूनं फलति साधुषु |

दशाननोऽहरत्सीतां बन्धनं च महोदधे: ||

अर्थ

दुष्ट मनुष्य काहीतरी लफड करून ठेवतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात कायमचे एखाद्या सज्जनाला. हेच पहाना सीता पळवली रावणाने आणि सेतुबन्धन मात्र कायम पडलं महासागरावर.

४१९. अकर्णमकरोच्छेषं विधिर्ब्रह्माण्डभङ्गधीः |

श्रुत्वा रामकथां रम्यां शिरः कस्य न कम्पते ||

अर्थ

[अतिशय] सुंदर रामकथा ऐकून कोणाचे मस्तक डोलणार नाही? [म्हणूनच शेषाने जर रामकथा ऐकली त्याचे मस्तक डोलावाल्यामुळे त्याच्या मस्तकावरील] पृथ्वीगोल कोसळून फुटेल या भीतीने ब्रह्मदेवाने त्याला कर्णहीन बनवले आहे.

४१८. शनैः पन्थाः शनैः कन्थाः शनैः पर्वतमस्तके |

शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ||

अर्थ

मार्ग आक्रमण करणे; सन्यासी बनणे; डोंगरमाथ्यावर चढून जाणे; विद्याध्यायन करणे; धन मिळवणे या पाच गोष्टी हळू हळू अवास्तव घाई न करता साधाव्यात. घाई केली की त्याचे दुष्परिणाम चिरकाल भोगावे लागतात.

४१७. विषभारसहस्रेण गर्वं नायाति वासुकिः |

वृश्चिकोबिन्दुमात्रेणोर्ध्वं वहति कण्टकम् ||

अर्थ

[नागराज ] वासुकी विषाचा प्रचंड साठा जवळ असूनही त्याचा गर्व बाळगत नाही. विंचवाजवळ थेंबभरच विष असेल पण तो नांगी [गर्वाने] सतत वर करून चालतो.