भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, June 30, 2014

१३०९. सदयं हृदयं यस्य भाषितं सत्यभूषितम् |

कायः परहिते यस्य कलिः तस्य करोति किम् ||

अर्थ

जो मनानी दयाळू आहे; अगदी खरं बोलतो आणि दुसऱ्याला मदत करण्यास देह झिजवतो, त्याच्यावर कलियुगाचा काय [वाईट परिणाम] होणार?

१३०८. पूरोत्पीडे तडागस्य परीवाहः प्रतिक्रिया |

शोकक्षोभे च हृदयं प्रलापैरेव धार्यते || उत्तररामचरित्र

अर्थ

तलावात पाणी भरून वरती यायला लागलं तर जादा पाण्याचा [पाट काढून निचरा करणं] हाच उपाय आहे. मनात दुःख खदखदत राहील तर शोकाच्या  [रडत जिवलगाना सांगून] विलापानीच हृदय सावरत.

१३०७. गुणवत्तरपात्रेण च्छाद्यन्ते गुणिनां गुणाः |

रात्रौ दीपशिखाकान्तिः न भानावुदिते सति ||

अर्थ

जरी [काही व्यक्ती खूप] गुणी असल्या त्यांच्या पेक्षा अधिक गुणवान लोकांसमोर त्यांचे गुण झाकोळून जातात. जसं दिव्याच्या ज्योतीच तेज रात्री पडत पण सूर्य उगवल्यावर [त्याच्या प्रखर तेजापुढे ते फिकं पडत आणि दिसतच] नाही.

१३०६. गाढं गुणवती विद्या न मुदे विनयं विना |

मूर्खतापि मुदे भुयान्महत्सु विनयान्विता ||

अर्थ

नम्रपणा नसला तर सखोल ज्ञान असून सुद्धा [श्रोत्याला] आनंद होणार नाही. थोर लोक जरी [एखाद्या विषयात] अडाणी असले तरी नम्रपणामुळे [आनंददायी] होतील. [माहित नसलेल्या गोष्टी ते नीट विचारून जाणून घेतील. गर्विष्ठपणा लोकांना तापदायक वाटतो.]

Thursday, June 26, 2014

१३०५. रे रे घरट्ट मा रोदीहि ! कं कं न भ्रामयन्त्यमूः |

कटाक्षवीक्षणादेव कराकृष्टस्य का कथा ||

अर्थ

अरे जात्या; [घरघर असा आवाज करत] रडू नकोस बाबा! या [स्त्रिया] कोणाला [गरा गरा] फिरायला [भाग पाडत] नाहीत बरे? अरे [एका] नजरफेकीनेच [त्या पळायला भाग पाडतात; तुला तर] हातानी खेचत असल्यावर गरगर फिरायला लागेल यात काय विशेष? [त्याच दुःख करू नकोस.]

Wednesday, June 25, 2014

१३०४. यावत्स्वस्थमिदं शरीरमरुजं यावज्जरा दूरतो यावच्चेन्द्रियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुषः|

आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान्संदीप्ते सदने तु कूपखननं प्रत्युद्यमःकीदृशः ||
अर्थ

शहाण्या माणसानी जोपर्यंत आपली तब्बेत चांगली आहे; देहाला दुखणं झालेलं नाही; म्हातारपण अजून लांब आहे; सगळ्या अवयवात भरपूर जोम आहे; मरायला टेकलो नाही; तोपर्यंतच पारमार्थिक कल्याण करून घेण्याचा प्रयत्न नेटानी करावा. घर जळायला लागल्यावर विहीर खणायला घेऊन काय उपयोग?

Tuesday, June 24, 2014

१३०३. अर्थाःहसन्ति उचितदानविहीनलुब्धं भूम्यो हसन्ति मम भूमिरिति ब्रुवाणम् |

जारा हसन्ति तनयानुपलालयन्तं मृत्युर्हसत्यवनिपं रणरङ्गभीरुम् ||

अर्थ

पात्र व्यक्तीला दान न करणाऱ्या कंजूष माणसाला पाहून संपत्ती [त्याची कीव येऊन] उपरोधाने हसते. ही जागा माझी आहे असं म्हणणाऱ्याला पृथ्वी हसते. [ही जमीन सोडून देऊन हा मृत्यूनंतर निघून जाणारच आहे म्हणून] मुलांच कोडकौतुक करणाऱ्या [बापाला] पाहून जार [मनातल्या मनात] हसतात. युद्धात घाबरणाऱ्या राजाला बघून यम हसतो.

Monday, June 23, 2014

१३०२. पुत्रपौत्रवधूभृत्यैः सम्पूर्णमपि सर्वदा |

भार्याहीनगृहस्थस्य शून्यमेव गृहं मतम् ||

अर्थ

अगदी नेहमी मुलं; नातवंड; सुना; नोकरचाकर यांनी घर भरलेलं असलं तरी पत्नी नसेल तर त्याला ते रित रितच वाटत.

१३०१. मूर्खशिष्योपदेशेन दुष्टस्त्रीभरणेन च |

द्विषतां संप्रयोगेण पण्डितोsप्यवसीदति ||

अर्थ

मूर्ख विद्यार्थ्याला शिकवलं; एखाद्या दुष्ट बाईला खूप मदत केली; शत्रूंच भलं करत राहील तर; अगदी पंडिताचा सुद्धा नाश होतो.

Friday, June 20, 2014

१३००. उद्योगिनः करालम्बं करोति कमलालया |

अनुद्योगिकरालम्बं करोति कमलाग्रजा ||

अर्थ

कमलामध्ये निवास करणारी लक्ष्मी उद्योगी माणसाचा हात पकडते, [त्याला साथ देते] आणि अक्काबाई [लक्ष्मीची मोठी बहीण-गरिबी] आळशी माणसाची साथ करते.

Thursday, June 19, 2014

१२९९. सद्विद्या यदि का चिन्ता वराकोदरपूरणे |

शुकोsपि लभते वृत्तिं राम रामेति च ब्रुवन् ||

अर्थ

जर शिक्षण चांगलं घेतलं असेल तर ते बिचारं पोट भरण्याची कसली काळजी? "राम राम " असं बोलून पोपटाचा सुद्धा [व्यवस्थीत] उदरनिर्वाह होतो.

Wednesday, June 18, 2014

१२९८. त्यजति भयमकृतपापं सुमित्रमयशः प्रमादिनं विद्या |

ह्री: कामिनमलसं श्रीः क्रूरं स्त्री दुर्जनं लोकः ||

अर्थ

ज्यानी पाप [वाईट काम] केलेलच नाही, त्याला भीती वाटत नाही. ज्यानी सन्मित्र सांभाळलेले आहेत, त्याचा बदलौकिक होत  नाही. चुका करणाराला [अभ्यासात सातत्य न ठेवणाऱ्याला] विद्या सोडून जाते; विषयी माणसाला लाजलज्जा सोडून जाते; लक्ष्मी आळशाला सोडून पळते; क्रूर माणसाजवळ स्त्री टिकत नाही; दुष्ट मनुष्य या जगात [कोणालाच] नको असतो.

Tuesday, June 17, 2014

१२९७. इन्दुं निन्दति तस्करो गृहपतिं जारो सुशीलं खलः साध्वीमप्यसती कुलीनमकुलो जह्याज्जरन्तं युवा |

विद्यावन्तमनक्षरो धनपतिं नीचश्च रूपोज्वलं वैरूप्येण हतः प्रबुद्धमबुधो कृष्टं निकृष्टो जनः ||

अर्थ

चोर चंद्राला नाव ठेवतो; जार [प्रेयसीच्या] नवऱ्याची निंदा करतो; दुष्ट सज्जनांना नाव ठेवतो; कुलटा गर्तीच्या स्त्रीची निंदा करते; हलक्या कुळातला घरंदाज माणसाला सोडून जातो; तरुण म्हाताऱ्यांची सांगत सोडतो; अडाणी सुशिक्षिता जवळ रहात नाही; गरीब श्रीमंताजवळ टिकत नाही; कुरूप व्यक्ती देखण्याची निंदा करते; मंद माणूस हुशार व्यक्तीची निंदा करतो [तात्पर्य] गुणांनी निकृष्ट आपल्यापेक्षा गुणी माणसाचा मत्सर करतो.

Monday, June 16, 2014

१२९६. तटस्थैः ख्यापिताश्चेतो विशन्ति गुणिनां गुणाः |

उत्कोचितानां पद्मानां गन्धो वायुभिराहृतः ||

अर्थ

गुणी लोकांच्या गुणांच; तिऱ्हाईतानी गुणवर्णन केल्यावर [श्रोत्याच्या] मनात त्याच  कौतुक वाटायला सुरवात होते. [आपले आपण गुण सांगितले तर कुणाला खात्री वाटत नाही,] जसं की उमललेल्या कमळांचा सुगंध जेंव्हा वारा वाहून नेतो तेंव्हाच सगळीकडे पसरतो. [कमळ स्वतः सांगत नाहीत ]

१२९५. यस्मै ददाति विवरं भूमिः फुत्कारमात्रभीतेव |

आशीविषः स दैवाड्डौम्बकरण्डे स्थितिं सहते ||

अर्थ

ज्यानी केवळ फूत्कार सोडल्यावर जमीनसुद्धा भ्याल्याप्रमाणे त्याला वारुळाला जागा देते, असा [खरं तर सामर्थ्यवान] ज्याच्या दाढेमध्ये विष आहे असा [साप] दुर्दैवाने डोम्बाऱ्याच्या करंडीत वेटोळ करून आयुष्य [रखडत रखडत] घालवतो. [दुर्दैवाने सामर्थ्यवान माणसाला सुद्धा वाईट दिवस येतात.]

Thursday, June 12, 2014

१२९४. राजंस्त्वत्कीर्तिचन्द्रेण तिथयः पूर्णिमाः कृताः |

मद्गेहान्न बहिर्याति तिथिरेकादशी भयात् ||

अर्थ

हे राजा तुझ्या कीर्तिरूप चंद्राने [सर्व] तिथ्या पौर्णिमा बनवल्या आहेत. [तुझी परिपूर्ण कीर्ती पूर्ण चंद्राप्रमाणे आहे, त्यामुळे सतत पौर्णिमाच ] [आता माझी मात्र उपासमार {एकादशी } रोजच तर जणू काही हि एकादशी] माझ्या घराबाहेर [पडली तर तिची पण पौर्णिमा होईल या] भीतिनी ती माझ्या घरातून बाहेर पडत नाही. [माझी गरिबी हटत नाही तर तूच बघ आता माझ्याकडे.]

१२९३. यथोर्ध्वाक्षः पिबत्यम्बु पथिको विरलाङ्गुलिः |

तथा प्रपापालिकापि धारां वितनुते तनुम् ||

अर्थ

[पाणपोईवर आलेला] वाटसरू नजर वर [पाणपोईवरच्या सुंदरीकडे] लावून [जास्त वेळ उभं राहता यावं म्हणून] बोट [पाणी गळून जावं यासाठी] लांब ताणतो, तर [भेट अधिक वेळ टिकावी म्हणून] सुंदरी सुद्धा धार अगदी लहानलहान करत जाते.

Tuesday, June 10, 2014

१२९२. कुदेशमासाद्य कुतोऽर्थसंचयः कुपुत्रमासाद्य कुतो जलाञ्जलिः |

कुगेहिनीं प्राप्य गृहे कुतः सुखं  कुशिष्यमध्यापयतः कुतो यशः ||

अर्थ

अयोग्य प्रदेशात वास्तव्य केल्यास पैसे कसे साठणार? मुलगा वाईट [असंस्कृत] असला तर श्राद्ध कोण करणार [म्हातारपणी शांतता सुख कुठलं मिळायला?] पत्नी चांगली [गुणी आणि अनुकूल] नसेल तर घरात सुख कसलं मिळतय? वाईट [शिकवण्याकडे; अभ्यासाकडे लक्ष न देणारे दंगिष्ट] विद्यार्थी शिकवत राहिल तर कीर्ति कसची मिळणार?

Monday, June 9, 2014

१२९१. अत्यच्छेनाविरुद्धेन सुवृत्तेनातिचारुणा |

अन्तर्भिन्नेन संप्राप्तं मौक्तिकेन निबन्धनम् ||

अर्थ

मोती अतिशय सुंदर; गोल अगदी  स्वच्छ [कठीणपणा नाही; खुपणारा नाही असा] जमवून घेणारा. त्यांनी जर स्वतःत फट पडून घेतली तर त्याला [दागिन्यात अडकून पडाव लागत] [मौक्तीकान्योक्ती सर्व चांगले गुण आणि त्यात स्वतः कणखर न राहता भोक पडू दिलं, तर त्याचा फायदा घेतला जातो.]

Friday, June 6, 2014

१२९०. तवैतद्वाचि माधुर्यं जाने कोकिल कृत्रिमम् |

प्रपोषितो यैस्तानेव जातपक्षो जहासि यत् ||

अर्थ

अरे कोकिळा; तुझ्या बोलण्यातला हा गोडवा नकली आहे हे [मला] ठाऊक आहे, कारण पंख फुटल्यावर लगेच ज्यानी तुझं पालनपोषण केलं त्यांना सोडून देतोस. [जर हा गोडवा खरा असता तर ज्यानी संभाळलं त्यांचा असा त्याग तू केलाच नसतास. मनापासून चांगुलपणाचा अभावच आहे. बोलण नुसत गोडगोड] कोकिलान्योक्ती

Thursday, June 5, 2014

१२८९. अयि मलयज महिमायं कस्य गिरामस्तु विषयस्ते |

उद्गिरतो यद्गरलं फणिनः पुष्णासि परिमलोद्गारैः ||

अर्थ

अरे चंदनवृक्षा; तुझा मोठेपणा कोणाला बरं [योग्य इतका] वर्णन करता येईल. तू तर गरळ ओकणाऱ्या सापांच  सुद्धा सुगंध देऊन पोषणच करतोस. [चंदनान्योक्ती]

Wednesday, June 4, 2014

१२८८. उच्चैरेष तरुः फलं च विपुलं दृष्ट्वैव हृष्टःशुकः पक्वं शालिवनं विहाय जडधीस्तं नारिकेलं गतः |

तत्रारुह्यबुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा तस्य न केवलं विगलिता चञ्चूर्गता चूर्णताम् ||

अर्थ

"हे झाड खूप उंच आहे आणि फळे पण भरपूर आहेत" असा विचार करून आनंदित झालेला मंद पोपट तयार आशा साळीच शेत सोडून  "त्या " नारळाच्या झाडाकडे गेला. भुकेजलेल्या त्यानी त्या झाडावर फळ फोडायचा प्रयत्न केला [पण अरेरे] त्याची आशाच फक्त लयाला गेली असं नाही तर चोचीच सुद्धा पीठ पीठ झालं. [शुकान्योक्ती]

Monday, June 2, 2014

१२८७. यः परस्य विषमं विचिन्तयेत्प्राप्नुयात्स कुमतिः स्वयं हि तत् |

पूतना हरिवधार्थमाययौ प्राप सैव वधमात्मनस्ततः ||

अर्थ

जो दुष्ट माणूस दुसऱ्याच वाईट करण्याच ठरवतो त्याच स्वतःचच तसेच वाईट घडत. पूतना श्रीकृष्णाला ठार मारायला गेली पण तिलाच मृत्यू आला.

१२८६. माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी |

अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ||

अर्थ

आई घरात नसेल आणि पत्नी कडवटपणे बोलणारी [पतीला समजून घेऊन गोड शब्दात आपलं मत सांगणारी अशी नसेल] तर अशा माणसाने जंगलात निघून जावे, कारण घर आणि वन यात काही फरकच नाही ना!

१२८५. तावत्गर्जन्ति मण्डुकाः कूपमाश्रित्य निर्भयाः |

यावत्करिकराकारः कृष्णसर्पो न विद्यते ||

अर्थ

विहिरीच्या आश्रयाने  बेडूक न घाबरता तोपर्यंत  डराव डराव करत ओरडत राह्तात की जोपर्यंत हत्तीच्या सोंडेप्रमाणे [बळकट] असा काळा कुळकुळीत साप तिथे नसतो. [सर्पान्योक्ती ]