भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 27, 2011

३५८. शयनं पित्तनाशाय; वातनाशाय मर्दनम् |

वमनं कफनाशाय; ज्वरनाशाय लङ्घनम् ||

अर्थ

पित्तनाश करायचा असेल तर पुरेशी झोप घ्यावी. वात नाहीसा करायचा असेल तर अंग रगडून घ्यावे. कफ नाहीसा करायचा असेल तर उलट्या होतील असे करावे व ताप हटवायचा असेल तर पूर्ण लंघन करावे.

३५७. अतिमात्रबलेषु चापलं विदधानः कुमतिर्विनश्यति |

त्रिपुरद्विषि वीरतां वहन्नवलिप्तः कुसुमायुधो यथा ||

अर्थ

महाबलाढ्य लोकांशी साहसाने वागू पाहणारा मूर्ख धुळीलाच मिळतो. ज्याप्रमाणे मदन आपल्या सामर्थ्याच्या फाजील विश्वासाने गर्विष्ठ होऊन शंकरांना आपलं बळ दाखवायला गेला [आणि भस्मसात झाला] तसंच.

Thursday, May 26, 2011

३५६. सर्वत्र जयमन्विच्छेत्पुत्रादिच्छेत्पराजयम् |

वासुदेवं नमस्यन्ति; वसुदेवं न ते नराः ||

अर्थ

सगळ्या जगात विजय मिळवण्याची इच्छा धरावी; मुलाकडून [आणि शिष्याकडून] मात्र पराजय व्हावा अशी इच्छा करावी; [मुलगा किंवा शिष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ - वरचढ व्हावा अशी इच्छा करावी] सगळे लोक वासुदेवाला - वसुदेवाच्या मुलाला नमस्कार करतात [त्यातच पित्याला अधिक आनंद होतो]

Tuesday, May 24, 2011

३५५. न क्वचिच्च बहिर्यान्ति मानिनां प्रार्थनागिरः |

यदि निर्यातुमिच्छन्ति तदा प्राणपुरस्सराः ||


अर्थ


स्वाभिमानी माणसाच्या तोंडून कधी याचनेचे शब्द बाहेर पडणारच नाहीत. पडण्याचा प्रसंग आला तर आधी प्राण बाहेर पडतील मगच याचना. [मेल्यावर कसे शब्द बाहेर पडणार? म्हणजे देहात प्राण असेपर्यंत ते याचना करणार नाहीत. ]

Monday, May 23, 2011

३५४. कृतार्थः स्वामिनं द्वेष्टि ;कृतदारस्तु मातरम्‌ |

जातापत्या पतिं द्वेष्टि ; गतरोगश्चिकित्सकम् ||

अर्थ

[उद्देश] साध्य झाला कि नोकर मालकाला टाळू लागतो; लग्न झालं कि मुलगा आईला विसरतो; मूल झालं कि पत्नी पतीकडे दुर्लक्ष करू लागते आणि आजारातून उठल्यावर रोगी वैद्याकडे फिरकत नाही.

३५३. अङ्गणवेदी वसुधा; कुल्या जलधिः; स्थली च पातालम् |

वल्मीकश्च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ||

अर्थ

जो खंबीर मनोवृत्तीचा माणूस ध्येयासाठी कंबर कसून तयार असतो. ही [सप्तद्वीपा] वसुंधरा आपल्या घरासमोराच्या अंगणासारखी [लहान] वाटते. महासागर हा नदीच्या कालव्यासारखा भासतो. पाताळ म्हणजे फिरायला जायचे ठिकाण वाटते मेरू पर्वत मुंग्यांचे वारूळ वाटते.

३५२. स एव धन्यो विपदि यः स्वरूपं न मुञ्चति |

त्यजत्यर्ककरैस्तप्तं हिमं देहं ; न शीतताम् ||

अर्थ

कितीही संकटे आली तरी जो आपले स्वाभाविक गुण सोडत नाही तोच खरा धन्य होय. सूर्यकिरणांनी बर्फ जरी तापले तरी आपल्या देहाचे ते विसर्जन करील; वितळेल पण आपली शीतलता सोडणार नाही.

Thursday, May 19, 2011

३५१. क्षुध्-तृट्-आशाकुटुम्बिन्यः मयि जीवति नान्यगाः |

तस्मात् आशा महासाध्वी कदाचिन्मां न मुञ्चति ||

अर्थ

[कवींनी आपल्या आशाळभूतपणाच विनोदी अंगानी वर्णन केलं आहे] तहान; भूक आणि आशा या माझ्या [एकनिष्ठ] कारभारणी [बायका] आहेत मी जिवंत असे पर्यंत त्या दुसरीकडे पाहणार सुद्धा नाहीत आणि त्यात सुद्धा आशा ही महासाध्वी आहे ती केंव्हाही माझा त्याग करत नाही [खाण-पिणं झाल्यावर थोडावेळ तरी तहान-भूक त्रास देत नाही आशा मात्र कधीच पिच्छा सोडत नाही]

३५०. सत्यस्य वचनं श्रेयः सत्यादपि हितं वदेत् |

यद् भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम || नारदमुनी

अर्थ

सत्य बोलणं अधिक चांगले; [पण फक्त] खरं बोलण्यापेक्षा कल्याणकारक बोलावे. सत्य म्हणजे तरी काय कि जे प्राणीमात्रांचे अतिशय हित करेल तेच असे माझे मत आहे.

Wednesday, May 18, 2011

३४९. आरभन्तेऽल्पमेवाज्ञाः; कामं व्यग्रा भवन्ति च |

महारम्भाः कृतधियस्तिष्ठन्ति च निराकुलाः ||

अर्थ

अडाणी लोक लहानसेच काम हाती घेतात आणि त्यातच अगदी गुंतून पडतात. जाणते स्थिरबुद्धीचे लोक भले मोठे काम हातात घेऊन सुद्धा अत्यंत शांतपणे स्थिरबुद्धीने ते करत राहतात.

Monday, May 16, 2011

३४८. कुक्षेर्भागद्वयं भोज्यैस्तृतीये वारि पूरयेत् |

वायोः संचारणार्थाय चतुर्थमवशेषयेत् ||

अर्थ = जठराचे चार भाग कल्पून त्यापैकी दोन भाग अन्नाने भरावेत; तिसरा पाण्याने भरावा आणि वायु संचारणासाठी चवथा भाग मोकळा ठेवावा.

३४७. जातमात्रश्चिकित्स्यः स्यान्नोपेक्ष्योऽल्पतया गदः |

वह्निशत्रुविषैस्तुल्यः स्वल्पोऽपि विकरोत्यसौ ||

अर्थ

रोग झाला रे झाला कि त्यावर लगेच उपचार करावे; त्याची हेळसांड करू नये. नाहीतर अग्नि, शत्रू आणि विष यांप्रमाणे तो वाढत वाढत जाऊन अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो व असाध्य बनतो.

Tuesday, May 10, 2011

३४६. बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदुषिताः |

अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम् || नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ

सुवचनांचा [कोणालाच उपयोग न होता ती ] स्वतःच्या ठिकाणीच गलीतगात्र होऊन जातात [कारण ] ज्ञानी लोकांना [एकमेकांचा ] मत्सर असतो [ते सुभाषितांची चर्चा करत नाहीत ]; सत्ताधारी लोकांना माजाची बाधा असते [ते कोणाला सुविचाराबद्दल चौकशी करत नाहीत ]उरलेल्या लोकांना काही ज्ञान नसल्याने त्यांना सुवचनांचा पत्ताच नसतो [त्यामुळे हे सर्व ज्ञान वाया जातं ]

३४५. कौपीनं; भस्मनां लेपो ; दर्भा ; रुद्राक्षमालिका |

मौनमेकान्तिका चेति मूर्खसंजीवनानि षट् ||

अर्थ

भगवी कफनी, भस्माचे पट्टे, दर्भ, रुद्राक्षांची माळ, मौन आणि एकटेच राहणे या सहा गोष्टी मूर्ख माणसाला संजीवन देणाऱ्या आहेत. [त्यांच्या आधारावर तो जगतो]

३४४. किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि, क्ष्मां न क्षिपत्येष यत् किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |

किंत्वंगीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||

अर्थ

कूर्म हा पाठीवरून पृथ्वीच ओझं ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? खरं तर एकदा सुरु केलेलं काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो [व] हाती घेतलं ते तडीस लावणं हे थोरांच कुलव्रतच असत.

[निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु - हे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच ब्रीदवाक्य आहे.]

Sunday, May 1, 2011

३४३. कुर्वन्नपि व्यलीकानि यः प्रियः प्रिय एव सः |

अशेषदोषदुष्टोऽपि कायः कस्य न वल्लभः ||

अर्थ

कितीही चुका, अप्रिय गोष्टी केल्या तरी जे आपल्याला आवडत ते लाडक असतंच, ते कधीही नावडत होत नाही. सगळ्या दोषांनी गच्च भरलेला [स्वतःचा] देह कोणाला बरे आवडत नाही?

३४२. न भृत्यपक्षपाती स्यात्प्रजापक्षं समाश्रयेत् |

प्रजाशतेन संदिष्टं संत्यजेदधिकारिणम् ||

अर्थ

राजाने कधी नोकराची बाजू घेऊ नये, प्रजेची बाजू घ्यावी. शंभर प्रजाजन सांगत असतील तर त्या अधिकाऱ्याचा राजाने सत्वर त्याग करावा.