भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, September 25, 2014

१३५०. सत्वादिस्थैरगणितगुणैर्हन्त विश्वं प्रसूय व्यक्तं धत्ते प्रहसनकरीं या कुमारीति संज्ञाम् |

मोहध्वान्तप्रसरविरतिर्विश्वमूर्तिः समन्तादाद्या शक्तिः स्फुरतु मम सा दीपवद्देहगेहे ||
 
अर्थ 
 
केवढे हे आश्चर्य! [देवी अंबिका] असंख्य  सत्वगुणांनी संपूर्ण विश्व निर्माण करून सुद्धा अगदी गमतीशीर असं "कुमारी " हे [यथार्थ] नामाभिधान धारण करते. ती विश्व हेच जिचं रूप आहे अशी अशी; माया रूपी अंधाराचा व्याप्ती नष्ट करणारी; आद्य शक्ती अशी [देवी]  दिव्याप्रमाणे माझ्या देहरूपी घरात प्रकट होऊन [आत्मस्वरूप प्रकाशित करो.]

Wednesday, September 24, 2014

१३४९. नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कृथाः |

अत्यन्तसरसहृदयो यतः परेषां गुणग्रहीतासि ||

अर्थ

हे कूपा [विहिरी] मी अतिशय नीच [हलकट; कमी उंची असणारा] आहे, याबद्दल अजिबात दुःख करू नकोस. कारण अगदी रसाळ [पाण्याने संपृक्त] असं हृदय असूनही तू दुसऱ्यांचे गुण [दोऱ्या पुढे आल्यावर] घेऊन [त्यांची पात्रे भरून] देतो.

Tuesday, September 16, 2014

१३४८. कान्तं वक्ति कपोति काकुलतया नाथान्तकालोऽधुना व्याधोऽधो धृतचापसज्जितशरः श्येनः परिभ्रामति |

इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतस्तूर्णं तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||

अर्थ

रडवेली होउन मादी कबुतरीण नराला म्हणते; "स्वामी; आता शेवट आलाय. [झाडा] खाली  पारधी धनुष्याला बाण लावून [आपल्याला मारायला] सज्ज झालाय [आणि वरती ] ससाणा घिरट्या घालतोय". असं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्याचा नेम चुकल्याने] त्या बाणाने ससाणा पण जखमी होऊन ते दोघे लगेचच यमाच्या दरबारी गेले. नशिबाची चाल वेगळीच होती. [अगदी मृत्युच्या दाढेतून ते सुटले.]

१३४७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |

अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

अर्थ

सज्जन [नुसत] पाहिल्यावर नारळासारखे [खडबडीत; कडक; कठोर असावेत असं दिसत]; पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे [दुर्जन] बाहेरूनच बोराप्रमाणे आकर्षक असतात. [पण अनुभव चांगला येत नाही.]

Thursday, September 11, 2014

१३४६. सुगन्धं केतकीपुष्पं कण्टकैः परीवेष्टितम् |

यथा पुष्पं तथा राजा दुर्जनैः परिवेष्टितः ||

अर्थ

सुवास असणारा केवड्याला जसे [नेहमीच] काटे असतात, तसा राजा दुष्ट लोकांनी वेढलेला असतो.

१३४५. अमितगुणोऽपि पदार्थो दोषेणैकेन निन्दितो भवति |

सकलरसायनसारो दोषेणैकेन लशुन इव || पण्डित राज  जगन्नाथ

अर्थ

सर्व औषधीमधे महत्वाची असलेली लसूण तिच्या [उग्र वास] या एकाच दोषाने निंद्य ठरते, तसे असंख्य गुण असून सुद्धा एखाद्या दोषाने एखाद्या पदार्थाला [एखाद्या व्यक्तीला] नावे ठेवली जातात.

Tuesday, September 9, 2014

१३४४. आयातो भवतः पितेति मातुर्निशम्योदितं धूलीधूसरितो विहाय शिशुभिः क्रीडारसान्प्रस्तुतान् |

दूरात्स्मेरमुखः प्रसार्य ललितं बाहुद्वयं बालको नाधन्यस्य पुरः समेति परया प्रीत्या रटन्घर्घरम् ||

अर्थ

"तुझे बाबा आले रे" असं आईनी म्हटलेलं ऐकल्यावर;  चालू असलेली  मित्रांबरोबरची भरपूर गम्मत टाकून हसत हसत सुंदर हात पसरून घशातून आनंदाचे उद्गार काढत धुळीने माखलेलं आपलं मूल आनंदाने ज्याच्या  सामोर येत; असा [पिता] खरोखर धन्य होय.

Monday, September 8, 2014

१३४३. कुत्र विधेयो यत्नो विद्याभ्यासे सदौषधे दाने |

अवधीरणा क्व कार्या खलपरयोषित्परधनेषु ||


अर्थ

कशाच्या बाबतीत [अविरत;अथक] प्रयत्न करावा? शिक्षण; चांगलं औषध आणि दान. केंव्हा दुर्लक्ष करावं? दुष्ट लोक; दुसऱ्याची पत्नी आणि परधन.

Friday, September 5, 2014

१३४२. सम्प्रति न कल्पतरवो न सिद्धयो नापि देवता वरदाः|

जलद त्वयि विश्राम्यति सृष्टिरियं भुवनलोकस्य  ||

अर्थ

आजकाल कल्पतरू [त्याच्या खाली बसून इच्छित वस्तू देणारे वृक्ष  कुठेही] नसतात; [अष्ट] सिद्धि पण नसतात देव सुद्धा वर देत नाहीत. [बाबारे] जलदा [पाणी देणाऱ्या मेघा] तू जर विश्रांती घेतलीस [धारा बरसायचं सोडून दिलंस] तर हे सगळं जग गळाठून जाईल [त्याला सक्तीची विश्रांती मिळेल.]

Thursday, September 4, 2014

१३४१. अयं रत्नाकरोऽम्भोधिरित्यसेवि धनाशया |

धनं दूरेऽस्तु वदनमपूरि क्षारवारिभिः ||

अर्थ

हा सागर रत्नांची खाण आहे म्हणून पैशाच्या आशेने मी ह्याचं सेवन [सेवा; पाण्याचं सेवन] केलं. पण [अरेरे] संपत्ती दूरच [मिळण्याची जराही शक्यता नाही] तोंड मात्र खारट पाण्यानी खराब झालं. [समुद्रान्योक्ती  समुद्र = कंजूष श्रीमंत मनुष्य; कवि =गरजू माणूस.]

Tuesday, September 2, 2014

१३४०. किं पौरुषं रक्षति यो न वार्तान्किं वा धनं नार्थििजनाय यत्स्यात् |

सा किं क्रिया या न हितानुबद्धा किं जीवितं साधुविरोधि यद्वै ||

अर्थ

दीनदुबळ्यांच जो रक्षण करत नसेल त्याच्या पराक्रमांचा काय बरं उपयोग? गरजूंना ज्या संपत्तीचा उपयोग होत नाही तिच्या पासून काय फायदा? जे काम कल्याणासाठी नाही त्याचा काय उपयोग? सज्जनांना त्रास देणाऱ्या आयुष्याचा काय बरं उपयोग?

Monday, September 1, 2014

१३३९. लोभमूलानि पापानि व्याधयो दोषमूलकाः |

स्नेहमूलानि दुःखानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||

अर्थ

हाव [या दुर्गुणामुळे माणूस] पापे करतो; [आपल्याच] चुकांमुळे आजार होतात; आसक्तीने कुठेतरी जीव जडल्यामुळे, दुःख होतात. या तीन गोष्टींचा त्याग करून सुखी हो.