भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, November 30, 2011

५१७. आयाधिको व्ययं कुर्वन् को न याति दरिद्रताम् |

आयो व्ययाधिको यस्य स धनी न धनी धनी ||

अर्थ

मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणारा कोण बरे गरीब होत नाही? खर्चापेक्षा जास्त मिळकत असणारा [खरा] श्रीमंत होय [खूप] संपत्ती असून [खर्च अजून जास्ती करणारा] नव्हे.

५१६. यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् |

तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ||

अर्थ

ज्याप्रमाणे हजारो गाईन्मधून वासरू [आपली] आई मिळवतं, [शोधून काढतं] त्याप्रमाणे प्रारब्ध ते करणाऱ्याच्या पाठोपाठ येत.

Monday, November 28, 2011

५१५. निर्वनो हन्यते व्याघ्र: निर्व्याघ्रं भिद्यते वनम् |

तस्मात् व्याघ्रो वनं रक्षेत् वनं व्याघ्रं च पालयेत् ||

अर्थ

अरण्यात नसलेला [गावात शिरल्यावर] वाघ मारला जातो. [आणि] ज्या अरण्यात वाघ नाही [तिथली झाडी कसली भीती नसल्यामुळे] तोडली जाते. [तो भाग उजाड होतो म्हणजे खरं तर ] वाघ जंगलाच रक्षण करतो. [म्हणून] वाघ आणि अरण्य यांचे रक्षण करावे.

५१४. य: स्वभावो हि यस्यास्ति स नित्यं दुरतिक्रम: |

श्वा यदि क्रियते राजा स किं नाश्नात्युपानहम् ||

अर्थ

जो माणसाचा मूळचा स्वभाव असतो त्याच्यावर मात करण [फार] कठीण असतं. कुत्र्याला जरी राजा बनवलं तरी तो चपला चाटणार नाही काय? [तो तसच करेल]

५१३. अनेकसंशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम् |

सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यन्ध एव स: ||

अर्थ

दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी [सुद्धा] दाखवणारा; अनेक शंकांचे निरसन करणारा - शास्त्र हा - सर्वांसाठी डोळाच आहे. जो [ते] शिकला नाही तो आंधळाच होय.

Friday, November 25, 2011

५१२. यौवनं धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता |

एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||

अर्थ

तारुण्य; श्रीमंती; सत्ता आणि अविचारीपणा यापैकी एक गोष्ट सुद्धा संकटाला कारणीभूत होते, तर चार ही जेथे असतील तेथे अनर्थ होईल यात काय संशय?

५११. अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् |

प्राप्नोति बुद्ध्यवज्ञानमपमानं च शाश्वतम् ||

अर्थ

अगदी बृहस्पति असला तरी वेळ आल्याशिवाय बोलला, तर तो बुद्धीचा कमीपणा समजला जातो आणि त्याचा खूप अपमान होतो.

Wednesday, November 23, 2011

५१०. जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता |

अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम् |

अर्थ

चांगले कपडे घातलेला माणूस सभेवर छाप पाडतो. ज्याच्याकडे  गाई-म्हशी आहे त्याला हवं ते खाता येत. वाहन असणा-या माणसाने रस्त्यावर विजय मिळवलेला असतो [तो मनात येईल तिकडे जाऊ शकतो.]  चारित्र्य उत्तम असणाऱ्या माणसाने सगळच जिंकलेल असतं.

५०९. दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम् |

आवृणुध्वमतो दोषान् विवृणुध्वं गुणान् बुधा: ||

अर्थ

हे जाणकार लोकांनो; या जगात एकही गोष्ट [एकही] दोष नसलेली किंवा एक ही गुण नसलेली नसते म्हणून दोष झाका आणि गुणांच वर्णन करा [वाढवा] [सर्वच गोष्टीत काहीनाकाही दोष व काहीतरी गुण असतात तर आहे त्यातलं चांगल बघावं दोष उगाळत बसू नये.]

Monday, November 21, 2011

५०८. निस्स्वं त्यजन्ति गणिका अकल्पं नृपतिं प्रजा: |अधीतविद्या आचार्यमृत्विजो दत्तदक्षिणम् ||

खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चातिथयो गृहम् | दग्धं मृगास्तथारण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ||

अर्थ

कफल्लक माणसाचा वेश्या त्याग करतात; दुबळ्या राजाचा प्रजा त्याग करते; शिक्षण पूर्ण झाल्यावर [विद्यार्थी] गुरूला सोडून जातात; दक्षिणा मिळाल्यावर यज्ञाचे पुरोहित यजमानाला सोडून जातात; फळे नसलेलं झाड पक्षि सोडून जातात; जेवण झाल्यावर पाहुणे पळतात; प्राणी वणवा पेटलेल अरण्य सोडून जातात आणि जार उपभोग घेऊन बाईला टाकून जातो.

५०७. यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद: |

तद्वदर्थान् मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया ||

अर्थ

ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो त्याप्रमाणे [राजाने] प्रजेला त्रास न होईल अशा रीतीने कर घ्यावे.

५०६. किं वाच्यं सूर्यशाशिनो: दारिद्र्यं महतां पुर: |

दिनरात्रिविभागेन परिधत्तो यदम्बरम् ||

अर्थ

सूर्य आणि चन्द्र यांच्या दळीद्राबद्दल [अजून] काय सांगावे? थोरामोठ्यांच्या समोर दिवस आणि रात्र अस वाटणी करून घेऊन ते दोघ अंबर [ कपडा; आकाश ] वापरतात. [कविनी अम्बर या शब्दावर सुंदर श्लेष केला आहे.]

५०५. तन्तवोऽप्यायता नित्यं तन्तवो बहुला: समा: |

बहून्बहुत्वादायान्सहन्तीत्युपमा सताम् ||

अर्थ

धागे सूक्ष्म [पातळ, दुर्बल] आणि लांब असून [जर] ते खूप आणि एकाच दिशेने असले तर ते खूप झटके किंवा भार सहन करतात हाच सज्जनाच्या बाबतीत दृष्टांत आहे [सज्जन दुर्बल असताना जर दुसऱ्यांच्या बरोबर एकत्र येऊन काम केल तर अडचणींवर मात करून सफल होतात.]

५०४. लिम्पतीव तमोऽङ्गानि वर्षतीवाञ्जनं नभ: |

असत्पुरुषसेवेव दृष्टिर्विफलतां गता || मृच्छकटिक अंक पहिला

अर्थ

रात्रीच्या अंधाराचे विटाने केलेले वर्णन - सर्व शरीराला जणू काही अंधार फासला जातोय; आकाश जणू काही काजळाचा पाऊस पाडतय; दुष्ट माणसाची सेवा जशी वाया जाते त्याप्रमाणे दृष्टि निरुपयोगी झाली आहे.

Wednesday, November 16, 2011

५०३. शास्त्रानुसारिणी चर्या चित्तज्ञा: पार्श्ववर्तिन: |

बुद्धिरस्खलितार्थेषु परिपूर्णं रसायनम् ||

अर्थ

[आरोग्य] शास्त्राला अनुसरून आचरण; आजूबाजूची माणसे आपल मन जाणणारी; आपल्याला जे हवं असेल ते मिळवण्यासाठी [योग्य ते करण्याची] बुद्धि या गोष्टी म्हणजे उत्तम रसायन [पौष्टीक अन्न] आहेत.

Monday, November 14, 2011

५०२. अमृतं कल्पयित्वा तु यदन्नं समुपागतम् |

प्राणाग्निहोत्रविधिना भोज्यं तद्वदघापहम् ||

अर्थ

जे अन्न आपल्यापुढे वाढून आले असेल ते अमृत आहे अशी कल्पना करून प्राण हेच अग्निहोत्र आहे अशा रीतीने [यज्ञाप्रमाणे पावित्र्य राखून] तो जसा पापहरण करतो त्याप्रमाणे हे रोग हारक आहे असे समजून जेवावे.

५०१. अर्थानामर्जने दु:खमर्जितानां च रक्षणे |

आये दु:खं व्यये दु:खं धिगर्थान् कष्टसंश्रितान् ||

अर्थ

पैसे मिळवताना [माणूस कष्ट पडल्यामुळे] दु:खी होतो मिळवलेली संपत्ती [चोर; नातेवाईक; कररूपाने घेणारे या सगळ्यांपासून ] सांभाळण्याचा त्रास असतो मिळवण्यास दु:ख; खर्च करताना पण वाईट वाटत अशा फक्त त्रासच देणाऱ्या संपत्तीचा धिक्कार असो !

५००. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती |

पुष्पाञ्जलिरयं तस्यां रसिकेभ्यो प्रदीयते ||

अर्थ

सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा ही महत्वाची; मधुर देवांनी उपयोगात आणलेली भाषा आहे. तिच्यातील [वाङ्मयाच्या ] रसिकांना त्याच भाषेमध्ये [प्रेमाची; सुभाषित रूपी] पुष्पांजली वहात आहोत.

Friday, November 11, 2011

४९९. धनमस्तीति वाणिज्यं भूमिरस्तीति कर्षणम् |

सेवा न किञ्चिदस्तीति भिक्षा नैव च नैव च ||

अर्थ

[आपल्याकडे] संपत्ती असेल तर [उपजीविकेसाठी] व्यापार करावा; जमीन असेल तर शेती करावी; अस काही नसेल तर नोकरी करावी पण भीक कधीच मागू नये.

४९८. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् |

अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात्‌ चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ||

अर्थ

आपण [स्वतः; आपल मन] जर आनंदात असेल तर [सगळं] जग आनंदी आहे [असं आपल्याला वाटत] आपण दु:खी असलो तर सगळ जग दु:खी [भासत] म्हणून जर तुला सुख मिळवण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा मन समाधानी ठेवण्याचा प्रयत्न कर.

४९७. साहित्यसंगीतकलाविहीन: साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन: |

तृणं न खादन्नपि जीवमान: तद् भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ

वाङ्मय; गानकला किंवा इतर दुसरी कोणतीही कला न येणारा [माणूस म्हणजे] शेपूट आणि शिंग नसलेला मूर्तिमंत पशूच होय तो जगतो [पण] गवत खात नाही हे पशूंचे अगदी सुदैवच म्हणायचे.

४९६. दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् |

सत्यपूतां वदेत् वाणीं मन:पूतं समाचरेत् ||

अर्थ = [पाय ठेवताना] नजरेने तपासून ठेवावा; पाणी कापडात गाळून प्यावं; बोलताना सत्याने पवित्र अशी वाणी बोलावी; मनाला [पटलं तर] पवित्र वाटेल असच वागावं [ खर तर चूक करत असताना आपलं मन खात असतं तसं झालं तर ति गोष्ट करू नये. मराठीत मात्र चवथा चरण आहे त्याचा अर्थ वाटेल तसे वागणे असा झाला आहे. मुळात संस्कृत श्लोकाचा तसा अर्थ नाही.]

४९५. ददाति प्रतिगृण्हाति गुह्यमाख्याति पृच्छति |

भुङ्क्ते भोजयते चैव षड् - विधं प्रीतिलक्षणम् ||

अर्थ

प्रेम व्यक्त सहा प्रकारांनी होते. [ज्याच्यावर जीव आहे त्याला काही] देणे; [त्याच्याकडून] घेणे; गुप्त गोष्ट विचारतो आणि [आपल्याबाबतची] सांगतो; [त्याच्याकडे] जेवतो आणि त्याला जेऊ घालतो हे प्रेम असल्याचे लक्षण आहे.

४९४. कुलीनै: सह संपर्कं पण्डितै: सह मित्रताम् |

ज्ञातिभिश्च समं मेलं कुर्वाणो नावसीदति ||

अर्थ

चांगल्या कुळातील माणसांबरोबर संबंध; विद्वानांशी मैत्री; आपल्या जातभाईशी येण-जाणं असणा-यांचा कधीच नाश होत नाही.

४९३. अनुगन्तुं सतां वर्त्म कृत्स्नं यदि न शक्यते |

स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति ||

अर्थ

सज्जनांची वाट चोखाळणं [त्यांच पूर्णपणे अनुकरण करणं] जरी [आपल्याला] शक्य नसेल तरीही थोड का होईना [जेवढ जमेल तेवढ] अनुकरण करावं [तेवढ केल्यानी सुद्धा आपल्या उन्नतीला मदतच होते.] त्या रस्त्याने जाणा-यांचा अध:पात होत नाही.

Friday, November 4, 2011

४९२. अधोऽध: पश्यतः कस्य महिमा नोपजायते |

उपर्युपरि पश्यन्त: सर्व एव दारिद्रति ||

अर्थ

आपल्यापेक्षा खाली [ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे] बघत राहिलो तर आपण मोठे [चांगल्या स्थितीत ] आहोत असे वाटते. [पण ] वर वर पहात राहिल्यास [ आपल्यापेक्षा श्रीमंता कडे ] पहात राहिल्यास [माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्यापेक्षा अधिक श्रीमंत कोणीतरी असतोच त्यामुळे ] सर्वच गरीब आहेत असे वाटू शकते.

४९१. न कामयेऽहं गतिमीश्वारात् परामष्टर्द्धियुक्तामपुनर्भवं वा |

आर्तिं प्रपद्येऽखिलदेहभाजामन्त:स्थितो येन भवन्त्यदु:खा: || भागवत ९ स्कंध २१ वा अध्याय

रन्तिदेव राजाची परिक्षा घेण्यासाठी ब्रह्मा; विष्णु महेश येतात. खूप दिवसाचा तो उपाशी असताना, [४८ दिवस तो उपाशी आहे] अन्न मिळाल्यावर एक ब्राह्मण येतो. तो खाऊन गेल्यावर, एक वृषल येतो. उरलेल्या मधून तो त्याला अन्न देतो. मग एक हरिजन कुत्री घेऊन येतो. मग पाणीच फक्त उरत ते अंत्यजाला देऊन रन्तिदेव हा श्लोक म्हणतो.

अर्थ

मी परमेश्वराकडे स्वर्गात ऎश्वर्यसंपन्न असे स्थान मिळवण्याची इच्छा किंवा मोक्ष सुद्धा मागत नाही. प्राणिमात्राच्या देहात वास करणाऱ्या आत्म्याचे दु:ख नाहीसे व्हावे म्हणून मी त्याला शरण जातो.

Tuesday, November 1, 2011

४९०. न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् |

कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ||

अर्थ

मी राजा बनण्याची इच्छा करीत नाही. मला स्वर्ग सुद्धा नको, [एवढेच काय तर] मोक्ष सुद्धा नको. दु:खाने होरपळलेल्या प्राण्यांचे संकट नाहीस व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

४८९. गच्छत: स्खलनं क्वापि भवत्येव प्रमादत: |

हसन्ति दुर्जनास्तत्र समादधति साधव: ||

अर्थ

चालायला [सुरवात केल्यावर - नवीन काही शिक्षण; उपक्रम राबवताना] चुकून कुठेतरी [माणूस] घसरतो - प्रगती न होता काहीतरी घोटाळा होऊ शकतो - अशा वेळी दुष्ट माणसे थट्टा करतात [पण] सज्जन [मात्र त्याला] सांभाळून घेतात.