भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 29, 2013

११५४. दिनयामिन्यौ सायंप्रात:शिशिरवसन्तौ पुनरायात: |

काल: क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः ||

अर्थ

रात्र आणि दिव; सकाळ नंतर संध्याकाळ अशा रीतीने सर्व ऋतु एकापाठोपाठ एक पुन्हा पुन्हा येऊन जातात. काळ असा खेळ करत असतो [आपलं] आयुष्य निघून जात तरीदेखील आशा [हाव] संपत नाही. [या आशा हा; काळज्या सोडून देऊन ईशचिंतनात माणसांनी आयुष्य व्यतीत केलं पाहिजे.]

११५३. कृमिकुलचितं लालाक्लिन्नं विगन्धि जुगुप्सितं निरुपमरसप्रीत्या खादन्नरास्थि निरामिषम् |

सुरपतिमपि श्वा पार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते नहि गणयति क्षुद्रो जन्तुः परिग्रहफल्गुताम् || नीतिशतक  राजा भर्तृहरि

अर्थ

ज्यात किडे वळवळत आहेत असे; लाळेनी बरबटलेले 'कुजका वास येणारे; किळसवाणे; ज्यात जराही मासं राहिलेलं नाही असं माणसाच हाडूक; कुत्रा अमृत चाखतोय अशा प्रेमानी खात असताना, जरी शेजारी देवांचा राजा इंद्र उभा असला तरी त्याच्याकडे पाहून सुद्धा  [ते चघळायला भीत नाही. त्याला हाडूक चघळण्याची लाज वाटत नाही.] क्षुद्र जंतूना आपल्याजवळच्या कस्पटासमान गोष्टींचा क्षुद्रपणा कळतच नाही.

Wednesday, November 27, 2013

११५२. त्रिविक्रमोऽभूदपि वामनोऽसौ स सूकरश्चेति स वै नृसिंहः |

नीचैरनीचैतिनीचनीचैः सर्वैरुपायैः फलमेव साध्यम् ||

अर्थ

[भगवान विष्णु] त्रिविक्रम झाला तोच वामन [अति बुटका; याचक] पण झाला; त्यांनी डुकराचं रूप सुद्धा धारण केलं. तोच नरसिंह सुद्धा [अति उग्ररूप] झाला [तात्पर्य असं की] हलक; क्षुद्र अगदी क्षुल्लक एकदम महान काहीही करून काम पूर्ण होईल त्याप्रकारे प्रयत्न करायचे. [त्यात कमीपणा वाटायचं काही कारण नाही. काम सुफळ करण्याला महत्व द्यावं.]

Tuesday, November 26, 2013

११५१. शिरसा विधृता नित्यं तथा स्नेहेन पालिता: |

केशा अपि विरज्यन्ते निःस्नेहा: किं न सेवकाः ||

अर्थ

ज्यांना [आपण] नेहमी [अगदी] डोक्यावर घेतलंय [=एवढा मान देतोय] स्नेहानी [प्रेमानी, तेल चोपडतोय] ते केस [इतक करून सुद्धा] विरक्त [प्रेम टाकून देतात]. काळा रंग जाऊन पांढरे होतात. तर स्नेह [जीव लावला नाही तर नोकर काय प्रेमानी [आपलं काम] करणार?

Monday, November 25, 2013

११५०. पिकस्तावत्कृष्ण: परमरुणया पश्यति दृशा परापत्यद्वेषी स्वसुतमपि नो पालयति यः |

तथाप्येषोऽमीषां सकलजगतां वल्लभतमो न दोषा गण्यन्ते खलु मधुरवाचां क्वचिदपि ||

अर्थ

खरं तर कोकीळा काळीच असते [गोरीपान; आकर्षक असं काही नाही] बघते तर तांबूस [रागीट] नजरेनी; दुसऱ्याच्या बाळांचा तर ती द्वेषच करते पण स्वतःच्या मुलाचं पण संगोपन करत नाही [इतके दुर्गुण असूनही] सर्व जगाची फार फार लाडकी असते [यावरून असं दिसत की] गोडगोड बोलणाऱ्यांचे दोष कधी मनावर घेतले जात नाही.

Sunday, November 24, 2013

११४९. भार्यावियोग: स्वजनापवादो ऋणस्य शेषं कृपणस्य सेवा |

दारिद्र्यकाले प्रियदर्शनं च विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

अर्थ

आग नसून देखील या पाच गोष्टी शरीराला [मनातून] जाळत राहतात - पत्नीचा [जोडीदाराचा] विरह, आपल्याच नातेवाईकांकडून  दूषण, कर्ज [फेडता न आल्यामुळे] राहिलेली शिल्लक, कंजूष माणसाची नोकरी आणि आपली [फार] गरिबी आलेली असताना आवडत्या माणसांची गाठभेट.

११४८. स एव रसिको लोके श्रुत्वा काव्यं परैः कृतम् |

उत्पद्यते च युगपन्नयनेऽक्ष्णोश्च यस्य वाः ||

अर्थ

या जगात; दुसर्‍यानी केलेल काव्य ऐकून ज्याच्या डोळ्यातून पाणी येत [आणि मुखातून] "वा वा " असं उमटत तोच खरा रसिक.

Friday, November 22, 2013

११४७. मूर्खत्वं सुलभं भजस्व कुमते मूर्खस्य चाष्टौ गुणा निश्चिन्तो बहुभोजनोऽतिमुखरो रात्रिंदिवा स्वप्नभाक् |

 कार्याकार्यविचारणान्धबधिरो मानापमाने समः प्रायेणामयवर्जितो दृढवपुर्मूर्खः सुखं जीवति ||

अर्थ

मूर्ख असणं सोप्प आहे, अरे ढ मुला; त्याचा आश्रय घे. मूर्खाचे आठ गुण आहेत त्याला कसली काळजी नसते; भरपूर जेवतो; अति  बडबड्या असतो; रात्रंदिवस तो [दिवा] स्वप्न बघतो; हे करावं का करू नये असल्या विचारांबाबतीत तो आंधळा आणि बहिरा पण असतो; मान किंवा अपमान त्याच्या खिजगणतीत नसतो; साधारणपणे त्याची तब्बेत ठणठणीत असते असं असल्यामुळे मूर्ख माणूस आनंदात जगतो.

Thursday, November 21, 2013

११४६. यच्चिन्तितं तदिह दूरतरं प्रयाति यच्चेतसापि न कृतं तदिहाभ्युपैति |

इत्थं विधेर्विधिविपर्ययमाकलय्य सन्तः सदा सुरसरित्तटमाश्रयन्ते ||

अर्थ

आपण ज्याची इच्छा करत असतो ती गोष्ट अगदी लांब पळून जाते आणि जे आपण मनातसुद्धा आणलं नसेल ते  समोर येऊन ठेपत. अशाप्रकारे नशिबाची उलटापालट लक्षात घेऊन सज्जन लोक नेहमी [सर्व आशा; अपेक्षाचा त्याग करून] गंगेच्या काठी [परमेश्वराची भक्ती करत] राहतात.

Wednesday, November 20, 2013

११४५. रे रे खला: शृणुत मद्वचनं समस्ताः स्वर्गे सुधास्ति सुलभा न तु सा भवद्भिः |

कुर्मस्तदत्र भवतामुपकारकारि काव्यामृतं पिबत तत्परमादरेण ||

अर्थ

सगळ्या दुष्टांनो [टवाळ मंडळीनो] माझं बोलण नीट ऐका स्वर्गात अमृत [तर] असतच. पण तुम्हाला [स्वर्गात प्रवेशच मिळणार नसल्याने] तुम्हाला ते मिळणं सोप नाहीये. तर तुम्हाला [तो आनंद मिळावा असं] तुमच्यावर उपकारच असं काव्यामृत आम्ही इथेच [तयार] करतोय तर कौतुकानी त्याचा आस्वाद घ्या. [अमृताच्या तोडीचा आनंद उत्तम साहित्य वाचून मिळवा.]

Tuesday, November 19, 2013

११४४. वरं दरिद्र: श्रुतिशास्त्रपारगो न चापि मूर्खो बहुरत्नसंयुतः |

सुलोचना जीर्णपटापि शोभते न नेत्रहीना कनकैरलङ्कृता ||

अर्थ

खूप दागिने घालून सजलेल्या [अतिशय श्रीमंत अशा]  मूर्खपेक्षा, शास्त्रांचा अभ्यास केलेला गरीब माणूस चांगला. जुने  कपडे घातले असले तरी सुंदर डोळे असणारी रमणी, पुष्कळ दागिन्यांनी मढलेल्या अन्ध स्त्री पेक्षा केंव्हाही चांगली!

Monday, November 18, 2013

११४३. नभो भूषा पूषा कमलवनभूषा मधुकरो वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम् |

मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः ||

अर्थ

सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या बागेला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्याने वाणी शोभून दिसते. अधिक संपत्ती दान करण्याने सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंतऋतु मध्ये मदनाचा अस्तित्व शोभून दिसत. सभेमध्ये चांगल वक्तृत्व शोभून दिसत. [तर] नम्रता सर्व गुणांना खुलवते.

११४२. तृष्णां चेह परित्यज्य को दरिद्र: क ईश्वर: |

तस्याश्चेत्प्रसरो दत्तो दास्यं च शिरसि स्थितम् ||

अर्थ

तृष्णेचा [हव्यास; हावरटपणाचा] त्याग केला तर कोण गरीब आणि कोण श्रीमंत? [आपल्याकडे जे आहे ते भरपूर असं ठरवलं तर सगळेच श्रीमंत आहेत.] पण जर तृष्णेला मोकळ रण दिलं तर तिची गुलामी कायमची आलीच.

११४१. परिचरितव्या: सन्तो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |

यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ||

अर्थ

सज्जन लोक जरी आपल्याला उपदेश करत नसले तरी त्यांच्या सहवासात रहावं [ते जरी उपदेशाचे दोस पाजत नसले तरी] ते सहजपणे ज्या गप्पा मारतात ती [शास्त्राप्रमाणे आचरणीय गोष्ट असते.] दुसऱ्याची निंदा; कुटाळक्या न करता ते नेहमी चांगल्या पद्धतीने विचार करत असतात.

Friday, November 15, 2013

११४०. अनन्तरत्नप्रभवस्य यस्य हिमं न सौभाग्यविलोपि जातम् |

एको हि दोषो गुणसंनिपाते निमज्जतीन्दोः किरणेष्विवाङ्कः || कुमारसंभव १ ; ३

अर्थ

[हिमालयाच्याबाबतीत; कोड येणं अशासारखा दोष, हिमानी संपूर्ण झाकल्यामुळे वाटेल का काय म्हणून कालिदास सांगतो.] भरपूर रत्नांना तो जन्म देत असल्यामुळे [तिथल्या खाणीत सर्व उत्तम पैदास होत असल्यामुळे] हिम [बर्फामुळे येणार्‍या फिकटपणामुळे] त्याचं सौंदर्य कमी झालं नाही. [स्निग्ध] चांदण्यामुळे चंद्रावरच्या डागानी त्याचं सौंदर्य [कमी न होता वाढत]. त्याप्रमाणे गुणांचा प्रचंड साठा असल्याने एखादा दोष झाकला जातो.

Thursday, November 14, 2013

११३९. एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोरिति यो बभाषे |

न तेन दृष्टं कविना समस्तं दारिद्र्यमेकं गुणकोटिहारि  ||

अर्थ

पुष्कळ गुण असताना एखादा दोष लपून जातो, [झाकला जातो] असं कवि [कालिदासाने कुमारसंभवात असं लिहिल आहे] म्हणतो, त्याला हे काही दिसलं नव्हत [त्याच्या हे कसं लक्षात आल नाही की] गरिबी [हा] एकच दोष कोट्यावधी गुणांचा नाश करतो.

Wednesday, November 13, 2013

१३३८. लोभमूलानि पापानि रसमूलाश्च व्याधयः |

इष्टमूलानि शोकानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||

अर्थ

पापे ही लोभामुळे [हव्यास हे हवं ते हवं यामुळे] होतात. वेगवेगळ्या चवीढवीमुळे आजार होतात. [जिह्वालौल्यामुळे जवळपास सगळे आजार होतात.] आपल्याला अमुकच हवंय या इच्छेमुळे खूप दु:ख होत. या तीनही गोष्टींचा त्याग करून सुखी हो.

Tuesday, November 12, 2013

१३३७. कृतार्थः स्वामिनं द्वेष्टि कृतदारस्तु मातरम् |

जातापत्या पतिं द्वेष्टि गतरोगश्चिकित्सकम् ||

अर्थ

सर्व आकांक्षा पूर्ण झाल्यावर [नोकर] मालकाचा द्वेष [कंटाळा; निंदा] करतो. लग्न झालेला मुलगा आईचा द्वेष करतो. [त्याला पहिल्या इतक आईच कौतुक रहात नाही; तिच्या चुका खूप होतात असं वाटत] मुल झाल्यावर बाई पतीचा द्वेष करते. [नवऱ्यापेक्षा मुलाची बाजू भांडणात  घेते; मुलाला अधिक महत्व देते] बरा झाल्यावर आजारी मनुष्य डॉक्टरच म्हणण तेवढस मनावर घेत नाही; [कुपथ्य करतो.]

Monday, November 11, 2013

११३६. किमिष्टमन्नं खरसूकराणां किं रत्नहारो मृगपक्षिणां च |

अन्धस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसङ्गः ||

अर्थ

अगदी उत्कृष्ट अन्न मिळालं तरी गाढव किंवा डुक्कर यांना त्याची काय चव लागणार? [त्यांना ते गोड लागणार नाही] पशू आणि पक्षी यांना रत्नाच्या हाराची किंमत कळणार नाही. दृष्टीहीनाला दिव्याचा उपयोग नसतो. बहिऱ्याला मधुर संगीताची गोडी समजणार नाही. अगदी तसच मूर्ख माणसाला शास्त्रसिद्ध गोष्टी सांगून त्याला त्याच काहीच महत्व वाटणार नाही.

११३५. अलङ्करोति हि जरा राजामात्यभिषग्यतीन् |

विडम्बयति पण्यस्त्रीमल्लगायनसेवकान् ||

अर्थ

प्रौढत्वामुळे राजा; मंत्री वैद्य आणि सन्यासी हे शोभून दिसतात. [पोक्तपणामुळे या पदाना अधिक प्रतिष्ठा मिळते] मल्ल; गायक; नोकर आणि वेश्या यांची मात्र अधोगती होते. [ मल्लाची ताकद नाहीशी झाल्यावर कुस्ती संपलीच. गळा पण म्हातारपणी साथ देत नाही.]

११३४. त्याज्यं न धैर्यं विधुरेऽपि काले धैर्यात्कदाचिद्गतिमाप्नुयात्सः |

यथा समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति तर्तुमेव ||

अर्थ

वाईट काळ आला तरी धीर सोडता कामा नये. त्या धीर धरण्यामुळे कदाचित त्याला मार्ग सापडू शकेल. जसं समुद्रात जहाज बुडल्यावर [मनात बळ धरून माणूस] पोहत पोहत [किनारा गाठण्याची] इच्छा करतो. [एखादवेळेस तो पोहून तीर गाठेल, पण घाबरला तर नक्की बुडून जाईल] म्हणून मन घट्ट करून संकटाला तोंड दिल पाहिजे.]

११३३. शक्तेनापि सता जनेन विदुषा कालान्तरप्रेक्षिणा वस्तव्यं खलु वज्रपातविषमे क्षुद्रेऽपि पापे जने |

दर्वीव्यग्रकरेण धूममलिनेनायासयुक्तेन किं भीमेनातिबलेन मत्स्यभवनेऽपूपा न संघट्टिताः ||

अर्थ

[वाईट काळ आला असताना] ज्ञानी [विचारी] माणसाने तो जरी [फार] सामर्थ्यवान असला तरीही; खरोखर; आपल्या डोक्यावर वज्र आदळतय [इतका त्रास होत असला तरी] आपले [चांगले] दिवस येण्याची वाट पहातात. पापी आणि क्षुल्लक अशा लोकांच्यात [सहनशीलतेने] रहावे [हेही दिवस जाऊन चांगले दिवस येतात] अतिशय सामर्थ्यवान अशा भीमाने सुद्धा [अज्ञातवासात] विराट राजाकडे; अति कष्ट करत धुराने भरलेल्या [मुदपाकखान्यात] हातात पळी घेऊन घावन रांधले नाहीत काय?

Tuesday, November 5, 2013

११३२. उचितमनुचितं वा कुर्वता कार्यजातं परिणतिरवधार्या यत्नतः पण्डितेन |

अतिरभसकृतानां कर्मणामा विपत्तेर्भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाक: ||

अर्थ

हुशार माणसाने [कुठलही] काम करण्याआधी हे योग्य आहे की अयोग्य; त्याचा परिणाम काय होईल याचा प्रयत्नपूर्वक विचार करावा. [काम नीट विचार करूनच करावी] घाईघाईने केलेल्या कामांमुळे छातीत बाण घुसावा त्याप्रमाणे अतिशय त्रासदायक परिणाम; संकट येण्या आधीपासूनच होतो.

११३१. वनेषु दोषाः प्रभवन्ति रागिण:गृहेषु पञ्चेन्द्रियनिग्रहस्तपः |

अकुत्सिते कर्मणि यः प्रवर्तते निवृत्तरागस्य गृहं तपोवनम् ||

अर्थ

विषयी [आसक्त] माणूस अरण्यात राहिला तरी त्याच अधःपतन होऊ शकत. तेच पंचेंद्रियांवर ताबा मिळवून माणूस घरात राहिला तरी ते तपच होय. अयोग्य कर्म न करता; आसक्ति रहित राहून कर्तव्य करणाऱ्याच्या बाबतीत घर हेच आश्रमाप्रमाणे असत. [घरालाच आश्रमाच पावित्र्य प्राप्त होत. त्याला सन्यास घ्यायची काही जरुरी नसते.]

Monday, November 4, 2013

११३०. क्रोधो हि शत्रुः प्रथमो नराणां देहस्थितो देहविनाशनाय |

यथा स्थितः काष्ठगतो हि वह्निः स एव वह्निर्दहते शरीरम् ||

अर्थ

आपल्याच शरीरात असणारा क्रोध [संतापीपणा] हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. तो आपल्याच देहात असला तरी आपला नाश करतो. जसं लाकडामध्ये आग लपलेली असते, त्या आगीमध्ये लाकुडच जळून खाक होत तसा; तो [संतापच] आपला नाश करतो. [म्हणून रागावर ताबा मिळवावा]

११२९. अन्यमुखे दुर्वादो यः प्रियवदने स एव परिहास: |

इतरेन्धनजन्मा यो धूमः सोऽगरुभवो धूमः ||

अर्थ

[कटू वचने] परक्याच्या तोंडातून [ऐकली] तर त्याला मुक्ताफळं वगैरे नाव मिळत. तेच आवडीच्या माणसांनी बोलल तर ती थट्टा होते. जसं अगरू [चंदना सारखं सुवासिक काष्ठ] जाळल्यावर धूप केला असं आपण म्हणतो तेच इतर लाकडांना मात्र धूर झाला असं वाटत.

Friday, November 1, 2013

११२८. दक्षः श्रियमाधिगच्छति पथ्याशी कल्यतां सुखमरोगी |

अभ्यासी विद्यान्तं धर्मार्थयशांसि च विनीतः ||

अर्थ

जो सतर्क असतो त्याला श्रीमंती मिळते. आरोग्यदायी अन्न सेवन करणाराची तब्बेत चांगली राहते. सुदृढ माणूस सुखी असतो. अभ्यासूवृत्तीच्या माणसाला अगदी वरपर्यंत शिकता येत. चांगल्या वळणाच्या माणसाला धर्म; संपत्ती आणि कीर्ति यांचा लाभ होतो.