भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, February 28, 2012

६०४. योऽत्ति यस्य यदा मांसमुभयो: पश्यतान्तरम् |

एकस्य क्षणिका प्रीतिरन्य: प्राणैर्वियुज्यते ||

अर्थ

जेंव्हा एक [प्राणी] दुसऱ्याचे मांस खातो तेंव्हा [त्या गोष्टीच्या परिणामातील] फरक पहा [त्यामुळे खाणाऱ्याला] क्षणभर आनंद होतो पण दुसऱ्याचा मात्र जीवच जातो.

६०३. इक्षोरग्रात्क्रमश: पर्वणि पर्वणि यथा रसविशेष: |

तद्वत्सज्जनमैत्री विपरीतानां तु विपरीता ||

अर्थ

उसाच्या वरच्या टोकापासून जसं जसं पुढचं पेर अधिकाधिक [मधुर] रसाळ असं असत त्याचप्रमाणे सज्जनांशी केलेली मैत्री [अधिकाधिक मधुर बनत जाते] आणि दुर्जानाशी केलेली मैत्रीच मात्र उलटं असतं.

६०२. वरं वनं वरं भैक्ष्यं वरं भारोपजीवनम् |

पुंसां विवेकहीनानां सेवया न धनार्जनम् ||

अर्थ

अविचारी मालकांची सेवा [नोकरी] करून पैसे मिळवण्यापेक्षा अरण्यात [राहिलेलं] परवडलं; भीक मागणं बर किंवा [कुणावर तरी] भार होऊन राहण बरं.

६०१. आगच्छदुत्सवो भाति यथैव न तथा गत: |

हिमांशोरुदय: सायं चकास्ति न तथोषसि ||

अर्थ

[पुढे] येणाऱ्या सणाचं [आपल्याला जितक कौतूक] वाटत तितकं होऊन गेलेल्या सणाच वाटत नाही. संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी तो जसा तेजस्वी दिसतो तसा पहाटे [अस्ताच्या वेळी] दिसत नाही.

Friday, February 24, 2012

६००. मांसं मृगाणां दशनौ गजानां मृगद्विषां चर्म फलं द्रुमाणाम् |

स्त्रीणां सूरूपं च नृणां हिरण्यमेते गुणा: वैरकरा भवन्ति ||

अर्थ

प्राण्यांच मांस; हत्तींचे दात; वाघ सिंह वगैरे प्राण्यांच कातडं; झाडांची फळं; स्त्रियांचे सौंदर्य आणि सगळ्या लोकांच सोनं [संपत्ती] ह्या त्यांच्या गुणांमुळेच [या गोष्टी लुबाडणारे त्यांच्याशी] वैर करतात.

Wednesday, February 22, 2012

५९९. पिनाकफणीबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता |

पवर्गरचितामूर्तिरपवर्गप्रदायिनी ||

अर्थ

पिनाक [त्रिशूळ] फणी [सर्प] बालेंदु [चंद्राची कोर] भस्म आणि मंदाकिनी [गङ्गा] या पवर्गातील गोष्टी ज्या [मूर्तीत आहेत अशी] भगवान शंकराची मूर्ति [मात्र] अपवार्गाचा [स्वर्गाचा] लाभ करून देते.

Tuesday, February 21, 2012

५९८. प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता |

शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

अर्थ

[शुक्लपक्षातील] प्रतिपदेच्या चन्द्रकोरी प्रमाणे विकास पावण्याचा स्वभाव असणारी; सर्व जगाला आदरणीय वाटणारी; शहाजीराजांच्या पुत्राची; शिवाजी महाराजांची मुद्रा [नाणी; चलन जनतेच्या] कल्याणासाठी शोभून दिसते.

Monday, February 20, 2012

५९७. अङ्गणवेदी वसुधा कुल्ल्या जलधि: स्थली च पातलम् |

वल्मीकश्च सुमेरु: कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ||

अर्थ

[एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी] ज्याने पक्का निश्चय केला आहे, अशा मनस्वी माणसाला पृथ्वी ही घराच्या आवारा प्रमाणे [लहान] वाटते. समुद्र हा डबकं असल्यासारखा वाटतो. पाताळ [कितीही खोल जायचं असल तरी तो उत्साहाने] माळ असल्याप्रमाणे [ओलांडतो.] अति उंच मेरू पर्वत असला तरी वारुळासारखा [क्षुल्लक मानून तो सर्व अडचणी पार करीत राहतो.]

५९६. संरोहत्यग्निना दग्धं वनं परशुना हतम् |

वाचा दुरुक्तं बीभत्सं न संरोहति वाक्-क्षतम् ||

अर्थ

अरण्यातील कुऱ्हाडीने तोडलेली किंवा वणव्याने जळलेली [झाडे पुन्हा] वाढतात. पण [त्या जखमा भरून आल्या तरी] कडवट आणि घाणेरडं बोलण्याने झालेली जखम भरून येत नाही.

Thursday, February 16, 2012

५९५. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: |

पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||

अर्थ

सगळी उपनिषदं याच गाई [त्या सर्वामधील तत्वज्ञानाच सार]; हे अमृताप्रमाणे असणार महत्वपूर्ण दूध ; श्रीकृष्ण दोहन करीत आहे; तिथे अर्जुन हे वासरू [त्याच्यासाठीच हे दोहन झालं आणि त्यामुळे त्याचा आस्वाद विचारी माणसाला घेता येतो.]

Wednesday, February 15, 2012

५९४. शय्या वस्त्रं चन्दनं चारू हास्यं वीणा वाणी सुन्दरी या च नारी |

न भ्राजन्ते क्षुत्पिपासातुराणां सर्वारम्भास्तण्डुलप्रस्थमूला: ||

अर्थ

[सुंदर] बिछाना; [चांगले] कपडे; सुंदर हास्य; वीणा [वादन, संगीत]; सुंदर स्त्री या [आणि अशा कुठल्याही गोष्टी] तहानलेल्या आणि भुकेजलेल्या माणसाना भावत नाहीत. [भूक आणि तहान ही पहिली गरज भागल्यावर मग इतर गोष्टींनी आनंद होतो म्हणून] सगळ्याच गोष्टींच्या आधी तांदूळ [अन्न; त्यासाठी लागणारा पैसा ह्याचा विचार] सुरवातीला करावा लागतो.

Tuesday, February 14, 2012

५९३. वृक्षं क्षीणफलं त्यजन्ति विहगाः शुष्कं सर: सारसा निर्द्रव्यं पुरुषं त्यजन्ति गणिका भ्रष्टं नृपं मन्त्रिणः |

पुष्पं पर्युषितं त्यजन्ति मधुपा दग्धं वनान्तं मृगा: सर्व: कार्यवशाज्जनोभिरमते तत्कस्य को वल्लभ: ||

अर्थ

फळांचा बहर संपल्यावर पक्षी झाडांना सोडून देतात. [दुसऱ्या झाडांवर जातात] तळ आटलं की क्रौंच पक्षी [दुसऱ्या तळ्यावर] जातात. वेश्या गरीब माणसाला सोडून देतात. पदच्युत झालेल्या राजाचा मंत्री त्याग करतात. भुंगे सुकलेल्या फुलावरून उडून जातात. आपल कुठलं तरी काम होण्याच्या आशेने लोक सहवास करतात. कोणाला बरं दुसऱ्याबद्दल खरं प्रेम असत? [सर्व त्यांच्या त्यांच्या कामापुरते गोड वागून काम झालं की पळतात.]

५९२. दरिद्रता धीरतया विराजते कुरूपता शीलतया विराजते |

कुभोजनं चोष्णतया विराजते कुवस्त्रता शुभ्रतया विराजते ||

अर्थ

धैर्याने वागल्यामुळे गरिबी शोभून दिसते. [त्या लोकांच हसं न होता इतर सगळे त्यांना मानानी वागवतात.] चारित्र्य चांगल असेल तर कुरूप व्यक्तींचा आब राहतो. कदान्न [कमी किमतीच्या वस्तूंच म्हणा किंवा नीट न जमलेला पदार्थ असेल तरी; निदान] गरम असेल तर ठीक लागतो.[जुने किंवा ] जाडेभरडे कपडे स्वच्छ असले तर शोभून दिसतात.

Monday, February 13, 2012

५९१. क्रोधो हि शत्रु: प्रथमो नराणां देहस्थितो देहविनाशनाय |

यथा स्थितो काष्ठगतो हि वह्नि: स एव वह्नि: दहते शरीरम् ||

अर्थ

संताप हा माणसाचा सर्वात पहिला शत्रु आहे आपल्या शरीरातच तो राहतो आणि [आपण संतापल्यास आपल्याच ] शरिराचं नुकसान - अगदी मृत्यू येई पर्यंत - करतो. जसं लाकडात आग सुप्तपणे असतेच पेट घेतल्यावर ते लाकूड स्वतःलाच जाळून टाकत

५९०. कल्पद्रुमो न जानाति न ददाति बृहस्पति: |

अयं तु जगतीजानिर्जानाति च ददाति च ||

अर्थ

राजप्रशंसा - कल्पवृक्ष [हा इच्छित वस्तु देतो पण खरी जरूर कशाची आहे हे त्याला] समजत नाही. बृहस्पतीला [सगळं ज्ञान असत पण तो] दान करत नाही. ह्या राजाला मात्र कळतं पण आणि तो दान पण करतो.

Friday, February 10, 2012

५८९. अन्यमुखे दुर्वादो य: प्रियवदने स एव परिहास: |

इतरेन्धनजन्मा यो धूम: सोऽगरुभवो धूप: ||

अर्थ

दुसऱ्या कोणी [वाईट] बोलल्यावर [त्याला आपण मुद्दाम] लागट [टोचून बोलला असं म्हणतो.] आवडत्या माणसांनी तेच [बोलल तर] थट्टा केली असं धरतो. [सगळ्याच] लाकडांना येतो तो धूर [त्रासदायक] पण अगरू [चंदनासारखे सुवासिक वृक्ष] त्याला आपण धूप घातलाय असं म्हणतो.

Thursday, February 9, 2012

५८८. अत: परीक्ष्य कर्तव्यं विशेषात्सङ्गतं रह; |

अज्ञातहृदयेष्वेवं वैरीभवति सौहृदम् ||
अभिज्ञान शाकुन्तल कालिदास

अर्थ

म्हणून [स्त्रीने; परिणामाचा विचार करून ] विशेषेकरून [नुसत्या गप्पा मारणं वगैरे ठीक आहे]; त्या  माणसाची पूर्ण परीक्षा करून [अगदी सर्व बाजूनी त्याची चौकशी करून नंतरच] एकान्त करावा. नाहीतर ज्याचं मन ओळखलेल नाही, अशांच्या बाबतीत [मागाहून] प्रेमाचं रुपांतर वैर करण्यात  होत.

५८७. सर्व एव जन: शूरो ह्यनासादितसङ्गर: |

अदृष्टपरसामर्थ्य: सदर्प: को भवेन्न हि ||

अर्थ

युद्ध करायला न गेलेले सर्वजण [स्वतःला] शूरच [समजतात.] जोपर्यंत दुसऱ्याचा पराक्रम पहिला नाही तोपर्यंत कोण गर्व करणार नाही. [विराटाच्या उत्तराने सुद्धा रणांगणावर जाण्यापूर्वी खूप बढाया मारल्या होत्या.]

Tuesday, February 7, 2012

५८६. एक एव तप: कुर्यात् द्वौ स्वाध्यायपरौ हितौ |

त्रयोऽधिका वा क्रीडायां प्रवासेऽपि च ते मता: ||

अर्थ

तपश्चर्या करायला एकट्यानेच बसावे. अभ्यासाला मात्र दोघे असणं हितकारक असतं. खेळ किंवा प्रवासाला तीन किंवा त्यापेक्षा अधिक सवंगडी चांगले असं म्हणतात.

Monday, February 6, 2012

५८५. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये |

भावे हि विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम् ||

अर्थ

देवाचं अस्तित्व हे लाकडी [मूर्तीत] नाही, दगडी [मूर्तीत] नाही किंवा मातीच्या मूर्तीत आहे असं पण नाही. [भक्ताचा तीव्र] भाव असेल तिथेच [देव वास्तव्य] करतो. तेंव्हा दृढ भक्ती हीच भगवंताच्या वास्तव्याच कारण आहे. [मोठ्या बडेजाव करून सोन्या चांदीची उपकरणे घेण्याची पण जरूर नाही. मनापासून भक्ती करणं जरूर आहे.]

५८४. यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते |

तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत्फलम् ||

अर्थ

ज्याप्रमाणे एकच हाताने टाळी वाजत नाही त्याचप्रमाणे प्रयत्न सोडून दिल्यास कुठलही काम परिपूर्ण होत नाही.

५८३. सन्तोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तचेतसाम् |

कुतस्तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम् ||

अर्थ

समाधान रूपी अमृताने परिपूर्ण असणाऱ्या संमंधात अन्त:करण असणाऱ्या लोकांना जे सुख प्राप्त होत तसं संपत्तीची हाव असणाऱ्या; सतत कशाना कशाच्या तरी मागे धावणाऱ्या कोठून मिळणार?

Friday, February 3, 2012

५८२. कृतान्तस्य दूती जरा समागत्य वक्तीति लोका: श्रुणुध्वम् |

परस्त्रीपरद्रव्यवाञ्छां त्यजध्वं भजध्वं रमानाथपादारविन्दम् ||

अर्थ

जरा [म्हातारपण] ही यमाची दूती जवळ येऊन सांगते; ' लोकानो ऐका; [आता म्हातारपण आलाय आता तरी] परस्त्री आणि दुसऱ्याची संपत्ती ह्यांची हाव सोडा आणि परमेश्वराच्या चरणांची भक्ती करा.

Thursday, February 2, 2012

५८१. सिद्धिं वाञ्छयता जनेन विदुषा तेजो निगृह्य स्वकं सत्वोत्साहवतापि दैवगतिषु स्थैर्यं प्रकार्यं क्रमात् |

देवेन्द्रद्रुहिणोपमैर्बहुगुणैरभ्यर्चितो भ्रातृभिः किं क्लिष्ट: सुचिरं विराटभवने पूर्वं न धर्मात्मज: ||

अर्थ

स्वतःपाशी खूप ताकद आणि उत्साह असला तरी नशीब विरोधात असताना; यश मिळवायचं असेल तर; ज्ञानी [विचारी] माणसाने स्वत:चं तेज आवरून [झाकून] शांत राहील पाहिजे अतिशय गुणी असे; इंद्राला सुद्धा पराभूत करतील असे [पराक्रमी] भाऊ मनापासून मदत करत असून सुद्धा धर्मपुत्र [युधिष्ठिराने जय मिळण्या] पूर्वी विराटाच्या महालामध्ये पुष्कळ काळपर्यंत कष्ट सोसले नाहीत काय? [दैव प्रतिकूल असताना सहनशक्ति वाढवून सोसावं लागत. मग आपला जय होतो]

Wednesday, February 1, 2012

५८०. सर्वथा स्वहितमाचरणीयं किं करिष्यति जनो बहुजल्प: |


विद्यते न हि स कश्चिदुपाय: सर्वलोकपरितोषकरो य: ||

अर्थ

आपलं कल्याण होईल अस आचरण करावं. [लोक नाव ठेवतील याचा बाऊ करू नये. नुसती,] भाराभर बडबड करणारे लोक [आपलं काय वाकडं] करणार आहेत? सगळ्या जगाला आनंद देईल असा कुठलाच उपाय नसतो. [प्रत्येक गोष्टीमुळे कोण ना कोण दुखावतो त्यामुळे मुद्दाम एखाद्याच वाटोळ वगैरे करायचं नाही पण आपल्या हिताच्या गोष्टी भिडेखातर सोडू नयेत.]