भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, March 16, 2015

१३९२. भिक्षाशनं भवनमायतनैकदेशः शय्या भुवः परिजनो निजदेहभारः |

वासश्च जीर्णपटखण्डनिबद्धकन्था हा हा तथापि विषयान्न जहाति चेतः ||

अर्थ

जेवण भिक्षा मागून; घर म्हणजे बसलोय तेवढी जागा; अंथरूण जमीन; आपलं स्वतःच शरीर हाच नोकरवर्ग; जुन्या फाटक्या चिंध्यांची गोधडी एवढेच कपडे [थोडक्यात जवळ काही सुद्धा नाही] तरीही; अरेरे!  मन विषयांचा त्याग करत नाही. [ विषयांमध्ये घोटाळतय!]

Thursday, March 12, 2015

१३९१. तृष्णां चेह परित्यज्य को दरिद्रः क ईश्वरः |

तस्याश्चेत्प्रसरो दत्तो दास्यं च शिरसि स्थितम् ||

अर्थ

[माणसांनी] जर हाव सोडून दिली तर मग कोण गरीब आणि कोण श्रीमंत? [आहे त्यात समाधान राखलं तर सगळेच सारखे होतील] पण तृष्णेला जर शिरकाव करू दिला तर गुलामी ठरलेलीच. [आपल्याला हे हवं ते हवं म्हणजे कष्ट; लाचारी सगळ आलं]

Monday, March 9, 2015

१३९०. श्रुत्वा षडाननजनुरर्मुदितान्तरेण पञ्चाननेन सहसा चतुराननाय |

शार्दूलचर्म भुजगाभरणं सभस्म दत्तं निशम्य गिरिजाहसितं पुनातु ||

अर्थ

षडानन [सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाच्य] जन्माची [खबर मिळाल्याच्या] आनंदात पंचाननाने [पाच मुखे असणाऱ्या भगवान शंकराने] चटकन चतुराननाला [चार मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला; आपल्या जवळ असणारी संपत्ती [?] वाघाच चर्म; सापांची कडी आणि भस्म दिलं हे ऐकून पार्वतीला जे हसू फुटलं ते [आपल्या सर्वांच] रक्षण करो.

Sunday, March 8, 2015

१३८९. विषस्य विषयाणां हि दृश्यते महदन्तरम् |

उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||

अर्थ

विषय [हे विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर] आणि विष यात फार फरक आहे. विष खाल्लं तर [ते खाणाराला] मारून टाकत पण विषय मनात नुसते घोळवून [दुष्परिणाम होतो आणि] मरण ओढवत. [म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की नाही?]

Monday, February 23, 2015

१३८८. चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः |

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ||

अर्थ

[जरी पर्वत वादळामुळे हलत नसले तरी] प्रलय काळातील झंझावातामुळे ते [सुद्धा] डळमळले तर खुशाल घसरू देत पण धैर्यवान; बुद्धिमान लोकांची स्थिर बुद्धी कुठल्याहि संकटात विचलित होत नाही.

Thursday, February 19, 2015

१३८७. प्राप्ता जरा यौवनमप्यतीतं बुधा यतध्वं परमार्थसिद्ध्यै |

आयुर्गतप्रायमिदं यतोऽसौ विश्राम्य विश्राम्य न याति कालः ||

अर्थ

अरे समजदार माणसांनो; तारुण्य तर गेलंच आहे; म्हातारपण येऊन ठेपलंय [आता तरी] अद्ध्यात्माच्या  [तत्त्वज्ञानाच्या] प्राप्ती साठी झटा. आयुष्य संपल्यात जमा आहे कारण की काळ [यम] थांबून थांबून [तुमच मन अशान्त आहे म्हणून तुम्हाला वेळ देऊन] येत नाही. [आपली घटका भरली की तो नेतोच.]

Tuesday, February 17, 2015

१३८६. एकेश्वर्ये स्थितोऽपि प्रणतबहुफलो यः स्वयं कृत्तिवासाः कान्तासंमिश्रदेहोऽप्यविषयमनसां यः पूरस्ताद्यतीनाम् |

अष्टाभिर्यस्य कृत्स्नं जगदपि तनुभिर्बिभ्रतो नाभिमानः सन्मार्गालोकनाय व्यपनयतु स नस्तामसीं वृत्तिमीशः  ||

अर्थ

भक्तांना भरपूर फळ देणारा असा हा महेश सर्व ऐश्वर्य त्याच्यामध्ये एकवटलं असून सुद्धा स्वतः [व्याघ्र] चर्म परिधान करतो. अर्धांगी शरीरातच अन्तर्भूत असूनही; विषयापासून निवृत्त अशा तापसी यतींमध्ये  तो भगवान अग्रगण्य आहे. आपल्या अष्ट प्रकृतींनी सर्व जग धारण करत असूनही ज्याला अभिमान शिवत नाही अशा त्या भगवान शंकराने आम्ही सन्मार्गावर रहावं म्हणून आमच्या तामस वृत्तीचे हरण करावे,

Tuesday, February 3, 2015

१३८५. धर्मं प्रसङ्गादपि नाचरन्ति पापं प्रयत्नेन समाचरन्ति |

आश्चर्यमेतद्धि  मनुष्यलोकेऽमृतं परित्यज्य विषं पिबन्ति ||

अर्थ

या जगात; [लोक] सत्कृत्य जराही करत नाहीत; पापं अगदी कळत असून मुद्दामहून करतात. हे मोठच नवल आहे की माणसं अमृता [प्रमाणे असणाऱ्या] धर्माच सेवन न करता, अमृत टाकून देऊन विष [पापाचरण करतात] पितात.

Saturday, January 31, 2015

१३८४. भारोऽविवेकिनः शास्त्रं भारो ज्ञानं च रागिणः |

अशान्तस्य मनो भारः भारोऽनात्मविदो वपुः || योगवासिष्ठ
अर्थ

विचार; मनन केलं नाही तर शिक्षण हे फक्त ओझं बनत. [पोपटपंची] आसक्ती [सुटत नसेल] तर  [तत्व] ज्ञान  हे ओझं ठरत. मन हे अस्वस्थ [चंचल] माणसाला त्रासदायक असत. आत्मज्ञान झालं नाही तर आपला देह भारभूत आहे.

Wednesday, January 28, 2015

१३८३. हालाहलं नैव विषं विषं रमा जनाः परं व्यत्ययमत्र मन्वते |

निपीय जागर्ति सुखेन तं शिवः स्पृशन्निमां मुह्यति निद्रया हरिः ||

अर्थ 

[खरं तर समुद्रमंथनात निघालेलं जहाल विष] हालाहल हे काही विष नव्हेच. [त्यातून आलेली देवी] लक्ष्मी हेच विष आहे. पण लोकांना मात्र उलटच वाटत. [कारण असं पहा की] ते [विष] पिऊन [अगदी शरीरात ठेऊन सुद्धा भगवान ] शंकर मजेत जागृत राहतो आणि विष्णुला मात्र तिला नुसता स्पर्श केल्यावर झोप घेरून टाकते. [अगदी सापावर सुद्धा झोपतोय.]

Tuesday, January 27, 2015

१३८२. वासश्चर्म विभूषणं शवशिरो भस्माङ्गलेपः सदा ह्येको गौः स च लाङ्गलाद्यकुशलः सम्पत्तिरेतादृशी |

इत्यालोच्य विमुच्य शङ्करमगाद्रत्नाकरं जाह्नवी कष्टं निर्धनिकस्य जीवितमहो दारैरपि त्यज्यते ||

अर्थ

कपडा म्हणजे काय तर कातडं! दागिना म्हणजे प्रेताची कवटी; अंगाला तर कायम भस्म फासलेलं; जवळ एकच बैल आणि त्याला [जमीन] नांगरायला वगैरे काहीच येत नाही, एवढीच काय ती मालमत्ता. असं सगळ बघून शंकराला सोडून दिऊन गंगा [रत्नांची खाण असणाऱ्या] समुद्राकडे की हो निघून गेली! दरिद्र्याच जगणंच कठीण! अहो बायको सुद्धा टाकून देते.

१३८१. रहस्यभेदो याञ्चा च निष्ठूर्यं चलचित्तता |

क्रोधो निःसत्यता द्यूतमेतन्मित्रस्य दूषणम् ||

अर्थ

गौप्यस्फोट करणं; मागणे; ताठपणा; मनाची चंचलता; रागीटपणा; दारू पिणे आणि खोटं बोलणे ही मित्र वाईट असल्याची लक्षण आहेंत.

Wednesday, January 21, 2015

१३८०. सिंहो व्याकरणस्य कर्तुरहरत्प्राणान्प्रियापाणिनेर्मीमांसाकृतमुन्ममाथ सहसा हस्ती मुनिं जैमिनिम् |

छन्दोज्ञाननिधिं जघान मकरो वेलातटे पिङ्गलमज्ञानावृतचेतसामतिरुषां कोऽर्थस्तिरश्चां गुणैः ||
 
अर्थ 
 
व्याकरणाची रचना करणाऱ्या [एवढ्या थोर बुद्धिमान ] पाणिनीचे प्रिय असे प्राण सिंहाने घेतले. मीमांसा शास्त्र समजावून सांगणाऱ्या जैमिनीला हत्तींनी ठार केलं. वेदांच संपूर्ण ज्ञान असणाऱ्या पिंगल  ऋषींना नदीकाठी मगरींनी गिळलं. [हे एवढे थोर लोक असले तरी] अतिशय तापट आणि अज्ञानी [गुणांची कदर नसणाऱ्या] पशु [आणि पशु तुल्य माणसांपुढे] गुणी लोकांचा काय पाडाव लागणार? [ते त्यांचा नाशच करणार.]

Monday, January 12, 2015

१३७९. आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |

आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||

अर्थ

[फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून] नारळाच्या पोटात /मनात [पाणी] पाणी  झालं. फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला. उंब्राच फळ तर फुटलंच.  केळ्यानी तर मान खालीच घातली. द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहान झाली जांभूळ [हेव्यानी] जांभळ पडलं.  [हे सगळं  मत्सरानी बरं !]

Friday, January 2, 2015

१३७८. शूरोऽसि कृतविद्योऽसि दर्शनीयोऽसि पुत्रक |

यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते || पंचतंत्र

अर्थ

[दत्तक कोल्हयाच्या पिलाला सिंहीण म्हणते]  तू पराक्रमी आहेस, शिकलेला आहेस, देखणा आहेस; पण बाळा ज्या घराण्यात तुझा जन्म झाला [त्यातले प्राणी] हत्तीला मारू [शकत] नाहीत.