भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, August 30, 2010

२६०. परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् |

परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ||

युधिष्ठिर महाभारत

अर्थ

एकमेकात भांडण झाल्यास, आपण [पांडव] पाच आणि ते कौरव शंभर आहेत. पण दुसऱ्या [शत्रूशी] युद्ध असताना आपण एकशे पाच [पांडव अधिक कौरव] आहोत.

२५९. गुणेष्वनादरं भ्रातः पूर्णश्रीरपि मा कृथाः |

सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः ||

अर्थ

हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे [संवर्धन करण्यात] दुर्लक्ष करू नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने] पूर्ण भरला असला तरी गुण [गुण किंवा पोहोऱ्याचा दोर] तुटल्यास खाली कोसळतो.

Monday, August 16, 2010

२५८. जगतीह बन्धुभावं विजयं जयं च लभताम् |

मम राष्ट्रमानचिह्नं राष्ट्रध्वजं नमामि ||

या जगामध्ये बंधुभाव [प्रेम] पसरो. [सत्याचा निश्चितपणे] विजय होवो. [मी] राष्ट्राचे मानचिह्न असणाऱ्या राष्ट्रध्वजाला वन्दन करतो.

२५७. अकुतोभयं मनो मे, त्वयि नित्यमेव रमताम् |

सत्यं शिवं च हृद्यं , लब्धुं सदा प्रयतताम् ||

अर्थ

अत्यंत निर्भय असे माझे मन तुझ्या [निरीक्षणात] नेहमी आनंदी होवो नेहमी शाश्वत सत्य, मनोहर कल्याण मिळवण्याचा प्रयत्न करो.

२५६. मरुता प्रकम्पमानं, उच्चैर्विराजमानम् |

रुचिरं त्रिवर्णकान्तं, राष्ट्रध्वजं नमामि ||

अर्थ

तेजस्वी अशा, तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या, [खूप] उंचावर वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाला मी वन्दन करतो.

Friday, August 13, 2010

२५५.कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् |

परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः ||

अर्थ

कावळ्यांच्या घरट्यात काव काव चालू असताना, कोकीळपक्षाचे कुहू कुहू गायन शोभून दिसते काय? [ते लोपून जाते तसंच] दुष्ट लोक परस्परांशी बोलत असताना विचारी माणसाने गप्प बसावे. [त्यांचा फक्त अपमान होईल]

२५४. अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |

बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः ||

अर्थ

थोडक्यात आणि सुंदर भाषेत जो सांगतो तो खरोखर [चांगला-फर्डा] वक्ता होय. खूप बडबड करून त्यातून थोडासाच अर्थ निघत असेल तर त्याला वाचाळ म्हणावे.

Sunday, August 8, 2010

२५३. सन्तश्च लुब्धाश्च महर्षिसंघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः |

किं किं सामिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किं माधवदाघयानम् ||

चित्रकाव्याच्या विविधप्रकारापैकी ' अन्तरालाप ' नावाचा एक चमत्कृतिपूर्ण काव्यप्रकार आहे. अन्तरालापाच्या एकच श्लोकात प्रश्न व त्या प्रश्नांची दडलेली उत्तरे असतात. प्रस्तुत श्लोकात सज्जन, लोभी, ऋषीसमूह, ब्राह्मण, शेतकरी आणि मान्यवर हे सहाजण कशाची इच्छा करतात? असा एक प्रश्न आणि या सहाहि जणांना नको वाटणारी एकच गोष्ट कोणती? असा दुसरा प्रश्न विचारला आहे.

२५२. सम्पन्नतरमेवान्नं दरिद्रा भुञ्जते सदा |

क्षुत् स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ||

अर्थ

गरीब लोक नेहमी अतिशय चांगल असं अन्न भक्षण करतात. कारण भूक ही सुंदर चव आणते की जि [गोष्ट] श्रीमंतांच्या बाबतीत दुर्मिळ असते.

२५१. पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् |

मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||

अर्थ

शिकत राहणाराला मूर्खपणाचा धोका नसतो. जप करणाराला पाप लागण्याचा धोका नसतो. मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते. दक्ष राहणार्याला कसलीच भीती नसते.

Friday, August 6, 2010

२५०. न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः |

यो वै युवाप्यधीयानः तं देवाः स्थविरं विदुः ||

अर्थ

ज्याचं डोकं म्हातारपणामुळे पांढरे झाले आहे त्याला देव वृद्ध म्हणत नाहीत तर जो तरुण असूनही [खूप] शिकलेला आहे त्याला वृद्ध असे म्हणतात.

२४९. को हि तुलामधिरोहति शुचिना दुग्धेन सहजमधुरेण |

तप्तं विकृतं मथितं तथापि यत्स्नेहमुद्गिरति ||

अर्थ

जन्मतः मधुर असणाऱ्या दुधाची कोण बरे बरोबरी करू शकेल ते तापवल [त्रास दिला] विकार केला [विरजून दही केलं] घुसळल [कसाही त्रास दिला] तरी स्नेह [स्निग्धता -प्रेम - ओशटपणा] प्रकट करते.

Tuesday, August 3, 2010

२४८. विना कार्येण ये मूढा गच्छन्ति परमन्दिरम् |

अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी ||

अर्थ

जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे नक्की कमीपणा येतो.

२४७. तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतो रुतैः |

रतार्ता तित्तिरी रौति तीरे तीरे तरौ तरौ ||

अर्थ

कामविव्हल झालेली टिटवी ह्या अशा अधिकाधिक वाढत जाणाऱ्या कर्कश आवाजात सगळ्या काठावर प्रत्येक झाडावर ओरडत आहे.

चित्रकाव्यामध्ये हा द्वयक्षर श्लोक रसपूर्ण आणि अर्थाची ओढाताण न करता सुंदर रचना केली आहे.

२४६. कर्तव्यमद्य किमु वेत्यविचिन्तयन्तमुत्साहशून्यमवलोंक्य नरं हताशम् |

मोक्षं प्रवृत्तिसुलभं प्रदिशन्तमत्र प्रत्नं नमामि पुरुषं धृतबालभावम् ||

मुकुन्दराय [मिरजकर]

अर्थ

उत्साह मुळीच नसलेल्या, कर्तव्ये करावी [की संन्यासात सुख मानावे अशा गोंधळात पडलेल्या], निराश अशा [अर्जुनाला - भारतीय जनतेला] पाहून प्रवृत्तिपर मोक्षाच्या मार्गाचा, प्रयत्नवादाचा उपदेश करणाऱ्या, बाळ [नाव धारण करणाऱ्या - पक्षी बाल - निष्पाप अशा] पुरुषाला [टिळकाना, श्रीकृष्णाला मी] वन्दन करतो.

२४५. प्रदोषे दीपक: चन्द्र: प्रभाते दीपको रवि:।

त्रैलोक्ये दीपको धर्म: सुपुत्रो कुल दीपक: ॥

अर्थ

रात्री चन्द्र हा दिवा असतो. [उजेड देतो] पहाटेपासून सूर्य हा दिवा असतो. तिन्ही लोकात धर्म [आपण केलेली सत्कृत्ये ही] दिव्याप्रमाणे [उपयोगी] पडतात. सुपुत्र हा घराण्याला दिवा [मार्गदर्शक] असतो.

२४४. कति वा पाण्डवा भद्र खट्वाखुरमितास्त्रयः |

एवमुक्त्वा जडः कश्चिद् दर्शयत्यङ्गुलिद्वयम् ||
 
मुकुन्दराय

अर्थ

सद्गृहस्था, पांडव किती [होते] [यावर] एका मूर्खाने खाटेच्या खुरांइतके तीन, असे म्हणून दोन बोटे दाखवली.

२४३. अनालस्यं ब्रह्मचर्यं शीलं गुरुजनादरः |

स्वावलम्बो दृढाभ्यासः षडेते छात्रसद्गुणाः ||
मुकुन्दराय

अर्थ

उद्योगीपणा, ब्रह्मचर्य, उत्तम चारित्र्य, शिक्षकांबद्दल आदर, स्वावलंबन, सतत अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत.