भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 31, 2012

७७३. द्वावुपायौ इह प्रोक्तौ विमुक्तौ शत्रुदर्शने |

हस्तयो: चलनादेको द्वितीय: पादवेगज: ||

अर्थ

शत्रू दिसल्यावर त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी दोन उपाय सांगितलेले आहेत. एक म्हणजे हातात [शस्त्र घेऊन जोरदार प्रतिकार; चढाई] करणे  आणि दुसरा पाय वेगात पळवणे. [य: पलायते  स जीवति.]

Thursday, August 30, 2012

७७२. गृहं शिशुविवर्जितं विगतभर्तृका बालिका पुरी सततनिर्जला जनपदोऽरिभि: पीडित: |

वनं दवसमाकुलं तरुमनाश्रिता वल्लरी शठः परमधार्मिको मनसि सप्त शल्यानि मे ||

अर्थ

मुल नसलेलं घर; विधवा मुलगी; पाण्याचे वांधे असणार गाव; दुष्ट त्रास देत असलेल ठिकाण; सगळीकडे दवं पसरलेलं अरण्य; झाडाचा आधार न मिळालेली वेल आणि अतिशय धार्मिक असा ठग अशी सात शल्ये माझ्या मनाला बोचतात.  [शशी दिवसधूसरो या श्लोकाचे अनुकरण ]

७७१. शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृते: |

प्रभुर्धनपारायण: सततदुर्गत: सज्जनो नृपाङ्गणगत: खलो मनसि सप्त शल्यानि मे || नीतिशतक भर्तृहरी

अर्थ

दिवस सुरु झाल्यावर फिकट झालेला चन्द्र; तारुण्य निघून गेलेली सुंदरी; कमळे नसलेले तळे; देखण्या माणसाचे अशिक्षित असणे; पैशाच्या मागे लागलेला मालक; नेहमी वाईट स्थितीत गेलेला सज्जन माणूस आणि राजदरबारी असलेला दुष्ट, हे माझ्या मनात [सलत राहणारे] सात काटे आहेत.

७७०. गुणानामुत्कर्षाच्चरणनखजाताऽपि सहसा पुनाना त्रैलोक्यं स्मरहरशिरोभूषणमभूत् |

विवेकभ्रष्टां तां कविरयमुदारो विगणयन्न तस्याः स्वस्यैव प्रकटयति दीर्घामवनतिम्  || मुकुन्दराय

अर्थ

पायाच्या नखापासून उत्पन्न झाली तरी सुद्धा आपल्या गुणांच्या महात्म्यामुळे तिन्ही लोकांची [पाप नष्ट करून त्यांना] पवित्र करणारी [गंगामाता] भगवान शंकराच्या मस्तकावर भूषण होऊन राहिली. तिचा अविचारी असा अपमान करून या फार उदार [?] कवीने तिची नव्हेच तर स्वतःचीच अतिशय अधोगती दाखवून दिली आहे. [ थोड्याशा विनोदी छटेने हा श्लोक रचलेला आहे. भर्तृहरीबद्दल या कवीला चांगला आदर आहे. एखाद्या काव्याच सौंदर्य रसग्रहण करताना काही कवि विडंबनाचा मार्ग चोखाळतात.]

Monday, August 27, 2012

७६९. शिर: शार्वं स्वर्गात्पशुपतिशिरस्त: क्षितिधरं महीध्रादुत्तुङ्गादवनिमवनेश्चा पि जलधिम् |


अधोऽधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमथवा विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख: || नीतिशतक  भर्तृहरी
 
अर्थ
 
ही गंगा नदी स्वर्गातून भगवान शंकराच्या डोक्यावर; शंकराच्या मस्तकावरून [अजून  खाली] पर्वतावर [कोसळली.] त्या अतिशय उंच अशा पर्वतावरून [खाली] पृथ्वीवर आणि तिथूनही समुद्रात अशा रीतिने खाली खालीच घसरत पार रसातळाला गेली. [यातून अस दिसत की ] ज्यांचा विवेक सुटला, त्यांचा अध:पात शेकडो प्रकारांनी होतो.

७६८. कविना कवनं कवनेन कवि: कविना कवनेन विभाति मही |

तरुणा कुसुमं कुसुमेन तरुस्तरुणा कुसुमेन च भाति वनम् ||

अर्थ

कविमुळे काव्य शोभून दिसते. काव्यामुळे कवि [च कौतुक होत] उठून दिसतो. त्या दोघांमुळे पृथ्वीला शोभा येते. झाडामुळे फूल सुंदर दिसतं. फुलामुळे झाडाला शोभा येते आणि त्या दोघांमुळे अरण्य सुंदर दिसतं.

७६७. पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सर: |

मणिना वलयं वलयेन मणि; मणिना वलयेन विभाति कर: ||

अर्थ

पाण्याच्या योगाने कमळ शोभून दिसते. कमळ [फुलल्यामुळे] पाण्याला शोभा येते. पाणी आणि कमळ यांमुळे तळे सुंदर दिसते. रत्नाने बांगडी खुलून दिसते. कंकणामुळे रत्नाला शोभा येते. त्या दोन्ही मुळे हात सुंदर दिसतो.

Saturday, August 25, 2012

७६६. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् |

अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्याच्चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ||

अर्थ

आपलं मन जर आनंदी असेल तर आपल्याला जग सुखी दिसत आणि आपणच जर मनातून दु:खीकष्टी असलो तर [सगळं] जग दु:खी दिसत. म्हणून जर तुला सुख हवं असेल तर प्रथम मन सुखी करण्याचा प्रयत्न कर.

Thursday, August 23, 2012

७६५. अक्षम: काव्यनिर्माणे न क्षमो रससेवने |

निन्दापटु: सहिष्येऽहं परोत्कर्षं कथं बत ||

अर्थ

[मला] काव्यरचना पण करता येत नाही आणि काव्याच्या सौंदर्याचा  पण आस्वाद घेता येत नाही; नाव ठेवण्यात तर मी हुशार, मग दुसऱ्यांनी [केलेलं सुंदर काव्य आणि त्याच कौतुक] त्याचा उत्कर्ष मला कसा बरं सहन होणार? [असे आम्ही टीकाकार बनतो.]

७६४. हितवक्ता मितवक्ता संस्कृतवक्ता न चापि बहुवक्ता |

अर्थान् विमृश्य वक्ता स हि वक्ता सर्वंकार्यकर: ||

अर्थ

जो मोजकेच; कल्याणकारक; सर्वं बाजूंचा विचार करून सुसंकृत भाषेत [शिवराळ; अर्वाच्य अशी नव्हे] भाराभर पाल्हाळ न लावता बोलतो त्याच्या [वक्तृत्वाने] सर्वं कामे होतात. तोच [खरा उत्कृष्ट] वक्ता.

Tuesday, August 21, 2012

७६३. जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन: |

जनक: पञ्चमश्चैव जकारा: पञ्च पूजिता: ||

अर्थ

जननी [आई], जन्मभूमी [मायदेश], जाह्नवी [गंगानदी], जनार्दन [विष्णु], जनक [वडिल] या पाच "ज" ने सुरु होणाऱ्या गोष्टींची [नेहमी] पूजा करावी. [त्यांना मान देऊन त्यांची सेवा करावी.]

७६२. एकवर्णं यथा दुग्धं भिन्नवर्णासु धेनुषु |

तथैव धर्मवैचित्र्यं तत्वमेकं परं स्मृतम् ||

अर्थ

गाई वेगवेगळया रंगाच्या असल्या तरी त्यांच दुध मात्र एकाच रंगाच [थोडस पिवळसर] असतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे धर्म असले तरी [सत्य; अहिंसा वगैरे] तत्व सर्वं धर्मात सारखीच असतात असे आपल्या स्मृतीत [हिंदू धार्मिक ग्रंथ] सांगितले आहे.

Monday, August 20, 2012

७६१. अपारे काव्यसंसारे कविरेक: प्रजापतिः |

यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते  ||

अर्थ

काव्याच्या अमर्याद अशा जगामध्ये कवीच, एकटाच ब्रह्मदेव असतो. ते जग त्याच्या मर्जीवर फिरत असतं. [आपल्या व्यावहारिक जगात दुष्टांच साम्राज्य पण असू शकतं, चांगल्या लोकांना त्रास होऊ शकतो.  कवीच्या राज्यात 'काव्यात्म न्याय" असतो. आदर्शवाद दिसू शकतो.]

७६०. दीपासक्त्या पतङ्गस्य भोगासक्त्या नरस्य च |

रोगिणोऽपथ्यसक्त्या च नाश एव न संशय: ||

अर्थ

दिव्यावर झेपावल्या मुळे पतंगाच, आसक्तीने माणसाच वाटोळ होत. कुपथ्य केल्याने आजाऱ्याच फारच नुकसान होत हे नक्की. [संयम राखणे जरूर आहे.]

Thursday, August 16, 2012

७५९. भवन्त्वेककार्या भवन्त: समस्ता अध: पातिनीं द्वेषबुद्धिं विहाय |

तथा सर्वदोषा विनाशं प्रयान्तु परा संस्कृति: प्रोन्नतेर्वोऽस्तु हेतु: ||

अर्थ

गर्तेत ढकलणाऱ्या द्वेषबुद्धीचा त्याग करून आपण सर्वं [भारतीय  विकासाच्या] कामात लागा. त्याच प्रमाणे सर्वं दोषांचा नाश होवो [आपल्या] श्रेष्ठ संस्कृतिमुळे तुमची  [सर्वं भारतीयांची] अतिशय भरभराट  होवो.

७५८. आलक्ष्यदन्तमुकुलाननिमित्तहासै: अव्यक्तवर्णरमणीयवच:प्रवृत्तीन् |

अङ्काश्रयप्रणयिन: तनयान्वहन्तो धन्यास्तदङ्गरजसा मलिनीभवन्ति  ||
शाकुंतल कालिदास

अर्थ

वरचेवर कारणावाचून हसल्यामुळे ज्याच्या दंतकळ्या थोड्या दिसतात; ज्याच्या बोलण्याचा प्रयत्न बोबड्या बोलामुळे रमणीय वाटतो; आणि ज्यांना [मोठ्या माणसांच्या] मांडीवर बसण्याची [मोठी] हौस असते. अशा मुलांना धारण केल्याने त्यांच्या [त्या मुलांच्या ] अंगावरील धुळीमुळे भाग्यवान लोकच मलीन होतात.

७५७. अनुकूले विधौ देयं यत: पूरयिता हरि: |

प्रतिकूले विधौ देयं यत: सर्वं हरिष्यति  |
अर्थ

नशीब आपल्याला अनुकूल असताना दान करावच [कारण] हरि आपल्याला लागेल तेवढ देतोच आहे. नशीब प्रतिकूल असलं तरी दान करतच रहावं. [कारण  दान केलं नाही तरी देव] सगळं नेईलच [मग दान केल्याच पुण्य तरी पदरात घ्यावं.]

Monday, August 13, 2012

७५६. आपत्काले तु सम्प्राप्ते यन्मित्रं मित्रमेव तत् |

वृद्धिकाले तु सम्प्राप्ते दुर्जनोऽपि सुहृद् भवेत्  ||

अर्थ

संकटकाळी [सुद्धा] जो मित्रत्वाने वागतो तो आपला [खरा ] मित्र होय. भरभराटीच्या दिवसात दुष्ट सुद्धा मैत्री करेल. [स्वत:च्या फायद्यासाठी; पण त्याचा आपल्याला काही उपयोग नाही.]

७५५. औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह |

स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानन्दवर्धनम् ||

अर्थ

सर्व औषधांमध्ये हसणे हे औषध श्रेष्ठ आहे असे म्हणतात. [ते] सोपे; स्वतःच्याच जवळ असते आणि तब्बेत सुधारते आणि आनंद  वाढवते. [हा हा हा]

७५४. य: समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति |

यथोरगस्त्वचं जीर्णां स वै पुरुष उच्यते  ||

अर्थ

ज्याप्रमाणे साप जुनी [झालेली] कात टाकून देतो. त्याप्रमाणे आपल्याला आलेला राग [शान्त करून अपराध्याला] क्षमा करून नाहीसा करतो तोच खरा [उत्कृष्ट] पुरुष असे [जाणकार] म्हणतात.

Wednesday, August 8, 2012

७५३. हस्ताक्षरं समीचीनं मित्रं ज्ञेयं चिरन्तनम् |

तदेव विपरीतं चेत् शत्रुवत् गण्यते बुधै: ||
अर्थ

चांगलं हस्ताक्षर हा कायमचा मित्र आहे असं [माणसाने] जाणावं. पण तेच जर उलट असेल [घाणेरड असेल] तर जाणकार लोक त्याला शत्रु प्रमाणे मानतात.

७५२. वार्ता च कौतुकवती; विमला च विद्या; लोकोत्तर: परिमलश्च कुरङ्गनाभे: |

तैलस्य बिन्दुरिव वारिणि दुर्निवारमेतत्त्रयं प्रसरति स्वयमेव भूमौ  ||
अर्थ

आश्चर्यकारक बातमी; निर्दोष किंवा परिपूर्ण अशी विद्या; आणि हरिणाच्या [कस्तुरीमृगाच्या] नाभीतील [कस्तुरीचा] अलौकिक सुवास या तीन गोष्टी जगामध्ये; पाण्यावरील तेलाच्या थेंबाप्रमाणे अशा आपोआप पसरतात की त्याला आवर घालता येत नाही.

Tuesday, August 7, 2012

७५१. स्वभावसुन्दरं वस्तु न संस्कारमपेक्षते |

मुक्तारत्नस्य शाणाश्मघर्षणं नोपयुज्यते ||
अर्थ

जन्मापासूनच सुंदर असणाऱ्या वस्तूवर पुन्हा दुसरे संस्कार [पालिश करणे मेकअप करणे वगैरे] करण्याची गरजच नसते. [जातीच्या सुंदरा काहीही शोभते इतर रत्नांना पैलू पडावे लागतात तेंव्हा त्यांच तेज फाकत पण] मोत्याला [जन्मताच तेज असल्यामुळे] सहाणेवर घासण्याची जरूर नसते.

Monday, August 6, 2012

७५०. न स्वल्पस्य कृते भूरि नाशयेन्मतिमान्नर: |

एतदेवात्र  पाण्डित्यं यत्स्वल्पाद् भूरिरक्षणम्  ||

अर्थ

[जर लहानशी] गोष्ट [वाचवण्यासाठी] बऱ्याच किंवा मोठ्या गोष्टींचा नाश होत असेल तर बुद्धिमान माणसाने तसे करू नये. [शेपटावर भागत असेल तर त्याचा त्याग करुन  बाकीच तरी वाचवावं ] थोड्याचा त्याग करून पुष्कळ मोठा भाग वाचवणं हीच  हुशारी आहे.

Sunday, August 5, 2012

७४९. बुद्धिर्यस्य बलं तस्य ; निर्बुद्धेस्तु कुतो बलम् |

पश्य सिंहो मदोन्मत्त: शशकेन निपातितः ||

अर्थ

जो बुद्धिमान असतो तोच सामर्थ्यवान बनतो. मंद [व्यक्ती] कशी ताकदवान होईल? असं पहा की; माजलेल्या [अति ताकदवान असून सुद्धा बुद्धि न चालवल्यामुळे] सिंहाला [आपल्या हुशारीने ] सशाने पराभूत केले.

Thursday, August 2, 2012

७४८. कर्तव्यो भ्रातृषु स्नेह: विस्मर्तव्या: गुणेतरा: |

सम्बन्धो बन्धुभि: श्रेयान् लोकयोरुभयोरपि  ||

अर्थ

नातेवाईकांचे [विशेषतः भाऊबंधकी होते अशा ठिकाणी] दोष सोडून द्यावेत. [त्यांचा विचार  न करता] व त्यांच्यावर प्रेम करावं. या लोकी आणि परलोकी सुद्धा नातेवाईकांवर प्रेम असणे  हितावह असते.

Wednesday, August 1, 2012

७४७. काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति |

सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धा: सर्वयत्ना: फलन्ति  ||

अर्थ

लाकूड [खूप खूप] घुसळलं [एकमेकावर घासलं] त्या लाकडापासून सुद्धा आग तयार होते. [खूप प्रयत्न केले असता या गार अशा पदार्थापासून अग्नि निर्माण होतो.] [खूप] खणत राहीलं  तर [आतला झरा मिळून] जमीन पाणी देते, उत्साहाने [काम करणाऱ्या] लोकांना [काहीच] असाध्य नसते.  सर्व प्रयत्न [काम पार पडे पर्यंत ] केल्यास फळ हे मिळतच.

७४६. वित्तं बन्धुर्वय: कर्म विद्या भवति पञ्चमी |

एतानि मानस्थानानि गरीयो यद्यदुत्तरम्  ||

अर्थ

संपत्ती; नातेवाईक; वय; [स्वतःच] कर्तृत्व; आणि [यात] शिक्षण हे पाचवं आहे.  यांमुळे आदर मिळतो. पहिल्यापेक्षा पुढचे पुढचे गुण अधिक मान मिळवून देणारे आहे.