भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 28, 2010

१६८. द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |

१६८. द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता ||

अर्थ

सुभाषिताची माधुरी [पाहिल्यावर आपण त्याच्यापुढे काहीच नाही म्हणून ] द्राक्ष काळवंडली, साखरेचा दगड बनला, अमृत तर घाबरून स्वर्गात निघून गेलं.

१६७. साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |

१६७. साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ

ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

Thursday, May 27, 2010

१६६. लक्ष्मीवन्तो न जानन्ति प्रायेण परवेदनाम् |

१६६. लक्ष्मीवन्तो न जानन्ति प्रायेण परवेदनाम् |
शेषे धराभरक्रान्ते शेते नारायणः सुखम् ||

अर्थ

श्रीमंत लोकांना सहसा दुसऱ्याचं दुःख समजत नाहीत. [जसं] पृथ्वीच्या ओझ्याने थकलेल्या शेषावर नारायण खुशाल झोपून राहतो.

१६५. तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |

१६५. तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ||

अर्थ

गवतापेक्षाही कापूस हलका असतो, कापसापेक्षा याचक क्षुद्र असतो. [मग प्रश्न असा पडतो की] वाऱ्याने त्याला उडवले कसे नाही? तर माझ्याजवळ काहीतरी मागेल म्हणून.

१६४. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |

१६४. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||

अर्थ

सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे [चांगलं वाईट] ठरवतात.

मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या नाटकातील पहिल्या अंकातला हा श्लोक आहे.

१६३. दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि त्रृप्तौ न च चक्षुषी मे |

१६३. दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि त्रृप्तौ न च चक्षुषी मे |
तयोर्विवादं परिहर्तुकामः समागतोऽहं तव दर्शनाय ||

अर्थ

खूप लांबवरून आपली कीर्ति ऐकून कानांच समाधान झालं पण [ आपलं दर्शन लांबून होऊ शकत नसल्याने] डोळे मात्र अतृप्त राहिले. [म्हणून] त्याचं भांडण होऊ लागलं ते मिटवण्यासाठी मी [आपल्या दर्शनाने डोळ्यांना सुखी करण्यासाठी] आलो आहे.

१६२. स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |

१६२. स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ||

अर्थ

संकट कोसळलं म्हणून सज्जन स्वतःचा [सुस्वभाव] कधीहि सोडत नाही. कापाराला अग्नीचा स्पर्श झाला [जळून नाहीसा होण्याची वेळ आली तर उलट] तरी तो अधिकच सुगंधित होतो.

१६१. याचना हि पुरुषस्य महत्वं नाशयत्यखिलमेव तथा हि |

१६१. याचना हि पुरुषस्य महत्वं नाशयत्यखिलमेव तथा हि |
सद्य एव भगवानपि विष्णुः वामनो भवति याचितुमिच्छन् ||

अर्थ

[एखादी गोष्ट] मागण्यामुळे माणसाचे मोठेपण पूर्णपणे नाहीसे होते भगवान [म्हणजे अष्ट ऐश्वर्ये असणारा] विष्णु सुद्धा याचना करताना वामन [लहान, वामन या शब्दाचा अर्थ बुटका असा आहे.] झाला.

Sunday, May 23, 2010

१६०. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |

१६०. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

अर्थ

महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.[अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो]. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. [मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.]

१५९. रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् |

१५९. रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् |
दैवज्ञं भिषजं मित्रं फलेन फलमादिशेत् ||

अर्थ

राजा, देव, गुरु, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काही वस्तू, फळ देऊन त्याचं फळ मिळवावे.

Saturday, May 22, 2010

१५८. मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् |

१५८. मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् |
तद्रोषादिव निर्याता वदनाद्रदनावलिः ||

अर्थ

कवि म्हातारपणाचे वर्णन करतो. मळकट [काळ्या] केसांचे पांढरे केस झाले. त्याचा राग येऊन की काय दाताची कवळी तोंडातून निघून गेली. [पांढरे असणं हा दातांचा गुण केसांनी चोरला अस वाटून रागावून दात निघून गेले.]

१५७. दर्शने स्पर्शने वाऽपि श्रवणे भाषणेऽपि वा |

१५७. दर्शने स्पर्शने वाऽपि श्रवणे भाषणेऽपि वा |
यत्र द्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते ||

अर्थ

जीला [व्यक्ति नुसती] पाहिल्यावर, तिला नुसता स्पर्श केला तरी, तिचं बोलण ऐकून, तिच्या बद्दल गोष्टी ऐकून, तिच्याशी बोलून किंवा तिच्याबद्दल बोलून मनात भावना तरंग [तिच्याबद्दल चांगले] उठतात असं असेल, तर त्याला प्रेम असं म्हणतात.

Friday, May 21, 2010

१५६. यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः |

१५६. यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः |
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ||

अर्थ

ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर [तेच] झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य आपल्याला मदत करणाऱ्याचा [सुद्धा] नाश करतो.

Wednesday, May 19, 2010

१५५. चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानाद्भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति |

१५५. चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानाद्भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति |
पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढास्तस्मान्मद्यं नैव पेयं न पेयम् ||

अर्थ

दारू प्यायल्याने मनात गोंधळ निर्माण होतो. मन थाऱ्यावर नसलं की पापाचरण घडतं. अशा प्रकारे पाप करून मूर्ख लोक नरकात पडतात. त्यामुळे दारू पिऊ नये, मुळीच पिऊ नये.

१५४. शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना |

१५४. शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना |
तथापि कृशतां धत्ते कष्टः खलु पराश्रयः ||

अर्थ

शांत अशा शंकराने चंद्राला डोक्यावर धारण केले असले, [मानाने वागवत असला] तरीही चंद्र बारीक होत जातो. खरोखर दुसऱ्यावर अवलंबून जगणं फार कठीण आहे.

Tuesday, May 18, 2010

१५३. मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् |

१५३. मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् |
भ्रृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

अर्थ

गप्प बसणे, वेळ लावणे, निघून जाणे, जमिनीकडे बघत बसणे, भुवया वाकड्या करणे, दुसर्‍याशीच बोलत बसणे अशा सहा रीतींनी नकार दिला जातो.

१५२. साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम् |

१५२. साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम् |
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति ||

अर्थ

सुशिक्षित [साक्षरा हे बहुवचन आहे] जर उलटले [साक्षरा हा शब्द उलट वाचला] तर राक्षस होतात. [सुशिक्षित उलटले तर राक्षसांप्रमाणे त्रास देतात ,रा-क्ष-सा उलट सा-क्ष-रा ] पण सुसंस्कृत [सरस] उलटले तरी ते सरसत्व [स-र-स उलट स-र-स ] सोडत नाहीत.

१५१. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |

१५१. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

अर्थ

[फार] मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर [सगळ्यांशी] भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून [माणसाने] मध्यममार्ग स्वीकारावा.

१५०. अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् |

१५०. अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् |
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा |

अर्थ

ओंजळीतील फुले दोन्ही हातांना सुगंधित करतात. वा ! वा! सुमनाचे [ फुलांसारखे, सुंदर अन्तःकरण असणार्‍याचे ] प्रेम हे डाव्या उजव्या हातावर [फुलांच्या संदर्भात हात, सज्जनाच्या बाबतीत क्षुद्र व सामर्थ्यवान] सारखेच असते.

१४९. पायाद्वो जमदग्निवंशतिलकॉ वीरव्रतालंकृतो रामो नाम मुनीश्वरो नृपवधे भास्वत्कुठारायुधः |

१४९. पायाद्वो जमदग्निवंशतिलकॉ वीरव्रतालंकृतो रामो नाम मुनीश्वरो नृपवधे भास्वत्कुठारायुधः |
येनाशेषहताहिताङ्गरुधिरैः सन्तर्पिताः पूर्वजा भक्त्या चाश्वमखे समुद्रवसना भूर्हन्तकारीकृता ||

अर्थ

ज्याने सर्व वाईट अशा शत्रूंच्या अंगातील रक्ताने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध केले. [त्याच्या वडिलांना मारले अशा शत्रूंना मारताना ] ज्याचा परशू तळपत होता. पराक्रम हे ज्याचे व्रत होते. असे जमदग्नि कुलशिरोमणि परशुराम नावाचे श्रेष्ठ ऋषी तुमचे रक्षण करोत. असे की ज्यांनी अश्वमेध यज्ञात समुद्रापर्यन्तची सर्व जमीन [यज्ञातल्या पुरोहितांना] दान केली.

Saturday, May 15, 2010

१४८. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च |

१४८. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च |
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ||

अर्थ

पैसे [नेहमी] मिळणे , कायम तब्येत चांगली असणे , आवडती पत्नी ,आणि ती गोड बोलणारी ,ताब्यात असलेला मुलगा आणि पैसे मिळवून देणारी विद्या , हे राजा , या सहा गोष्टी या जगात सुख देणाऱ्या आहेत.

१४७. वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि भवति कलभाषी |

१४७. वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि भवति कलभाषी |
विरते पयसि घनेभ्यः शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः ||

अर्थ

उदार मनुष्य जोपर्यंत दान करत असतो तो पर्यंत सर्वजण [ त्याच्या बद्दल] गोड बोलत असतात. [त्याला गरिबी आल्यावर किंवा तो देत नाही म्हटल्यावर कोणी तसं गोड बोलत नाही.] मोरांचा केकारव ढगातील पाणी संपल्यावर थांबतो.

१४६. दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् |

१४६. दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् |
बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणामनृतं बलम् ||

अर्थ

राजा [शासनसंस्था] ही दुबळ्यांची ताकद आहे. लहान मुलांची ताकद म्हणजे त्याचं रडणं. गप्प बसणं ही मूर्खांची ताकद आहे आणि खोटेपणा ही चोरांची ताकद आहे.

१४५. आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |

१४५. आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||

अर्थ

देणं , घेणं ,कर्तव्य या गोष्टी लगेच न केल्या तर त्यातील गोडी काळ खाऊन टाकतो.

१४४. हालाहलो नैव विषं विषं रमा जनाः परं व्यत्ययमत्र मन्वते |

१४४. हालाहलो नैव विषं विषं रमा जनाः परं व्यत्ययमत्र मन्वते |
निपीय जागर्ति सुखेन तं शिवः स्पृशन्निमां मुह्यति निद्रया हरिः ||

अर्थ

हलाहल हे खरं तर विष नाहीये, लक्ष्मी हीच विषाप्रमाणे आहे. पण लोकांना उलटच वाटतं. ते [हलाहल विष] भरपूर पिऊन भगवान शंकर मजेत जागा राहतो. पण हिला [नुसता] स्पर्श झाल्यावर, विष्णू झोपेमुळे बेसावध होतो. [शेषावर जाऊन चार महिने झोपतो.]

१४३. गोभिः क्रीडितवान् कृष्णो इति गोसमबुद्धिभिः ।

१४३. गोभिः क्रीडितवान् कृष्णो इति गोसमबुद्धिभिः |
क्रीडत्यद्यापि सा लक्ष्मीरहो देवी पतिव्रता ||

अर्थ

कृष्णाने गाईंबरोबर क्रीडा केली. [गाई रानात नेऊन सांभाळल्या तर] लक्ष्मी एव्हढी पतिव्रता देवी आहे की ती अजूनही गोजाती [बैला] प्रमाणे बुद्धी [मंद] असणार्‍यांकडेच राहते. [खेळते]

Wednesday, May 12, 2010

१४२. यदा न कुरुते भावं सर्वभुतेष्वमङ्गलम् |

१४२. यदा न कुरुते भावं सर्वभुतेष्वमङ्गलम् |
समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः ||

१५ वा श्लोक

अर्थ

जेव्हा मनुष्य कुठल्याही प्राण्याबद्दल वाईट कल्पना करत नाही, त्याची दृष्टी सम असते, तेव्हा त्याला [जगात] सर्व ठिकाणी सुख लाभते. 

१४१. न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति |

१४१. न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति |
हविषा कृष्णवर्त्मेव पुनरेवाभिवर्धते ||

भागवत नववा स्कंध एकोणिसावा अध्याय १४ वा श्लोक.

अर्थ

वासना या [वस्तूंचा] उपभोग घेतल्याने शान्त [नाहीशा] होत नाहीत. तूप घातल्यावर अग्नी जसा वाढतो तशा त्या वाढतात.

१४०. सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति |

१४०. सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति |
कन्दैः फलैर्मुनिवराः क्षपयन्ति कालं संतोष एव पुरुषस्य परं निधानम् ||

अर्थ

साप हवा खाऊन राहतात पण ते अशक्त नसतात, वाळलेली पाने खाऊन रानटी हत्ती ताकदवान होतात, थोर ऋषी कंदमुळे खाऊन दिवस काढतात समाधान हाच माणसाचा मोठा खजिना आहे.

Monday, May 10, 2010

१३९. स्वयं पञ्चमुखः पुत्रौ गजाननषडाननौ |

१३९. स्वयं पञ्चमुखः पुत्रौ गजाननषडाननौ |
दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ||

अर्थ

[स्वतःला कपडे सुद्धा नाहीत असा ] दिगंबर, [परत खायला] पाच तोंडे, मुलगे तर एक हत्तीचं तोंड असलेला तर दुसर्‍याला सहा मुखे. मग घरात [पत्नी पार्वती] ही अन्नपूर्णा नसेल, तर [शंकर ] जिवंत तरी कसा राहील?

१३८. 'अम्बा कुप्यति तात मूर्ध्नि विधृता गङ्गेयमुत्सृज्यताम् '

१३८. 'अम्बा कुप्यति तात मूर्ध्नि विधृता गङ्गेयमुत्सृज्यताम् ', 'विद्वन् षण्मुख, का गतिर्मम चिरं मूर्ध्नि स्थितायाः वद '|
कोपवेशवशादशेषवदनैः प्रत्युत्तरं दत्तवान् 'पाथोधिर्जलधिर्पयोधिरुदधिर्वारांनिधिः वारिधिः '||

समस्या : पाथोधिर्जलधिर्पयोधिरुदधिर्वारांनिधिः वारिधिः हे सहा समुद्रवाचक शब्द आहेत.

अर्थ

'बाबा , आई चिडते [म्हणून ] डोक्यावर धारण केलेली ती गंगा फेकून द्या ' [कार्तिकस्वामी म्हणतो ] 'अरे विद्वान सहा मुखे असणाऱ्या [कार्तिकस्वामी ] पुष्कळ कालपर्यंत माझ्या डोक्यावर असलेली [ती ] कोठे बरे जाईल , तूच सांग '[ भगवान शंकर म्हणाले त्यावर ] राग आणि आवेश यांमुळे एकही मुख शिल्लक न ठेवता [सहाही] मुखांनी त्याने उत्तर दिले ' पाथोधिः ................'

१३७. विधे पिधेहि शीतांशुं यावन्नायाति मे प्रियः |

१३७. विधे पिधेहि शीतांशुं यावन्नायाति मे प्रियः |
आगते दयिते कुर्याः शतचन्द्रं नभस्तलम् ||

समस्या : शतचन्द्रं नभस्तलम्

अर्थ

हे ब्रह्मदेवा, माझा प्रियकर येई पर्यंत चंद्राला लपव [नायिकेला चंद्राच्या दर्शनाने विरहाचा त्रास जास्त होतो. म्हणून चन्द्र नाहीसा करायला ती सांगते.] मग तो आल्यावर [वाटल्यास] आकाशात शंभर चन्द्र का आणीनास?

Thursday, May 6, 2010

१३६. चलत्तरङ्गरङ्गायां गङ्गायां प्रतिबिम्बितम् |

दुसऱ्या कवीने समस्या अशी सोडवली आहे.

१३६. चलत्तरङ्गरङ्गायां गङ्गायां प्रतिबिम्बितम् |
सचन्द्रं शोभतेऽत्यर्थं शतचन्द्रं नभस्तलम् ||

अर्थ

गंगेच्या अतिशय हालणाऱ्या लाटांवर प्रतिबिंबित झालेल्या. आकाशात चंद्र असल्याने ते शंभर [हालणाऱ्या लाटांमुळे शंभर प्रतिबिंबे पडल्यामुळे] चंद्र असल्याप्रमाणे अतिशय शोभून दिसते.

१३५. दामोदारकराघातविव्हलीकृतचेतसा |

सुभाषितांचा समस्या हा एक प्रकार आहे. यात कवींची एक प्रकारे परीक्षा होते. श्लोकाच्या चार चरणापैकी एक चरण देऊन तो योग्य दिसेल असे उरलेले चरण रचायचे आणि तो चरण बरेच वेळेला वेगळाच असे. उदा. शतचंद्रम् नभस्तलम् म्हणजे शंभर चंद्रांनी युक्त असे आकाश. आता हे वाक्य शोभून कसे दिसेल? तर एका कवीने ही समस्या अशी सोडवली.

१३५. दामोदारकराघातविव्हलीकृतचेतसा |
दृष्टं चाणूरमल्लेन शतचन्द्रं नभस्तलम् ||

अर्थ

कृष्णाच्या हातांच्या तडाख्यांनी कळवळून गेलेल्या [चीत झाल्याने पाठीवर पडलेल्या] चाणूर मल्लाला आकाशात शंभर चंद्र दिसले. [काजवे चमकल्याने शंभर चंद्र दिसल्या प्रमाणे गरगरले. ]

१३४. प्रदोषे दीपकश्चन्द्रः प्रभाते दीपको रविः ।

१३४. प्रदोषे दीपकश्चन्द्रः प्रभाते दीपको रविः ।
त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः॥

अर्थ

प्रदोषसमयी चंद्रामुळे प्रकाश मिळतो तर दिवसा सूर्यामुळे. तिन्हीलोकात धर्माचरण उपयोगी येते, तर सुपुत्र कुळाचा उद्धार करतो.

१३३. पात्रापात्रविवेकोऽस्ति धेनुपन्नगयोरिव ।

१३३. पात्रापात्रविवेकोऽस्ति धेनुपन्नगयोरिव ।
तृणात्सञ्जायते क्षीरं क्षीरात्सञ्जायते विषम्‌ ॥

अर्थ

(दान देताना) योग्य आणि अयोग्याचा (दान ज्याला देणार त्याचा) विचार गाय आणि सापाप्रमाणे करावा. जसे गाय गवतापासून (गवत खाऊन) दूध निर्माण करते तर साप दुधापासून विष निर्माण करतो. (त्यामुळे सत्पात्री दान करावे असे सुचविले आहे.)

Wednesday, May 5, 2010

१३२. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय |

१३२. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय |
सिध्यसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ||

अर्थ

कर्मयोगाचा अंगीकार करून आसक्ती सोडून कर्तव्य कर. हे अर्जुना फलप्राप्ती आणि काम पुरे न होणे या  बाबत तटस्थ असणे, [त्यांचा विचार न करता काम करणे यालाच [कर्म] योग असे म्हणतात.

गीता २ .४८ कर्मयोगाची व्याख्या दुसरी ओळ

१३१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |

१३१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ||

अर्थ

कर्तव्य बजावण्यावर तुझा अधिकार आहे पण फलप्राप्तीवर कधीच नाही. फळावर लक्ष ठेवून काम करू नकोस. आळशीपणा [कर्तव्य टाळण्याकडे] वर प्रेम करू नकोस.
 
गीता २ .४७ कर्मयोगाची चतुस्सूत्री.

Tuesday, May 4, 2010

१३०. नाभ्यस्ता भुवि‌ वादिवृंददमनी विद्या विनीतोचिता ।

१३०. नाभ्यस्ता भुवि‌ वादिवृंददमनी विद्या विनीतोचिता ।
खङ्‌गाग्रैः करिकुंभपीठदलनैर्नाकं न नीतं यशः ॥
कांताकोमलपल्लवाधररसः पीतो न चन्द्रोदये ।
तारुण्यं गतमेव निष्फलमहो शून्यालये दीपवत्‌ ॥॥

ह्या जगामध्ये नम्र माणसांना योग्य,[पर पक्षाच्या] पंडितांच्या समुदायाला पराजित करेल अशा विद्येचाही अभ्यास केला नाही, हत्तीदलांचा नाश तलवारीच्या धारेने करून स्वर्गात कीर्तीही पोहोचवली नाही, [रम्य]अशा संध्याकाळी पत्नीच्या कोमल अशा अधरांची माधुरी पण चाखली नाही तर, अरेरे! उजाड अशा घरामध्ये जळणार्‍या दिव्याप्रमाणे तारूण्य वायाच गेले.

हा श्लोक भर्तृहरीचा आहे.

१२९. अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम्|

१२९. अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम्|
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशा पिण्डम् ||

अर्थ

शरीर थकले आहे. डोके पांढरे झाले आहे. तोंडात दात नाहीत. म्हातारा काठी घेऊन जात आहे. [इतके म्हातारपण आले तरीहि] हाव माणसाला सोडत नाही.

हा श्लोक शंकराचार्यांचा आहे

१२८. तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।

१२८. तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥

पुस्तक म्हणते की तेलापासून माझे रक्षण करा, पाण्यापासून माझे रक्षण करा, माझे बंध शिथिल होणार नाहीत असे बघा, आणि मूर्ख लोकांच्या हातात मला देऊ नका.

सहभाग : सुनिल काळे

१२७. सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः ।

१२७. सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥

सतत प्रिय बोलणारी माणसे जगात सुलभ आहेत. परंतु अप्रिय पण हिताचे बोलणार वक्ता आणि श्रोता दोघेही मिळणे दुर्लभ आहे.

सहभाग : सुनिल काळे 

१२६. अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |

१२६. अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |
अनुसृत्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ||

अर्थ

दुसर्‍याला त्रास न देता, दुष्टांशी लाचारी न करता जरी थोडंच [मिळालं] तरी ते पुष्कळ आहे. [नेहेमी आपले आचरण शुध्द ठेवावे मग फळ जरी थोडे कमी मिळाले तरी चालेल.]

Monday, May 3, 2010

१२५. शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ।

१२५. शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो नहि सर्वत्र चंदनं न वने वने ॥

अर्थ

प्रत्येक पर्वतावर माणिक सापडत नाही, प्रत्येक हत्तीमधे मोतीमिळत नाही (अशी एक समजूत आहे की हत्तीच्या गंडस्थळामधे मोती असतो), सज्जन माणसे सगळीकडे नसतात (आणि) प्रत्येक अरण्यात चंदनाची झाडे नसतात. (चांगल्या गोष्टी दुर्मिळ असतात)

१२४. पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु ।

१२४. पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु ।
लुब्धेन सञ्चितं द्रव्यं समूलं हि विनश्यति ॥

अर्थ

मुंग्यांनी जमवलेले अन्न, मधमाश्यांनी साठवलेला मध (आणि) कंजूस माणसाने साठवलेले धन ह्या सगळ्यांचा संपूर्ण नाश होतो. (ह्या गोष्टी कोणीतरी चोरतेच)

१२३. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः ।

१२३. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः ।
स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ॥

अर्थ

ज्याच्याकडे पैसे आहेत तोच माणूस घरंदाज, तोच बुद्धिमान, तोच गुण जाणणारा आणि शिकलेला. तोच (चांगला) वक्ता आणि तोच देखणा. (खरे आहे) सगळे गुण सोन्याच्या (संपत्तीच्या) आश्रयाला असतात.

१२२. हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् |

१२२. हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् |
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम् ||

अर्थ

दान [करणे] हा हाताचा अलंकार आहे. खरे [बोलणे] हा गळ्याचा अलंकार आहे. शास्त्रांचा [अभ्यास करणे] हा कानाचा अलंकार आहे. [दुसऱ्या] अलंकाराची जरूरच काय?

१२१. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी |

१२१. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी |
देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः ||

अर्थ

पाऊस [योग्य] वेळी पडो. पृथ्वी धान्यांनी बहरलेली शोभून दिसो. ह्या आपल्या देशात शांती नांदो. सज्जन लोक निर्भय राहोत.

१२०. अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम् |

१२०. अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम् |
सदा लोकहिते युक्ताः रत्नदीपा इवोत्तमाः ||

अर्थ

ज्याप्रमाणे रत्न रूपी दिवे स्नेहाची [तेलाची] पात्राची [समई वगैरे वस्तूंची] दशेची [वातीची] अपेक्षा न करता नेहमी प्रकाश पाडण्यात मग्न असतात, त्याप्रमाणे श्रेष्ठ लोक स्नेहाची [त्यांना प्रेम दिल पाहिजे अशी, ज्याला द्यायचं तो] पात्र [लायक] पाहिजे किंवा [वाईट] दशेतला पाहिजे, अशी अपेक्षा न ठेवता सतत लोकांचे कल्याण करण्यात मग्न असतात.

११९. सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् |

११९. सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् |
एतद्विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः ||

अर्थ

ज्या गोष्टी आपल्याजवळ असतात त्याला सुख [म्हणावं] आणि जे दुसऱ्याच्या ताब्यात असतं ते [वापरण्याची इच्छा करणे] म्हणजे दुःख. अशी सुख दुःखाची थोडक्यात व्याख्या आहे.