भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 30, 2012

८५९. नालसा: प्राप्नुवन्त्यर्थान्न शठा न च मायिन: |

न च लोकरवाद्भीता न च शश्वत्प्रक्षिण: ||

अर्थ

आळशी लोकांना; कपटी माणसांना; लबाड माणसाना; लोकांच्या नाव ठेवण्याला जे घाबरतात आणि नेहमी [अधिक चांगली संधी मिळेल अशी] वाट पहात राहणाऱ्यांना [भरपूर] संपत्ती मिळत नाही. [संधी मिळाली की पकडली पाहिजे.]

Thursday, November 29, 2012

८५८. अयुद्धे हि यदा पश्येन्न यावद्धितमात्मन: |

युध्यमानस्तदा प्राज्ञो म्रियेत रिपुणा सह ||

अर्थ

युद्ध न करण्यात [शत्रूच आक्रमण गप्प बसून राहिलं तर] आपलं काहीच कल्याण नाही असं लक्षात आलं तर बुद्धिमान  माणसाने शत्रूशी लढत त्याच्याबरोबर मरून जावे. [नुसताच प्राण गमावण्यापेक्षा त्याला काहीतरी नुकसान भोगाव लागेल. दोघेही मेले तरी चालेल. फक्त आपणच का मरायचं?]

Tuesday, November 27, 2012

८५७. प्रीणाति य: सुचरितै: पितरं स पुत्रो यद्भर्तुरेव हितमिच्छति तत् कलत्रम् |

तन्मित्रमापदि सुखे च समक्रियं यदेतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते ||

अर्थ

आपल्या सत्कृत्यांनी जो वडलांना आनंदित करतो तोच सुपुत्र. जी आपल्या पतीच्या हिताचीच फक्त इच्छा करते तीच [आदर्श] पत्नी, आपल्या संकटात आणि वैभवाच्या काळी आपल्या भावनांना योग्य असंच ज्याचे आचरण असते, तोच खरा मित्र आणि या तीन गोष्टी फक्त पुण्यवान लोकांनाच प्राप्त होतात.

८५६. बृहत्सहाय: कार्यान्तं क्षोदीयानपि गच्छति |

संभूयाम्भोधिमभ्येति महानद्या  नगापगा ||

अर्थ

अगदी लहान [क्षुद्र] जरी असला, तरी थोरामोठ्यांच्या मदतीने त्याच काम पूर्ण होत. जसं पर्वतातून निघालेले ओढे मोठ्या नदीला मिळाल्यावर समुद्राला जाऊन मिळतातचं.

Monday, November 26, 2012

८५५. व्रजन्ति ते मूढधिय: पराभवं भवन्ति मायाविषु ये न मायिन: |

प्रविश्य हि घ्नन्ति शठास्तथाविधानसंवृताङ्गान्निशिता इवेषव: ||
अर्थ
कपटी लोकांशी जे कपटीपणे वागत नाहीत, त्या बावळट माणसांचा पराभव होतो.धारदार बाणाने उघड्या [कवच नसलेल्या त्वचेवर] आघात होतो,  त्याप्रमाणेच  तशा प्रकारच्या [भोळसटपणे विश्वास ठेवणाऱ्या] माणसांचा ठग नाश करतात.

८५४. स्वादुकामुक ; कामानां वैतृष्ण्यं किं न गच्छसि |

मधु पश्यसि दुर्बुद्धे प्रपातं नैव पश्यसि ||

अर्थ

अरे गोडघाशा [फक्त सुखाची हाव धरणाऱ्या माणसा] विषयांची विरक्ती तुला कशी बर येत नाही? अरे बावळटा; तुझं मधाकडे लक्ष आहे, [पण ते मधाच पोळ आहे त्याच्या शेजारचा] कडा तुझ्या लक्षातच येत नाहीत का? [फक्त वासनापूर्तीचे वाईट परिणाम तुला कळत नाहीत, वेळीच मनावर ताबा मिळवला पाहिजे.]

८५३. छिद्रं मर्म च वीर्यं च विजानाति निजो रिपुः |

दहत्यन्तर्गतश्चैव शुष्कवृक्षमिवानल: ||

अर्थ

आपल्या [अगदी ओळखीचा] जवळचा मनुष्य [जेव्हा] शत्रु बनलेला असेल, तेंव्हा आपला पराक्रम तसच मर्मस्थान आणि वैगुण्य [कमतरता] त्याला पूर्णपणे माहित असते. त्यामुळे आत शिरलेला वारा जसं वठलेलं झाड जाळतो त्याप्रमाणे तो नाश करतो.

८५२. स भार: सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् |

तदन्नमपि भोक्तव्यं जीर्यते यदनामयम् ||

अर्थ

अरे सदगृहस्था; [माणसाने] ज्यामुळे आपण खचून बसणार नाही, एवढंच वजन उचलावं तसंच तब्बेत चांगली राहून, पचेल एवढंच जेवण जेवाव.

८५१. वक्तार: किं करिष्यन्ति श्रोता यत्र न विद्यते |

नग्नक्षपणके देशे रजक: किं करिष्यति ||

अर्थ

जिथे श्रोते नाहीत तिथे भाषण करणारे काय बोलणार? दिगंबर [जैन] संन्याशांच्या प्रदेशात धोबी कोणते कपडे धुणार?

८५०. अफलानि दुरन्तानि समव्ययफलानि च |

अशक्यानि च वस्तूनि नारभेत विचक्षणः ||

अर्थ

ज्या गोष्टी फलदायी होणार नाहीत; पूर्ण होई पर्यंत अतिशय त्रास आहे; जे करण्यात फायदा आणि तोटा सारखाच आहे, जे घडण अशक्य आहे, अशा गोष्टी शहाण्या माणसाने करायला सुरवात करू नये.

८४९. प्रभवो ह्यात्मन: स्तोत्रं जुगुप्सन्त्यपि विश्रुता: |

ह्रीमन्त: परमोदारा पौरुषं वापि गर्हितम् || भागवत पुराण

अर्थ

अतिशय उदार असे, सत्तेवर असणारे, ज्याचा पराक्रम सगळीकडे प्रसिद्ध आहे, अश्या विनयशील लोकांना स्वत:ची स्तुती करवून घेणं हे निंद्य वाटत.

८४८. अप्रगल्भस्य या विद्या कृपणस्य च यद् धनम् |

यच्च बाहुबलं भीरोर्व्यर्थमेतत्  त्रयं भुवि ||


अर्थ

परिपक्वता नसेल त्याची विद्या; चिक्कू माणसाची संपत्ती आणि घाबरट माणसाची ताकद, या तिन्ही गोष्टी या जगात वाया जातात.

८४७. न किञ्चिदवमन्येत सर्वस्य शृणुयान्मतम् |

बालस्याप्यर्थवद्वाक्यमुपयुञ्जीत पण्डित: ||
 
अर्थ
 
[एखाद्या विषयाच्या बाबतीत ] अगदी सर्वांची मते ऐकावी. कुणाचाही अनादर करू नये. विद्वान माणसाने अगदी लहान मुलाचसुद्धा शहाणपणाचे बोलणं असेल तर त्याचा वापर करावा.

८४६. यो जानात्यर्जितुं सम्यगर्जितं न तु रक्षितुम् |

नात: परतरो मूर्खो वृथा तस्यार्जनश्रम: ||

अर्थ

[पैसे] कमावणे ज्याला चांगल्या प्रकारे जमत, पण मिळवलेल जो सांभाळू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख कोणी नाही. [तोच मूर्खशिरोमणी होय] त्याचे पैसे मिळवण्याचे सगळे श्रम वाया जातात.

Friday, November 16, 2012

८४५. विशाखान्ता गता मेघा: प्रसूत्यन्तं च यौवनम् |

प्रमाणान्त: सतां कोपो याचनान्तं च गौरवम् ||

अर्थ

विशाखा नक्षत्र झालं की ढग पळतात. [त्यावर्षीचा पाऊस संपला] तारुण्य बाळंतपणापर्यंतच असतं. [पहिलं बाळ झालं की जबाबदारीनी वागायला पाहिजे.] सज्जनांचा राग नमस्कार केल्यावर [नम्रपणामुळे] मावळतो. एखादी गोष्ट मागितली तर त्या माणसा बद्दलचा आदर नाहीसा होतो.

८४४. क्षमा शत्रौ च मित्रे च यतीनामेव भूषणम् |

शाम्येत्प्रत्यपकारेण नोपकारेण दुर्जन: |

अर्थ

मित्र आणि शत्रूंना सुद्धा क्षमा  करणे ही गोष्ट यति [संन्यास घेतलेल्यांनाच] कौतुकास्पद आहे. [गृहस्थाला ते योग्य नव्ह, कारण] दुष्ट मनुष्य हा त्याला [त्याच्या दुष्कृत्यांचे] वाईट परिणाम भोगल्यामुळेच वठणीवर येईल त्याच्यावर उपकार केल्यामुळे नव्हे.

८४३. अनारोग्यमनायुष्यमस्वर्ग्यं चातिभोजनम् |

अपुण्यं लोकविद्विष्टं तस्मात्तत् परिवर्जयेत् ||

अर्थ

अतिशय [भुकेपेक्षा जास्त] जेवण  हे तब्बेत बिघडवणार; आयुष्य कमी करणार; स्वर्ग न मिळवून देणार; पाप लागेल असं; जगात लोक निंदा करतील असं; असतं त्यामुळे ते पूर्णपणे टाळावं.

८४२. पूरोत्पीडे तडागस्य परीवाह: प्रतिक्रिया |

शोकक्षोभे च हृदयं प्रलापैरेव धार्यते ||

अर्थ

जलाशय [तुडुंब] भरून वाहायला लागला असेल, तर त्याला पाट  काढणं हा इलाज आहे. अतिशय शोक झाला असता रडण्यानेच मन थोडसं शान्त होत.

Monday, November 12, 2012

८४१. निजदोषावृतमनसामतिसुन्दरमेव भाति विपरीतम् |

पश्यति पित्तोपहत: शशिशुभ्रं शङ्खमपि पीतम् ||

अर्थ

स्वतःच्या दोषांमुळे ज्यांच मन झाकाळून गेलं आहे, त्यांना अतिशय चांगल्या गोष्टी सुद्धा उलट दिसतात. [आणि वाईट वस्तु चांगल्या सुद्धा भासू शकतात.] जसं फार पित्त झालेल्या माणसाला चंद्राप्रमाणे शुभ्र असा शंख पिवळा दिसतो.

८४०. कुलीनै: सह सम्पर्कं सज्जनै: सह मित्रताम् |

ज्ञातिभिश्च समं मेलं कुर्वाणो नावसीदति  ||

अर्थ

ज्याचा  घरंदाज  लोकांशी सहवास; सज्जन लोकांशी मैत्री; आणि नातलगांशी  [चांगले] संबंध असतील तो नाश पावत नाही.

Saturday, November 10, 2012

८३९. सुखं हि दु:खान्यनुभूय शोभते घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् |

 सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां धृत: शरीरेण मृत: स जीवति ||

अर्थ

दाट अंधकारात ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशाने [खूप] आनंद होतो, त्याप्रमाणेच खूप दु:खे भोगल्यावर मिळणारे सुख शोभून दिसते. [आनंदित करते] परंतु आधी सुख उपभोगल्यानंतर ज्या माणसाला गरिबी येते; तो शरीराने जिवंत असला तरी मेलेल्या प्रमाणे जगतो.

Thursday, November 8, 2012

८३८. यथा गजपति: श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रित: |

विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीच: स्वमाश्रयम् ||

अर्थ

ज्याप्रमाणे एखादा मोठा हत्ती थकल्यावर सावलीसाठी एखाद्या झाडाखाली आला [तरी - त्या झाडाची झालेली मदत विसरून] विश्रांती झाल्यावर तेच झाड उपटून टाकतो. त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य आपल्याला आधार देणाऱ्यांचा [देखील] नाश करतो.

Wednesday, November 7, 2012

८३७. तदा स वृद्धो भवति तदा भवति दु:खित: |

तदा शून्यं  जगत्सर्वं यदा मात्रा वियुज्यते ||

अर्थ

जेंव्हा [एखाद्या  व्यक्तीला] आईचा वियोग होतो तेंव्हा त्याला दु:ख होतं; सगळं जग भकास वाटत व तो [खरा] म्हातारा होतो.

Tuesday, November 6, 2012

८३६. गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यमादौ परिणतिरवधार्या यत्नत: पण्डितेन |

अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्तेर्भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाक: ||
अर्थ

चांगले [भले थोरले] किंवा अगदी साधं सुद्धा काम करण्यापूर्वी ज्ञानी माणसाने त्याचा परिणामांचा नीट विचार करावा. अतिशय घाईघाईने केलेल्या कामाचा हृदयाला जाळून टाकेल असा अतिशय बोचरा परिणाम, संकट संपेपर्यंत छळत राहतो.

Monday, November 5, 2012

८३५. असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् |

सद्भिस्तु लीलया प्रोक्तं शिलालिखितमक्षरम् ||

अर्थ

दुर्जनानी शपथ घेऊन जरी वचन दिलं, तरी पाण्यावर ओढलेल्या रेघेप्रमाणे [ते लगेच नष्ट होणारे] असते. याउलट सज्जनांनी सहज बोलले तरी दगडावर कोरल्याप्रमाणे [ते कायम टिकणारे] असते.

८३४. अखिलेषु विहङ्गेषु हन्त स्वच्छन्दचारिषु |

शुक पञ्जरबन्धस्ते मधुराणां गिरां फलम् ||

अर्थ

सर्वं पक्षी स्वैरपणे  आकाशात विहार करत पण, अरेरे!  हे पोपटा; तुझ्या गोड गोड बोलण्याच फळ [परिणाम] पिंजऱ्यातली कैद! [शुकान्योक्ती - गुणी माणूस त्याच्या गुणा पायी अडकतो.]

८३३. योऽत्ति यस्य यदा मांसमुभयो: पश्यतान्तरम् |

एकस्य क्षणिका प्रीतिरन्य: प्राणैः वियुज्यते ||

अर्थ

जेंव्हा कोणीतरी दुसऱ्याच [प्राण्याच] मांस खातो त्यावेळेच्या [परिणामाचा] फरक पहा. एकाला [ते खाणाराला] थोडासा वेळ मजा येते, पण दुसरा [जो प्राणी मारला जातो तो कायमचा] प्राणांना मुकतो.

Friday, November 2, 2012

८३२. विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधव: |

आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते ||

अर्थ

सहवासाच्या दोषामुळे सज्जन लोक कधीही बिघडत नाहीत. मोठमोठ्या [खूप विषारी] सापांनी [ चंदनाच्या झाडाच्या बुंध्याला] वेटोळं जरी घातलं तरीही चंदन विषारी बनत नाही.

८३१. शास्त्रानुसारिणी चर्या चित्तज्ञा: पार्श्ववर्तिन: |

बुद्धिरस्खलितार्थेषु परिपूर्णं रसायनम् ||

अर्थ

[वैद्यक] शास्त्राच्या नियमांप्रमाणे दिनचर्या, [आपल्याला  काय हवंय ते] जाणणारे जवळ असणारे लोक, तर्कसंगत बुद्धि  या  गोष्टी  [तब्बेत] चांगली राखणारे रसायन [टॉनिक] आहेत.