भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, June 28, 2013

१०५०. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् |

यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ||

अर्थ
 
ज्याच्या कृपेने मुक्याला बोलता येऊ लागत; पांगळा पर्वत चढतो, त्या अत्युच्च आनंदस्वरूप अशा रमापति विष्णूला मी प्रणाम करतो.

१०४९. कान्तं वक्ति कपोतिकाकुलतया नाथान्तकालोऽधुना व्याधोऽधो धृतचापसज्जितशरः श्येनः परिभ्राम्यति |


इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतः तूर्णं तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||

अर्थ

अगदी आर्तपणे कबुतराची मादी त्याला म्हणते; "स्वामी; आता आपलं संपल! [झाडाच्या] खाली पारधी धनुष्याला बाण जोडून सोडायला तयार झालायं. [म्हणून वर उडून जावं तर वर] ससाणा घिरट्या घालतोय"; पण असं घडलं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्यामुळे त्याचा नेम चुकून त्या बाणाने] ससाणा पण मेला [आणि] लगेच [कबुतरांच्या ऐवजी] ते दोघेच यमाच्या घरी गेले नशिबाची चाल वेगळीच असते. [अगदी अटळ वाटत असलेला मृत्यू सुद्धा चुकला. म्हणून माणसानी आशा सोडू नये.]

Wednesday, June 26, 2013

१०४८. न हि वैरेण वैराणि शाम्यन्तीह कदाचन |

अवैरेण हि शाम्यन्ति एष धर्मः सनातनः ||

अर्थ

शत्रुत्व कधीही अधिक वैर केल्यामुळे संपून जात नाहीत. हा पूर्वापार चालत आलेला धर्म आहे की प्रेम लावल्यानेच शत्रुत्व नाहीसे होते.

Monday, June 24, 2013

१०४७. हे हेमकार परदुःखंविचारमूढ किं मां मुहुः क्षिपसि वारशतानि वह्नौ |

संदीप्यते मयि सुवर्णगुणातिरेको लाभः परं तवमुखे खलु भस्मपातः ||

अर्थ

हे  दुसऱ्याला दुःख होतय याचा जराही विचार न करणाऱ्या सोनारा; मला शेकडो वेळा आगीत का रे फेकतोस? खरोखर त्यामुळे [माझ्यातील हीण जळून मी] सुवर्णाने झळकत आहे [माझा तर फायदाच होतोय] पण तुझ्या तोंडात मात्र राख उडतेय [या वाईट कामाचं वाईट फळ तुलाच भोगावं लागतंय] [सुवर्णान्योक्ती. सोन = सद्गुणी मनुष्य, सोनार = दोष दाखवणारे ]

१०४६. प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम् |

ददति जलमानल्पास्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ||

अर्थ

अगदी लहानपणी जे थोड पाणी लोकांनी पाजलेलं [नारळाच्या झाडाला पाणी दिलेलं] असत त्याच ओझ डोक्यावर घेऊन गोड असं भरपूर पाणी आयुष्यभर ते - नारळ देतात. सज्जनलोक केलेले उपकार कधीही विसरत नाहीत.

१०४५. आघ्रातं परिचुम्बितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितं त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा तत्र व्यथां मा कृथाः |

हे सद्रत्न तवैतदेव कुशलं  यद्वानरेणादरादन्तःसारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना ||
अर्थ

हे उत्कृष्ट प्रकारच्या रत्ना; [माकडाच्या हातात सापडल्यावर त्याने तुला] हुंगलं; चाटलं; बराचवेळ चोखलं त्यानंतर चावून पाहिलं किंवा [काय दगडच आहे असं म्हणून] तुच्छतेने जमिनीवर फेकून दिलं, तरी त्याबद्दल अजिबात दु:ख वाटून घेऊ नकोस. ह्यातच तुझ भलं आहे की याच्या गाभ्यात काय बरं आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेने त्यांनी दगडानी ठेचून भुगा केला नाही. [रत्नान्योक्ती - अतिशय गुणी व्यक्ती माकड - गाजरपारखी मालक असं झाल्यावर त्याला सन्मान मिळण कठीणच. निदान पुरी वाट लावली नाही हेच नशीब.]

Friday, June 21, 2013

१०४४. यस्य न ज्ञायते वीर्यं न कुलं न विचेष्टितम् |

न तेन सङ्गतिं कुर्यादित्युवाच बृहस्पतिः ||

अर्थ

[देवांचा गुरु] बृहस्पती म्हणतो की ज्याचा पराक्रम [केवढा आहे ते]; घराणं आणि हालचाली ठाऊक नाहीत त्याच्या सहवासात [मैत्री किंवा त्याला मदत किंवा त्याच्याकडून मदत घेण्यासाठी सुद्धा] राहू नये.

Thursday, June 20, 2013

१०४३. कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धिः कर्मानुसारिणी |

तथापि सुधिया भाव्यं सुविचार्यैव कुर्वता ||

अर्थ

माणसाची बुद्धी [प्रारब्ध] कर्माला अनुसरून चालते. [तसंच वागण्याची आपल्याला इच्छा होते.]; आपण पूर्वी जे केलेल असतं, त्याप्रमाणेच फळे भोगावी लागतात [असं असलं तरीही] माणसानी कुठलही काम करताना नीट विचार करूनच काय ते करावं. [प्रारब्धाप्रमाणे घडेल असं म्हणून निर्बुद्धपणे वागू नये.]

Wednesday, June 19, 2013

१०४२. रागे द्वेषे च माने च द्रोहे पापे च कर्मणि |

अप्रिये चैव कर्तव्ये चिरकारी प्रशस्यते ||

अर्थ

या प्रसंगी दिरंगाई करणाऱ्याचं कौतुक होत - [कुणावर जीव लावण्याच्या बाबतीत] प्रेम करताना; द्वेष [वाटला तरी त्या नीट विचार खरं -खोटं वगैरे करून] मत्सर करणार; अभिमान [बाळगताना सुद्धा पक्का विचार करणार]; विश्वास असलेल्या व्यक्ती बद्दल [कुणाचं तरी ऐकून एकदम उलट हालचाल न करता शहानिशा करून] द्रोह करायचा; वाईट काम करताना [जमेल तेवढा] उशीर; नावडत कामाला चेंगटपणा.

Tuesday, June 18, 2013

१०४१. बधिरयति कर्णविवरं वाचं मूकयति नयनमन्धीयति |

विकृतयति गात्रयष्टिं सम्पद्रोगोऽयमद्भुतो लोके ||
अर्थ = श्रीमंती [चा माज] रूपी रोग फारच आश्चर्यकारक आहे. [दुसरा एखादा रोग झाला तर एखादा अवयव दुखावेल पण हा तर सर्व शरीरावर परिणाम करतो. पैशाचा माजामुळे ऐकलं असून सुद्धा न् ऐकल्या सारखं] कानाला बहिर करतो; वाणीला मुकी करतो; डोळे [असून डोळेझाक केल्याने] आंधळेपण येते. [आपलं शरीर ताठ असत ते] वेडवाकड करून सोडतो. [म्हणून श्रीमंतीचा माज फारच वाईट.]

Monday, June 17, 2013

१०४०. चेतो भग्नं यदि किल भवेत्सज्जनानां कदाचित्‌ नि:सन्देहं सहजमचिराद्धेमवद्युज्यते तत् |

छिन्नो भिन्नो घटति न यथा कुम्भकारस्य कुम्भ: दुर्वृत्तानामुपहतमनो युज्यते नैव नैव ||

अर्थ

जर कधी काळी सज्जनाच मन भंग पावलं तरी लवकरच ते सोप्या उपायांनी आणि निश्चितपणे पुन्हा जोडलं जात. जसं की सोनं [पहिला मोडून पुन्हा दागिना बनवतात] पण दुष्ट माणसाच्या बाबतीत मात्र कुम्भाराच्या  घड्याला  तडा  गेला; फुटला तर कधीच सांधता येत नाही. त्याप्रमाणे जर मनाचे तुकडे झाले तर कधीही सांधता येत नाहीत. 

१०३९. विधिरेव विशेषगर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध: |

सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन ||

अर्थ

हे कावळ्या; तू कावकाव करत रहा रे.  [कोकीळ फार उत्तम गातोय आणि आपण कसं असं कचकचाट करायचा असं म्हणून बुजू नकोस.] त्यात तुझा काय दोष? आंब्याच्या झाडावर सरल अशा [सुंदर गाणाऱ्या] कोकीळाशेजारी तुझी वस्ती ठेवण्याबद्दल ब्रह्मदेवालाच यासाठी भरपूर नावे ठेवली पाहिजेत.

[वायसान्योक्ती - व्यवस्थापकांनी योग्य ठिकाणी व्यक्तींची योजना करणं जरूर आहे, ज्याचा त्याच्या  वकुबाप्रमाणेच  ते काम करणार. दोष त्यांचा नाही.]

Friday, June 14, 2013

१०३८. दरिद्रता समायाता स्वालस्यस्यैव कारणात् |

श्रीमन्तो हि श्रमाज्जाताः श्रमे लक्ष्मीः प्रतिष्ठिताः ||

अर्थ

स्वतःच्या आळशीपणामुळे गरिबी आली आहे आणि स्वतः कष्ट केल्यामुळे श्रीमंती आली आहे. लक्ष्मी [संपत्तीची देवता] श्रमांवर विराजमान होते.

Thursday, June 13, 2013

१०३७. शत्रुभावस्थितान्यस्तु करोति वशवर्तिनः |

प्रज्ञाप्रयोगसामर्थ्यात्स शूरो स च पण्डितः ||

अर्थ

आपली बुद्धीमत्तेचा उपयोग करून जो मनुष्य आपले [निश्चित असे] शत्रुत्व करणाऱ्या माणसांना [देखील] जो आपल्या बाजूला वळवून घेतो तोच खरा पराक्रमी. [युद्ध करून एवढी हानी करून शत्रूंना मारण्यापेक्षा हे फार उत्तम] तोच खरा ज्ञानी !

१०३६. अमितगुणोऽपि पदार्थो दोषेणैकेन निन्दितो भवति |

सकलरसायनसारो दोषेणैकेन लशुन इव ||

अर्थ

एखाद्या गोष्टीमध्ये खूप चांगले गुण असले तरी त्यातल्या एखाद्याच दोषामुळे त्याला नाव ठेवली जातात. तसंच लसणीच आहे सर्व चांगल्या पौष्टीक गोष्टींचा अगदी साठा तिच्यात असला तरी एका दोषामुळे  [उग्र वासाने] तिला नाव ठेवतात.

१०३५. रोगशोकपरीतापबन्धनव्यसनानि च |

आत्मापराधवृक्षाणां फलान्येतानि देहिनाम् ||

अर्थ

माणसानी स्वतः केलेल्या अपराध [चूक; गुन्हा] रूपी वृक्षाची आजार; शोक; दुःखं; जखडलं जाणं आणि संकटे येणं ही फळ आहेत.

१०३४. दक्षः श्रियमधिगच्छति पथ्याशी कल्यतां सुखमरोगी |

अभ्यासी विद्यान्तं धर्मार्थयशांसि च विनीतः ||

अर्थ

सावध असेल त्या माणसाला संपत्ती मिळते. पथ्याच [आणि सत्वयुक्त] अन्नाच सेवन करणाराची तब्बेत चांगली राहते. सुदृढ माणूस सुखी असतो.  अभ्यासूवृत्तीच्या माणसाचं शिक्षण पूर्ण होत [सद्वृत्त आणि ] नम्र माणसाला संपत्ती; साफल्य आणि धार्मिकतेची प्राप्ती होते.

Monday, June 10, 2013

१०३३. लाभानामुत्तमं किं स्याद् धनानां स्यात् किमुत्तमम् |

लाभानां श्रेय आरोग्यं धनानामुत्तमा विद्या ||

अर्थ

[आपल्या] फायद्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ फायदा कुठला? संपत्तीच्या [प्रकारांमधे] कुठली श्रेष्ठ? सगळ्यात [चांगलं] आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. संपत्तीच्या सगळ्या प्रकारात विद्या ही श्रेष्ठ संपत्ती होय.

१०३२. सर्वे यत्र विनेतार: सर्वे पण्डितमानिन: |

सर्वे महत्वमिच्छन्ति कुलं तदवसीदति ||

अर्थ

ज्या घरात सर्वांनाच पुढारीपण करायचं असतं. [आपण म्हणू तसं व्हायला पाहिजे असं वाटत]; सगळे स्वतःला शहाणं समजतात; सर्वांनाच मोठेपणा हवा असतो, त्या घराण्याचा नाश होतो. [कोणाला तरी पड खावी लागते; दुस-याच्यासाठी खस्ता खाव्या लागतात तेंव्हा घर वर येत.]

१०३१. हीनसेवा न कर्तव्या कर्तव्य: महदाश्रय: |

राममासाद्य लङ्कायां लेभे राज्यं बिभीषणः ||

अर्थ

हलक्या माणसांची नोकरी करू नये. थोरामोठ्यांचा आधार घ्यावा. [अगदी सख्ख्या भावाला सोडून देऊन ] बिभीषणाने रामाचा आश्रय घेतला आणि लंकेच राज्य मिळवले.

Thursday, June 6, 2013

१०३०. साधोः प्रकोपितस्यापि मनो नायाति विक्रियाम् |

न हि तापयितुं शक्यं सागराम्भस्तृणोल्कया ||

अर्थ

सज्जन संतापला तरी त्याचं मन विकृत होत नाही. [राग आला म्हणून मनावरचा त्याचा ताबा सुटत नाही. अविचारीपणा तो करणार नाही.] गवताच्या काडीने समुद्राचं पाणी तापवणं शक्यच नसतं.

Tuesday, June 4, 2013

१०२९. यद्यपि धनेन धनिन: क्षितितलनिहितेन भोगरहितेन |

तस्माद्वयमपि धनिनस्तिष्ठति नः काञ्चनो मेरुः ||

अर्थ

[काहीही] उपभोग न घेता जमिनीत धन पुरून, ठेवणारे लोक जर अशा धनाने श्रीमंत ठरत असतील; तर मग आम्ही सुद्धा श्रीमंतच आहोत, कारण सुवर्णाचा पर्वत मेरु हा तर आमचाच आहे.

[गरीब लोक आणि पैसा नुसता उशाशी ठेवणारे श्रीमंत यात काय फरक? मेरु सोन्याचा असला तरी या कवीला
त्यातलं सोनं वापरता येत नाही तसंच तो श्रीमंत पैसे कुजवून गरिबीतच राहतो.]

Monday, June 3, 2013

१०२८. परोपकार: कर्तव्यः प्राणैरपि धनैरपि |

परोपकारजं पुण्यं न स्यात्क्रतुशतैरपि ||

अर्थ

पैसे खर्च करून आणि त्याचप्रमाणे प्राण देऊन सुद्धा परोपकार करावा. शेकडो यज्ञ केले तरीही परोपकार करण्याएवढे पुण्य मिळणार नाही.

१०२७. शीलं शौर्यमनालस्यं पाण्डित्यं मित्रसंग्रहः |

अचोरहरणीयानि पञ्चैतान्यक्षयो निधिः ||

अर्थ

चारित्र्य; पराक्रम; कामसूपणा; विद्वत्ता आणि जोडलेले  [चांगले] मित्र या पाच  गोष्टी म्हणजे न चोरता येईल असा; ऱ्हास न पावणारा खजिना आहे.