भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, May 29, 2014

१२८४. वातोल्लासितकल्लोल धिक्ते सागर गर्जितम् |

यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकाम् ||

अर्थ

उसळलेल्या वाऱ्यामुळे मोठी गर्जना करणाऱ्या सागरा तुझा धिक्कार असो [कारण] तुझ्या किनाऱ्यावर तहानलेला वाटसरू विहीर कुठे असेल त्याची विचारणा करतो. [सागरान्योक्ती  सागर = कंजूष श्रीमंत; वाटसरू = गरीब याचक]

Wednesday, May 28, 2014

१२८३. शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना |

तथापि कृशतां धत्ते कष्टः खलु पराश्रयः ||

अर्थ

स्वभावानी शांत [राहून] अशा भगवान शंकरांनी अगदी डोक्यावरच [अगदी कौतुकानी] सांभाळलाय तरीही चन्द्र [मधून का होईना] रोडावतो. बरोबरच आहे दुसऱ्याच्या आधारावर जगणं कठीणच असत.

Tuesday, May 27, 2014

१२८२. मन्त्रिणां भिन्नसंधाने भिषजां सान्निपातिके |

कर्मणि व्यज्यते प्रज्ञा स्वस्थे को वा न पण्डितः ||

अर्थ

[आपल्या राज्यातील उच्चपदस्थामध्ये] एकी नसेल अशावेळी मंत्र्याची किंवा सन्निपात आजाराच्या  [टॉयफाइड] आजा~यावर उपचार करताना वैद्याची हुशारी स्पष्ट होते. सगळ सरळ चाललं असेल तर सगळेच तल्लख असतात.

Monday, May 26, 2014

१२८१. ऊर्णां नैष दधाति नापि विषयो वाहस्य दोहस्य वा तृप्तिर्नास्य महोदरस्य बहुशो घासैः पलालैरपि |

हा कष्टं कथमस्य पृष्ठशिखरे गोणी समारोप्यते को गृह्णाति कपर्दकैरमुमिति ग्राम्यैर्गजो हस्यते ||

अर्थ

"याच्या अंगावर  [मेंढीसारखी] लोकर पण उगवत नाही. बरं दूध देणारा किंवा वाहून नेणारा पण हा प्राणी नाही. याचा एवढा मोठा पोटोबा टरफल किंवा केवढा तरी चारा घालून सुद्धा भरायचा नाही. बाप रे उंच अशा पाठीवर पोती तरी कशी चढवायची हो [मग अशा {निरुपयोगी} प्राण्याला] केवढ्यातरी रुपड्या खर्चून कोण बरं विकत घेईल? असं म्हणून गावंढळ लोक हत्तीला हसतात. [गजांतलक्ष्मी वगैरे राजे लोकांनाच कळणार ना?]

१२८०. अम्भांसि जलजन्तूनां दुर्गं दुर्गनिवासिनाम् |

स्वभूमिः श्वापदादीनां राज्ञां मन्त्री परं बलम् ||

अर्थ

पाणी ही जलचरांची ताकद असत. किल्ल्यावरील लोकांच गड हे [महत्वाच] बळ असत, आपली हद्द  ही जनावरांची [पशू; साप वगैरे] ताकद असते. तर मन्त्री हा राजाचा मुख्य आधार असतो.

Saturday, May 24, 2014

१२७९. मद्यपाः किं न जल्पन्ति किं न भक्षन्ति वायसाः |

कवयः किं न पश्यन्ति किं न कुर्वन्ति दुर्जनाः ||

अर्थ

दारुडे काय बडबडत नाहीत? [वाट्टेल ते - खरं खोटं बोलतात.] कावळे काहीही खातात. कवी काय पहात नाहीत बरे? [जे न देखे रवि ते देखे कवि] दुष्ट लोक वाट्टेल ती कुकर्मे करतात.

१२७८. सर्वेन्द्रियाणि संयम्य बकवत्पतितो जनः |

कालदेशोपपन्नानि सर्वकार्याणि साधयेत् ||

अर्थ

आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून माणसाने त्या त्या वेळी आणि त्या त्या ठिकाणी जसं वागणं योग्य आहे तसा व्यवहार ठेऊन आपली काम साधून घ्यावी. [मासे पकडण्यासाठी बगळा जसा तासनतास एका पायावर चित्रासारखा उभा राहतो, सगळं व्यवधान तिकडे लावतो तसं.]

Thursday, May 22, 2014

१२७७. नष्टं मृतमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः |

पण्डितानां च मूर्खाणां विशेषोऽयं यतः स्मृतः ||

अर्थ

मृत व्यक्ती; नष्ट झालेल्या वस्तु आणि भूतकाळात [घडलेल्या] घटना यांच्या बद्दल विद्वान शोक  करत [वेळ आणि स्वास्थ्य नाश करत] नाहीत. विद्वान आणि मूढ [सामान्य माणसं] यातला हा फरक सांगितलेला आहे.

१२७६. निरक्षरे वीक्ष्य महाधनत्वं विद्यानवद्या विदुषा न हेया |

रत्नावतंसाः कुलटा: किमार्यनार्यो कुलटा भवन्ति ||

अर्थ

अशिक्षित माणूस खूप श्रीमंत आहे असं दिसल्यामुळे विद्वानाने आपल्या उत्कृष्ट अशा विद्येकडे [उच्चशिक्षणाकडे] दुर्लक्ष करू नये. [आपण मनापासून ज्ञानार्जन करावं. पैसा कमी मिळतो याची खंत बाळगू नये.] वाईट चालीच्या बायका जडजवाहीरानी मढलेल्या पाहून गर्तीच्या स्त्रिया कधी सुशीलपणा सोडतात काय?

१२७५. देहे पातिनि का रक्षा यशो रक्ष्यमपातवत् |

नरः पतितकायोऽपि यशःकायेन जीवति ||

अर्थ

[केंव्हातरी निश्चितपणे मृत्युमुखी] पडणाऱ्या शरीराच्या रक्षणाबद्दल [अतिचिंता] कशाला करायची?  कीर्तिला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. [कारण] मरून गेल्यावर सुद्धा मनुष्य कीर्तिरूपं शरीराने जिवंत राहतो.

Monday, May 19, 2014

१२७४. कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो हंसः कुतो मानसात्किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासंनिभम् |

रत्नानां निचयाःप्रवालमणयो वैदूर्यरोहः क्वचिच्छम्बुकाः किमु सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

अर्थ

[बगळे नवीन आलेल्या पक्ष्याला पाहून विचारतात] तांबडे तांबडे डोळे, तोंड [चोच] आणि पाय असणारा तू कोण आहेस? " कोण बरे तू ?"; "हंस "; "कुठून आलास बरं?"; "मानससरोवरातून "; "तिथ काय असत?"; " तिकडे ना सोनेरी कमळांचे ताटवेच्या ताटवे. अमृतासारखं पाणी. रत्नांच्या राशीच असतात. कुठे कुठे वैदूर्याचे कोंबसुद्धा मिळतात." [इतकं वैभव ऐकून परत बगळे विचारतात] "शिंपले असतात का रे ?"; "नाही बाबा" हे ऐकून बगळे खदाखदा हसले. [काय एकेकाची आवड असते.]

१२७३. कलारत्नं गीतं गगनतलरत्नं दिनमणिः सभारत्नं विद्वाञ्श्रवणपटुरत्नं हरिकथा |

निशारत्नं चन्द्रःशयनतलरत्नं शशिमुखी महीरत्नं श्रीमाञ्जयति रघुनाथो नृपवरः ||

अर्थ

सर्व कलामध्ये उत्कृष्ट [रत्न] गानकला सूर्य हा आकाशमंडळाचे रत्न होय. विद्वान हा सभेच रत्न. सर्वात  श्रवणीय ही हरिकथाच असते. श्रेष्ठ राजा श्रीराम हा पृथ्वीतलाचा अलंकार, असून त्याचा [नेहमी] विजय होतो.

१२७२. एकसार्थप्रयातानां सर्वेषां तत्र गामिनाम् |

यद्येकस्त्वरितं यातस्तत्र का परिदेवना ||

अर्थ

सर्वच लोक जिथे [परलोकी] जाणार आहेत अशा तांड्यातील एक जण जर पटकन गेला तर त्याच काय दुःख करायचय ? [एखाद्या आप्ताला लवकर मृत्यू आला म्हणून दुःख करण्यापेक्षा आपल्याला पण मृत्यू येणार आहे] म्हणून आसक्ति घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Wednesday, May 14, 2014

१२७१. ध्यानशस्त्रं बकानां च वेश्यानां मोहशस्त्रकम् |

साधुत्वशस्त्रं मैन्दानां परप्राणार्थहारकम् ||

अर्थ

बगळ्यांच ध्यान करण्याच [सोंग हेच] शस्त्र; वेश्यांच भुरळ पाडणं हे हत्यार आणि ठगांच  शहाजोगपणाच ढोंग ही  हत्यार दुसऱ्यांचे प्राण आणि द्रव्य लुबाडत असतात.

Monday, May 12, 2014

१२७. प्रेम सत्यं तयोरेव ययोर्योगवियोगयोः |

वत्सरा वासरीयन्ति वासरीयन्ति वत्सराः ||

अर्थ

त्यांच्यातच खर प्रेम आहे असं म्हंटल पाहिजे; की जे जवळ असताना वर्ष हे दिवसासारखं [पटकन गेलं असं वाटत] आणि विरहकाळात एक दिवस हा वर्षाप्रमाणे भासतो.

१२६९. क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम् |

धर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्क्रोधं विवर्जयेत् ||
अर्थ

संताप हे संकटांचे कारण आहे. राग हे संसाराच्या [जन्ममरणाच्या येरझारांचे] बंधनाचे मूळ आहे. संतापामुळे धर्माची हानी होते [संताप झाल्यामुळे शाप दिला तर सगळं तप वाया जाते शिवाय त्यापायी परमेशाच्या भक्तीत व्यत्यय येतो] म्हणून रागावणं संपूर्णपणे सोडून द्यावं. 

१२६८. दोषोऽपि गुणतां याति प्रभोर्भवति चेत्कृपा |

अङ्गहीनोऽपि सूर्येण सारथ्ये योजितोऽरुणः ||

अर्थ

जर धन्याची कृपादृष्टी असेल तर असलेला एखादा दोष गुणाप्रमाणे भासतो. [त्या दोषाचा तोटा न होता फायदाच होतो] विकलांग [पांगळा] असूनही सूर्याने अरुणाला सारथी नेमले आहे. [त्याला पाय नसले तरी त्याचा वेळ अगदी चांगला जातो. त्याला काही फरकच पडत नाही.]

१२६७. न पश्यति च जन्मान्धः कामान्धो नैव पश्यति |

न पश्यति मदोन्मत्तो ह्यथीं दोषं न पश्यति ||

अर्थ

जन्मापासून अंधाला दिसत नाहीच. विषयांधाला [पाप; धोके; परिणाम] दिसत नाहीत. मस्तवाल माणसाला [सद्गुणी; गरजवंत वगैरे] दिसत नाही. गरजवंताला [कशात] दोष दिसत नाहीत.

Thursday, May 8, 2014

१२६६. ब्रह्मन्; कृष्णकथाः पुण्याः माध्वीर्लोकमलापहाः |

को नु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो   नित्यनूतनाः || भागवत

अर्थ

हे [शुक] महर्षे; अतिशय रसाळ; नेहमी नव्याप्रमाणे वाटणाऱ्या; पुण्य मिळवून देणाऱ्या; या जगाच काळबेरं [वाईट; पाप] नाहीसं करणाऱ्या अशा कृष्णकथा ऐकताना कोणाला बरे समाधानी वाटणार नाही? [त्या अजून अजून ऐकाव्या असंच वाटेल.]

Wednesday, May 7, 2014

१२६५. देशे देशे किमपि कुतुकादद्भुतं लोकमानाः संपाद्यैव द्रविणमतुलं सद्म भूयोऽप्यवाप्य |

संयुज्यन्ते सुचिरविरहोत्कण्ठिताभिःसतीभिः सौख्यं धन्याःकिमपि दधते सर्वसंपत्समृद्धाः ||

अर्थ

अगदी भरपूर संपत्ती मिळवून परदेशातल्या आश्चर्य वाटेल अशा विविध गोष्टी पाहून आपल्या घरी परत आल्यावर, अतिशय श्रीमंती मिळवलेल्या; कृतकृत्य अशा [कामासाठी परदेशी राहिलेल्याना] पुष्कळ काळपर्यंत झालेल्या विरहामुळे उत्कंठित झालेल्या प्रियेचा सहवास मिळाल्याने अपूर्व सुखाचा अनुभव मिळतो.

Monday, May 5, 2014

१२६४. नीरसान्यपि रोचन्ते कार्पासस्य फलानि मे |

येषां गुणमयं जन्म परेषां गुह्यगुप्तये ||

अर्थ

कापसाची फळ [बोंड] शुष्क [रसहीन] असून सुद्धा मला आवडतात. [जरी रसदार नसली] तरी गुणी [गुण किंवा धागा यांनी युक्त] अशा यांच्या जन्मामुळे दुसऱ्यांच लज्जारक्षण होत. [त्यांचा परोपकाराचा गुण स्तुत्य आहे.]

१२६३. अवशेन्द्रियचित्तानां हस्तिस्नानमिव क्रियाः |

दुर्भगाभरणप्रायो ज्ञानं भारो क्रियां विना ||

अर्थ = ज्यांची इंद्रिये स्वतःच्या ताब्यात नाहीत त्यांच कुठलहि काम हत्तीच्या आंघोळी प्रमाणे असत. [हत्ती पाण्यात डुंबल्यावर लगेच मातीत सुद्धा लोळेल मग त्या अंग स्वच्छ करण्याला काय अर्थ? तसंच काही केल्यावर त्याच्या उलट सुद्धा वर्तन हे लोक करू शकतात.] कुठलही ज्ञान झाल्यावर ते जीवनात आचरणात आणलं नाही तर ते कमनशिबी माणसाने घातलेल्या दागिन्या प्रमाणे ओझच होय.


१२६२. अपराधो न मेऽस्तीति नैतद्विश्वासकारणम् |

विद्यते हि नृशंसेभ्यो भयं गुणवतामपि ||

अर्थ

कर्दनकाळ माणसांच्या बाबतीत "मी काही गुन्हा केला नाही" त्यामुळे [तो छळणार नाही अशी] खात्री; अगदी गुणी लोकांना सुद्धा; धरता येत नाही.

१२६१. अलभ्यं लब्धुकामस्य जनस्य गतिरीदृशी |

अलभ्येषु मनस्तापः संचितार्थो विनश्यति ||

अर्थ

असाध्य गोष्टीच्या पाठीमागे लागलेल्या माणसाची अवस्था अशी होते की; असाध्य वस्तु न मिळाल्याने मनस्ताप तर होतोच [आणि ती मिळवण्यासाठी] जमवलेली पुंजी मात्र खलास होऊन जाते.