भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, May 31, 2013

१०२६. गुणवन्त: क्लिश्यन्ते; प्रायेण भवन्ति निर्गुणा: सुखिनः |

बन्धनमायान्ति शुका; यथेष्टसंचारिण: काका: ||

अर्थ

या जगात गुणी लोकांनाच खूप कष्ट करावे लागतात. तर गुणहीन [काही कौशल्य नसलेले  किंवा] दुर्गुणी लोक सुखात [आरामात] राहतात. पोपट पिंजऱ्यात अडकतात तर कावळे मात्र स्वैर विहार करत असतात.

Thursday, May 30, 2013

१०२५. जामाता कृष्णसर्पश्च पावको दुर्जनस्तथा |

विश्वासात्प्रभवन्त्येते पञ्चमो भगिनीसुतः ||


अर्थ

जावई; काळा साप; अग्नि; दुष्ट मनुष्य आणि तसंच अजून बहिणीचा मुलगा - भाचा - हे भरवसा ठेवला की डोईजड होतात.

Wednesday, May 29, 2013

१०२४. अप्राप्तकालवचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् |

प्राप्नुयाद्बुध्यवज्ञानमपमानं च शाश्वतम् ||

अर्थ

नको त्या वेळी सल्ला देणारा साक्षात बृहस्पती जरी असला आणि त्याचा विचार कितीही चांगला असला त्याच्या बुद्धीची टवाळी होते आणि त्याचा पुढे नेहमी अपमान होत राहतो.

Tuesday, May 28, 2013

१०२३. यस्मिन्वंशे समुत्पन्नस्तमेव निजचेष्टितैः |

दूषयत्यचिरेणैव घूणकीट इवाधमः ||

अर्थ

वेळू पोखरणारा किडा त्याच वेळूत [वंशात] जन्माला येतो. [निर्माण होतो] पण तो तोच वेळू पोखरून नष्ट करतो. तसंच अधम मनुष्य ज्या घराण्यात जन्माला येतो, त्या घराण्याचा आपल्या हीन कृतींनी नाश करतो.

१०२२. ग्रासोद्गलितसिक्थेन का हानिः करिणो भवेत्‌ |

पिपीलिका तु तेनैव सकुटुम्बोपजीवति ||

अर्थ

हत्तीच्या घासातला एखादा तुकडा खाता खाता गळून पडला तर हत्तीच काय नुकसान होणार आहे? पण तेवढ्या [त्याच्या दृष्टीने लहानशा] तुकड्यात मुंगीचे अख्खे कुटुंब पोसले जाईल.

Monday, May 27, 2013

१०२१. दिव्यं चूतरसं पीत्वा गर्वं नायाति कोकिल: |

पीत्वा कर्दमपानीयं भेको रटरटायते ||

अर्थ

अतिशय मधुर असा आम्रमंजीरीतला रस पिऊनही कोकीळ कधी गर्वाने फुगून जात नाही. [उलट मधुर कूजन करतो.] तर चिखलातले गढूळ पाणी पीत असूनसुद्धा बेडूक मात्र सारखा रटाळ आणि कर्णकटू आवाज काढत बसतो. [कशाचा माज करतो कोणास ठाऊक.]

Friday, May 24, 2013

१०२०. येनाहङ्कारयुक्तेन चिरं विलसितं पुरा |

दीनं वदति तत्रैव यः परेषां स निन्दितः ||

अर्थ

एखाद्या माणसानी जिथे पुष्कळ काळ रुबाबात घालवला असेल तिथेच नंतर तो लाचारीने बोलू लागला तर मग त्याची चेष्टा - टिंगल होते.

Thursday, May 23, 2013

१०१९. खलसख्यं प्राङ्मधुरं वयोऽन्तराले निदाघदिनमन्ते |

एकादिमध्यपरिणतिरमणीया साधुजनमैत्री ||

अर्थ

दुष्टांची मैत्री सुरवातीला सकाळच्या किंवा थंडीतल्या उन्हासारखी कोवळी - उबदार वाटते. मधल्या काळात चढत्या उन्हासारखी त्रासदायक वाटते आणि शेवटाला उन्हाळ्यातल्या उन्हासारखी चटके देणारी; अंगाची मनाची तगमग करणारी असते. सज्जनांची मैत्री मात्र सुरवातीला, मधे व शेवटी सारखीच रमणीय - सुखाची - हवीहवीशी वाटत राहते.

Wednesday, May 22, 2013

१०१८. अन्वयागतविद्यानामन्वयागतसम्पदाम् |

विदुषां च प्रभूणां च हृदयं नावलिप्यते ||
 
अर्थ
 
ज्यांना वंशपरंपरेने विद्या मिळालेली असते असे  घरंदाज विद्वान व ज्यांना  वंशपरंपरेने वैभव मिळालेले असते असे कुलीन श्रीमंत कधी गर्वाने उन्मत्त होत नाहीत.

Monday, May 20, 2013

१०१७. सम्पत्सरस्वती सत्यं सन्तानं सदनुग्रहः |

सत्ता सुकृतसम्भाराः सकाराः सप्त दुर्लभा:||

अर्थ

संपत्ती; सरस्वती [विद्या] सत्य; संतान [गुणी अपत्य] सज्जनांचा अनुग्रह [कृपा];  सत्ता आणि सुकृतसंभार [पुण्यराशी] या सात ’स’ने सुरुवात होणाऱ्या गोष्टी दुर्मिळ असतात.

१०१६. सुलभं वस्तु सर्वस्य न यात्यादरणीयताम् |

स्वदारपरिहारेण परदारार्थिनो जनाः ||
अर्थ

जी गोष्ट माणसाला सहजी मिळते तिचे कुणाला कौतुक वाटत नाही. म्हणून तर लोकांना  आपली बायको असताना परस्त्रीच खूप आकर्षण असत.

१०१५. सिंहक्षुण्णकरीन्द्रकुम्भगलितं रक्ताक्तमुक्ताफलं कान्तारे बदरीधिया द्रुतमगाद्भिल्लस्य पत्नी मुदा |

पाणिभ्यामवगुह्य शुल्ककठिनं तद्वीक्ष्य दूरे जहावस्थाने पततामतीव महतामेदृशी स्याद्गतिः ||

अर्थ

एका सिंहाने जिंकलेल्या गजेन्द्राच्या गंडस्थळातून गळून पडलेली पण रक्ताने माखलेली मोत्ये दुरून पाहून, ती बोरेच आहेत असे समजून एक भिल्लीण मोठ्या आनंदाने  धावतच ती वेचायला गेली. पण अरेरे ! हातात घेताच ही खपणं कठीण आहे म्हणून तिन ती लांब फेकून दिली .
योग्यतेने थोर माणसं सुद्धा नको तिथ पडली की त्यांची किंमत न कळल्यामुळे त्यांची अशीच अवस्था होणार दुसरं काय?

Friday, May 17, 2013

१०१४. माता गुरुतरा भूमेः खात्पितोच्चतरस्तथा |

मनः शीघ्रतरं वाताच्चिन्ता बहुतरी तृणात् ||

अर्थ

आई ही पृथ्वीहून थोर असते. वडील हे योग्यतेने आकाशाहून थोर -विशाल असतात. मन वाऱ्या पेक्षाही चंचल असते. तर चिन्ता ही गवताहूनही उदंड वाढत राहते.

Thursday, May 16, 2013

१०१३. असहायः पुमानेकः कार्यान्तं नाधिगच्छति |

तुषेणापि परित्यक्ता न प्ररोहन्ति तण्डुलाः ||

अर्थ

कुणी मदतनीस नसेल तर एकटा माणूस काम तडीस नेऊ शकत नाही. भातावर जर तुसकट नसेल ते उगवत नाही. [तुसकट हे जरी क्षुल्लक असलं तरी भात रुजण्यासाठी त्याची जरुरी असते. अगदी एकटा काही करू शकत नाही.]

Wednesday, May 15, 2013

१०१२. हर्तुर्याति न गोचरं ;किमपि शं पुष्णाति यत्सर्वदा ह्यर्थिभ्यः प्रतिपाद्यमानमनिशं प्राप्नोति वृद्धिं पराम्|

कल्पान्तेष्वपि न प्रयाति निधनं विद्याख्यमन्तर्धनं येषां तान्प्रति मानमुज्झत नृपाः कस्तैः सह स्पर्धते ||

अर्थ

विद्या नावाचे गुप्त धन  - चोरांना कुठे, किती आहे ते दिसतच नाही. ते [विद्याधन] नेहमी अतिशय हित करतच असते. [विद्या] मागणाऱ्याला सतत देत राहीलं, तरी ते कमी न होता उदंड वाढतच राहते. कल्पांती सुद्धा ह्याचा नाश होत नाही. राजे लोकांनो, असं हे धन ज्यांच्याकडे असते, त्यांच्याशी वागताना उर्मटपणा करू नका. अरे त्यांच्याशी कोण स्पर्धा करू शकेल?

१०११. भूमौ स्खलितपादानां भूमिरेवावलम्बनम् |

त्वयि जातापराधानां त्वमेव शरणं मम ||

अर्थ

जमिनीला अडखळून ठेचकाळून एखादा जर पडला तरी तो भूमीचाच आधार घेतो. मग हे दयाघना परमेश्वरा; तुझ्या बाबतीत मी अपराधी असलो तरी तुलाच शरण येणार. दुसरं कोण मला सांभाळणार?

Monday, May 13, 2013

१०१०. तृणं ब्रह्मविदः स्वर्गस्तृणं शूरस्य जीवितम् |

जिताक्षस्य तृणं नारी; निस्पृहस्य तृणं जगत् ||

अर्थ

ब्रह्मज्ञानी माणसाला स्वर्गसुख कस्पटासमान वाटते. पराक्रमी माणसाला आयुष्य गवताच्या काडीप्रमाणे [बिनमहत्वाचे ] वाटते. ज्याने दृष्टीवर विजय मिळवलेला आहे, त्याला स्त्री [च्या सौंदर्याचे] बिलकुल महत्व नसते. निरिच्छ माणसाला अवघे जग तुच्छ वाटते.

१००९. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जन: श्मशाने |

देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक: ||

अर्थ

[आयुष्यभर मिळवलेल सारं धन आपण मेल्यावर सोबत घेऊन जाता येत नाही] ते जिथे ठेवलं आहे तिथेच - जमिनीवर - रहात प्राणी गोठ्यात राहतात. बायको दारापाशीच थांबते. नातेवाईक स्मशानापर्यंत येतात. आपलं शरीर [स्वतःच सुद्धा] चितेवर जळून जात [ते सुद्धा पुढे येत नाही] आणि आपली भलीबुरी कर्म घेऊन जीवाला एकट्यालाच परलोकी  जावे लागते.

१००८. मुख्यमेकं पुरस्कृत्य शून्यात्मानोऽपि साधकाः |

भवन्ति; तं विना नैव; यथा संख्याङ्कबिन्दवः ||

अर्थ

मुख्य [कर्तृत्ववान माणसाला] पुढे केल्यावर मागून जाणारे शून्य किमतीचे असले तरी [त्यांच काम] साधून जात. तो मुख्य नसेल तर मात्र त्यांची किंमत शून्यच राहते. जशी आकड्याच्या संख्येवरची शून्ये. त्या आकड्याचे मोल पुढच्या शून्यांमुळे दसपट, शतपट, हजारपट होते आणि तो आकडा असल्याशिवाय त्या शून्याना पण किंमत नसते.

Thursday, May 9, 2013

१००७. आपदो महतामेव महतामेव सम्पद: |

क्षीयते वर्धते चन्द्र: कदाचिनैव तारका: ||

अर्थ

संकटे काय किंवा वैभव काय थोरामोठ्यांच्या वाट्याला येते. कलेकलेने वाढतो तो चंद्रच, तारका तर कधीच [आकार बदलत ] नाहीत.

Wednesday, May 8, 2013

१००६. नोदकक्लिन्नगात्रस्तु स्नात इत्यभिधीयते |

स स्नातो यो दमस्नात: सबाह्याभ्यन्तरं शुचि: ||

अर्थ

अंग पाण्याने भिजवले म्हणजे स्नान झाले असे म्हणत नाहीत. तर जो इंद्रिय निग्रह या व्रताने नखशिखान्त शुद्ध झाला, त्यानेच खरे स्नान केले असे म्हणतात. [तो अंतर्बाह्य पवित्र असतो.]

Tuesday, May 7, 2013

१००५. अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरु: |

बादरायणसम्बधाद्यूयं यूयं वयं वयम् ||

अर्थ

आमच्या बैलगाडीच चाक, बोरीच्या लाकडापासून बनवलेले आहे आणि तुमच्या [अंगणात साक्षात] बोरीच झाडच आहे. [एवढाचं] तुमचा आणि आमचा बोरीमुळे आलेला संबंध [तेवढा सोडला तर] तुम्ही; तुम्ही आहात आणि आम्ही; आम्ही. [यावरून मराठीत बादरायण संबध = अतिशय लांबचा संबध असा शब्द आला आहे.] [जेंव्हा स्वतःच्या फायद्यासाठी  जवळीक दाखवायची इच्छा असते तेंव्हा, अशी  दुरुनची नाती[?] असली तरी चालतात.]

१००४. वाग्वादश्चार्थसम्बध: परोक्षे दारभाषणम् |

यदीच्छेद्विपुलां मैत्रीं त्रीणि तत्र न कारयेत् ||

अर्थ

जर एखाद्याची कायमची आणि उदंड मैत्री हवी असेल तर त्याच्या बाबतीत तीन गोष्टी टाळाव्या. शाब्दिक वादविवाद; पैशाची देवाणघेवाण, व त्याच्या अनुपस्थितीत एकांतात त्याच्या पत्नीशी संभाषण.

१००३. आपातालगभीरे मज्जति नीरे निदाघसन्तप्तः |

न स्पृशति पल्वलाम्भः पञ्जरशेषोऽपि कुञ्जरः क्वापि ||

अर्थ

[मुक्त] हत्ती उन्हाळ्यात उन्हाने त्रासला की पाताळाएवढ्या खोल पाण्यातही [स्वैरपणे] डुंबत राहू शकतो पण तोच पिंजऱ्यात अडकला की डबक्यातल्या पाण्याला स्पर्शसुद्धा करत नाही.

१००२. गुणेन स्पृहणीय: स्यान्न रूपेण युतो नर: |

सौगन्ध्यहीनं नादेयं पुष्पं कान्तमपि क्वचित् ||

अर्थ

[फक्त] देखणा आहे म्हणून [कौतुक मिळवणं ह्यापेक्षाही] माणसानी आपल्या गुणांमुळे हवाहवास वाटायला पाहिजे. फूल दिसायला सुंदर असलं तरी सुवासिक नसलं तर ते सहसा  दिलं जात नाही. [रूपापेक्षा गुण अधिक महत्वाचे आहेत.]

१००१. वरं बुद्धिर्न सा विद्या विद्याया बुद्धिरुत्तमा |

बुद्धिहीना विनश्यन्ति यथा ते सिंहकारका: ||

अर्थ

नुसती सहजबुद्धि [कॉमन सेन्स] असलेली परवडली; [कुठली तरी विशिष्ट] विद्या नसली तरी  चालेल, कारण [एखाद्या विषयातल नुसत] ज्ञान असण्यापेक्षा अक्कल श्रेष्ठ ठरते. सहज बुद्धि नसणारे लोक मात्र त्या सिंह निर्माण करणाऱ्या [दीड शहाण्यासारखे] नाश पावतात.

१०००. मतिरेव बलाद्गरीयसी तदभावे करिणामियं दशा |

इति घोषयतीव डिण्डिमः करिणो हस्तिपकाहतः क्वणन् ||

अर्थ

"शारीरिक बळाहून बुद्धीच श्रेष्ठ आहे आणि ती नसल्यामुळेच हत्तींची  अशी दशा - अवस्था झालीय " अशी दवंडी पिटवण्यासाठीच जणू काही माहुताकडून वाजवल्या जाणाऱ्या नगाऱ्याचा ध्वनी होतो आहे.

९९९. अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं; सुरक्षितं दैवहतं विनश्यति |

जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः; कृतप्रयत्नोऽ पि गृहे न जीवति ||

अर्थ

दैवाच्या मनात असेल [त्या प्राण्याच नशीब जोरावर असेल तर] ते दैवच - त्याला कोणी संभाळणार नसलं तरी [ते] त्याचा सांभाळ करत. पण नशीब फिरलं असेल तर त्याला कितीही बंदोबस्तात ठेवलं तरी त्याचा नाश होतो. रानावनात सोडून दिलेले निराधार मूल दीर्घायुषी होईल पण दैव सहायक नसेल तर घरात सुद्धा हर प्रयत्न करूनही ते जगत नाही.

९९८. गुणिनि गुणज्ञो रमते; नागुणशीलस्य गुणिनि परितोष: |

अलिरेति वनात्पद्मं; न दर्दुरस्त्वेकवासोऽपि ||

अर्थ = [स्वतः] गुणी माणसालाच गुणवंतांच प्रेम - कौतुक असत, ज्याला स्वतःला त्यात गति नसेल तर त्याला गुणवंताचा आदर - प्रेम काही वाटत नाही. भुंगा [अगदी दुरून] अरण्यातून [सरोवराकडे] येतो पण त्याच जलाशयात रहात असूनही बेडूक कमळाच्या [जवळपास] फिरकत नाही.

९९७. न यत्रास्ति गतिर्वायोः रश्मीणाञ्च विवस्वतः |

तत्रापि प्रविशत्याशु बुद्धिर्बुद्धिमतां सदा ||

अर्थ

जिथे वारासुद्धा शिरू शकणार नाही किंवा जिथे सूर्यकिरणांनाही जाता येत नाही, तेथे सुद्धा बुद्धिमान लोकांची बुद्धी अगदी नेहमी झटकन जाऊन पोहोचते.

९९६. अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिस्तथा |

द्वावेतौ सुखमेधेते यद्भविष्यो विनश्यति ||

अर्थ

संकटाची चाहूल ओळखून आधीच त्यावरील उपायासंबंधी विचार आणि योजना करून ठेवणारा; संकट आल्यावर लगेचच चाणाक्षपणे त्यावर बुद्धीने मत करणारा, हे  दोघेच जीवनात  सुखी होतात. दैवात जसे असेल तसे होईल असे म्हणून काहीही न करता निष्क्रीय राहणारा [संकटांनी] नाश पावतो.

९९५. मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा |

ग्रामणिर्गणकश्चैव सप्तैते परभक्षकाः ||

अर्थ

माशी; डास; वेश्या; भिकारी; तसंच गावाचा मुख्य आणि कारकून हे सातजण दुसऱ्याच खाऊन जगतात. [त्यांची स्वकष्टाची मिळकत फारच कमी असते.]

९९४. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा ; कालो जगद्भक्षकः |

लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला ; विद्युच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद ; त्वं रक्ष रक्षाधुना ||

अर्थ

आपल्या डोळ्यादेखत आयुष्याचा ऱ्हास होतोय; तारुण्य हळूहळू संपतय; [एकदा] गेलेले दिवस पुन्हा परत येत नाहीत; काळ तर जगाला खाऊन टाकतोच आहे; संपत्ती पाण्यावर उठून क्षणात फुटणाऱ्या लाटेसारखी चंचल आहे, आयुष्य विजेसारखं क्षणिक आहे; तरी [सगळ्यांना] आसरा देणाऱ्या परमेश्वरा; तूच माझा सांभाळ कर; मी तुला शरण आलो आहे.