भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, February 28, 2013

९४०. गावो गन्धेन पश्यन्ति वेदै: पश्यन्ति वै द्विजा: |

चारै: पश्यन्ति राजानश्चक्षुभ्यामितरे जना: ||

अर्थ

गाई; बैलांना वासाने [पदार्थाचे] ज्ञान होते. ज्ञानी लोक वेदाने [त्यांना असणाऱ्या माहितीतून विचार करून सगळं] बघतात [त्या प्रसंगाचा सर्वंकष विचार करतात]; राजे [प्रशासक] हेरांच्या करवी लक्ष ठेवतात. आणि सामान्य माणसाला [मात्र] डोळ्याला दिसत [ते खरं] असं दिसत [वाटत.]

Wednesday, February 27, 2013

९३९. मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत् |

अन्यलक्षितकार्यस्य यत: सिद्धिर्न जायते ||
अर्थ

काय करायचंय ते मनात घोळवलं तरी [ते सगळं] बोलून टाकू नये कारण की; दुसऱ्यांनी त्यात [फार] लक्ष घातलं तर काम पूर्ण होत नाहीत.

९३८. कान्पृच्छामः सुराः स्वर्गे निवसामो वयं भुवि |

किं वा काव्यरसः स्वादुः ? किं वा स्वादीयसी सुधा ? ||

अर्थ

[सुंदर असा] काव्यरस हा [अधिक] मधुर असतो का अमृत अधिक मधुर असतं. [इतकं काव्य आम्हाला मधुर लागत] हे आम्ही विचारावं तरी कोणाला? आपण तर इथं पृथ्वीवर राहतो [आणि अमृतपान करणारे] देव तर स्वर्गात राहतात. [आम्हाला तर काव्यरस हाच अधिक मधूर भासतो.]

९३७. सत्यं न मे विभवनाशकृतास्ति चिन्ता भाग्यक्रमेण हि धनानि भवन्ति यान्ति |

एतत्तु मां दहति नष्टधनाश्रयस्य यत्सौहृदादपि जनाः शिथिलीभवन्ति ||

अर्थ

खरोखरच मला वैभव नाहीस झाल्याबद्दल काही काळजी वाटत नाही. नशिबाच्या फे~यामुळे संपत्ती येते आणि निघून पण जाते [ती केंव्हा तरी मिळेलच] परंतु श्रीमंतीचा ~हास झाल्यावर लोक मैत्रीचे संबध सुद्धा कमी करतात, यानी मी अगदी पोळून निघालोय [याबाबत मला फारच वाईट वाटत.]

Monday, February 25, 2013

९३६. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |

इति विमृशन्तः सन्तः संन्तप्यन्ते न ते विपदा ||

अर्थ

सज्जन लोक; तोडलेला वृक्षसुद्धा  [हळूहळू का होईना पुन्हा] वाढतो; चन्द्र [एका पंधरवड्यात] खंगला तरी पुन्हा वृद्धिंगत होतोच; [त्याचप्रमाणे संकटे आली तरी त्यांचा निरास होतो.] असा विचार करून संकटांमुळे चिडत नाहीत.

Friday, February 22, 2013

९३५. प्राप्य चलानधिकारान् शत्रुषु मित्रेषु बन्धुवर्गेषु |

नापकृतं नोपकृतं न सत्कृतं किं कृतं तेन ||

अर्थ

थोड्याकाळासाठी अधिकार मिळूनही जर एखाद्याने नातेवाईकांच भल केलं नाही; शत्रूंना त्रास दिला नाही; मित्रांना मदत केली नाही, तर अशा तात्पुरत्या अधिकाराचा त्यांनी उपयोग तरी काय केला? [ते वायाच घालवले.]

Thursday, February 21, 2013

९३४. जामाता जठरं जाया जातवेदा जलाशयः |

पूरिता नैव पूर्यन्ते जकाराः पञ्च दुर्भराः ||
अर्थ = जावई; जठर [पोट]; जाया [पत्नी]; जातवेद [अग्नि] आणि जलाशय या पाच "ज " नी सुरु होणाऱ्या वस्तु कधी तृप्त होत नाहीत. [पूर्णपणे भरत नाहीत.]

Wednesday, February 20, 2013

९३३. विहाय पौरुषं यो हि दैवमेवावलम्बते |

प्रासादसिंहवत्तस्य मूर्ध्नि तिष्ठन्ति वायसाः ||

अर्थ

पराक्रम [प्रयत्न] करायचा सोडून जो मनुष्य नशिबावर हवाला ठेवून [गप] बसून राहतो;  त्याच्या डोक्यावर ; ज्याप्रमाणे एखाद्या इमारतीवर असणाऱ्या सिंहाच्या [शिल्पावर] जसे [तो सिंह असला तरी] कावळे बसतातच त्याप्रमाणेच;  [कमी लायकी असणारे लोक] वर चढतात.

९३२. अगुणस्य हतं रूपमशीलस्य हतं कुलम् |

असिद्धेस्तु हता विद्या अभोगस्य हतं धनम् ||

अर्थ

जर चांगले गुण नसतील तर स्वरूपसुंदर असून ते वाया जातात. चारित्र्य कलंकित असेल तर घराण्याला बट्टा लागतो. शिक्षण ती कला पूर्ण येई पर्यंत [वरच्या थरापर्यंत न गेल्यास] वाया जाते. जो आपल्या संपत्तीचा उपयोग करत नाही ती फुकटच जाते.

Monday, February 18, 2013

९३१. शत्रुवाक्यामृतं श्रुत्वा तेन सौहार्दमार्जवम् |

न हि धीरेण कर्तव्यमात्मन: शुभमिच्छता ||

अर्थ

आपलं स्वतःच कल्याण व्हावं अशी इच्छा असणाऱ्या माणसाने, शत्रूच गोडगोड बोलणं ऐकून, त्यासाठी मैत्री किंवा सरळपणे वागायचं असं करू नये. [ते फसवण्यासाठीच असत.]

९३०. को नरकः परवशता ; किं सौख्यं? सर्वसङ्गविरतिर्या |

किं सत्यं? भूतहितं ;किं प्रेयः प्राणिनामसवः ||

अर्थ

नरक कोणता आहे? दुसऱ्यावर अवलंबून असणं. आनंद म्हणजे काय? सर्व गोष्टींच्या आसक्ति पासून मुक्त असणं. सत्य म्हणजे काय? प्राणीमात्रांच कल्याण करणं. सजीवांना काय प्यार असत? स्वतःचा प्राण.

९२९. जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |

स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ||

अर्थ

एक एक थेंब [पाणी] साठून हळूहळू घडा भरतो, तसंच [थोड थोड संपादन करून] विद्या; संपत्ती आणि धर्म या गोष्टींच संवर्धन करावं, त्यांचा अभ्यासाचा असा हेतु आहे.

Friday, February 15, 2013

९२८. सत्येन रक्ष्यते धर्मो; विद्या योगेन रक्ष्यते |

मृजया रक्ष्यते रूपं: कुलं वृत्तेन रक्ष्यते ||

अर्थ

सत्याने धर्माचं रक्षण होत; [सतत] अभ्यासाने विद्येच संवर्धन होत; स्वच्छता राखण्याने सौंदर्याची जोपासना करता येते; चांगल्या वर्तनाने घराण्याचा लौकिक वाढतो.

९२७. सुशिष्यो वा कुशिष्यो वा मनुष्यो न मृदां चयः |

अल्पं वा बहु वा कार्यं भविष्यत्येव नित्यशः ||

अर्थ

विद्यार्थी चांगला असो किंवा वाईट, तो माणूस आहे, मातीच ढेकूळ नव्हे. त्यामुळे [शिक्षकाने] थोडे किंवा फार काम नेहमी करायलाच पाहिजे. [सर्व प्रकारचे विद्यार्थी असतात हे ओळखून त्या त्या प्रकारे मुलांची प्रगती साधली पाहिजे.]

९२६. कथितं धार्यते येन सच्छिष्यः स निगद्यते |

एनं पाठयतः शिष्यमाचार्यस्यास्ति को गुणः || वि. गो . विजापूरकर

अर्थ

सांगितलेलं जो लगेच आत्मसात करतो त्याला सच्छिष्य असे म्हणतात. [पण] मग याला शिकवलं यात शिक्षकाची काय हुशारी आहे हो?

Wednesday, February 13, 2013

९२५. कथितं धार्यते येन सच्छिष्यः स निगद्यते |

कुशिष्यमध्यापयतो मूर्ख त्वां मे यशः कुतः || वि . गो . विजापूरकर

अर्थ

सांगितलेलं ज्याच्या  [डोक्यात] रहात, त्याला चांगला विद्यार्थी असं म्हणतात. अरे मूर्खा; तुझ्यासारख्या गणंगाला शिकवून माझ काय नाव होणार?

९२४. पूर्वमेव मया तुभ्यं कथितं विस्मृतं त्वया |

त्वं मूढ नासि मे पाठ्यो यत्र कुत्र सुखं व्रज || वि. गो . विजापूरकर

अर्थ

हे मी आधीच तुला सांगितलेलं आहे. तू [सगळं] विसरलायस. अरे मूर्खा; मी [काही] तुला शिकवणार नाहीये. जा चालता हो [खुशाल] हवं तिकडे!

Tuesday, February 12, 2013

९२३. यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः |

रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम् ||

अर्थ

उत्तम अशा हत्तीच दान केल्यावर [त्याला बांधायची] साखळी [स्वतःजवळ ठेवण्याची] जो  इच्छा करतो [त्याचा जीव; एकदा हत्तीचे दान केल्यावर दोरखंडात अडकला] तर तो मूर्खपणा आहे.

Monday, February 11, 2013

९२२. अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् |

अतोऽर्थाय यतेतैव  सर्वदा यत्नमास्थितः || महाभारत

अर्थ

संपत्तीचा माणूस नोकर असतो. पण पैसा हा कुणाचा नोकर नसतो [माणसाला पैशाची गरज असते]; पैशाचं काही कुणावाचून अडत नाही. म्हणून नेहमी [न्यायाने] प्रयत्नपूर्वक संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा.

९२१. लोभात् क्रोध: प्रभवति लोभात् काम: प्रजायते |

लोभान्मोहश्च नाशश्च लोभ: पापस्य कारणम् ||

अर्थ

हावरटपणामुळे राग येतो; लोभामुळे [सगळं हवं अशा] इच्छा होतात;  लोभामुळे मोह पडतो आणि [अखेरीस]  नाश होतो; लोभ [आसक्ति] हे पापाचे [मूळ] कारण आहे.

Friday, February 8, 2013

९२०. अहिंसयैव भूतानां कार्यं श्रेयोऽनुपशासनम् |

वाक् चैव मधुरा स्लक्ष्णा प्रयोज्या धर्ममिच्छता || मनुस्मृति

अर्थ

धर्मशील [अशा शिक्षकाने] मुलांना शिकवताना मृदू आणि गोड भाषा वापरणे अधिक हिताचे आहे [आणि त्याने] तसेच कराव.

Tuesday, February 5, 2013

९१९. अधिगतपरमार्थान्पण्डितान्मावमंस्थास्तृणमिव लघुलक्ष्मीर्नैव तान् संरुणद्धि |

अभिनवमदलेखाश्यामगण्डस्थलानां न भवति बिसतन्तुर्वारणं वारणानाम् ||

अर्थ
 
तत्वज्ञान आत्मसात केलेल्या लोकांचा [कधीही] अपमान करू नको. कस्पटाप्रमाणे असणारी क्षुद्र संपत्ती त्यांना कधीच बांधू शकत नाही. ज्यांची गंडस्थळे नुकत्याच निघालेल्या मदाच्या स्रावामुळे काळसर दिसत आहेत [जे अगदी माजावर आले आहेत] अशा हत्तींना कमळाच्या देठातील तंतूने [इतक्या कुचकामी वस्तूने] बांधता येत नाही. [खऱ्या ज्ञानी माणसाना पैसा कस्पटासमान असतो.]

९१८. विरला जानन्ति गुणान्विरला: कुर्वन्ति निर्धने स्नेहम् |

विरला: परकार्यरता: परदु:खेनापि दु:खिता विरला: ||

अर्थ

[गुणी माणसाचे] गुण पारखणारे फार थोडे असतात. फार थोडे लोक माणूस गरीब असला तरी प्रेम करतात. अगदी कमी माणसे दुसऱ्यासाठी [खूप मनापासून] काम करतात आणि दुसऱ्याला वाईट प्रसंग आला तर त्यानी दु:खी होणारे सुद्धा फार थोडे असतात.

९१७. श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम् |

आत्मन: प्रतिकुलानि न परेषां समाचरेत् ||

अर्थ

कृपा करून धर्माच्या [तत्वज्ञानाचं] सार ऐकून घ्या आणि तसं खात्री ठेवून आचरणात आणा. आपल्याला जे नको असत तसं दुसऱ्यांशी वागू नका.

Monday, February 4, 2013

९१६. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः |

एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे || ईशावास्योपनिषद्

अर्थ

इह लोकी कर्मे करीत करीतच शंभर वर्षे जगण्याची इच्छा कराव. तुला [देहवंताला] हाच मार्ग आहे. याहून वेगळा मार्ग नाही. मनुष्याला कर्म चिकटत नाही [फळाची वासना चिकटते म्हणून निष्काम कर्म कर.]

Friday, February 1, 2013

९१५. अनाहूता: स्वयं यान्ति रसास्वादविलोलुपा: |

निवारिता न गच्छन्ति मक्षिका इव भिक्षुका: ||

अर्थ

चांगलं चवदार [भोजनाला] चटावलेले [हावरट] भिक्षुक न बोलावता [माशांप्रमाणे] येतात आणि माशा -चिलटांप्रमाणेच हाकललं तरी जातच नाहीत.