भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, April 21, 2011

३४१. योगेश्वरश्च भगवान्भार्गवो भृगुतुल्यधीः |

शुक्रः पानमदात्तीव्राद् बुभुजे शिष्यमौरसम् ||

अर्थ

भृगुॠषीचा पुत्र, साक्षात त्यांच्या इतकाच बुद्धिमान शिवाय महान योगेश्वर असूनही अतिरिक्त मद्यपानामुळे, शिष्य असलेला व [जावई होऊ शकला असता असा कच ] त्यांचा औरस पुत्र झाला. [शुक्राचार्यांकडे शिकत असलेल्या कचाला संजीवनी विद्या मिळू नये म्हणून दैत्यांनी त्याला मारून , जाळून त्याची राख मद्यातून शुक्राचार्यांना पाजली पण देवयानीच्या हट्टामुळे त्यांनी संजीवनी मंत्र म्हटला आणि कच पोट फाडून बाहेर आला अशा रीतीने तो त्यांचा औरस पुत्र बनला. असा हा दारूचा दुष्परिणाम.]

Monday, April 18, 2011

३४०. अशेषलङ्कापतिसैन्यहन्ता श्रीरामसेवाचरणैककर्ता |

अनेकदुःखाहतलोकगोप्ता त्वसौ हनुमांस्तव सौख्यकर्ता ||

अर्थ

[हे मानवा] रावणाच्या सर्व सैन्याचा नाश करणारा; श्रीरामाची अनन्य भक्ति करणारा; दुःखाने अतिशय ग्रासलेल्या लोकांचे रक्षण करणारा हा हनुमान तुला आनंदी करेल.

आज हनुमान जयंती आहे त्यानिमित्त हा श्लोक.

३३९. अल्पतोयश्चलत्कुम्भो, अल्पदुग्धाश्च धेनवः |

अल्पविद्यो महागर्वी, कुरूपी बहुचेष्टितः ||

अर्थ

जिच्यात पाणी कमी आहे अशी घागर अतिशय आवाज करते, आटायला लागलेली गाय लाथाळ बनते, थोडंच ज्ञान असलेला मनुष्य महागर्विष्ठ असतो आणि रूपहीन माणूस नटवा [नखरेल] असतो.

३३८. ज्योतिषं जलदे मिथ्या, मिथ्या श्वसिनि वैद्यकम् |

योगो बह्वशने मिथ्या मिथ्या ज्ञानं च मद्यपे ||

अर्थ

पावसाबद्दल नेमकं भविष्य सांगतो, [असं बोलून उपयोग नसतो कारण तस कोणालाच नक्की सांगता येत नाही] श्वास लागल्यावर केलेले खोटे उपचार मिथ्या, खादाड माणसाला योग साध्य होईल हे खोटं आणि दारुड्याला शिकवलेलं ज्ञान सुद्धा निरुपयोगी असतं.

३३७. गुणानामेव दौरात्म्याद्धुरि धुर्यो नियुज्यते |

असंजातकिणस्कन्धः सुखं स्वपिति गौर्बलिः ||

अर्थ

गुणांच्या म्हणजेच, ओझे वाहण्याचा गुण, त्या गुणाच्या दुष्टपणामुळेच बैल जोखडाला जुंपला जातो. ज्याच्या खांद्यावर जोखडाचा घट्टा पडलेला नाही, असा धष्टपुष्ट बैल सुद्धा खुशाल झोपून राहतो.

३३६. गुर्वर्थे त्यक्तराज्यो व्यचरदनुवनं पद्मपद्भ्यां प्रियायाः पाणिस्पर्शाक्षमाभ्यां मृजितपथरुजो यो हरीन्द्रानुजाभ्याम् |

वैरूप्याच्छूर्पंणख्याः प्रियविरहरुषाऽऽरोपितभ्रूविजॄम्भत्रस्ताब्धिर्बिद्धसेतुः खलदवदहनः कोसलेन्द्रोऽवतान्नः ||

अर्थ

वडिलांसाठी ज्याने राज्याचा त्याग केला, लाडक्या पत्नीला [पळवल्यानंतर] हनुमान आणि लक्ष्मण यांच्यासह कमलाप्रमाणे कोमल असे चरण असूनही जो वनात भटकत राहिला, शूर्पणखेला विद्रूप केलं, प्रियेच्या विरहामुळे रागावलेल्या ज्याने [क्रोधाने] भुवया वक्र केल्यामुळे घाबरलेल्या समुद्रावर ज्याने पूल बांधला, राक्षससेना रूपी वणव्यालाच जाळून टाकलं तो कोसलदेशचा राजा [प्रभू रामचंद्र ] आमचे रक्षण करो.

३३५. यदशक्यं न तच्छक्यं यच्छक्यं शक्यमेव तत् |

नोदके शकटं याति न च नौर्गच्छति स्थले ||

अर्थ

जे घडणे शक्य नसते ते [कितीहि प्रयत्न केले तरी] होऊ शकत नाही. जे घडणं शक्य आहे तसंच घडत. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी बैलगाडी पाण्यात हिंडू शकत नाही आणि नौका जमिनीवर चालत नाही.

३३४. अधः पश्यसि किं बाले, तव किं पतितं भुवि |

रे रे मूढ न जानासि गतं तारुण्यमौक्तिकम् ||

अर्थ

[एका म्हातारपणामुळे वाकून चालणाऱ्या वृद्ध स्त्रीला एका तरुणाने खवचटपणे विचाले] "ए मुली, एवढं वाकून काय शोधतेस? तुझ काही हरवलंय का ?" म्हातारी म्हणाली "अरे मूर्खा एवढं सुद्धा तुला समजत नाही? [माझ हरवलेलं] तारुण्य रूपी मोती मी शोधतेय".

३३३. रे रे घरट्ट मा रोदीः कं कं न भ्रामयत्यमूः |

कटाक्षवीक्षणादेव कराकृष्टस्य का कथा ||

अर्थ

अरे जात्या [धान्य दळण्याची चक्की, घरघर आवाज काढते] रडू नकोस रे. [स्त्रिया तुला गरगर फिरवतात म्हणून] अरे नुसत्या कटाक्ष टाकून त्या [पुरुषांना] नाचवतात. तुला तर [चक्क] हातानी खेचतात [तर फिरावंच लागणार] यात काय नवल?

Friday, April 8, 2011

३३२. नारिकेलसामाकारा दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |

अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

अर्थ

सज्जन बाहेरून दिसायला आणि आतून असायला नारळासारखे असतात. इतर लोक मात्र बोरासारखे नुसते बाहेरून दिसायलाच चांगले असतात. [नारळ मोठे; टणक् शेंडीवाले खरखरीत असतात, पण आतलं पाणी आणि खोबर मोठं गोड असत. बोर मात्र बाहेरून मोठ्या मोहक रंगाची पण त्यांच अंतरंग खात्रीच नसतं.]

३३१. आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् |

दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ||

नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ

दिवसाच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील [वेगवेगळया] सावलीप्रमाणे दुष्टाची व सज्जनाची मैत्री असते. [म्हणजे] सकाळची सावली जशी सुरवातीला मोठी पण पुढे पुढे कमी कमी होत जाणारी असते तशी दुष्टाची मैत्री प्रारंभी जास्त पण पुढे कमी कमी होत जाते. दुपारनंतरची सावली सुरवातीला लहान पण नंतर वाढत जाणारी असते तशी सज्जनाची मैत्री हळूहळू वाढतच जाते.

३३०. पीयुषेण सुरा; श्रिया मुररिपुर्मर्यादया मेदिनी शक्रः कल्परुहा शशाङ्ककलया श्रीशंकरस्तोषितः |

मैनाकादिनगा निजोदरगृहे यत्नेन संरक्षिताः मच्चूलीकरणे घटोद्भवमुनिः केनापि नो वारितः ||

अर्थ

[मी] अमृत देऊन देवांना; लक्ष्मी देऊन श्रीविष्णूला; [स्वतःला] मर्यादा घालून पृथ्वीला; कल्पवृक्ष देऊन इंद्राला; चन्द्रकला देऊन श्रीशिवला संतुष्ट केले. मैनाक वगेरे पर्वत सुद्धा प्रयत्नपूर्वक स्वतःच्या पोटात जाऊन सांभाळले. [पण अरेरे ] ज्यावेळी अगस्त्य ॠषी मला ओंजळीत घेऊन पिऊ लागला, त्यावेळी कोणीहि त्याला अडवले नाही.

३२९. दक्षः श्रियमधिगच्छति; पथ्याशी कल्यतां सुखमरोगी |

उद्युक्तो विद्यान्तं धर्मार्थयशांसि च विनीतः ||

अर्थ

नित्य सावध असणाराला वैभव मिळते; पथ्याने राहणाऱ्याला आरोग्य; निरोगी माणसाला सुख; [सतत] अभ्यास करणाऱ्याला संपूर्ण विद्या आणि सुसंस्कार असणाऱ्याला धर्म; अर्थ आणि विविध प्रकारचे यश मिळते.