भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, July 26, 2010

२४२. दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः स्पर्शश्चेत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् |

न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वाऽलौकिकॉऽपि ||

शङ्कराचार्य - शतश्लोकी

अर्थ

या त्रिभुवनात ज्ञानदात्या सद्गुरुना शोभेल असा दृष्टान्तच नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तर [तर तीही योग्य नाही], कारण अहो, जरी परिस लोखंडाला सुवर्णत्व देतो तरी परिसत्व देत नाही. [परंतु ]सद्गुरू चरणयुगुलांचा आश्रय करणाऱ्या आपल्या शिष्याला स्वतःचे साम्य देतात आणि त्यामुळेच ते निरुपम आहेत आणि त्यांना योग्य असा दृष्टान्त प्रपंचात मिळत नाही.

Saturday, July 24, 2010

२४१. स्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रान्तिरन्यस्य विशेषस्लिष्टा|

यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतीष्ठापयितव्य एव ||

कालिदास - मालविकाग्निमित्र

अर्थ

कोणाला [एखाद्या शिक्षकाला] स्वतःचे ज्ञान प्रशंसनीय असते. कुणाला शिकवण्याची हातोटी उत्तम असते. ज्याला या दोनही गोष्टी चांगल्या येतात त्याला निश्चितपणे अग्रस्थान दिले पाहिजे.

२४०. अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन |

अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः ||

अर्थ

पैसे [देऊन] औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत [विकत] मिळते, पण ज्ञान [त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते ] कष्टाने मिळवावे लागते.

Wednesday, July 21, 2010

२३९. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः |

यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ||

अर्थ

हे निषादा , चिरंतन काळपर्यन्त तुला प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस. - वाल्मिकी ऋषी
[पक्ष्याला मारलेले दिसल्यावर त्यांच्या तोंडून वरील उद्गार बाहेर पडले तेंव्हा ब्रह्मदेवाने प्रकट होऊन वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास सांगितले]

२३८. लौकिकानां हि साधूनामर्थं वागनुवर्तते |

ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोनुधावति ||

अर्थ

सगळे सत्प्रवृत्त लोक जसं असेल - घडेल - तसं वर्णन करतात. परंतु [द्रष्टे ] ऋषी जस बोलले त्याप्रमाणेच [नंतर ] घटना क्रम घडला.
[वाल्मिकी ऋषीनी आधी वर्णन केल्याप्रमाणे नंतर रामायण घडलं]

Tuesday, July 20, 2010

२३७. मनसेह मनोज्ञाय धारासंसरणे रभः|

भरणे रससंराधा यज्ञा नो महसे नमः ||

अर्थ

इथे [ह्या जगात ] मनाने त्या सुंदर तेजाला नमस्कार असो. आम्ही उच्च ध्येयाकडे जोमाने जात आहोत आणि त्यासाठी केलेले यज्ञ म्हणजे रसपूर्ण मेजवानीच.

श्री . भि . वेलणकर यांच्या चित्रकाव्यातील विलोमकाव्य या पोटप्रकारातला हा श्लोक आहे . पहिली ओळ वाचल्यानंतर शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचत आले तरी त्याला सुंदर अर्थ असतो अशा काव्याला विलोम काव्य म्हणतात.

Sunday, July 18, 2010

२३६. पक्षिणां बलमाकाशो मत्स्यानामुदकं बलम् |

दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् ||

अर्थ

आकाशात पक्ष्यांची ताकद काम करते. माश्यांच बळ पाण्यात असतं राजाने [केलेले रक्षण] हे दुबळ्यांचे बळ होय आणि रडणं ही लहान मुलांची ताकद असते.

२३५. विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः |

आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते ||

अर्थ

सज्जन माणसे [वाईट लोकांच्या] संगतीने बिघडत नाहीत. चंदनाच्या वृक्षाला मोठमोठया सापांनी वेढले तरी तो विषारी बनत नाही.

२३४. अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |

अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ||

अर्थ

रोहित हा [एक मोठा मासा] खूप खोल पाण्यात विहार करून सुद्धा गर्व करीत नाही. पण शफरी मात्र टीचभर पाण्यात असली तरी [गर्वाने] फुगते.

२३३. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |

नीयते स वृथा येन प्रमादः सुमाहनहो ||

अर्थ

सर्व रत्ने [सर्वात महाग वस्तू] दिली तरीहि आयुष्याचा एक क्षण सुद्धा [वाया घालवलेला परत] मिळत नाही. म्हणून वेळ वाया घालवणे ही घोडचूक आहे.

२३२. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |

अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा |
क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ||

भागवत सातवा स्कंध पाचवा अध्याय

अर्थ

प्रल्हाद हिरण्यकश्यपुला सांगतो विष्णूची भक्ति - श्रवण [त्याच्या कथा ऐकणे] \, नामसंकीर्तन, मनात स्मरण करणे, पाय चेपणे, पूजा करणे, नमस्कार करणे, दास्य भक्ति [हनुमानाप्रमाणे], सख्य भक्ति [अर्जुनाप्रमाणे] आणि आत्मनिवेदन [स्वतः देव आपलं ऐकतो आहे अशा प्रकारे त्याला सर्व सांगणे] - अशी नवविधा भक्ति केली तर ते उत्तम शिक्षण होय.

२३१. पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा |

तथापि तत्तूल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ||

अर्थ

पूर्वी कवींची मोजदाद करण्याच्या वेळी करंगळी [वर पहिलं नाव] कालिदास [हे] घेऊन मोजलं. पण पुढे त्याच्या तोडीचा कवि न सापडल्याने अनामिका [जिच्यासाठी नाव नाही अशी] सार्थ नावाची झाली. [कालिदासाची अद्वितीयता सांगण्यासाठी नेहमी हा श्लोक उद्धृत करतात]

कालिदासाच्या स्मृती निमित्त हा श्लोक.

Wednesday, July 14, 2010

२३०. सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः |

अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते ||

अर्थ

कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. [त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं] कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो.

२२९. गानाब्धेस्तु परं पारं नोपेयाय सरस्वती |

अतो निमज्जनभयात्तुम्बीं वहति वक्षसि ||

अर्थ

देवी सरस्वतीला देखील अथांग अशा गानानंदाच्या सागराचे पैलतीर गाठता आले नाही, म्हणूनच [तिच्या मूर्तीत] [तुम्बी] तिच्या हातात वीणा आहे. [त्यात भोपळा -बुडायला लागू नये म्हणून] आहे.

Tuesday, July 13, 2010

२२८. एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता |

बुद्धिर्बुद्धिमता युक्ता हन्ति राज्यं सनायकम् ||

अर्थ

धनुष्य धारण करणाऱ्याने बाण सोडला तर तो एकच माणसाला मारेल किंवा [एखादे वेळी नेम चुकल्यास] मारणार पण नाही. परंतु बुद्धिमान माणसाने डोक्याने काम केले तर राजा सकट राज्याचा तो नाश करू शकतो.

२२७. राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः |

लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा ||

अर्थ

राजा [प्रशासक] जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते. तो दुराचारी असेल तर जनता दुराचारी होते. जर तो [सर्वाशी] सारखा वागत असेल तर ती पण तशीच वागते. माणसे नेहमी राजा प्रमाणेच वागतात.

२२६. बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |

न च्छन्दसा केनचिदुद्ध्रृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||

अर्थ

भूकेलेल्यांची भूक व्याकरण खाऊन भागत नाही. तहानलेले काव्य परीक्षण पिऊ शकत नाहीत. वेदांच्या [ज्ञानाने] कोणी घरात बरकत आणू शकत नाही. त्यामुळे धन मिळवावेत, गुण वाया जातात.

२२५. व्रजत्यधः प्रयात्युच्चैर्नरः स्वैरेव चेष्टितैः |

अधः कूपस्य खनिता ऊर्ध्वं प्रासादकारकः ||

अर्थ

माणसाची स्वतःच्या कृत्यांमुळेच प्रगती किंवा अधोगती होते. विहीर खणणारा खाली खाली जातो आणि हवेली बांधणारा वर वर जातो.

२२४. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |

दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||

अर्थ

सिंहाप्रमाणे असणाऱ्या कामसू माणसाकडे लक्ष्मी [आपणहून] येते. मात्र घाबरट लोक नशीब महत्वाचे आहे असे म्हणतात. नशिबाचा विचार न करता स्वतःच्या सामर्थ्याने प्रयत्न कर आणि प्रयत्न करूनही जर [ध्येय] गाठता आलं नाही तर त्यात [तुझा] काय दोष आहे?

Friday, July 9, 2010

२२३. सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |

तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||

अर्थ

[चांगले] सोनार सोन्याची कमळे बनवू शकतात. पण त्यात सुगंध मात्र फक्त चतुर असा ब्रह्मदेवच निर्माण करू शकतो. [निसर्गा इतकी उत्तम आणि परिपूर्ण रचना मानव करू शकत नाही]

२२२. लुब्धानां याचकः शत्रुश्चोराणां चन्द्रमा रिपुः |

जारस्त्रीणां पतिः शत्रुर्मूखाणां बोधको रिपुः ||

अर्थ

[काहीतरी] मागणारा हा हावरटांचा शत्रु असतो. चन्द्र हा चोरांचा शत्रु आहे. वाईट चालीच्या स्त्रियांचा पति हा शत्रु असतो आणि [चांगले] शिकवणारा हा मूर्खांना शत्रु वाटतो.

२२१. पद्मे मूढजने ददासि विभवं विद्वत्सु किं मत्सरः? नाहं मत्सरिणी न चापि चपला नैवास्ति मूर्खें रतिः |

मूर्खेंभ्यो द्रविणं ददामि नितरां तत्कारणं श्रूयतां विद्वान्सर्वजनेषु पूजिततनुः मूर्खस्य नान्या गतिः ||

अर्थ

कवि आणि लक्ष्मी यांचा संवाद - हे लक्ष्मी, मूर्ख लोकांना तू श्रीमंती देतेस तर पंडितांचा तुला मत्सर [द्वेष] वाटतो काय? लक्ष्मी- मी मत्सरी नाही, चंचल नाही किंवा मूर्खांवर माझे प्रेम सुद्धा नाही. मूर्खांना मी भरपूर संपत्ति देते त्याचे कारण ऐका. सर्व लोक विद्वानांचा मान ठेवतातच. पण मूर्खांना [श्रीमंतीशिवाय दुसऱ्या कुठल्याही कारणाने मान मिळणे] शक्य नसते म्हणून.

२२०. श्रुत्वा सागरबन्धनं दशशिराः सर्वैर्मुखैरेकदा तूर्णं पृच्छति वार्तिकान्सचकितो भीत्वा परं संभ्रमात् |

बद्धः सत्यमपांनिधिर्जलनिधिः कीलालधिस्तोयधिः पाथोधिजलधिर्पंयोधिरुदधिर्वारांनिधिर्वारिधिः ||

अर्थ

समुद्राला सेतू [पूल] बांधला हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या, ]घाबरलेल्या] दहा मुखे असलेल्या [रावणाने] गडबडीने हेरांना सर्वच [दहाही] तोंडानी विचारले, खरोखरीच सागराला [समुद्रवाचक दहा शब्द] बांधले काय ?

प्रहेलिका

वरील श्लोकामधिल समुद्राची १० नावे सांगा.

Monday, July 5, 2010

२१९. न मातरि न दारेषु न सोदर्ये न चात्मनि |

विश्वासस्तादृशः पुंसां यादृङ्मित्रे स्वभावजे ||

अर्थ

आपल्या खऱ्या मित्रावर माणसांचा इतका विश्वास असतो की तेवढा आईवर, पत्नीवर, सख्ख्या भावावर इतकाच काय खुद्द स्वतःवरही नसतो.

२१८. वरं वनं वरं भैक्ष्यं वरं भारोप जीवनम् |

पुंसां विवेकहीनानां सेवया न धनार्जनम् ||

अर्थ

अविचारी माणसांची नोकरी करून पैसे मिळवण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं परवडलं, भीक मागितलेली परवडली किंवा ओझी वाहिलेली पत्करली.

२१७. शीतलादिव संत्रस्तं प्रावृषेण्यान्नभस्वनः |

नभो बभार नीरन्ध्रं जीमूतकुलकम्बलम् ||

अर्थ

जणू काही थंडीने कुडकुडल्यामुळे आणि पावसामुळे आकाशाने अजिबात भोके नसलेले, भरपूर ढगांचे बनवलेले कांबळे पाघारले आहे.

[कवीला मळभ असलेले आकाश हे घोंगडी पंघारल्या प्रमाणे वाटते आहे.]

Friday, July 2, 2010

२१६. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः तृणं च शय्या न च राजयोगी |

सुवर्णकायो न च हेमधातुः पुंसश्च नाम्ना न च राजपुत्रः ||

अर्थ

झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षि नाही. गवताची गादी वापरतो तापसी नाही. पिवळा धमक आहे पण सोन नाही. पुल्लिंगी आहे पण राजकुमार नाही.

प्रहेलिका

२१५. पर्वताग्रे रथो याति भूमौ तिष्ठति सारथिः |

वायुवेगेन चलति पदमेकं न गच्छति ||

अर्थ

रथ वाऱ्याच्या गतीने पर्वताच्या शिखरावर जातो. सारथी मात्र जमिनीवरच असतो. तो एक पाउल सुध्धा न हलता रथ वायुवेगानी कसा जातो ?

प्रहेलिका

Thursday, July 1, 2010

२१४. कार्यापेक्षी नरः प्रायः प्रीतिमाविष्करोत्यलम् |

लोभार्थी शौण्डिकः शष्पैर्मेषं पुष्णाति पेशलैः ||

अर्थ

माणसे काहीतरी काम करून घ्यायचं असलं की [खूप] पुळका दाखवतात. बोकडाला चांगलं गवत घालून त्याची जोपासना खाटिक करतो, ते त्याला कापल्यावर भरपूर मास मिळाव म्हणून नाही का?

२१३. विधाय वैरं सामर्षे नरोऽरौ य उदासते |

प्रक्षिप्योदर्चिषं कक्षे शेरते तेऽभिमारुतम् ||

अर्थ

रागावलेल्या शत्रुशी वैर करून जो माणूस नुसता बसून राहतो, तो वाळलेल्या गवताला आग लावून वारा ज्या दिशेने वाहतो तिथे झोपून राहतो.

२१२. नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता |

अमुखी कुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ||

अर्थ

नर आणि मादी यांच्यापासून जन्म झाला असला तरी ती स्त्रीला शरीर नाही, तोंड नसूनही ती आवाज करते आणि जन्मल्यावर लगेच नाश पावते. अशी ती कोण?

प्रहेलिका

२११. सर्वस्वापहरो न तस्करगणो रक्षो न रक्ताशनः सर्पो नैव बिलेशयोऽखिलनिशाचारी न भूतोऽपि च |

अन्तर्धानपटुर्न सिद्धपुरुषो नाप्याशुगो मारुतस्तीक्ष्णास्यो न तु सायकस्तमिह ये जानन्ति ते पण्डिताः ||

अर्थ

सर्वस्वापहर आहे, पण चोरांची टोळी नाही. रक्त पितो, पण राक्षस नाही. बिळात राहतो, पण साप नाही. सगळी रात्र भटकतो, पण भूत नाही. पटकन अदृश्य होतो, पण सिद्ध पुरुष नाही. वेगात धावतो, पण वारा नाही. चावा तीक्ष्ण आहे, पण बाण नाही. ओळखतील ते ज्ञानी..:)

प्रहेलिका

२१०. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |

त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||

अर्थ

झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षिश्रेष्ठ नाही. तीन डोळे आहेत पण शंकर नाही. वल्कलं परिधान केली आहेत पण तापसी नाही. पाणी बाळगतो पण घडा किंवा ढग नाही. असा कोण ते ओळखा?

प्रहेलिका