भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, October 31, 2011

४८८. यद्यपि बहु नाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम् |

'स्व ' जन: 'श्व 'जन: मा भूत् 'सकलं ' ' शकलं '; ' सकृत् ' 'शकृत्' ||

अर्थ

हे बाळ; जरी तू पुष्कळ शिकला नाहीस [तरी चालेल] पण व्याकरण मात्र शिक. [निदान] स्वजन [आपले नातेवाईक च्याऐवजी ] श्वजन [कुत्रा]; सकल [च्याठिकाणी] शकल [तुकडा] सकृत् [च्यासाठी] शकृत् [शेण] असे अर्थ व्हायला नकोत.

Friday, October 28, 2011

४८७. अज्ञ: सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञ: |

ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रञ्जयति ||

अर्थ

अडाणी माणसाची समजूत सहजपणे पटते; जाणकाराचे समाधान त्यापेक्षा लवकर करता येते. पण किंचितशा ज्ञानाने गर्विष्ठ बनलेल्या माणसाचे समाधान ब्रह्मदेव सुद्धा करू शकणार नाही.

४८६. स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञताया: |

विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपण्डितानाम् ||

अर्थ

ब्रह्मदेवाने मूर्ख लोकांसाठी अज्ञानाचे [मूर्खपणाचे केवळ] स्वतःच्याच ताब्यात असणारे; सर्व फायदेच असणारे [काहीच तोटा होत नाही असे] पांघरूण - म्हणजेच मौन - बनवले आहे विशेषतः ज्ञानी लोकांच्या समुदायात गप्प बसणे हा मूर्ख लोकांसाठी सुंदर दागिना आहे.

४८५. अपारे काव्यसंसारे कविरेक: प्रजापति: |

यथास्मै रोचते यद्वत्तथा तथा वै परिवर्तते ||

अर्थ

अमर्याद अशा काव्यसृष्टी मध्ये कवि हा एकटाच ब्रह्मदेव [कर्ता- करविता] असतो. ते [जग] त्याला जसं आवडत तसं ते फिरत [काव्यात्म न्याय सामान्यतः वाङ्मयात वापरलेला असतो या जगातल्या प्रमाणे चांगल्या माणसांचे हाल कवि होउ देत नाहीत. कपट करणा-राला शिक्षा मिळते.]

४८४. शरीरस्य गुणानां च दूरमत्यन्तमन्तरम् |

शरीरं क्षणविध्वंसि ; कल्पान्तस्थायिनो गुणा: ||

अर्थ

[आपला] देह आणि गुण यात अतिशय मोठ अंतर आहे. शरीर हे क्षणात नष्ट होऊन जातं. पण गुण मात्र कल्प एवढा काल टिकतात. [थोड्याशा फायद्यासाठी उच्च तत्व सोडून देऊन आपला सुसंस्कृतपणा नाहीसा करू नये. आज नाही उद्या आपण मरणारच आहोत.]

४८३. अम्भस: परिमाणेन प्रोन्नतं कमलं भवेत् |

स्वस्वामिना बलवता भृत्यो भवति गर्वित: ||

अर्थ

पाण्याच्या प्रमाणा प्रमाणे [पाण्याची पातळी जेवढी वर असेल तेवढ] कमळ अधिक उंचीवर [तरंगत]. स्वतःचा मालक बलाढ्य झाला कि नोकराला [त्याप्रमाणात] माज चढतो. [तो मालकाच्या कर्तृत्वावर असतो.]

४८२. कवय: परितुष्यन्ति नैवान्ये कविसूक्तिभि: |

न हि सागरवत् कूपा वर्धन्ते विधुकान्तिभि: ||

अर्थ

कवीच्या चांगल्या वचनांनी [कवनांनी, दुसरे] कवि आनंदित होतात, इतर [सामान्य लोक] नाही. [असे पहा कि] चंद्राच्या चांदण्याने समुद्राप्रमाणे विहिरींना भरती येत नाही. [कविनांच - तेवढ ज्ञान - रसिकता असेल तरच त्याच सौंदर्य ग्रहण करता येत.]

४८१. सर्वत्र देशे गुणवान् शोभते प्रथितो नर: |

मणि: शीर्षे गले बाहौ यत्र कुत्रापि शोभते ||

अर्थ

गुणी मनुष्य देशात कुठल्याही भागात [किंवा कुठल्याही विषयात जाणकार असला तरी] तो प्रसिद्ध होतो आणि शोभून दिसतो. रत्न डोक्यावर [मुकुटात] गळ्यात [हारात] दंडावर [वाक्यामध्ये] कुठेही घातलं तरी त्याचं सगळीकडे तेज पसरत.

४८०. केनामृतमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् |

आपदां च परित्राणं शोकसन्तापभेषजम् ||

अर्थ

कोणी बरं दोनच अक्षरे असलेले अमृत निर्माण केल असावं. अगदी कुठल्याही दु:खावर औषध आहे आणि संकटापासून ज्याच्यामुळे संरक्षण मिळत. [तो म्हणजे मित्र]

Thursday, October 20, 2011

४७९. यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य |

एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति ||

अर्थ

ज्याप्रमाणे चंदनाचे [लाकडांचे] ओझे वाहून नेणारे गाढव ओझे जाणते, पण चंदन [त्याचा सुगंध] जाणत नाही. त्याचप्रमाणे पुष्कळ शास्त्रांचा अभ्यास करूनही मूर्ख माणसे त्यांच्या अर्थाच्या अज्ञानामुळे फक्त ओझेच वाहतात [कष्ट तेवढे करतात, ज्ञानाचा आनंद त्यांना मिळत नाही.]

Wednesday, October 19, 2011

४७८. "रात्रिर्गमिष्यति ; भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति; हसिष्यति पङ्कजश्री: |

इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ||   

अर्थ

[कमळ मिटल्यामुळे] कळ्यामधे अडकलेला भुंगा असा विचार करत असतो; " रात्र संपेल; सुंदर पहाट येईल; सूर्य उगवेल; कमळ दिमाखात उमलेल [आणि आपण बाहेर पडू] एवढ्यात अरेरे ! [दुर्दैवाने] हत्तीने कमळवेलच उपटली.

Tuesday, October 18, 2011

४७७. बन्धनानि किल सन्ति बहूनि ; प्रेमरज्जुमयबन्धनमाहु: |

दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रि: निष्क्रियो भवति पङ्कजकोषे ||

अर्थ

बंधन तर बरीच [बऱ्याच प्रकारची] असतात. पण प्रेमाच्या धाग्यांच बन्धन [तोडण्यास सर्वात कठीण] असे सांगतात. [असे पहा कि] लाकडे पोखारण्यात निष्णात अश्या भुंग्याला देखील [अतिशय कोमल असूनही] कमळाच्या पाकळ्या [कुरतडून बाहेर पडण्यास असमर्थ ठरतो] निष्क्रीय बनवतात. [भुंगा मध खायला गेल्यावर सूर्यास्त झाला तर कमळ मिटत आणि तो आत अडकतो.]

४७६. दुन्दुभिस्तु सुतरामचेतनस्तन्मुखादपि धनं धनं धनम् |

इत्थमेव निनद: प्रवर्तते किं पुन: यदि जन: सचेतन: ||

अर्थ

नगारा ही वस्तू तर पूर्णपणे जड [चेतनेचा अंश जरा सुद्धा नसलेली] तरीसुद्धा तिच्या मुखातून सुद्धा धन -धन -धन असा आवाज येत राहतो. तर सजीव माणूस [सतत धन - पैसे पैसे] करतील [यात काय संशय?]

४७५. लङ्कापते: संकुचितं यशो यत् यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्र: |

स सर्व एवादिकवे: प्रभावो न कोपनिया: कवय: क्षितीन्द्रै: ||

अर्थ

लंकेच्या राजा रावणाची कीर्ति [जी] कमी झाली आणि श्री रामाची कीर्ति [जगभर] प्रसिद्ध झाली ही सर्व आद्य कवि [वाल्मिकी] यांची करामत आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी कवी रागवतील असे वागू नये [कवि नर्म विनोदाने आपले महात्म्य सांगत आहे.]

४७४. एते सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थं परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृता स्वार्थाविरोधेन ये |

तेऽमी मानुषराक्षसा: परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये , ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ||

अर्थ

स्वतःच्या फायद्याचा त्याग करून दुसऱ्यांची कामे करतात ते सज्जन. स्वतःच्या मतलबाला धक्का न लावता [जेवढी जमेल तेवढी] मदत दुसऱ्यासाठी करतात त्यांना सामान्य लोक म्हणावे. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच नुकसान करता ते मनुष्य रूपी राक्षसच होत. [पण स्वतःचा काही फायदा सुद्धा नसताना] विनाकारणच दुसऱ्यांच नुकसान करणारांना काय म्हणावं ते आम्हाला [सुद्धा] समजत नाही.

Friday, October 14, 2011

४७३. यज्ञोत्सवे स्वपित्रा हठादनाकारिता सती गत्वा |

तनुमजहात्परिभूता क्वापि न गच्छेदनाहूत: || शतोपदेशप्रबन्ध गुमानि कवि

अर्थ

स्वतःच्या वडिलांनी यज्ञासाठी आमंत्रण दिलेले नसता हट्टाने [माहेरच्या प्रेमामुळे] सती तेथे गेल्यावर अपमान झाल्यामुळे सतीने प्राणत्याग केला. [म्हणून] आमंत्रण असल्याशिवाय कुठेही [अगदी जवळच्या नातलगांकडे सुद्धा] जाऊ नये.

४७२. न विना परिवादेन रमते दुर्जनो जन: |

काक: सर्वरसान्पीत्वा विनामेध्यं न तृप्यति ||

अर्थ

कुटाळक्या केल्याशिवाय दुष्टांना आनंद होत नाही.  कावळ्याला जरी सर्व चवदार पदार्थ मिळाले तरी निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.

Wednesday, October 12, 2011

४७१. सुजना: परोपकारं शूरा: शस्त्रं धनं कृपणा: |

कुलवत्यो मन्दाक्षं प्राणवियोगेऽपि नैव मुञ्चति ||

अर्थ

जीव जाण्याचा प्रसंग आला तरी सज्जन लोक दुसऱ्यावर उपकार करणे; शूरवीर शस्त्र [घेऊन पराक्रम] करणे; चिक्कू माणसे संपत्ती आणि घरंदाज स्त्रिया लज्जा सोडत नाहीत.

४७०. युक्तं सभायां खलु मर्कटानां शाखास्तरूणां मृदुलासनानि |

सुभाषितं चीत्कृतिरातिथेयी दन्तैर्नखाग्रैश्च विपाटनानि ||

अर्थ

माकडांची सभा असेल तर झाडांच्या [वेड्यावाकड्या] फांद्या म्हणजेच मउसूत बैठका; सभेतली सुंदर भाषण म्हणजे त्यांचे चीत्कार आणि नखांनी आणि दातांनी ओरबाडणे हाच पाहुणचार मिळणार.

४६९. यदसत्यं वदेन्मर्त्यो यद्वासेव्यं च सेवते |

यद् गच्छति विदेशं च तत्सर्वमुदरार्थत: ||

अर्थ

माणूस जे खोट बोलतो; नको त्याची नोकरी करतो [किवा नाईलाजाने नको ते भोगतो] परदेशी जातो ते सगळं पोटासाठी.

४६८. दुराचारो हि पुरुषो लोके भवति निन्दित: |

दु:खभागी च सततं व्याधितोऽल्पायुरेव च ||

अर्थ

वाईट आचरणाचा माणसाची जगभर निंदा होते. तो नेहमी दु:खी; आजारी आणि अल्पायुषी असतो.

४६७. अगतित्वमतिश्रद्धा ज्ञानाभासेन तृप्तता |

त्रय: शिष्यगुणा ह्येते मूर्खाचार्यस्य भाग्यत: ||

अर्थ

मूर्ख शिक्षक [जर] नशीबवान असेल तर [अभ्यासाच्या विषयात] बेताचि अक्कल; [शिक्षकावर नको इतका] विश्वास आणि वरवरच्या ज्ञानाने समाधान होणे असे तीन गुण? शिष्यामध्ये त्याला मिळतात.

४६६. मात्रा समं नास्ति शरीरपोषणं चिन्तासमं नास्ति शरीरशोषणम् |

मित्रं विना नास्ति शरीरतोषणं विद्यां विना नास्ति शरीरभूषणम् ||

अर्थ

आई सारखं [मुलाच्या] शरीराची वाढ होण्यासाठी दुसर [कोणी करत] नाही. काळजी सारखं शरीर पोखरणार दुसर काही नसतं. मित्रासारख दुसरं कोणी आनंद देणार नसतं शिक्षणासारखा शरीरासाठी दुसरा अलंकार नाही.

Tuesday, October 4, 2011

४६५. सर्वथा संत्यजेद्वादं न कंचिन्मर्मणि स्पृशेत् |

सर्वान् परित्यजेदर्थान् स्वाध्यायस्य विरोधिन: ||

अर्थ

[विद्यार्थ्याने] वादावादी संपूर्णपणे टाळावी; कोणालाही [जीवाला] लागेल असे बोलू नये; अभ्यासाला मारक ठरतील अशा सर्व गोष्टी सोडून द्याव्यात.

४६४. यदेवोपनतं दु:खात्सुखं तद्रसवत्तरम् |

निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषतः ||

अर्थ

दु:खानंतर उपभोगायला मिळालेलं सुख हे अधिक बहारदार वाटतं. उन्हातून तापुन आल्यावर झाडाची सावली जास्त आनंददायी असते.

४६३. या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना |

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभि: देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ||

अर्थ

[बुद्धीचा ] मंदपणा संपूर्णपणे नाहीसा करणारी; ऐश्वर्यसंपन्न अशी; कुन्दाची फुलं, चन्द्र, तुषारांचा हार यांच्याप्रमाणे [नाजूक, तेजस्वी, गोरीपान] असणारी; शुभ्र वस्त्रे धारण करणारी; जिचा हात श्रेष्ठ अशा वीणेच्या दांड्याने सुशोभित झाला आहे अशी; पांढऱ्या कमळावर बसणारी; ब्रह्मा, विष्णु, महेश वगैरे देव जिला नेहमी नमस्कार करतात अशी देवी सरस्वती माझे रक्षण करो.