भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, October 8, 2012

८०८. नि:स्वो वष्टि शतं शती दशशतं लक्षं सहस्राधिप: लक्षेश: क्षितिपालतां क्षितिपतिश्चक्रेशतां वाञ्छति |

चक्रेश: सुरराजतां सुरपति: ब्राहमं पदं वाञ्छति ब्रह्मा विष्णुपदं हरि: शिवपदम् आशावधिं को गत: ||
 
अर्थ

ज्याच्याजवळ काहीच नाही तो शंभर [रुपयाची नाणी तरी] मिळावी अशी इच्छा करतो. ज्याच्याजवळ शंभर आहेत त्याला त्याच्या दसपट मिळावे अस वाटत. हजार असतील त्याला लाख मिळावे असं वाटत. [हा फार जुन्या काळातील श्लोक असल्यामुळे लाख हेच भरपूर आहेत अस कवीला वाटतंय.] लक्षधीशाला आपण राजा असाव असं वाटत. [मांडलिक] राजाला चक्रवर्ती राजा व्हाव असं वाटत. चक्रवर्ती राजाला देवांचा राजा [इंद्र] व्हाव असं वाटत. इंद्राला ब्रह्मदेव असाव असं वाटत. ब्रह्मदेवाला विष्णु व्हायला पाहिजे असं वाटत विष्णु देवाला भगवान शंकर व्हावं असं वाटत. [खरी गोष्ट म्हणजे] आशा [खरं तर हाव] कुणाची बर शान्त झालीय? [सगळे आशेचे दास आहेत.]

८०७. यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद्भयम् |

एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ||

अर्थ

ज्याप्रमाणे पिकलेले फळ हे पडतच; त्याला दुसरी गतीच नाही, तसंच जन्माला आलेला माणूस हा मरणारच त्याला दुसरी काही भीती नाही.

Friday, October 5, 2012

८०६. तृणादपि लघुस्तूल: तूलादपि च याचक: |

वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति  ||

अर्थ

गवतापेक्षाही कापूस हलका असतो. कापसापेक्षाही याचक [भिकारी] हलका [क्षुद्र] असतो. [कविनी असं म्हटल्यावर चाणाक्ष वाचक विचारतो ] मग [इतका हलका असल्यास] वाऱ्यानी त्याला का उडवलं नाही बरं? [कवीचे उत्तर - वाऱ्यालाही भीती वाटली -भिकारीच हा ] मला पण काहीतरी मागेल. [भिकाऱ्याला सगळेच टाळतात.]

८०५. शिरसा धार्यमाणोऽपि सोम: सोमेन शम्भुना |

तथापि कृशतां धत्ते कष्ट: खलु पराश्रय: ||

अर्थ

भगवान शंकराने  पार्वती बरोबर असताना चंद्राला [अगदी] डोक्यावर धारण केलाय तरी [एवढा कौतुकाचा असूनही] तो कृश होत जातो. [यावरून असं दिसत की] खरोखर दुसऱ्याच्या आधारानी राहणं कठीणच असतं.

Wednesday, October 3, 2012

८०४. कार्यं हृदा विनिश्चिन्वन्नुपायं चिन्तयन् धिया |

निवर्तयंश्च हस्तेन संसिद्धिं लभते नर: ||

अर्थ

[आपल्याला नक्की काय] काम करायचं आहे ते मनात पक्क ठरवून; ते पुर करण्यासाठी लागणाऱ्या कृतीचा डोक्यात नीट विचार करून; ते हातानी अमलात आणलं की [तरच] कार्य सुफळ सम्पूर्ण होते. [एखाद काम पूर्ण होण्यास या सर्वं गोष्टी जरूर आहेत.]

८०३. दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकी गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् |

विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोष

अर्थ

अरे दारिद्र्या; तू अतिशय विचारी आहेस. खूप गुणी माणसावर तुझं अगदी नेहमी प्रेम असतं. [गुणी माणसाना गरिबी ठरलेलीच, ते दारिद्र्य त्यांना मुळी सोडत नाही] आणि अशिक्षित किंवा काही कला नसणाऱ्या माणसांवर तू जराही प्रेम करत नाहीस. [गरिबी त्यांच्या कडे फिरकत सुद्धा नाही.]

Tuesday, October 2, 2012

८०२. त्याज्यं न धैर्यं विधुरेऽपि काले धैर्यात्कदाचिद्गतिमाप्नुयात्स: |

यथा समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति तर्तुमेव ||

अर्थ

[कितीही] वाईट परिस्थिती आली तरी धीर सोडू नये. [गळाठून गेला तर आत्ताच नष्ट होईल पण] धीर एकवटून राहील तर केंव्हा तरी त्याला [संकटातून] बाहेर पडता येईल. समुद्रात जहाज फुटलं तरी सुद्धा [इतक्या अवघड परिस्थितीत असूनही] नावाडी [पोहून; फळकुटाला धरून; कोणाच्यातरी मदतीने] समुद्र  कसातरी पार करण्याची इच्छा करतो.