भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, May 27, 2013

१०२१. दिव्यं चूतरसं पीत्वा गर्वं नायाति कोकिल: |

पीत्वा कर्दमपानीयं भेको रटरटायते ||

अर्थ

अतिशय मधुर असा आम्रमंजीरीतला रस पिऊनही कोकीळ कधी गर्वाने फुगून जात नाही. [उलट मधुर कूजन करतो.] तर चिखलातले गढूळ पाणी पीत असूनसुद्धा बेडूक मात्र सारखा रटाळ आणि कर्णकटू आवाज काढत बसतो. [कशाचा माज करतो कोणास ठाऊक.]

Friday, May 24, 2013

१०२०. येनाहङ्कारयुक्तेन चिरं विलसितं पुरा |

दीनं वदति तत्रैव यः परेषां स निन्दितः ||

अर्थ

एखाद्या माणसानी जिथे पुष्कळ काळ रुबाबात घालवला असेल तिथेच नंतर तो लाचारीने बोलू लागला तर मग त्याची चेष्टा - टिंगल होते.

Thursday, May 23, 2013

१०१९. खलसख्यं प्राङ्मधुरं वयोऽन्तराले निदाघदिनमन्ते |

एकादिमध्यपरिणतिरमणीया साधुजनमैत्री ||

अर्थ

दुष्टांची मैत्री सुरवातीला सकाळच्या किंवा थंडीतल्या उन्हासारखी कोवळी - उबदार वाटते. मधल्या काळात चढत्या उन्हासारखी त्रासदायक वाटते आणि शेवटाला उन्हाळ्यातल्या उन्हासारखी चटके देणारी; अंगाची मनाची तगमग करणारी असते. सज्जनांची मैत्री मात्र सुरवातीला, मधे व शेवटी सारखीच रमणीय - सुखाची - हवीहवीशी वाटत राहते.

Wednesday, May 22, 2013

१०१८. अन्वयागतविद्यानामन्वयागतसम्पदाम् |

विदुषां च प्रभूणां च हृदयं नावलिप्यते ||
 
अर्थ
 
ज्यांना वंशपरंपरेने विद्या मिळालेली असते असे  घरंदाज विद्वान व ज्यांना  वंशपरंपरेने वैभव मिळालेले असते असे कुलीन श्रीमंत कधी गर्वाने उन्मत्त होत नाहीत.

Monday, May 20, 2013

१०१७. सम्पत्सरस्वती सत्यं सन्तानं सदनुग्रहः |

सत्ता सुकृतसम्भाराः सकाराः सप्त दुर्लभा:||

अर्थ

संपत्ती; सरस्वती [विद्या] सत्य; संतान [गुणी अपत्य] सज्जनांचा अनुग्रह [कृपा];  सत्ता आणि सुकृतसंभार [पुण्यराशी] या सात ’स’ने सुरुवात होणाऱ्या गोष्टी दुर्मिळ असतात.

१०१६. सुलभं वस्तु सर्वस्य न यात्यादरणीयताम् |

स्वदारपरिहारेण परदारार्थिनो जनाः ||
अर्थ

जी गोष्ट माणसाला सहजी मिळते तिचे कुणाला कौतुक वाटत नाही. म्हणून तर लोकांना  आपली बायको असताना परस्त्रीच खूप आकर्षण असत.

१०१५. सिंहक्षुण्णकरीन्द्रकुम्भगलितं रक्ताक्तमुक्ताफलं कान्तारे बदरीधिया द्रुतमगाद्भिल्लस्य पत्नी मुदा |

पाणिभ्यामवगुह्य शुल्ककठिनं तद्वीक्ष्य दूरे जहावस्थाने पततामतीव महतामेदृशी स्याद्गतिः ||

अर्थ

एका सिंहाने जिंकलेल्या गजेन्द्राच्या गंडस्थळातून गळून पडलेली पण रक्ताने माखलेली मोत्ये दुरून पाहून, ती बोरेच आहेत असे समजून एक भिल्लीण मोठ्या आनंदाने  धावतच ती वेचायला गेली. पण अरेरे ! हातात घेताच ही खपणं कठीण आहे म्हणून तिन ती लांब फेकून दिली .
योग्यतेने थोर माणसं सुद्धा नको तिथ पडली की त्यांची किंमत न कळल्यामुळे त्यांची अशीच अवस्था होणार दुसरं काय?