भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, June 28, 2012

७१५. गिरौ कलापी गगने पयोद: लक्ष्यान्तरेऽर्कंश्च जलेषु पद्मम् |

इन्दुर्द्विलक्षे कुमुदस्य बन्धुर्यो यस्य हृद्यो न हि तस्य दूर: ||

अर्थ

मेघ हा आकाशात असतो आणि मोर पर्वतावर असतो [तरी ढग दिसल्यावर मोर नाचत सुटतो] सूर्य एक लाख [मैलावर] असतो आणि कमळ पाण्यात असतं [तरी सूर्य उगवल्यावर कमळ उमलत ] रातकमळाचा  बांधव [मनापासून आवडता ] चन्द्र दोन लाख [मैलावर] अंतरावर असतो. [ते पण चंद्रोदय झाल्यावर विकसित होत ]  तर एखाद्याच्या मनात ज्यानी जागा मिळवली आहे तो त्याच्यासाठी जवळच असतो. [तो लांब असला तरी आपल्या मनात त्याच्या बद्दल विचार चालूच असतात.]

टीप: अंतरे लक्षात न घेता अर्थ लक्षात घ्यावा, कारण त्याकाळामधे कदाचीत कवीला चंद्र सूर्यापेक्षा लांब आहे असे वाटत असेल.

७१४. अवृत्तिकं त्यजेद्देशं वृत्तिं सोपद्रवां त्यजेत् |

त्यजेन्मायाविनं मित्रमन्नं प्राणहरं त्यजेत्  ||

अर्थ

ज्या प्रदेशात [आपल्याला] उपजीविकेचे साधन नसेल त्या ठिकाणाचा त्याग करावा. ज्या धंदा किंवा नोकरीचा त्रास होत असेल तर ती सोडून द्यावी. फसव्या [किंवा मनातून शत्रूसारखा आणि वरवर गोड बोलणाऱ्या] मित्राला टाळावे. जिवाला धोका होईल असे [कुपथ्याचे] जेवण जेवू नये.

७१३. देहीति वचनं कष्टं नास्तीति वचनं तथा |

तस्माद्देहीति नास्तीति न भवेज्जन्मनि  जन्मनि  ||

अर्थ =  'देहि' [दे]  असं बोलणं आणि तसंच 'नास्ति ' [नाही] असं उत्तर देण अतिशय अवघड असत म्हणून आताच्या आणि पुढच्या कुठल्याही जन्मात 'देहि ' किंवा 'नास्ति ' असं म्हणण्याची वेळ यायला नको. [रे बाबा ]

Monday, June 25, 2012

७१२. मार्जारभक्षिते दु:खं यादृशं गृहकुक्कुटे |

न तादृङ्ममताशून्ये कलविङ्केऽमूषके  ||

अर्थ

घरातला कोंबडा जर मांजरीनी खाल्ला तर [आपल्याला] जसं दु:ख होत तसं ज्याच्यावर आपला जीव नाही अशी चिमणी किंवा उंदीर तिनी खाल्ला तर आपल्याला होत नाही. [आपल दु:ख हे खरं तर आपल्या आसक्ती मुळे असतं. ]

Sunday, June 24, 2012

७११. मुक्त्वा नि:श्रीकमप्यब्जं मराली न गतान्यत: |

भ्रमराली त्वगाद्वेगादिदं सदसदन्तरम् ||

अर्थ

ज्याचं वैभव लयाला गेलेलं आहे [ज्यातला मध संपलाय; ते सुकलय अशा] कमळाला हंसी [तरीसुद्धा] सोडून जात नाही. पण भुंग्यांची रांग [मात्र सगळी] वेगात उडून जाते. हाच सज्जन आणि दुर्जन यांच्यातला फरक आहे.

७१०. जीर्यन्ति जीर्यत: केशा: दन्ता जीर्यन्ति जीर्यत: |

जीवनाशा धनाशा च जीर्यतोऽपि न जीर्यति  ||

अर्थ

म्हातारपण आल्यामुळे [वृद्धांचे] केस गळतात; दात पडत जातात. पण [खूप] वृद्ध झाला तरी पैशाची हाव आणि जगण्याची इच्छा कमी होत नाही. [खरं तर जसं जसं  म्हातारपण येईल तसं तसं  आसक्ती सोडली पाहिजे.]
७०९. वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये  |
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ || रघुवंश १

अर्थ

[मी] शब्द आणि अर्थ यांचे सम्यक आकलन होऊन [मनोहर काव्यनिर्मिती व्हावी म्हणून] शब्द आणि अर्थ जसे एकमेकात सामावलेले असतात त्याप्रमाणे समरस असलेल्या; सर्व जगाचे माता पिता असलेल्या देवी पार्वती आणि भगवान शंकर यांना वंदन करतो.