भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 1, 2025

१४२३. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह:‌ ।

सदसद्गृहभिक्षान्नं सोमपानं दिने दिने ॥


अर्थ

भिक्षाहारी .........

भिक्षा मागून जेवण करणाऱ्याला (खरं म्हणजे)उपास‌ केल्याचं ( पुण्य ) मिळते. भिक्षा मागणे म्हणजे दान स्वीकारणे नाही. चांगल्या किंवा वाईट लोकांकडून सुद्धा भिक्षा मागणे म्हणजे अमृत पिण्याप्रमाणे (पुण्यकारक) आहे.


१४२२. नमोस्तुते व्यास विशालबुद्धे

फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।

येन त्वया भारत तैल पूर्णः

प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः ।।


अर्थ : 

प्रकांड पंडित असणाऱ्या, पूर्ण उमललेल्या कमळाच्या पाकळी प्रमाणे दीर्घ नेत्र असणाऱ्या आणि ज्यांनी (महा)भारत रूपी अगदी भरपूर तेल असणारा, ज्ञानमय असा झगझगीत प्रकाश देणारा दीप प्रज्वलित केलात अशा, हे व्यास महर्षी, तुम्हाला (मी) वंदन करतो/ते. 

Monday, July 28, 2025

१४२१. पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत्पतति भूतले ।

उत्थाय च पुनः पीत्वा, पुनर्जन्म न विद्यते ॥

अर्थ :- (हा चार्वाक दर्शनाच्या तत्वज्ञानाचा श्लोक आहे)
(भरपूर दारू) पिऊन पुन्हा, जो जमिनीवर लोळण घेईल आणि उठल्यावर पुन्हा प्यावी. (जमेल तेवढा उपभोग घ्यावा.) पुनर्जन्म वगैरे काही नसते.

Friday, July 25, 2025

१४२०. अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभेषजात्।

नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।

अर्थ

अच्युत, अनन्त, गोविन्द या नावांच्या उच्चारणरुपी औषधामुळे सर्व रोग दूर होतात. हे मी अगदी खरं खरं म्हणतो आहे.  

Thursday, June 26, 2025

१४१९. सर्पो नृत्यति चेन्मञ्चे चक्राटस्तत्र कारणम्।

तं निगृह्य खलं पूर्वं कुर्यात् सर्पावरोधनम्॥


अर्थ : जर व्यासपीठावर (दुष्ट माणूस खूप महत्त्वाची) सूत्रे हलवत असेल तर गारुडी हा (मुख्य सूत्रधार) कारण आहे. त्या दुष्टाला पहिल्यांदा ताब्यात घेऊन मग सापाला निर्बंध घालावेत. 

दुष्ट माणूस - सर्प


Monday, June 16, 2025

१४१८. जन्मदु:खं जरादु:खं नित्यदु:खं पुनः पुनः।

संसारसागरे दु:खं तस्माज्जागृहि जागृहि॥

संसार रूपी समुद्रात (प्रत्येकाला) जन्माच्या वेळी, म्हातारपणी (वेगवेगळ्या दुखण्यामुळे) दु:ख असे सारखे दु:खच भोगावे लागते.म्हणून, जागा हो. जागा हो.(आणि मोक्षप्राप्तीचा प्रयत्न कर)

 


Friday, April 4, 2025

१४१७. गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे ।

अपारकरुणापूरतरङ्गितदृशे नमः ॥

विघ्नरूपी अंध:काराचा नाश करणारा, व करुणारूपी अथांग जलराशींनी भरलेल्या डोळ्यांचा [असा] गणपती नावाच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.