भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, January 18, 2012

५६६. पादाहतं समुत्थाय मूर्धानमधिरोहति |

स्वस्थादेवापमानेऽपि देहिनस्तद्वरं रज: ||

अर्थ

अपमान झाला असूनही गपचूप [सगळ सहन करत राहणाऱ्या] बसून राहणाऱ्या माणसापेक्षा, लाथाडलं गेल्यावर उठून डोक्यावर जाऊन बसणारी धूळ सुद्धा बरी [फुकटचे अपमान सहन करणे म्हणजे सहनशीलता नव्हे स्वाभिमान असणं जरुरी आहे.]

Tuesday, January 17, 2012

५६५. क्रोधो वैवस्वतो राजा तृष्णा वैतरणी नदी |

विद्या कामदुघा धेनु: सन्तोषो नन्दनं वनम् || शुकनीति

अर्थ

राग [येणं] म्हणजे यमराजा [मृत्यूला आमंत्रण], हावरटपणा म्हणजे वैतरणी [नरकातली यातना भोगायला लावणारी] नदी, विद्या [आत्मज्ञान; इतर विद्या सुद्धा] इच्छित वस्तु देणारी कामधेनु आणि मनाचा संतोष म्हणजे स्वर्गातील नंदनवन बाग.

Monday, January 16, 2012

५६४. तिलवत्स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यं तिलगुललड्डुकवत् सम्बन्धे अस्तु सुवृत्तत्वम् |

अस्तु विचारे शुभसङ्क्रमणं मङ्गलाय यशसे कल्याणी सङ्क्रातिरस्तु व: सदाहमाशासे ||

अर्थ

मन हे तिळाप्रमाणे स्निग्ध [तिळाच्या बाबतीत तेल युक्त मनासाठी प्रेमळ] राहो, भाषेत गुळाप्रमाणे गोडवा राहू दे, परस्पर संबंधात घट्ट मैत्री असावी, [खडबडीतपणा नको.] विचार हे अधिकाधिक कल्याणकारक होवोत, त्यामुळे शुभ घडो आणि कीर्ति मिळो असे संक्रमण या संक्रांतीने होवो अशी मी नेहमी इच्छा करते /तो.

५६३. आपदां कथित: पन्था: इन्द्रियाणामसंयम: |

तज्जय: सम्पदां मार्ग: येनेष्टं तेन गम्यताम् || चाणक्यनीति

अर्थ

असं [ज्ञात्यांनी] सांगितलय की संकटे येण्याचा मार्ग म्हणजे इंद्रियांवर ताबा नसणे आणि वासनांवर ताबा असणे हा वैभव [मिळण्याचा] मार्ग आहे. [तर आता] जे [तुम्हाला] हवं असेल [त्या रस्त्याने] जा.

५६२. ये च मूढतमा लोके ये च बुद्धेः परं गता: |

त एव सुखमेधन्ते क्लिश्यन्तरितो जन: ||

अर्थ

या जगामध्ये जे महामूर्ख असतात आणि जे अतिशय बुद्धिमान असतात तेच सुखी होतात आणि अधले मधले असतात त्यांना त्रास सहन करावा लागतो.

Thursday, January 12, 2012

५६१. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पय: |

जातौ जातौ नवाचारा: नवा वाणी मुखे मुखे ||

अर्थ

[प्रत्येक] माणसाच डोकं वेगळ चालतं. प्रत्येक पाणवठ्यावरच्या पाण्याची चव वेगळी असते. सगळ्या जमातींमध्ये रीतिभाति वेगवेगळ्या असतात. प्रत्येक माणसाची बोलण्याची धाटणी वेगळी असते.

Wednesday, January 11, 2012

५६०. मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा |

क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादर: ||

अर्थ

मूर्ख माणसाची पाच लक्षणं आहेत - गर्विष्ठपणा; कडवट बोलणं; चिडणं; हेकटपणे वाद घालणं आणि दुसऱ्याच्या बोलण्याबद्दल तुच्छता दाखवणं [म्हणून त्यांच्या बोलण्याचा नीट विचारच करायचा नाही.]